तक्रारदार : त्यांचे प्रतिनीधी श्री.राजन बदले यांचे
मार्फत हजर.
सामनेवाले : ----------
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ना.द. कदम, सदस्य - ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सा.वाले हे घरबांधणी व्यावसायिक असून त्यांचा घरबांधणी व्यवसाय
जे.पी.नगर कोफराड विरार येथे चालु होता. सदर व्यवसायी भागीदारी संस्था असून त्यामध्ये सा.वाले क्रमांक 2 हे प्रमुख भागीदार आहेत.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनानूसार त्यांनी जे.पी.नगर कोफराड विरार येथील प्रकल्पात 570 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिका विकत घेण्याचे ठरविले व एकुण किंमत रू. 90,000/-, पैकी सा.वाले यांना वेळोवेळी दि. 30.11.1989 ते 20.09.92 या कालावधीत एकूण रूपये 71,251/-, चे अधिदान केले. त्याबाबतच्या पावत्या तक्रारदारांनी पृष्ठ क्र 1 ते 5 वर सादर केल्या आहेत. तक्रारदारांच्या कथनानूसार वरीलप्रमाणे रक्कम अदा करूनही सामनेवाले यांनी घरासंबधी करारनामा केला नाही. या संबधात तक्रारदाराने पुढे असे कथन केले की, सामनेवाले यांना वारंवार संपर्क साधून करारनामा करण्याविषयी तसेच घराचा ताबा सामनेवाले यांनी मान्य केल्याप्रमाणे 2 वर्षात
देण्याविषयी विनंती केली. तथापी सामनेवाले यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. अशाप्रकारे गेली 22 वर्ष सततपणे सा.वाले यांच्याशी सततचा संपर्क साधूनही याबाबत सामनेवालेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत दि. 15 जून 2007 रोजी त्यांना पत्र लिहून शेवटची संधी देण्यात आली. परंतू त्या पत्रासही सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद देण्याचे टाळले, असे तक्रारदारांनी नमूद केले आहे.
अशाप्रकारे सामनेवाले यांनी खोटी वचने देऊन, भूल थापा करून तक्रारदारांचे पैसे घेतले व त्याबाबत तक्रारदारांच्या घरासंबधी कोणताही करारनामा केला नाहीच. शिवाय सदनिका सुध्दा दिली नाही. याशिवाय तक्रारदारांनी अनेक विनंत्या करूनही कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांच्या कथनानूसार सदर ताबा मोफा अक्ट कलम 4 ची भंग करणारी आहेच शिवाय ही एक अनुचीत व्यापारी प्रथा आहे त्यामुळे तक्रारदाराने, सामनेवाले यांना दिलेली रक्कम रू. 71225/-, व त्यावर 20% दराने 22 वर्षाच्या व्याजासहीत परत करावी. तसेच रू.50,000/- इतकी नुकसान भरपाई आणि दाव्याचा खर्च रू.10,000/- मिळावा अशी प्रस्तुत मंचाकडे मागणी केली आहे.
3. प्रस्तुत मंचाने सामनेवाले यांना आपली कैफियत दाखल करता यावी यासाठी 16 जून 2012 ते 21.02.2013 या कालावधीत अनेक वेळा संधी देण्यात आली. विशेषतः त्यांना तक्रारी बाबतचे व इतर सर्व कागदपत्रे प्राप्त होऊनही त्यांनी आपली कैफियत सादर करण्याचे पूर्णतः टाळले आहे.
4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली असून वर उल्लेख केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी त्यांची कैफियत अथवा इतर कागदपत्रे अनेकवेळा संधी देऊनही दाखल केली नाही.
5. प्रस्तुत मंचाने तक्रारदाराने सादर केलेले शपथपत्र, कागदपत्रे व लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांचे पैसे स्विकारून त्याबद्दल सदनिका देण्याचा कोणताही करार केला नाही ताबाही दिला नाही अथवा पैसेही परत केले नाहीत अशाप्रकारे अनुचित प्रथेचा अवलंब केला, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई वसूल करण्यास पात्र आहेत काय? | होय अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येतो. |
कारण मिमांसा
6. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची बाजु ऐकून घेतली तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरून वस्तुस्थिती विचारात घेतली तक्रारदारांनी सदनिका खरेदीसाठी, सामनेवाले यांनी वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे आवश्यक त्या तारखेला मागितलेली रक्कम सामनेवाले यांचेकडे जमा केली आहे. त्याबद्दल सा.वाले यांनी रक्कम मिळाल्याची पावत्या दिल्या आहेत. पृष्ठ क्रमांक 1 ते 5 ही रक्कम स्वीकारल्या नंतरही, सामनेवाले यांनी सदनिका खरेदी विक्रीचा करारनामा केला नाही हे स्पष्ट झाले आहे या संदर्भात महाराष्ट्र ओनराशीप ऑफ फ्लॅटस अक्ट ( महाराष्ट्र सदनिका मालकी अधिनियम) कलम 4 मधील तरतूदीनूसार, सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून सदनिका खरेदी विक्री व्यवहारासाठी पैसे स्वीकारल्यानंतर त्वरित त्याबाबतचा करारनामा करून आवश्यक ती स्टॅपडयूटी भरून, त्याची नोंद करणे अनिवार्य होते. तथापी, सामनवाले यांनी असे न करून या कायदयातील उपरोक्त तरतूदीचा भंग केला आहे
7. प्रसतुत मंचास असेही आढळून आले आहे की, सामनेवाले यांनी
तक्रारदारास दिलेल्या आश्वासनानूसार सदनिकेचे बांधकाम करणेचे तसेच ठराविक मुदतीत पूर्णपणे तयार सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन/वचन अजिबात पाळलेले दिसून येत नाही. ही बाब सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे स्पष्टपणे दर्शविते.
8. प्रस्तुत मंचास असे आढळून आले आहे की, सामनेवाले यांना तक्रार व कागदपत्रे प्राप्त होऊनही त्यांनी आपली कैफियत अनेकवेळा संधी देऊन सुध्दा सादर केली नाही. शिवाय प्रस्तुत मंचाने नोटीशी पाठवूनही सामनेवाले आपली बाजु मांडण्यासाठी कधी ही स्वतः अथवा प्रतिनीधी मार्फत उपस्थित राहिले नाहीत.
9. परिणामतः तक्रारदारांचा दावा हा विनाआव्हान व अविवादास्पद राहिला सामनेवाले हयांनी नियोजीत प्रकल्प पूर्ण केला आहे. हयाबद्दल पुरावा नाही तसेच भविष्यात ते पूर्ण करतील हयाची खात्रीही नाही. बराच कालावधी उलटून गेल्याने सामनेवाले हयांनी मूळची एकुण रक्कम रू.71,251/-, 18% व्याजासह रक्कम अदा करण्याच्या दिनांकापासून परत करावी असा आदेश देणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे. हयाबाबतीत तक्रारदाराने रक्कमेचा परतावा मागितला असल्याने ताबा देण्याविषयीच्या आदेशाचा प्रश्न उपस्थित होत नाही. त्यामूळे सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून घेतलेली एकुण रक्कम रू. 71251/-,रक्कम स्वीकारल्याच्या दिनांकापासून ते परतावा करेपर्यंत द.सा.द.से 18% व्याजदराने तक्रारदारास देण्यास जबाबदार आहेत. या शिवाय, नुकसानाभरपाई रू.10,000/- आणि दाव्याचा खर्च रू.1,000/-, ही तक्रारदार
यास देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत.
10 याप्रकारे तक्रारदार हे सामनेवाले यांनी सदनिका खरेदी/विक्रीसाठी पैसे स्वीकारून त्याबाबतचा करारनामा न करणे, न सदनिका बांधणे व तक्रारदारास सदनिका न देणे, यासंदर्भात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे सिध्द करू शकले आहेत.
11. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 21/2012 अंशतः मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास सदनिका देण्याच्या व्यवहारात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना असे आदेश देण्यात येतात की, सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून वेळोवळी घेतलेली एकुण रक्कम रू. 71,251/-, सामनेवाले यांना अदा केल्याचे तारखेपासून ते पूर्ण रक्कम परत करेपर्यंतच्या दिनांकापर्यत द.सा.द.शे 18% दराने तक्रारदारास परत करण्यात यावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रास, कुचंबणा नुकसान भरपाईपोटी रू.10,000/-, अदा करावेत.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.