मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 02/04/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांना वाहनाची गरज असल्याने त्यांनी गैरअर्जदाराकडून यामाहा हे वाहन घेण्याकरीता दि.16.12.2009 रोजी रु.10,000/- देऊन वाहन नोंदविले. त्याबाबतची पावती गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला दिली व वाहन हे 15 दिवसानंतर मिळेल व तेव्हाच उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. उर्वरित रक्कम घेऊन तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांकडे गेले असता वाहन उपलब्ध नसल्याने देण्यास असमर्थता दर्शविली व तक्रारकर्त्याशी अनुचित व्यवहार करुन रक्कम मागितली असता ती परत देण्यासही नकार दिला, म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला नोटीस पाठविली. परंतू गैरअर्जदाराने नोटीसला उत्तर दिले नाही किंवा नोटीसप्रमाणे वर्तणूक केली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन रु.10,000/- व्याजासह मिळावे, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबाबत रु.20,000/- भरपाई व तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावे अशी मागणी केलेली आहे. 2. गैरअर्जदाराला सदर तक्रारीची नोटीस पाठविण्यात आली असता गैरअर्जदाराची नोटीस ‘घेण्यास नकार’ म्हणून परत आली. तसेच गैरअर्जदार उत्तर दिले नाही किंवा मंचासमोर हजर झाले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द दि.04.03.2011 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे व सोबत वाहनाबाबत अग्रीम राशी दिल्याची पावती, नोटीस व पोस्टाची पावती व पोच दाखल केलेली आहे. गैरअर्जदार या प्रकरणात उपस्थित झालेले नाही व कोणत्याही प्रकारचा बचाव त्यांनी घेतलेला नाही आणि तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढण्याकरीता कुठलेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. यास्तव तक्रारकर्त्याने आपली तक्रार शपथपत्रावर व दस्तऐवजासह दाखल केलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रार पूर्णतः सिध्द केल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराने रु.10,000/- स्विकारल्याचे उपलब्ध पावतीवरुन निदर्शनास येते व गैरअर्जदाराने वाहन उपलब्ध नसल्याने सदर रक्कम परत केलेली आहे हे उपलब्ध दस्तऐवजावरुन दिसून येत नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा सदर रक्कम मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. नोंदणी रक्कम घेऊनही वाहन उपलब्ध करुन न दिल्याने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्ता सदर नुकसान भरपाईदाखल रु.1,000/- आणि तक्रारीच्या खर्चादाखल रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.10,000/- दि.16.12.2009 पासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासह परत करावे. 3) तक्रारकर्त्याला, मानसिक व शारिरीक क्षतिपूर्ती म्हणून रु.1,000/- व तक्रारीचा खर्चादाखल रु.1,000/- गैरअर्जदाराने द्यावे. 4) सदर तक्रारीचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे अन्यथा गैरअर्जदार द.सा.द.शे. 12% व्याजाऐवजी 15% व्याज देण्यास बाध्य राहील.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |