निकालपत्रः- , श्री.वि.गं.जोशी, सदस्य ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे. 2. सा.वाले पर्यटकांना पर्यटनासाठी नेणारी आणि सेवा सुविधा पुरविणारी कंपनी आहे. 3. तक्रारदार असे निवेदन करतात की, तक्रारदारांनी ते स्वतः व त्यांची पत्नी मिळून रक्कम रु.1,02,000/- सिंगापूर,मलेशीया,थायलंड, या ठिकाणी पर्यटनाला जाण्यासाठी सा.वाले यांना दिले. हया पर्यटनाचा कार्यक्रम 7 एप्रिल, 2010 ते 16 एप्रिल, 2010 असा एकूण 10 दिवसाचा होता. 4. सा.वाले यांचे असे म्हणणे की, पर्यटनाच्या कार्यक्रमाप्रमाणे ते विमानाने सिंगापूर येथे 7 एप्रिलला येथे पोहोचले. परंतु सा.वाला यांनी पुरविलेल्या कार्यक्रमाप्रमाणे हॉटेल सिटीक्लब मध्ये त्यांना राहायला दिले गेले नाही. आणि कार्यक्रमात बदल करुन सकाळीच प्रेक्षणीय स्थळे पहाण्यासाठी नेण्यात आले. या प्रकारात त्यांना व त्यांच्या पत्नीला प्रातःविधी उरकण्याचीसुध्दा मुभा दिली नाही. प्रवासानंतर थोडासा आराम तसेच ताजेतवाने होण्याची संधी मिळाली नाही. यामुळे तक्रारदारांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. 5. तक्रारदारांचे असे म्हणणे की, त्यांना पुरविण्यात आलेले जेवण नॅहरी वगैरे कमी दर्जाची होती. तसेच त्यांचे लगेज हे गाडया ठेवण्याच्या परीसरात ठेवले गेले. आणि नंतर असे लक्षात आले की, त्यातील काही वस्तु चोरल्या गेल्या होत्या. चोरीला गेलेला ऐवज हा सुमारे रु.50,000/- रुपयांचा होता. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या पर्यटनाच्या दरम्यान दिलेल्या सेवेच्या कमतरतेबाबत पत्र व्यवहार केला. त्याचे उत्तर सा.वाले यांनी दिले नाही. म्हणून दिनांक 30 एप्रिल, 2010 रोजी वकीलाची नोटीस पाठविली. त्याचेही उत्तर न आल्यामुळे त्यांनी या मंचापुढे तक्रार दाखल केले. व खालील प्रमाणे मागण्या केल्या. 1) सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवेची कमतरता व नुकसान भरपाई म्हणून रु.1,50,000/- द्यावेत, व त्यावर 18 टक्के व्याज द्यावे. 2) तक्रार अर्जाचा खर्च द्यावा. 6. सा.वाला यांना मंचाची नोटीस मिळूनसुध्दा ते मंचासमोर हजर राहून त्यांनी आपली कैफीयत दाखल केली नाही. त्यामुळे तक्रार विना कैफीयत चालविण्यात आली. आणि सा.वाले यांचे विरुध्द ग्राहक तक्रार निवारण कायदा 1986 कलम 13(2)(ब)(ii) अन्वये एकतर्फा आदेश परीत करण्यात आला. तक्रारदारांनी आपल्या मागण्यांच्या पृष्टयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. त्यातील कथने तक्रारीशी सुसंगत आहेत. 7. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रार अर्ज, व त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्र, शपथपत्र व पैसे भरल्याच्या पावत्या, पर्यटनाची कार्यक्रम पत्रिका, याची पहाणी व अवलोकन करुन निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. क्र | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाला यांचे सेवेत कमतरता आहे हे तक्रारदारांनी सिध्द केलेले आहे का ? | होय. | 2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळविण्यास पात्र आहेत का ? | होय.रु.25,000/-+ रु.1,000/- | 3 | आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 8. सा.वाला यांनी परदेशी पर्यटनाचा कार्यक्रम आखला होता. त्या कार्यक्रमाप्रमाणे सर्व गोष्टी घडवून आणणे हे त्यांचे कर्तव्य होते. अचानक कार्यक्रमात बदल केल्यामुळे पर्यटकांवर त्याचा मानसीक परीणाम होतो याची जाणीव सा.वाले पर्यटक कंपनी यांनी राखायला हवी होती. कार्यक्रम पत्रिकेत नमुद केल्याप्रमाणे ज्या हॉटेलमध्ये तक्रारदारांना सकाळी रहावयास दिले जाणार होते ती उपलब्ध नव्हती म्हणजे पर्यटनाच्या आयोजनात तृटी असल्याचे जाणवते. त्यामुळे सा.वाले यांच्या सेवेत कमतरता आहे असे दिसून येते. 9. तक्रारदार सिंगापूर येथे पोहोचल्यानंतर सकाळीच हॉटेलचे रुम उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे सामान गाडया ठेवण्याच्या ठिकाणी उघडयावर ठेवण्यात आले आणि त्यामुळे त्यातील काही वस्तु हरवल्या. जर तक्रारदारांना सकाळीच सिंगापूर मुक्कामी कार्यक्रम पत्रिकेनुसार हॉटेलची रुम मिळाली असती तर हा प्रकार टाळता आला असता. 10. तक्रारदार यांनी विमान किंवा इतर साधनांनी प्रवास केला आहे. त्यामुळे त्याची रक्कम त्यांना परत देणे उचित नाही. परंतु कार्यक्रम पत्रिकेत बदल करुन जो त्रास आणि नुकसान झाले त्याची भरपाई करुन देणे योग्य ठरेल. सा.वाले यांनी मंचासमोर उपस्थित राहून तक्रारदारांच्या आरोपांचे खंडण केलेले नाही त्यामुळे तक्रारदारांच्या शपथपत्राव्दारे तक्रार अर्जात केलेले कथन खरे आहे असे मानून मंच सा.वाले यांच्या सेवेतील कमतरतेबाबत व तक्रारदारांच्या हरवलेल्या वस्तुंचे मुल्य मिळून रु.25,000/-व तक्रार अर्जाचा खर्च रु.1000/- तक्रारदाराला देणे उचित व न्याय ठरेल. 11. उक्त विवेचन लक्षात घेता मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 333/2010 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.1000/- द्यावेत. 3. वरील रक्कमा सामनेवाले यांनी तक्रारदारांना न्यायनिर्णयाची प्रत मिळाल्यापासून 60 दिवसाचे आत अदा करावी. अन्यथा विलंबापोटी वरील सर्व रक्कमावर नऊ टक्के दराने आदेशाची रक्कम अदा करेपर्यत व्याज द्यावे. 4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |