तक्रारदारतर्फे वकील ः- श्री. व्ही. के. लखेडा
सामनेवाले तर्फे प्रतिनीधी ः- श्री. अशोक शिंदे :
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 22/08/2017 रोजी घोषीत )
1. तक्रारदारांनी सामनेवाले बँकेकडून कर्ज घेतले होते व कर्जाची नियमीतपणे परतफेड करीत होते. सामनेवाले यांनी कर्जाची रक्कम अपेक्षापेक्षा जास्त दाखविली. तसेच तक्रारदार यांना Re-Payment Schedule देण्यात आले नाही. सबब, तक्रारदारांनी सामनेवाले विरूध्द ही तक्रार दाखल करून विविध मागण्या केल्या आहेत. तक्रारदारानी तक्रारीसोबत कागदपत्रे दाखल केली. सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते मंचात उपस्थित झाले आपली लेखीकैफियत शपथेवर दाखल केली. त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
2. तक्रारदारानूसार ते M/s. Laboratories Griffon Pvt. Ltd. येथे नोकरीस आहेत व सामनेवाले बँकेकडून त्यांनी दि. 11/12/2000 ला रू. 2,00,000/-,चे व त्यानंतर दि. 27/11/2002 ला रू. 1,50,000/-,कर्ज घेतले. पहिले कर्ज स्वतःच्या नावे होते व दुसरे कर्ज त्यांची पत्नी श्रीमती. वंदना अडसूले यांचे नावे होते. सामनेवाले यांनी कर्जाची रक्कम रू. 3,75,000/-, अशी दाखविली. कर्जा प्रति चा हप्ता त्यांच्या पगारातुन वजा करण्यात येत होता. तक्रारदार यांनी नियमीतपणे हप्ते भरले फक्त 2003 मध्ये 6 महिन्याचा अपवाद वगळता. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या कंपनीला पत्र लिहिल्यानंतर त्यांच्या कंपनीने पगारातुन रू. 7,500/-,हप्त्यापेाटी वजा करण्याचे मान्य केले. परंतू तक्रारदार यांच्या पगारातुन दरमहा रू. 6,000/-,वजा करण्यात येत होते. सामनेवाले यांनी दाखविलेल्या थकीत रकमेबाबत तक्रारदार यांचे समाधान न झाल्यामूळे व तक्रारदार यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांनी पूर्ण परतफेड केली होती. सबब त्यांनी सामनेवाले यांना Re-Payment Schedule ची मागणी केली. परंतू सामनवेाले यांनी तक्रारदार यांच्या नोटीसला जबाब दिला नाही. सबब, तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून Re-Payment Schedule त्यांना ताबडतोब देण्यात यावे. हप्त्याची वसुली थांबविण्यात यावी व मानसिक त्रासाकरीता रू. 75,000/-,ची मागणी केली.
3. सामनेवाले यांचेनूसार तक्रारदारांनी दिशाभूल करणारी कथने नमूद केली. तक्रारदार यांची तक्रार खोटी व क्षुल्लक आहे. तक्रारदार यांना कर्जाची परतफेड करावयाची नसल्यामूळे ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार यांना सामनेवाले यांनी रू. 2,00,000/-,वैयक्तिक कर्ज म्हणून दि. 11/12/2000 ला मंजूर केले होते व याची परतफेड 60 हप्त्यामध्ये रू. 5,600/-,याप्रमाणे करावयाची होते. त्यानंतर, तक्रारदारांनी पुन्हा वैयक्तिक कर्जाकरीता नोव्हेंबर 2002 मध्ये विनंती केली त्यावेळी ही रक्कम त्यांची पत्नी श्रीमती. वंदना यांचे नावे मंजूर करण्यात आली. हे कर्ज 60 हप्त्यामध्ये दरमहा रू. 4,200/-,परतफेड करावयाची होते. तक्रारदारानी दोन्ही कर्जाबाबत त्यांच्या पगारामधून हप्ता वजा करण्यात यावा याबद्दल संमती दिली. तक्रारदारानी दरमहा रू. 9,800/-,चा हप्ता देणे आवश्यक होते. परंतू तक्रारदारानी नियमीतपणे रू. 6,000/-,भरीत होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना थकीत झालेल्या रकमेबाबत वारंवार पत्र दिले. तक्रारदार हे स्वच्छ अंतःकरणाने मंचासमक्ष आले नसल्यामूळे ही तक्रार खारीज करण्यात यावी.
4. उभयपक्षांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला. तक्रारदार यांचे वतीने वकील श्री. व्ही. के. लखेडा व सामनेवाले तर्फे प्रतिनीधी श्री. अशोक शिंदे यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
5. उपरोक्त बाबींचा विचार करता, खालील बाबी हया मान्य आहेत. असे समजता येईल.
1. सामनेवाले क्र 1 यांनी दि. 11/12/2000 ला तक्रारदार यांना त्यांचे नावे रू. 2,00,000/-,व दि. 27/11/2002 ला त्यांच्या पत्नीच्या नावे रू. 1,50,000/-,चे वैयक्तिक कर्ज मंजूर केले. दोन्ही कर्जाचे हप्ते तक्रारदार यांच्या पगारातुन परस्पर वजा करण्यात येतात. माहे जानेवारी 2004 पासून तक्रारदार यांच्या पगारातुन दरमहा रू. 6,000/-,कर्जापोटी वजा करण्यात येतात. युक्तीवादाच्या तारखेपर्यंत कर्जाची परतफेड झालेली नव्हती.
6. तक्रार निकाली काढण्याकरीता खालील बाबी महत्वाच्या ठरतात.
(अ) सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसुर केला काय ?
(अ-1) साधारणतः कर्ज मंजूर करणारी बँक किंवा वित्तीय संस्था कर्जदार यांना Re-Payment Schedule देते. त्यावरून कर्जदार याला हप्त्यामधील किती रक्कम मूळ रकमेकरीता व किती रक्कम व्याजापोटी जमा होणार आहे याची माहिती प्राप्त होते. यावरून कर्जदार हप्त्याबाबत किंवा काही रक्कम आगाऊ भरण्याबाबत विचार करू शकतो. तो आपला हप्ता कमी किंवा जास्त करू शकतो. कर्जाचा शेवटचा हप्ता केव्हा आहे, याची त्याला स्पष्ट कल्पना येते. परंतू या तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी असे काही Re-Payment Schedule तक्रारदार यांना दिल्याचे संचिकेवरून स्पष्ट होत नाही. महत्वाची बाब म्हणजे तक्रारदार यांनी दि. 12/11/2009 ला वकीलामार्फत नोटीस पाठवून सामनेवाले यांना त्याबाबत विशेष करून मागणी केली होती ती पूर्ण केलयाचे दिसून येत नाही.
(अ-2) तक्रारदार यांनी रू. 2,00,000/-,चे कर्ज दि. 11/12/2000 ला व य. 1,50,000/-, चे कर्ज दि. 27/11/2002 ला घेतले. कर्जाची नियमीतपणे परतफेड केल्यानंतर सुध्दा सामनेवाले यांनी दाखल केलेल्या Secured Loan Installment Statement वरून रू. 2,00,000/-,च्या कर्जापोटी दि. 31/03/2011 ला रू. 2,05,262/-, व रू. 1,50,000/-,चेकर्जापोटी दि. 31/03/2011 रू. 1,20,718/-, असे एकुण रू. 3,25,980/-,रक्कम बाकी असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांनी अनु क्र. 11 व 9 वर्ष हप्ता भरल्यावर सुध्दा मूळ रकमेपैकी फक्त रू. 24,020/-, कमी झाले आहेत. तक्रारदार भरत असलेल्या रू. 6,000/-,च्या हप्त्यापैकी पहिल्या व दुस-या कर्जापोटी प्रत्येकी रू. 3,000/-,जमा दाखविण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या कर्जासाठी संपूर्ण रक्कम व्याजापोटी जमा दाखविण्यात आलेली आहे व मूळ रक्कमेपैकी रूपया एक सुध्दा जमा दाखविण्यात आलेला नाही. 1 वर्षात सामनेवाले यांनी व्याजाकरीता रू. 36,400/-,जमा करून घेतले आहे. अशाप्रकारे जर सामनेवाले यांनी ग्राहकाच्या कर्जाची परतफेडीचे नियोजन केले तर ‘ग्राहक’ कधीच कर्ज मुक्त होणार नाही. दुस-या कर्जाकरीता काही रक्कम व्याजापोटी व काही रक्कम मूळ रक्कमेपोटी जमा दाखविण्यात आली आहे. जर मूळ रक्कम दर महिन्याला कमी होत आहे तर व्याजाची रक्कम सुध्दा कमी कमी होत जाणे अपेक्षीत आहे. परंतू या Statement मध्ये व्याजाच्या रकमेमध्ये सातत्याने चढउतार दिसत आहे. अधिकतम व्याजाची रक्कम रू. 2,265/-,दाखविण्यात आली आहे. जर सामनेवाले यांनी रू. 6,000/-,पैकी या दुस-या कर्जाकरीता रू. 2,600/-, किंवा 2,700/-, रक्कम जमा केले असते व पहिल्या कर्जाकरीता रू. 3,300/-, किंवा 3,400/-,जमा केले असते तर दोन्ही कर्जातील मूळ रक्कम हळू हळू कमी झाली असती. सामनेवाले यांनी तक्रारदारानी भरीत असलेल्या हप्त्याकरीता कसे नियोजन करावे याबाबत तक्रारदार यांची संमती घेतल्याचे दिसून येत नाही.
(अ-3) सामनेवाले यांनी दाखल केलेल्या Secured Loan Installment Statement
वरून वर्षाच्या सुरूवातीला किती मूळ रक्कम व किती व्याज देय होते व वर्षाच्या शेवटी ही रक्कम किती होती हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदार यांना आपल्या जबाबदारीबद्दल बोध होत नाही. सामनेवाले यांनी आपल्या व्यवहाराबाबत पारदर्शक व स्पष्ट असणे अपेक्षीत असते. तसे न करणे, सेवेमध्ये त्रृटी असल्याचे सूचक आहे.
(ब) सामनेवाले यांनी अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली का ?
(ब-1) उपरोक्त चर्चेमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या पहिल्या कर्जाकरीता संपूर्ण रक्कम फक्त व्याजापोटी समायोजित करून एका प्रकारे अनुचित व्यापार पध्दत अवलंबिल्याचे स्पष्ट होते. हे करण्याकरीता त्यांनी तक्रारदार यांना कल्पना दिली नाही किंवा त्यांची संमती सुध्दा घेतली नाही.
(ब-2) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दि. 11/12/2000 ला रू. 2,00,000/-,चे कर्ज मंजूर केले व त्यानंतर पुन्हा दोन वर्षानी रू. 1,50,000/-,चे कर्ज तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे मंजूर केले. पहिल्या कर्जाचा हप्ता रू. 5,600/-, व दुस-या कर्जाचा हप्ता रू. 4,200/-,असा एकुण रू. 9,800/-,हप्ता झाला. आमच्या मते सामनेवाले यांनी तक्रारदारांना दुसरे कर्ज मंजूर करतांना तक्रारदार यांचा पगार किती आहे व तो दरमहा रू. 9,800/-,भरू शकतो का ? किंवा त्याच्या हप्त्याची रक्कम कमी करून अवधी वाढवावा याबाबत विचार करणे आवश्यक होते. एैपत नसतांना कर्ज मंजूर करणे म्हणजे कर्ज बुडीत जाण्यासारखे आहे. रू. 9,800/-, भरण्याकरीता तक्रारदार यांचा पगार तीनपट ते चारपट असणे आवश्यक होते किंवा ते अपरिहार्य होते. तेव्हा तक्रारदार यांना दुसरे कर्ज मंजूर करतांना त्यांचा पगार किती होता ते पाहणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्याच्या पगाराबाबत कागदपत्रे दाखल केली आहेत. त्याप्रमाणे तक्रारदार यांचा माहे डिसेंबर 2009 मध्ये संपूर्ण पगार रू. 20,619/-,माहे जानेवारी 2009 मध्ये रू. 25,637/-, व माहे जानेवारी 2010 मध्ये रू. 28,083/-, होता. तक्रारदार यांचा सन 2000 व 2002 मध्ये किती पगार होता याबाबत कागदपत्रे सम्मीलीत नाही. उपरोक्त माहितीवरून असे निश्चित म्हणता येईल की, तक्रारदार यांचा संपूर्ण पगार 2002 मध्ये रू. 15 ते 16,000/-,पेक्षा जास्त नसावा असा पगार असतांना त्यांच्याकडून रू. 9,800/-, चा हप्ता, जो त्यांच्या पगाराच्या अंदाजे 70 टक्के होईल, अपेक्षा करणे म्हणजे अव्यवहार्य बाब. सामनेवाले यांनी असा हप्ता त्यांच्या धोरणाप्रमाणे, नियमाप्रमाणे किंवा तरतुदीप्रमाणे अपेक्षीत तरी आहे का ? याबाबत जरूर चौकशी करावी.
(ब-3) सामनेवाले यांचेनूसार रू. 2,00,000/-, चे कर्ज दरमहा रू. 5,600/-,प्रमाणे 60 महिन्यात व रू. 1,50,000/-,चे कर्ज दरमहा रू. 4,200/-,प्रमाणे 60 महिन्यात तक्रारदार परतफेड करू शकत होते. याप्रमाणे तक्रारदार यांनी 60 महिन्यात रू. 6,88,000/-,परतफेड करणे आवश्यक होते व ही रक्कम मूळ रकमेच्या दुपटीपेक्षा कमी होते. सामनेवाले यांनी त्यांची लेखीकैफियत/पुराव्यामध्ये कुठेही नमूद केले नाही की, तक्रारदार यांनी एकुण किती रक्कम अदा केली व किती शिल्लक आहे. कदाचित त्यांनी हे काम संकोचामूळे केले नसावे. त्यांनी हे आकडे नमूद केले असते तर त्यांचा अनुचित व अव्यवहार्यपणा उघड झाला असता. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राप्रमाणे त्यांच्या पगारातुन दि. 08/02/2001 ते माहे डिसेंबर 2003 पर्यंत कर्जापोटी रू. 1,38,517.20 पैसे वजा झाले आहेत. सामनेवाले यांच्या लेखीकैफियतीमधील परिच्छेद क्र. 4.4 प्रमाणे तक्रारदार यांनी माहे जानेवारी 2004 पासून ते माहे मार्च 2011 पर्यंत नियमीतपणे दरमहा रू. 6,000/-, कर्जापोटी भरले. या दरानी ही रक्कम 5,10,000/-,होते. रू. 1,38,517.20 पैसे + रू. 5,10,000 = रू. 6,48,517.20 पैसे होते. सामनेवाले यांचेनूसार दि. 31/03/2011 ला देय रक्कम रू. 3,25,980/-,एवढी होती. भरलेली रक्कम रू. 6,48,517.20 पैसे अधिक देय रक्कम रू. 3,25,980 = रू. 9,74,497.20 पैसे एवढी होते. एका अर्थाने तक्रारदार यांनी जे कर्ज घेतले होजे, रू. 3,50,000/-,त्या रकमेच्या जवळपास पाऊने तीन पट ही रक्कम होते. तक्रारदार यांच्या कडून देय रक्कम 6,88,000/-,असतांना त्यांच्या कडून रू. 9,74,497.20 पैसे वसुल करण्यात येत आहेत.
(ब-4) पहिले कर्ज घेऊन अंदाजे 17 वर्ष होत आहे तर दुसरे कर्ज घेऊन अंदाजे 15 वर्ष होत आहे. परंतू या कर्जाची परतफेड केव्हा पर्यत होणार आहे हे अनिश्चित आहे. त्याबाबत सामनेवाले यांनी कोणतेही स्टेटमेंट सादर केलेले नाही. मा. सर्वोच्च न्यायालयानी श्री. हूकुमचंद गुलाबचंद जैन विरूध्द फुलचंद लखमीचंद जैन AIR 1965 SC 1692 मध्ये अभिव्यक्त केलेल्या मताप्रमाणे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 च्या कलम 44 अ च्या प्रयोजनाचे व नैसर्गीक न्यायाच्या दृष्टीने विचार केल्यास या तक्रारीमध्ये मूळ रकमेच्या दुप्पटपेक्षा जास्त रक्कम वसुल करणे, हे अनुचित व्यापार पध्दत ठरते.
7. सामनेवाले यांनी मंचाचे अधिकार क्षेत्राबाबत आक्षेप घेतला आहे. त्याच्या प्रमाणे सहकारी संस्था व सदस्यामध्ये वाद असल्यामूळे तो वाद महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा 1960 प्रमाणे निकाली काढणे आवश्यक आहे व त्याबाबत या मंचास अधिकार प्राप्त होत नाही.
8. ग्रा.सं.कायदयाच्या कलम 3 प्रमाणे या मंचास अतिरीक्त अधिकार दिलेले आहेत. याबाबत दूमत असण्याचे कारण नाही. तक्रारदार यांच्या प्रमुख मागणी पैकी एक मागणी ही Re-Payment Schedule पुरविण्याबाबत आहे. आमच्या मते ही मागणी स्पष्टपणे सेवा प्रदान करण्या सबंधीत असल्यामूळे या मंचास निश्चितपणे ही तक्रार चालविण्याचा अधिकार प्राप्त होतो.
9. सामनेवाले यांनी जर अनुचित व्यापार पध्दत अवलंबून रू. 7,00,000/-,पेक्षा जास्त रक्कम तक्रारदार यांचेकडून वसुल केली असल्यास, नैसर्गीक न्यायाच्या दृष्टीने ती रक्कम तक्रारदार यांना परत करणे न्यायोचित/संयुक्तिक होईल असे आम्हास वाटते.
10. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
11. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 167/2010 बहूतांशी मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसुर केला व अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी रू. 2,00,000/-,( दोन लाख) व रू.1,50,000/-,(एक लाख पन्नास हजार) कर्जाबाबत Re-Payment Schedule दि. 30/09/2017 पर्यंत किंवा त्यापूर्वी तक्रारदार यांना दयावे. तसे न केल्यास दि. 01/10/2017 पासून प्रतीमहा रू. 1,000/-,(एक हजार) प्रमाणे नुकसान भरपाई दयावी.
4. सामनेवाले यांनी तक्रादार यांच्याकडून रू. 2,00,000/-,(दोन लाख्) च्या कर्जाकरीता एकुण रक्कम रू. 4,00,000/-,(चार लाख) व रू.1,50,000/-, (एक लाख पन्नास हजार) च्या कर्जाकरीता एकुण रक्कम रू. 3,00,000/-, (तीन लाख) वसुल केली असल्यास पुढील रक्कम वसुल करण्याच्या अनुचित व्यापार पध्दतीपासून प्रतिबंधीत करण्यात येते.
5. सामनेवाले यांनी जर रू. 7,00,000/-,(सात लाख) पेक्षा जास्त रक्कम तक्रारदार यांच्याकडून कर्जापोटी वसुल केली असल्यास, अशी अतिरीक्त रक्कम तक्रारदार यांना दि. 30/09/2017 पर्यंत परत करावी. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/10/2017 पासून अदा करेपर्यंत द.सा.द.शे 18 टक्के व्याज लागु राहील.
6. सामनेवाले यांनी मानसिक त्रासासाठी तक्रारदार यांना रू. 50,000/-,(पन्नास हजार) व तक्रारीचा खर्च रू. 10,000/-,(दहा हजार) दि. 30/09/2017 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/10/2017 पासून अदा करेपर्यंत 10 टक्के व्याज लागु राहील.
7. आदेशाची प्रत 1) तक्रारदार 2) सामनेवाले 3) M/s. Laboratories Griffon Pvt. Ltd 20 Haines Road Mumbai – 400011 यांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
8. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-