(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारित दिनांक- 30 डिसेंबर, 2017)
01. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष फर्म आणि तिचे भागीदार यांचे विरुध्द प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली करारातील भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष क्रं-1) ते 4) हे प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे भागीदार असून सदर फर्मचा नोंदणी क्रं-एन.जी.पी./6111/1999-2000 असा आहे. (सोबत फर्मचे नोंदणी प्रमाणपत्र जोडण्यात येत आहे) तर विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हीचे मालकीची मौजा झिंगाबाई टाकळी, तालुका जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-12, खसरा क्रं-23, क्षेत्रफळ- 2 हेक्टर 02 आर एवढी जमीन असून ती विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याची पत्नी आहे. विरुध्दपक्षांचा भूखंड विक्रीचा मुख्य व्यवसाय आहे.
विरुध्दपक्ष फर्म तर्फे उपरोक्त जमीनीवर प्रस्तावित ले आऊट पाडून भूखंड विक्रीस काढले. तक्रारकर्तीने प्रस्तावित ले आऊट मधील भूखंड क्रं-137, क्षेत्रफळ-1740 चौरसफूट एकूण किम्मत रुपये-56,000/- मध्ये विकत घेण्याचे निश्चीत केले, त्या प्रमाणे विरुध्दपक्ष फर्म तर्फे विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा याने तक्रारकर्तीचे नावे भूखंड विक्री बाबत दिनांक-08/12/1999 रोजी बयानापत्र करुन दिले, बयानापत्राचे वेळी तक्रारकर्तीने बयानाराशी म्हणून आंशिक रक्कम रुपये-2000/- दिली व उर्वरीत रक्कम ही प्रतिमाह रुपये-2000/- प्रमाणे देण्याचे बयानापत्रात नमुद करण्यात आले. भूखंडाची संपूर्ण किम्मत अदा केल्या नंतर भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देऊन ताबा देण्यात येणार होता. बयानापत्रा वर तक्रारकर्ती तसेच विरुध्दपक्ष क्रं-4) आणि दोन साक्षदारांच्या सहया आहेत.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने भूखंडाच्या मासिक किस्ती विरुध्दपक्षा कडे जमा केल्यात व फर्म कडून पावत्या प्राप्त केल्यात. तिने शेवटची किस्त दिनांक-01/06/2008 रोजी भरली. सदर भूखंडाची रक्कम स्विकारताना विरुध्दपक्षा तर्फे कधीही विलंब शुल्काची मागणी करण्यात आली नाही. विरुध्दपक्षाने उशिराने किस्तीच्या रकमा स्विकारल्याने बयानापत्रातील अटीचा स्वतःच विरुध्दपक्षाने भंग केलेला आहे. बयानापत्रात नमुद केल्या प्रमाणे सतत तीन किस्तीच्या रकमा न भरल्यास भूखंड करार रद्द होईल अशी अट होती परंतु तक्रारकर्तीने बुक केलेला भूखंड रद्द झाल्या बाबत विरुध्दपक्षा तर्फे कधीही तिला मौखीक वा लेखी कळविण्यात आलेले नाही.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, दिनांक-01/06/2008 च्या नंतर तक्रारकर्ती बरेचदा विरुध्दपक्षाला भेटली व भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. दिनांक-30/08/2011 रोजी तक्रारकर्ती तिचे पती सोबत विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचेशी तिचे घरी जाऊन भेटली व विक्रीपत्र नोंदवून देण्याची विनंती केली असता विरुध्दपक्ष क्रं-5) हिने रुपये-4,00,000/-एवढया रकमेची मागणी करुन रक्कम न दिल्यास करारातील भूखंड दुस-या व्यक्तीस विक्री करण्यात येईल अशी ताकीद दिली. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक-08/09/2011 रोजी विरुध्दपक्षास वकीला मार्फत कायदेशीर नोटीस पाठवून मागणी केली, सदर नोटीसला विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं 2) यांनी उत्तर पाठविले परंतु विरुध्दपक्ष क्रं-3) ते 5) यांना नोटीस मिळूनही त्यांनी उत्तर दिले नाही. विरुध्दपक्षानां नोटीस प्राप्त झाल्या बाबत पोच सादर करण्यात येत आहे. त्यानंतर सुध्दा तक्ररकर्तीने दिनांक-24/09/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-3) ते 5) यांना नोटीस पाठविली परंतु ती न स्विकारता परत आली.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की,विरुध्दपक्षां विरुध्द दिवाणी न्यायालय, नागपूर येथील सिव्हील जज, सिनियर डिव्हीजन यांचे न्यायालयात जमीनी संदर्भात विशेष दिवाणी दावा क्रं-639/2000 सुरु असल्याचे तसेच ग्राहक मंचात सुध्दा काही तक्रारी दाखल असल्याचे तिला नंतर समजले परंतु विरुध्दपक्षानीं त्यांचे विरुध्द दिवाणी न्यायालयात सुरु असलेल्या न्यायालयीन दाव्या संबधी तिला कधीही माहिती न देऊन तिची फसवणूक केलेली आहे. तक्रारकर्तीने करारातील भूखंड क्रं 137 ची संपूर्ण किम्मत विरुध्दपक्षांना अदा करुनही ते विक्रीपत्र नोंदवून देत नाहीत म्हणून शेवटी तिने ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्षानां आदेशित करण्यात यावे की, त्यांनी करारातील भूखंड क्रं-137 चे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे नोंदवून द्दावे.
(2) तक्रारीचा निकाल लागे पर्यंत विरुध्दपक्षानीं भूखंड क्रं-137 हा अन्य कोणास विक्री करु नये असे प्रतिबंधीत करण्यात यावे.
(3) विरुध्दपक्षांना वादातील भूखंड क्रं-137 चे विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे करुन देणे शक्य नसल्यास विरुध्दपक्षाचे त्याच ले आऊट मधील अथवा अन्य ले आऊट मधील मंजूरी प्राप्त तेवढयाच क्षेत्रफळाचे भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे नोंदवून देण्याचे आदेशित व्हावे. परंतु विरुध्दपक्षानां असेही करणे शक्य नसल्यास वादातील भूखंड क्रं-137 ची आजचे बाजार भावा प्रमाणे येणारी किम्मत तक्ररकर्तीला अदा करण्याचे आदेशित व्हावे.
(4) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- आणि तक्रार व नोटीस खर्चापोटी रुपये-25,000/- अशा रकमा विरुध्दपक्षां कडून देण्याची मागणी केली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश रामरावजी माने आणि चंदा रामरावजी माने यांनी एकत्रित लेखी उत्तर नि.क्रं-23 प्रमाणे अभिलेखावर मंचा समक्ष दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे लेखी उत्तरा नुसार विरुध्दपक्ष क्रं-1) ते 4) हे प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे भागीदार असल्याचे तसेच सदर फर्म ही नोंदणीकृत असल्याची बाब नामंजूर केली. तसेच हे सुध्दा नाकबुल केले की, विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचे मालकीची मौजा झिंगाबाई टाकळी, पटवारी हलका क्रं 12, खसरा क्रं-23 येथे 2 हेक्टर 02 आर एवढी शेत जमीन असून ती विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णुप्रसाद मिश्रा याची पत्नी आहे. तक्रारकर्तीने भूखंड क्रं-137 चे खरेदी संदर्भात दिनांक-18/12/1999 रेजी बयानापत्र केल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. तक्रारकर्तीने करारातील भूखंडा बाबत जमा केलेल्या रकमा तसेच फर्म तर्फे तिला देण्यात आलेल्या पावत्या सुध्दा नाकबुल केल्यात. थोडक्यात तक्रारकर्तीने केलेली संपूर्ण तक्रारच नामंजूर केली. तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षानां भेटली, तिने भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची विनंती केली ही बाब सुध्दा नाकबुल केली.
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तर्फे उत्तरात पुढे असे नमुद करण्यात आले की, त्यांना तक्रारकर्तीने दिनांक-08/09/2011 रोजीची पाठविलेली नोटीस मिळाली व त्या नोटीसचे उत्तर त्यांनी दिले. नोटीसचे उत्तरात नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश रामरावजी माने यांचे वडील श्री रामराव बळीरामजी माने खसरा क्रं-23 चे मालक होते परंतु ते अशिक्षीत असल्याने त्यांचे अडाणीपणाचा फायदा घेऊन विरुध्दपक्ष क्रं-3) ते 5) अनुक्रमे राजेंद्रकुमार वासुदेव मिश्रा, विष्णु धीरधर मिश्रा आणि श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा यांनी त्यांच्या को-या कागदावर सहया घेतल्यात आणि विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचे नावे खोटे करारनामे तयार केले आणि त्यानंतर दिवाणी न्यायालयात खोटी केस दाखल केली आणि विरुध्दपक्षानीं आपल्या नावे खसरा क्रं-123 पैकी 1.06 हेक्टर आर जमीनीचे विक्रीपत्र खोटे आममुखत्यारपत्र तयार करुन विक्री करुन घेतले, अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांची फसवणूक केलेली आहे, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी विरुध्दपक्ष क्रं-3) ते 5) यांचे सोबत कुठलाही व्यवहार केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी तक्रारकर्ती कडून कधीही भूखंड क्रं 137 चे संदर्भात मोबदल्याची रक्कम स्विकारलेली नाही. विरुध्दपक्ष क्रं-3) ते 5) यांनी खोटे व्यवहार करुन तक्रारकर्तीची फसवणूक केलेली आहे व त्यांचे हस्ताक्षर दस्तऐवजात दिसून येतात. विरुध्दपक्षां विरुध्द दिवाणी न्यायालय, नागपूर येथे विशेष दिवाणी दावा क्रं-639/2000 सुरु असल्याची बाब मंजूर आहे. सबब विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) राजेंद्रकुमार वासुदेव मिश्रा याने नि.क्रं-10 वर लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल केले. त्याने लेखी उत्तरात विरुध्दपक्ष प्रकाश हाऊसिंग एजन्सी ही फर्म भागीदारी फर्म असल्याची बाब मान्य केली. त्याच बरोबर हे सुध्दा मान्य केले की, विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हि मौजा झिंगाबाई टाकळी, प.ह.क्रं-12, खसरा क्रं-23 मधील 2 हेक्टर 02आर एवढया जमीनीची मालक असून ती विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा याची पत्नी आहे. त्याने पुढे असे नमुद केले की, सदर फर्म ही नॉमीनल नोंदणीकृत असून त्याने फर्म तर्फे कोणताही व्यवहार केलेला नाही वा लाभ घेतलेला नाही. तक्रारकर्तीचे वादातील भूखंड क्रं-137 चे व्यवहारा बाबत त्याला काहीही माहिती नाही. वादातील भूखंड क्रं-137 असलेल्या जमीनी संबधाने विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश हाऊसिंग एजन्सी सोबत विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचा कोणताही व्यवहार/करार झालेला नाही वा प्रकाश हाऊसिंग एजन्सी तर्फे सदर जमीनीवर कोणतेही ले आऊट पाडण्यात आलेले नाही. विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णुप्रसाद मिश्रा याने धोखाघडी करुन लोकांची फसवणूक केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं-3) चा हाऊसिंग फर्म सोबत काहीही संबध नाही तसेच रकमा मिळाल्या बाबत ज्या पावत्या देण्यात आल्यात त्यावर त्याची सही सुध्दा नाही. त्याचे विरुध्द यापूर्वी सुध्दा एक ग्राहक तक्रार क्रं-367/2008 तक्रारकर्ती श्रीमती नंदाबाई सुधाकर नांदगवळी यांनी दाखल केलेली होती, त्या तक्रारीचा निकाल दिनांक-06/02/2010 रोजी लागला होता आणि त्या निकालपत्रात त्याचा कोणताही दोष नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात आली होती. तो प्रकाश हाऊसिंग एजन्सीचा भागीदार असल्याची बाब मान्य केली. त्याचे स्वाक्षरीचे बयानापत्र सुध्दा नाही. तक्रारकर्तीचा करार हा दिनांक-08/12/1999 रोजीचा असून तिने तब्बल 11 वर्षा नंतर ही तक्रार दाखल केलेली असल्याने ती मुदतबाहय म्हणून खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-3) याने केली.
05. विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णुप्रसाद मिश्रा याला ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली परंतु तो शेवट पर्यंत ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाला नाही म्हणून त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्यात आली.
06. विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिने लेखी उत्तर नि.क्रं-11 प्रमाणे मंचा समक्ष सादर केले. तिचे उत्तरा नुसार तीचे मालकीची मौजा झिंगाबाई टाकळी, प.ह.क्रं-12, खसरा क्रं-23 मधील 2 हेक्टर 02आर एवढया जमीन असल्याची बाब मान्य केली. तसेच हे म्हणणे सुध्दा मान्य केले की, ती विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा याची पत्नी आहे परंतु ती मागील 12 वर्षा पासून तिचे पती सोबत राहत नसून त्यांचेतील पती-पत्नीचे संबध राहिलेले नाहीत. तक्रारकर्तीचे वादातील भूखंड क्रं-137 चे व्यवहारा बाबत तिला काहीही माहिती नाही. वादातील भूखंड क्रं-137 असलेल्या जमीनी संबधाने तिने तक्रारकर्ती सोबत कोणताही व्यवहार केलेला नाही तसेच प्रकाश हाऊसिंग सोसायटी सोबत तिचा काहीही संबध नाही. तक्रारकर्ती ही तिचे कडे कधीही आलेली नाही वा तिने तक्रारकर्तीकडे विक्रीपत्र नोंदवून देण्यासाठी रुपये-4,00,000/- एवढया रकमेची मागणी केलेली नाही, तो तक्रारीतील मजकूर खोटा आहे. तिला तक्रारकर्ती कडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही. तिचे विरुध्द यापूर्वी सुध्दा एक ग्राहक तक्रार क्रं-367/2008 तक्रारकर्ती श्रीमती नंदाबाई सुधाकर नांदगवळी यांनी दाखल केलेली होती, त्या तक्रारीचा निकाल दिनांक-06/02/2010 रोजी लागला होता आणि त्या निकालपत्रात तिचा कोणताही दोष नसल्याचे निष्पन्न झाल्याने तिचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात आली होती. ती प्रकाश हाऊसिंग एजन्सीची भागीदार नाही वा तिने कोणतेही दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे नावे केलेले नाहीत. तिने श्री रामराव बळीरामजी माने यांचे सोबत करारनामा केला होता, त्यानंतर शेतजमीनीचे विक्रीपत्र विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचे नावाने दिनांक-19/12/2006 रोजी करण्यात आले होते आणि तेंव्हा पासून ती सदर कृषी जमीनीची मालक आहे. ती मागील 12 वर्षा पासून तिचे पती विष्णू धिरधर मिश्रा याचे सोबत राहत नसून त्यांचेतील पती-पत्नीचे संबध राहिलेले नाहीत. तिचे स्वाक्षरीचे बयानापत्र सुध्दा नाही तसेच बयानापत्रात तिचे नावाचा उल्लेख सुध्दा नाही. तसेच रकमा मिळाल्या बाबत ज्या पावत्या देण्यात आल्यात त्यावर तिची सही सुध्दा नाही. तिचे विरुध्द कोणताही दस्तऐवजी पुरावा नसल्याने तिचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिने केली.
07. तक्रारकर्तीने तक्रार सत्यापनावर दाखल केली असून सोबत दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात.
08. तक्रारकर्तीची तक्रार, दाखल लेखी दस्तऐवज आणि विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी एकत्रित दाखल केलेले उत्तर, विरुध्दपक्ष क्रं-3) तसेच विरुध्दपक्ष क्रं-5) चे लेखी उत्तर, त्याच प्रमाणे तक्रारकर्ती तर्फे वकील श्री सहारे यांचा युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
09. तक्रारकर्तीने जनमाहिती अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सिव्हील लाईन नागपूर यांचे कडून प्रकाश हाऊसिंग एजन्सी नागपूरचे जे दस्तऐवज दाखल केलेत, त्यावरुन प्रकाश हाऊसिंग एजन्सी ही सहकारी कायद्दा खालील नोंदणीकृत फर्म असून तिचा नोंदणी क्रं-6111/99-2000 असून तिची नोंदणी ही दिनांक-12 मे, 1999 रोजी झालेली आहे आणि सदर भागीदारी फर्मचे भागीदार म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-4) यांची नावे अनुक्रमे प्रकाश रामरावजी माने, चंदा रामरावजी माने, राजेंद्रकुमार वासुदेवप्रसाद मिश्रा आणि विष्णू धिरधर मिश्रा यांचे नावे दर्शविलेली असून ते सर्व फर्मचे दिनांक-01/01/1999 रोजी भागीदार झाले असल्याचे सदर दस्तऐवजात नमुद आहे, त्यामुळे प्रकाश हाऊसिंग एजन्सी ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत फर्म असून तिचे विरुध्दपक्ष क्रं-1) ते 4) हे दिनांक-01 जानेवारी, 1999 पासून भागीदार असल्याची बाब सिध्द होते.
10. विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा ही जरी विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याची पत्नी असली तरी तिचा प्रकाश हाऊसिंग एजन्सी या फर्मशी भागीदार म्हणून कोणताही संबध सदर दस्तऐवजाचे अवलोकन केल्यावर दिसून येत नाही. भागीदारांचे करारपत्र दिनांक-25 जानेवारी, 1999 या दस्तऐवजा मध्ये प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे भागीदार म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-4) यांची नावे अनुक्रमे प्रकाश रामरावजी माने, चंदा रामरावजी माने, राजेंद्रकुमार वासुदेव प्रसाद मिश्रा आणि विष्णू धिरधर मिश्रा यांचे नावे दर्शविलेली असून इंडीयन पार्टनरशिप एक्ट मधील तरतुदी या भागीदारी फर्मला लागू राहतील असे सुध्दा नमुद आहे. डिड ऑफ पार्टनर शिप दिनांक-25 जानेवारी, 1999 या दस्तऐवजा मध्ये प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे भागीदार म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-4) यांची नावे अनुक्रमे प्रकाश रामरावजी माने, चंदा रामरावजी माने, राजेंद्रकुमार वासुदेव प्रसाद मिश्रा आणि विष्णू धिरधर मिश्रा यांचे नावे दर्शविलेली आहेत.
11. प्रकरणातील दाखल फेरफार नोंदवही पत्रका वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीने करार केलेला भूखंड क्रं-137 ज्याचा सर्व्हे क्रं-23 आहे त्याचे क्षेत्र 3 हेक्टर 08 आर दर्शविलेले असून ती जमीन विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश रामरावजी माने आणि चंदा रामरावजी माने यांचे वडील श्री रामराव बळीरामजी माने यांचे मालकीची होती आणि त्यांचे मृत्यू नंतर वारसदार म्हणून त्यांची पत्नी श्रीमती मंजुळाबाई रामरावजी माने (विरुध्दपक्ष प्रकाश आणि चंदा माने यांची आई), मुलगा म्हणून प्रकाश रामरावजी माने, मुलगी सौ. मिना मोहन जगताप आणि अविवाहित मुलगी कु.चंदा रामरावजी माने यांची नावे चढविलेली आहेत. तसेच फेरफार नोंदवही वरुन असेही दिसून येते की, खातेदार
सौ.मंजुळाबाई रामरावजी माने, प्रकाश रामरावजी माने, चंदा रामराव माने, सौ.मीना ज. मोहन मानापुरे यांचे तर्फे आममुखत्यार मनोज धनराज मानापुरे याने मौजा झिंगाबाई टाकळी सर्व्हे क्रं-23 क्षेत्र-3 हेक्टर 08 आर या जमीनी पैकी 1 हेक्टर 06 आर एवढया जमीनीचे रजिस्टर्ड विक्रीपत्र नोंद क्रं-6940 दिनांक-19/12/006 अन्वये रुपये-8,13,000/- मध्ये विरुध्दपक्ष क्रं-5) सौ.सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचे नावे विक्री करुन दिलेले आहे.
12. या फेरफार नोंदीचे उता-या वरुन मौजा झिंगाबाई टाकळी, नागपूर येथील सर्व्हे क्रं-23 क्षेत्र-3 हेक्टर 08 आर या जमीनी पैकी 1 हेक्टर 06 आर एवढया जमीनीचे रजिस्टर्ड विक्रीपत्र नोंद क्रं-6940 दिनांक-19/12/006 अन्वये विरुध्दपक्ष क्रं-5) सौ.सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा ही एकमेव मालक असल्याची बाब सिध्द होते आणि प्रकाश हाऊसिंग एजन्सी, नागपूर या फर्मशी विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचा कोणताही संबध नसल्याची बाब सुध्दा दाखल दस्तऐवजा वरुन सिध्द होते. मौजा झिंगाबाई टाकळी, नागपूर येथील सर्व्हे क्रं-23 या जमीनीवर प्रकाश हाऊसिंग एजन्सी तर्फे प्रस्तावित ले आऊट पाडल्याचे कोणतेही दस्तऐवज आमच्या समोर दाखल झालेले नाहीत, विरुध्दपक्ष क्रं-5) सौ.सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचे उत्तरा प्रमाणे ती जमीन आजही कृषी जमीन आहे.
13. तक्रारकर्तीचे नावे प्रकाश हाऊसिंग एजन्सी तर्फे मौजा झिंगाबाई टाकळी, पटवारी हलका क्रं-12, खसरा क्रं-23 वर प्रस्तावित ले आऊट मधील भूखंड क्रं-137 जे बयानापत्र दिनांक-08/12/1999 रोजी करुन देण्यात आले, त्या बयानापत्रावर विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याने सही केलेली असल्याचे दिसून येते, जेंव्हा की, ती जमीन विरुध्दपक्ष क्रं-5) सौ.सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा, जी नात्याने विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याची पत्नी आहे हिचे मालकीची होती आणि विरुध्दपक्ष क्रं-5) ही प्रकाश हाऊसिंग एजन्सी मध्ये भागीदार नव्हती, अशी कायदेशीर परिस्थिती असताना विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याने कोणत्या अधिकारान्वये विरुध्दपक्ष क्रं-5) चे मालकीची शेत जमीन असलेल्या जागेतील भूखंडाचे तेथे कोणतेही ले आऊट पाडलेले नसताना वा मंजूरी प्राप्त नसताना तक्रारकर्तीचे नावे भूखंड क्रं-137 चे बयानापत्र करुन दिले ही बाब समजून येत नाही.
14. प्रकाश हाऊसिंग एजन्सीज, झिंगाबाई टाकळी, नागपूर तर्फे तक्रारकर्तीचे नावे ज्या पावत्या देण्यात आलेल्या आहेत, त्यावरील काही पावत्यांवर विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा याच्या सहया आहेत. तर काही पावत्यांवर विरुध्दपक्ष क्रं-3) राजेंद्रकुमार वासुदेव मिश्रा याच्या सहया आहेत, जरी विरुध्दपक्ष क्रं-3) राजेंद्रकुमार मिश्रा याने पावत्यांवर त्याच्या सहया असल्याची बाब नाकारलेली असली तरी त्याने दाखल केलेल्या उत्तरावरील त्याची सही आणि दाखल पावत्यावरील सहया या त्याचे सहीशी ब-याच अंशी जुळतात व ताळमेळ खातात, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-3) व क्रं-4) यांनी तक्रारकर्ती कडून भूखंडापोटी रकमा स्विकारल्याचे दिसून येते परंतु विरुध्दपक्ष क्रं-3) चीच पावतीवर सही असल्याचे ठाम निष्पन्न आम्ही काढू शकत नाही कारण उत्तरावरील सही पावती वरील सही पेक्षा थोडी वेगळी असल्याचे दिसते.
15. या प्रकरणा मध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश रामरावजी माने आणि विरुध्दपक्ष क्रं-2) कु.चंदा रामरावजी माने हे जरी प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे भागीदार असले तरी यांचा तक्रारकर्ती सोबत केलेल्या भूखंडाचे बयानापत्राशी वा रकमेतील व्यवहाराशी कोणताही संबध दिसून येत नाही, या दोघानां अंधारात ठेऊन विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा याने तक्रारकर्ती सोबत बयानापत्र केले व पुढे विरुध्दपक्ष क्रं-3) राजेंद्रकुमार मिश्रा आणि विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा यांनी तक्रारकर्ती कडून रकमा स्विकारल्यात. जेंव्हा वादातील जमीनच प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे नावावर वा मालकीची नाही तेंव्हा भागीदार म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश रामरावजी माने आणि विरुध्दपक्ष क्रं-2) कु. चंदा रामरावजी माने यांचा कोणताही संबध दिसून येत नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश माने आणि विरुध्दपक्ष क्रं-2) चंदा माने यांचा तक्रारकर्ती सोबत कोणताही व्यवहार झाल्याचे दस्तऐवज सुध्दा दिसून येत नाहीत, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे सदर तक्रारीतून मुक्त होण्यास पात्र आहेत, त्यांचेवर कोणतीही जबाबदारी येत नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हया सुध्दा प्रकाश हाऊसिंग एजन्सीच्या भागीदार नाहीत आणि त्यांचे मालकीचे जमीनीतील भूखंडाचे बयानपत्र त्याचे पती विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याने कोणत्या अधिकारान्वये तक्रारकर्तीला करुन दिले या संबधी कोणतेही अधिकारपत्र विरुध्दपक्ष क्रं-5) हिने प्रकाश हाऊसिंग एजन्सीला वा तिचे पती विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा याला दिलेले नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-5) सौ.सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिने तक्रारकर्ती कडून कोणत्याही रकमा सुध्दा स्विकारलेल्या नाहीत, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा ही सुध्दा तक्रारीतून मुक्त होण्यास पात्र आहे कारण तिचा सुध्दा यात कोणताही दोष दिसून येत नाही.
16. या प्रकरणामध्ये जो काही दोष दिसून येतो तो विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याचाच दिसून येतो. प्रकाश हाऊसिंग एजन्सी या भागीदारी फर्मचे मालकीचे नावे कोणतीही शेत जमीन नसताना आणि शेतजमीन ही त्याची पत्नी विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचे मालकीची असताना व तिने प्रकाश हाऊसिंग एजन्सी या फर्मला किंवा तिचे पती विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याला सदर शेत जमीनी संबधाने कोणतेही अधिकारपत्र लिहून दिलेले नसताना विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याने अनधिकृतपणे तक्रारकर्तीचे नावे मौजा झिंगाबाई टाकळी, नागपूर येथील पटवारी हलका क्रं-12, खसरा क्रं-23 मधील भूखंड क्रं-137 चे बयानापत्र दिनांक-08/12/1999 रोजी करुन दिले आणि पुढे तक्रारकर्ती कडून भूखंडाच्या रकमा सुध्दा स्विकारल्याची बाब सिध्द होते, त्यामुळे ही तक्रार केवळ विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याचे विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे, विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु मिश्रा याला कोणताही अधिकार नसताना त्याने भूखंडाचे बयानापत्र धोखाघडीने करुन देऊन तक्रारकर्तीची फसवणूक तर केलीच परंतु त्याचे सोबत अन्य विरुध्दपक्षानां सुध्दा निष्कारण या प्रकरणात प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे छापील फॉर्मवर बयानापत्र तयार करुन देऊन प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे अन्य भागीदार म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1) व क्रं 2) यांना निष्कारण गोवले.
17. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या बयानापत्रा वरुन तसेच पावत्यां वरुन तिने वादातील भूखंडापोटी रुपये-54,000/- विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णुप्रसाद मिश्रा याला दिलेली आहे. तक्रारकर्तीची सुध्दा यामध्ये चुक आहे की, तिने जमीनीची मालकी ही खरोखरीच प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे नावावर आहे कि नाही याची शहानिशा न करता तसेच मालकी हक्का संबधी कोणतेही दस्तऐवज तपासून न बघता हा व्यवहार केलेला आहे, यामध्ये तक्रारकर्ती सुध्दा निष्काळजीपणासाठी तेवढीच जबाबदार आहे कारण तिने कागदपत्र पाहून जर व्यवहार केला असता तर ही तक्रारच उदभवली नसती. जमीनीची मालकी मूळात प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे नावावर नसल्याने तक्रारकर्तीचे मागणी प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचा आदेश देणे कायदेशीर दृष्टीने शक्य नाही. तक्रारकर्तीने भूखंडापोटी दिनांक-08/12/1999 पासून ते दिनांक-01/06/2008 पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु ध्रिरधर मिश्रा याला दिलेली रक्कम दाखल बयानापत्र आणि पावत्यांच्या प्रतीं वरुन एकूण रुपये-54,000/- शेवटचा हप्ता दिल्याचा दिनांक-01/06/2008 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% व्याजासह त्याचे कडून परत मिळण्यास तसेच अन्य अनुषंगिक नुकसान भरपाई विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याचे कडून मिळण्यास तक्रारकर्ती ही पात्र आहे.
18. या प्रकरणात तक्रारकर्ती सोबत विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याने त्याचे मालकीचा भूखंड नसताना वा कोणतेही अधिकारपत्र नसताना वा प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे नावे जमीनीची मालकी नसताना भूखंड विक्री संबधाने प्रकाश हाऊसिंग फर्मचे तर्फे भूखंड विक्रीचे बयानापत्र तक्रारकर्तीचे नावे करुन देऊन धोखाघडी केलेली आहे आणि जो पर्यंत तिने भूखंडापोटी भरलेली रक्कम तिला व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याचे कडून परत मिळत नाही तो पर्यंत या तक्रारीचे कारण हे सतत घडत असल्याने प्रस्तुत तक्रार ही मुदतीत आहे.
19. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ती सौ.राणी ज. संजय तिहाडे हिची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष मे. प्रकाश हाऊसिंग एजन्सीज तर्फे भागीदार अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं-1) प्रकाश रामरावजी माने, भागीदार विरुध्दपक्ष क्रं-2) कु. चंदा रामरावजी माने, भागीदार विरुध्दपक्ष क्रं-3) राजेंद्रकुमार वासुदेव मिश्रा यानां वादातील भूखंड क्रं-137 ची मालकी प्रकाश हाऊसिंग एजन्सीचे नावे नसल्याने तक्रारीतून मुक्त करण्यात येते. तसेच विरुध्दपक्ष क्रं-5) श्रीमती सुनिता विष्णुप्रसाद मिश्रा हिचा प्रकाश हाऊसिंग एजन्सीशी कोणताही संबध नसल्याने व तिने तक्रारकर्ती सोबत वादातील भूखंड क्रं-137 संबधाने कोणताही व्यवहार केलेला नसल्याने तिला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु ध्रिरधर मिश्रा याला आदेशित करण्यात येते की, त्याने त्याला कोणताही अधिकार वा मालकी हक्क नसताना तक्रारकर्ती कडून वादातील भूखंड क्रं-137 चे किम्मती पोटी स्विकारलेली रक्कम रुपये-54,000/- (अक्षरी रुपये चौप्पन हजार फक्त) तक्रारकर्ती कडून शेवटचा हप्ता स्विकारल्याचा दिनांक-01/06/2008 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह तक्रारकर्तीला परत करावी.
(04) विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु ध्रिरधर मिश्रा याला असेही आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्तीला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- अशा रकमा तक्रारकर्तीला द्दाव्यात.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-4) विष्णु धिरधर मिश्रा याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.