तक्रारदार ः- स्वतः
सामनेवाले ः- एकतर्फा.
( युक्तीवादाच्या वेळेस)
न्यायनिर्णय - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
न्यायनिर्णय
(दि.04/04/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदारानी सामनेवाले यांनी उत्पादित केलेला भ्रमणध्वनी विकत घेतला होता. परंतू त्याच्यामध्ये दोष उत्पन्न झाला. तो दोष सामनेवाले यांना दुर करता आला नाही व दुरूस्तीच्या नावावर तक्रारदाराना दुसरा जुना मोबाईल देण्यात आला. तक्रारदारानी त्याबाबत सामनेवाले यांच्याकडे तक्रार नोंदविली व सतत पाठपुरावा करून सुध्दा सामनेवाले यांनी दाद न दिल्यामूळे हि तक्रार दाखल केली. सामनेवाले यांना मंचानी पाठविलेली नोटीस दि. 03/02/2017 ला प्राप्त झाली. परंतू, ते मंचात उपस्थित झाले नाही. तसेच, लेखीकैफियत सादर न केल्यामूळे, त्यांच्याविरूध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्याबाबत ट्रॅक रिपोर्ट संचिकेत दाखल आहे.
2. तक्रारदारानूसार त्यांनी दि. 01/12/2015 ला सामनेवाले यांचा उत्पादित भ्रमणध्वनी मॉयक्रोमॅक्स ए-106 विकत घेतला. सामनेवाले यांनी एक वर्षाची वारंटी दिली होती. परंतू, पाच महिन्याच्या आतच भ्रमणध्वनी दोष उत्पन्न झाला. भ्रमणध्वनीच्या स्क्रीनमध्ये दोष आढळून आला. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या अधिकृत सेवा केंद्रामध्ये भ्रमणध्वनी दाखविला असता, त्यांनी तो त्यांच्याकडे जमा करण्याबाबत सांगीतले व तीन-चार दिवसांनी येण्याबाबत कळविले. तशी पावती देण्यात आली. तक्रारदारानी चार दिवसानंतर फोन केला असता, त्यांना दोन ते तीन दिवस थांबण्याबाबत सांगण्यात आले. तक्रारदारानी पुन्हा फोन केला असता, त्यांना तेच उत्तर प्राप्त झाले. सेवाकेंद्रातील कर्मचारी त्यांच्यासोबत उध्दटपणे बोलु लागले. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या हेल्पलाईनवर फोन केला असता, त्यांना अधिकृत सेवाकेंद्राकडे जाण्याबाबत सांगण्यात आले. दि. 11/07/2016 ला तक्रारदाराना भ्रमणध्वनी परत करण्यात आला. त्यांच्या मुलीनी तो भ्रमणध्वनी त्याचदिवशी पुणे येथे नेला. मुलीच्या असे लक्षात आले की, भ्रमध्वनी व्यवस्थीत काम करीत नाही आहे व तो जुना भ्रमणध्वनी आहे. तक्रारदारानी विकत घेतलेला भ्रमध्वनी नव्हता. तक्रारदारानी पुण्याला जाऊन भ्रमणध्वनी आणला व सामनेवाले यांच्या अधिकृत सेवाकेंद्रात दि. 27/07/2016 ला दिला. तीन महिने झाल्यानंतर सुध्दा सामनेवाले यांनी तक्रारदाराना भ्रमध्वनी परत केला नाही. सामनेवाले यांचे कर्मचारी तक्रारदारांशी अपमानस्पदरित्या बोलु लागले व त्यांच्यासोबत धक्काबुक्की करू लागले. तक्रारदारांनी वारंवार विनंती केल्यावर सुध्दा व वारंटी पिरीअड असतांना सुध्दा तक्रारदारांचा भ्रमणध्वनी दुरूस्त केला नाही किंवा त्याबदल्यात नविन दिला नाही. सबब, तक्रारदारानी हि तक्रार दाखल करून, नविन भ्रमणध्वनी रू. 50,000/-,मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारदार हे माजी सैनिक आहेत. तक्रारदारांनी भ्रमध्वनी, विकत घेतल्यासंबधी पावती, दुरूस्तीबाबत जॉबशिट दाखल केली आहे.
3. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावतीवरून हे स्पष्ट होते की, त्यांनी रू. 6,000/-,अदा करून, सामनेवाले यांचा भ्रमणध्वनी विकत घेतला होता. विकत घेतल्यानंतर अल्पावधीमध्ये त्याच्यात दोष आढळून आला व तो दोष दूर करण्यास भरपूर अवधी लागला. शेवटी तो दोष दूर न झाल्यामूळे दुरूस्तीकरीता परत देण्यात आला व त्यानंतर तक्रारदाराना तो भ्रमणध्वनी पुन्हा प्राप्त झाला नाही किंवा त्याचा मोबदला किंवा त्याऐवजी दुसरा भ्रमणध्वनी देण्यात आला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराना त्यांचा भ्रमणध्वनी दुरूस्त न करता, दुसराच भ्रमणध्वनी न सांगता दिला. आमच्या मते सामनेवाले यांचे कृत्य अनुचित व्यापार पध्दतीमध्ये बसते. तसेच, सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसुर केल्याचे स्पष्ट होते. भ्रमणध्वनी मध्ये असलेला दोष दूर न होणे हे भ्रमणध्वनी मध्ये उत्पादित दोष असल्याचे सिध्द करते. भ्रमणध्वनी वारंटीच्या कालावधीमध्ये असल्यामूळे सामनेवाले यांचे हे कर्तव्य होते की, त्यांनी तो दुरूस्त करून, तक्रारदाराना दयावा. तसेच सामनेवाले यांच्या कर्मचा-यांचे वर्तन अशोभनीय होते. तक्रारदार यांच्या मागण्या मंजूर करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
4. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
5. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्र 497/2016 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवालेयांनी अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली व सेवा देण्यात कसुर केला असे जाहीर करण्यात येते..
3. सामनेवाले यांनी तक्रारदाराना नविन मॉयक्रोमॅस ए-106 दयावा किंवा रू. 6,000/-,(सहा हजार) रोख रक्कम तक्रारदाराना दयावी. हि पूर्तता दि. 18/05/2018 किंवा त्यापूर्वी करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदाराना मानसिक त्रासाकरीता रू. 3,000/-,(तीन हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 2,000/-,(दोन हजार) दि. 18/05/2018 पर्यंत अदा करावे.
5. उपरोक्त क्लॉझ 3 व 4 मधील नमूद रक्कम दि. 18/05/2018 पर्यंत अदा न केल्यास, त्या रकमेवर दि. 19/05/2018 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याज लागु राहिल.
6. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
7. आदेशाची प्रत उभयपक्षकारांना निःशुल्क पाठविण्यात यावी.
npk/-