जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :15/04/2010 आदेश पारित दिनांक :06/12/2010 तक्रार क्रमांक :- 248/2010 तक्रारकर्ता :– विनयकांत मोजेस निर्मल, वय अंदाजेः 77 वर्षे, व्यवसायः निवृत्त शिक्षक, राह. ख्रिच्चन कॉलोनी, डॉ. झाडे यांचे दवाखान्याच्या मागे, बीएसएनएल कार्यालयाचे जवळ, चंद्रपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. भालचंद्र लक्ष्मण धोटे, भागीदार मे. पुजा कंस्ट्रक्शन, वय अंदाजेः 60 वर्षे, व्यवसायः कॉंन्ट्रक्टर, राह. एस 17, भरत नगर, अमरावती रोड, नागपूर. 2. श्रीकांत भिमराव घोंगडे, भागीदार, मे. पुजा कंस्ट्रक्शन, वय अंदाजेः 58 वर्षे, व्यवसायः बिल्डर, राह. अंजली 11 बी, टाईप सी कार्पोरेशन कॉलनी, नागपूर. 3. विनयकुमार नरहर पाटील, वय अंदाजेः 54 वर्षे, व्यवसायः नोकरी, राह. एस एस/1, स्नेहल डेव्हलपर्स लोकसेवा नगर, मोखाडे कॉलेज जवळ, जयताळा रिंग रोड, भामटी, नागपूर. तक्रारकर्त्याचे वकील :– श्री. एस.जी. पझारे गैरअर्जदाराचे वकील :– श्री. व्ही. के. धोटे, श्री.जे.सी. शुक्ला, श्री.पी.एम.पांडे. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 06/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 15.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तकारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे पुजा कन्ट्रक्शन कंपनी या भागीदारी संस्थेकडून सदनिका विकत घेण्याचा करार केला होता व ज्या जागेवर सदनिकेचे बांधकाम केलेले आहे त्याचे मालक गैरअर्जदार क्र.3 असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. 3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदारांकडून सदनिका क्र.टी-1, शकुंतला पुजा अपार्टमेन्ट, वंजारीनगर, नागपूर येथे खरेदी करण्यासाठी रु.1,45,000/- ला करार केला. तक्रारकर्त्याकडून गैरअर्जदारांनी रु.45,000/- दि.21.09.1987 ते 30.01.1989 या कालावधीत स्विकारले व सदर सदनिका तक्रारकर्त्यास आवंटीत केली. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यासोबत दोन करारनामे दि.11.08.1989 रोजी केले त्याप्रमाणे एक विक्रीचा करारनामा व दुसरा इमारत बांधणी करारनामा केला. इमारत बांधणीचे करारनाम्यात सदनिकेची खरेदी किंमत रु.1,45,000/- दर्शविली होती व त्या करारनाम्यानुसार गैरअर्जदारांस खालिल प्रमाणे रकमा देणे होत्या. ‘सदनिका बुकींगचे वेळी रु.20,000/-, कामाचे सुरवातीस रु.20,000/- प्लिंथच्या सुरवातीस रु.20,000/-, तळघरस्लॅबचे वेळी रु.20,000/-, प्रथम माळा स्लॅबचे वेळी रु.20,000/-, दुसरा माळा स्लॅबचे वेळी रु.10,000/-, विटांचे काम, दरवाजा, खिडकीचे काम सुरुवातीस रु.10,000/-, फिनिशींगची सुरवात रु.10,000/- व काम संपल्यानंतर रु.,5,000/-‘ तकारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदारांनी ठरविल्यानुसार रु.57,000/- दिले व बाकी रक्कम रु.88,000/- एचडीएफसी बँक, नागपूर यांचेकडून कर्ज घेऊन सदनिकेची संपूर्ण रक्कम गैरअर्जदारांना दिली. तसेच इलेक्ट्रीक व पाणी कनेक्शन चार्जेस सुध्दा वेगळे दिले. 4. तक्रारकर्त्याने सदनिकेची संपूर्ण रक्कम देऊन सुध्दा गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन दिले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा फार अस्वस्थ झाला व जुलै-2008 मध्ये व्यक्तिशः भेटून सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली. ती गैरअर्जदारांनी मान्य केली व त्यानुसार तक्रारकर्त्याने स्टॅंम्प, रजिस्ट्रेशन, विक्रीपत्र तयार करणे इत्यादीचे रु.60,000/- ची गैरअर्जदारांची मागणी, त्यांचेवर विश्वास ठेवून तक्रारकर्त्याने रु.30,000/- दि.06.08.2008 रोजी व त्यानंतर 15 दिवसांनी बाकी रक्कम रु.30,000/- गैरअर्जदार क्र.2 यांना रोखीने दिले. तरीपण गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिले नाही ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी आहे, असे तक्रारीत नमुद केले असुन सदर तक्रारीव्दारे मागणी केली आहे की, गैरअर्जदारांना विक्रीपत्र करुन देण्याचा आदेश द्यावा, शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.2,00,000/-, गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे जमा असलेले रु.60,000/- दरमहा 2 टक्के व्याजासह रक्कम परत करण्याचा आदेश द्यावा. 5. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्यात आली असता, सदर नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 6. गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर तक्रारीला पुढील प्रमाणे आपले उत्तर दाखल केलेले आहे. त्यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, सदर सदनिकेचे विक्रीपत्र हे भुखंड मालक श्रीमती शकुंतलाबाई नरहर पाटील करुन देणार होत्या, त्यामुळे विक्रीपत्र करुन देण्याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांचा कोणताही संबंध येत नाही. तसेच त्यांनी सदर तक्रार ही कालबाह्य असल्याचे सुध्दा नमुद केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.3 च्या आईकडून तक्रारकर्त्याने विक्रीपत्र करुन घ्यावयास पाहिजे होते, पण तसे केली नाही. तसेच गैरअर्जदार क्र.3 ची आई दिगंवत झाल्यामुळे त्याचे आईने दिलेली “Power of Attorney” रद्द झालेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 हे तक्रारकर्त्यास कोणतीही मदत करु शकत नाही. त्यांनी आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार ही न्यायसंगत नसुन ती खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 7. गैरअर्जदार क्र.2 यांनी सुध्दा गैरअर्जदार क्र.1 यांच्या प्रमाणेच उत्तर दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी आपल्या उत्तरात सदर तक्रार ही कालबाद्य असल्याचे नमुद केले असुन पुढे असेही नमुद केले आहे की, त्याची आई श्रीमती शकुंतलाबाई नरहर पाटील हीचे 1996 मध्ये निधन झाले. त्यानंतर सुध्दा तक्रारकर्ता व इतर गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन घेण्याकरता कोणत्याही कायदेशिर प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही. त्यांनी तक्रारीत नमुद केलेले सर्व आक्षेप नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 8. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.30.11.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे तर्फे वकील हजर, गैरअर्जदार क्र.3 हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 9. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे कडून गैरअर्जदार क्र.3 यांचे मालकीचे भुखंडावरील शकुंतला पुजा अपार्टमेंट, वंजारीनगर, नागपूर येथील सदनिका क्र.टी-1, खरेदी करण्याचा रु.1,45,000/- मध्ये करार केला होता व त्यानुसार गैरअर्जदारांनी रु.45,000/- दि.21.09.1987 ते 30.01.1989 या कालावधीत स्विकारुन सदर सदनिकेचे आवंटन केले त्याकरीता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यासोबत एक विक्रीचा करारनामा व दुसरा इमारत बांधणी करारनामा दि.11.08.1989 रोजी केला. तक्रारकर्त्याने सदर सदनिकेची संपूर्ण रक्कम रु.1,45000/- गैरअर्जदारांना दिली व त्यानंतर त्यांनी तक्रारकर्त्यास सदर सदनिकेचे ताबापत्र दि.03.12.1991 रोजी करुन दिले ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.5 वरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेला विक्रीचा करारनामा हा तक्रारकर्ता, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या तर्फे आममुखत्यारपत्र धारक श्री. एल.बी. धोटे यांची स्वाक्षरी आहे. सदर करारनाम्यात पक्ष क्र.3 ही गैरअर्जदार क्र.3 ची आई आहे, त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, विक्रीच्या करारनाम्याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो. 10. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या उत्तरात आक्षेप घेतला आहे की, सदर तक्रार ही कालबाह्य आहे तसाच आक्षेप गैरअर्जदार क्र. 3 यांनीपण घेतलेला आहे. परंतु सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला दि. 03.12.1991 रोजी सदर सदनिकेचा ताबा दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयोगांच्या अनेक न्याय निवाडयांमध्ये जरी सदनिकेची संपूर्ण रक्कम दिली असेल व सदनिकेचा ताबा सुध्दा ग्राहकाला दिला असेल अश्या परिस्थितीत तक्रारीचे कारण सतत चालू राहते. त्यामुळे गैरअर्जदारांनी सदर तक्रार कालबाह्य असल्याचा घेतलेला आक्षेप हा अमान्य करण्यांत येत असुन सदर तक्रार ही कालातीत असल्याचे मंचाचे मत आहे. 11. गैरअर्जदारांनी सदर प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाचा ‘केरला ऍग्रो मशिनरी कॉर्पोरेशन लि. विरुध्द बीजयकुमार रॉय आणि इतर’ (2002) 3 एस.सी.सी. 165 व मा. राष्ट्रीय आयोगाचा ‘पी.एम.एस. एन्टरप्रायजेस आणि इतर –विरुध्द- दिल्ली डेव्हलपमेंट ऍथोरिटी आणि इतर’ 1(2010) सीपीजे 60 (एनसी) हे न्याय निवाडे दाखल केलेले आहेत. सदर दोन्ही न्याय निवाडयांतील तथ्य वेगळे असुन ते सदर प्रकरणाशी संलग्न नाही, त्यामुळे सदर प्रकरण हे कालातीत असल्याचे मंचाचे मत आहे. 12. गैरअर्जदार क्र.3 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्त्यासोबत झालेल्या करारनाम्यात गैरअर्जदार क्र.1 व 2 तसेच गैरअर्जदार क्र.3 यांची आई श्रीमती शकुंतलाबाई नरहर पाटील हीचे निधन 1996 मध्ये झाले. त्यानंतर तक्रारकर्ता व गैरअर्जदारांनी कोणतीही कायदेशिर कारवाई केलेली नाही म्हणून सदर विक्रीच्या करारनाम्याचे पालन करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.3 वर येत नसल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी ते स्वर्गीय श्रीमती शकुंतलाबाई नरहर पाटील हीचे वारस नसल्याबद्दलचा कूठेही उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्याचे आईने केलेला करारनामा हा गैरअर्जदार क्र.3 यांना कायदेशिर वारस म्हणून बंधनकारक आहे, असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.15 मध्ये गैरअर्जदार क्र.3 यांचे नाव मालमत्ता पत्रकात त्यांचे आईचे ऐवजी समाविष्ट झाल्याचे स्पष्ट निदर्शनास येते. यावरुन गैरअर्जदार क्र.3 हे त्यांचे आईने केलेल्या व्यवहारांसंबंधाने कायदेशिर बंधनकारक असुन ते परीपूर्ण करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.3 ची आहे. 13. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास वारंवार विनंती करुनही ते विक्रीपत्र करुन घेण्याकरता आले नाही असे म्हटले आहे. परंतु त्याबाबतचा कोणताही स्पष्ट पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही. तक्रारकर्ता / ग्राहकाकडून सदनिकेची संपूर्ण रक्कम स्विकारल्यानंतर त्याचे विक्रीपत्र करुन न देणे हे सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. 14. मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास शकुंतला पुजा अपार्टमेंट, वंजारीनगर, नागपूर येथील सदनिका क्र.टी-1 चे विक्रीपत्र करुन द्यावे. सदर विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्याने करावा असे जरी करारनाम्यात नमुद केले असले तरी विक्रीपत्राकरीता विलंब झाल्यामुळे त्यावरील स्टँम्पडयूटीचे दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे ज्यावेळी सदर सदनिकेचा ताबा गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दिला म्हणजेच दि.03.12.1991 रोजी असणा-या मुद्रांक शुल्काचा खर्च तक्रारकर्त्याने वहन करावा व त्यानंतर आजमीतीस असणारा मुद्रांक शल्काचा खर्च यामधील फरक हा गैरअर्जदारांनी सोसावा, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये त्याने रु.60,000/- मुद्रांक शुल्क व विक्रीपत्राकरीता खर्च केल्याचे म्हटले आहे, परंतु त्याबद्दल स्पष्ट पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे तक्रारकर्त्याची सदर बाब अमान्य करण्यांत येते. 15. तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.2,00,000/- ची मागणी केलेली आहे सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे गैरअर्जदारांनी संयुक्तिक अथवा वैयक्तिकपणे रु.20,000/- तक्रारकर्त्यास द्यावे. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादांचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शकुंतला पुजा अपार्टमेंट, वंजारीनगर, नागपूर येथील सदनिका क्र.टी-1 चे विक्रीपत्र करुन द्यावे. सदर विक्रीपत्राकरीता दि.03.12.1991 रोजी असणा-या मुद्रांक शुल्काचा खर्च तक्रारकर्त्याने वहन करावा व त्यानंतर वाढीव मुद्रांक शुल्काचा खर्च गैरअर्जदारांनी सोसावा. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.3,000/- अदा करावे. 4. वरील आदेशांचे अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत वैयक्तिकपणे अथवा संयुक्तिकपणे करावी. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |