द्वारा श्री.आर.बी.सोमानी- मा.अध्यक्ष
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः
तक्रारदार ही सहकारी गृहनिर्माण संस्था आहे व सामनेवालेविरुध्द त्यांनी केलेल्या दोषपूर्ण कामाबद्दल प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे कथन असे की, तक्रारदार ही नोंदणीकृत संस्था असून सभासदांच्या हिताचे काम करतात व प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचा त्यांना अधिकार आहे. सामनेवाले यांचेबरोबर दुरुस्ती व पेंटींगचा करार तक्रारदाराने केला होता ते योग्य न झाल्याने त्यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. सदर कराराची प्रत तक्रारीसोबत दाखल आहे.
सामनेवाले यांचा सेवा देण्याचा व्यवसाय आहे आणि सामनेवाले स्वतः सिव्हील इंजिनिअर आहेत आणि म्हणून इमारतीचे बाहेरील प्लॅस्टर आवश्यक तेथे लावणे व पेंटींग करणे असा कराराकरीता सामनेवाले यांचेशी रू. 7,00,000/- करीता केला. सदर कराराची प्रत प्रकरणात दाखल आहे. सामनेवाले यांनी सदर इमारतीस चांगले प्लॅस्टर व रंगकाम करण्यात येईल असे सांगितले. सदर करार दि. 23/12/2005 रोजी झाला आणि त्या अनुषंगाने रु. 7,00,000/- तक्रारदारांनी देण्याचे ठरले. सदर कराराच्या अटी तक्रारीत पुन्हा नमूद केल्या गेल्या आहेत.
तक्रारदाराने पुढे नमूद केले की सदर कराराअंतर्गत सामनेवालेचे पाच वर्षे डिफेक्ट लायबिलिटी होती. शेवटी दि. 5/1/2006 ला सामनेवाले यांनी चांगल्या कामाचा करुन देण्याची हमी दिल्यावर त्याना काम देण्यात आले. सामनेवाले यांनी मागणी केलेनुसार वेळोवेळी सामनेवाले यांना त्वरीत रक्कम दिली. दि. 11/10/2006 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराकडे उर्वरीत पेमेंटची मागणी केली. दि. 29/10/2006 रोजी तक्रारदाराने सामनेवालेस सदर पत्राचे उत्तर आणि दुरुस्तीमध्ये राहिलेले दोषांबद्दल कळविले व सदर दोष दुरुस्त करुन देण्याची विनंती केली. कारण सामनेवाले यांनी देय रकमेपैकी भरपूर रक्कम स्विकारली होती. सामनेवाले यांनी केलेल्या पेमेंटबद्दल पुरावा झेरॉक्स म्हणून दाखल केलेला आहे. सामनेवाले यांनी केलेले काम योग्य नव्हते कारण तक्रारदारास सभासदांकडून अनेक तक्रारी येणे सुरु झाले.
दि. 8/8/2006 रोजी सामनेवालेस पत्र देऊन दोष दुरुस्तीची सूचना दिली. परंतु सामनेवाले यांनी कोणतीही कारवाई केली नाही. सामनेवाले यांनी याप्रमाणे सूचना मिळूनही दुरुस्ती न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे. सदर पत्रांच्या प्रती रेकॉर्डवर दाखल आहेत. करारानुसार सर्वच रक्कम घेतल्यानंतरही योग्य दर्जाचे दुरुस्तीचे काम व रंगकाम झालेले नाही आणि सभासदांनी तक्रारदारांकडे अनेकवेळा लेखी तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींच्या प्रती रेकॉर्डवर दाखल आहेत. सदर तक्रारींवरुन अनेकवेळा सामनेवालेस दोष दुरुस्तीची सूचना दिली होती. शेवटी दि. 12/3/2009 रोजी तक्रारदाराने वकीलामार्फत सामनेवालेस नोटीस पाठविली व रु. 5,000/- नुकसान भरपाई मागितली.
सामनेवाले यांना सदर नोटीस मिळाली. परंतु त्यांनी पुर्तता केली नाही किंवा उत्तरही दिले नाही आणि यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली असे सिध्द होते.
तक्रारदाराने आर्कीटेक्ट सुहासिनी जठार यांचेकडून त्यांचे इमारतीमध्ये सामनेवाले यांनी केलेले प्लॅस्टर पॅचवर्क आणि रंगकामाची पाहणी करुन घेतली असता असे आढळले की त्यांना तज्ञ अहवाल दिला की सदर पॅचवर्क योग्य नव्हते व त्यामुळे नविन क्रॅक होऊन क्रॅक वाढले होते. प्लॅस्टर योग्य त-हेने काढले गेले नव्हते आणि पाण्याची गळती आढळली आणि योग्य दर्जाचे काम नव्हते असे सदर वास्तुविशारद यांनी दिलेला अहवाल दि. 2/10/2009 प्रकरणात दाखल आहे. योग्य दर्जाचे व प्रतीची सेवा योग्य काम न करुन सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सामनेवाले यांचे अशा कार्यवाहीमुळे तक्रारदार व त्यांचे सभासदांना अतोनात नुकसान मानसिक व शारीरिक त्रास झाला आणि म्हणून नुकसान भरपाई मिळणेस ते पात्र आहेत.
सामनेवाले यांचेशी करार पाच वर्षांपुरता होता. प्रस्तुत तक्रारीस कारण सतत घडत आहे कारण सदर करारानंतर पाच वर्ष होणे बाकी आहे आणि म्हणून या मंचास प्रस्तुत तक्रार निेकाली काढण्याचा अधिकार आहे.
तक्रारदाराने प्रार्थना केली की, सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली आहे असे मंचाने जाहिर करावे. सामनेवाले यांनी आवश्यक ती दुरुस्ती करुन दयावी व करार कालावधीत उच्च दर्जाचे काम व पुन्हा रंगकाम करुन दयावे. अन्यथा रु. 7,00,000/-, 21% व्याजासह परत करण्याची निर्देशित करण्यात यावे आणि रु. 5,00,000/- नुकसान भरपाई आणि रु. 25,000/- तक्रारीचा खर्च मिळावा अशी प्रार्थना केली. तकारीसोबत प्रतिज्ञालेख व यादीसोबत दस्तऐवज दाखल केले. त्यात प्रामुख्याने ठरावाची प्रत, सभासदांची यादी, सामनेवाले यांचेशी केलेल्या करारनाम्याची प्रत, वर्क ऑर्डर, सामनेवाले यांनी पुन्हा दिलेले इस्टिमेट,पेमेंटबद्दल अहवाल, तक्रारदाराद्वारे सामनेवालेस निकृष्ट कामाबद्दलचे पत्रव्यवहार, स्मरणपत्र, संस्थेला सभासदांकडून मिळालेल्या तक्रारी दाखल आहेत. तसेच सामनेवाले यांनी दि. 12/3/2009 ला तक्रारदाराने पाठविलेली नोटीस तसेच दि. 2/10/2009 रोजी आर्कीटेक्ट सुहासिनी जठार यांनी केलेला पाहणी अहवाल प्रकरणात दाखल आहे.
सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आलेली असता त्यांनी दि. 31/5/2010 रोजी आपला लेखी जबाब दाखल केला. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे कथन फेटाळले असून फक्त करार असल्याबद्दलचे मान्य केले. सामनेवालेंचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणेः
सामनेवाले हे व्यावसायिक असून मागील 12 वर्षांपासून पेंटींग, प्लंबिंग व बांधकामाबाबत कामे घेतात व त्यांचा या विषयाचा हातखंडा आहे व बाजारात पत आहे. वर्कऑर्डरप्रमाणे बिल्डींगचे बाहेरील पॅचवर्क व रंगकाम केले व बिल्डींगला कोणतेही वॉटर प्रुफींग केले नाही कारण तसे करारात समाविष्ट नव्हते.
करारानुसार 10% रक्कम 31 डिसेंबर, 2006 पर्यंत रोखून ठेवण्याचे अधिकार तक्रारदारास होते. सामनेवाले यांचे तक्रारदार सोसायटीचे काम सुरु असतांना कडप्पा फिटींगचे किरकोळ काम दिले गेले असता त्याचे वेगळे कोटेशन देण्यात आले. एकूण करारानुसार रु. 9,24,375/- घेणे होते. परंतु
तक्रारदाराने रु. 7,61,115/- दिलेले आहेत. सामनेवाले यांनी योग्यरित्या काम करुन दिलेले आहे. परंतु त्याची रक्कम तकारदाराने रोखून ठेवली आहे. रु. 1,63,260/- घेणे बाकी आहे. ही रक्कम बुडविणेचे दृष्टीकोनातून सामनेवाले यांचे कमिटी मेंबरांनी सामनेवाले यांनी केलेल्या कामातील दोष काढणे सुरु केले. सामनेवाले यांनी वेळोवेळी सदर बॅलन्स पेमेंटची मागणी केली. परंतु तक्रारदाराने मिटींगचे कारण पुढे करुन सामनेवालेस रक्कम दिली नाही. सामनेवाले यांनी पुढे नमूद केले की, योग्य दर्जाचे काम व साहित्य वापरले गेले आणि पदाधिका-यांना व सभासदांना वेळोवेळी दाखविले आहे. तक्रारदाराचे तक्रारीतील कथन खोटे असून सामनेवाले यांची बदनामी करणारे आहे.
सामनेवाले यांनी पुढे नमूद केले की सदर इमारत 1996 ची आहे. छताचे वॉटर प्रुफींग खराब झालेले होते व छताची दुरुस्ती करण्याचा सल्ला दिला होता आणि कळविले होते की, तसे न केल्यास रंगकाम करुन घेणे उचित ठरणार नाही. तक्रारदाराने सामनेवाले यांचा सल्ला धुडकावून लावला व कामाचा दर्जा योग्य नाही असा शिक्का लावून सामनेवालेचे पैसे बुडविण्याचे हेतूने खोटी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराने दाखल केलेला आर्कीटेक्टचा अहवाल दि. 2/10/2009 हा तक्रारदाराचे सांगणेवरुन हेतुपुरस्सर बनविलेला असून आहे तो खोटा व अर्धवट आहे. सदर तज्ञाने टेरेसवरील पाणी गळतीबद्दल काहीही मत दिले नाही आणि म्हणून सदर अहवाल चुकीचा असून अमान्य आहे. पैसे देण्याचे टाळण्यासाठी अशाप्रकारे बनाव तक्रारदाराने केला आहे. प्रस्तुत तक्रार खोटी असून ती खर्च रु. 10,00,000/- सह खारीज करावी तसेच खर्च मिळावा असे प्रतिज्ञालेखावर आपले लेखी उत्तर दाखल केले आहे.
सामनेवाले यांनी आपले प्रतिज्ञालेख दि. 15/6/2010 रोजी प्रकरणात दाखल केले व त्यांचेविरुध्द तक्रारदाराने केलेले संपूर्ण आक्षेप फेटाळले. तक्रारदाराने दि. 2/10/2009 चे अहवाल देणा-या तज्ञांचा प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल केलेला आहे आणि त्यांनी सदर अहवालातील मुद्दे बरोबर व खरे असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले. सदर प्रकरणात तक्रारदाराने युक्तीवाद सादर केला होता. सामनेवालेतर्फे कुणीही हजर झाले नाही. सामनेवाले अनेक तारखांपासून गैरहजर आहेत असे रोजनाम्यावरुन स्पष्ट होते.
सामनेवाले यांचा लेखी जबाब तसेच प्रतिज्ञालेख हा त्यांचेतर्फे युक्तीवाद ग्राहय धरुन तसेच तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रकरण अंतीम निकालाकरीता ठेवण्यात आले.
उभय पक्षांचे शपथेवरील लेखी कथन, दाखल कागदोपत्री पुरावे यांचे सुक्ष्म वाचन केलेनंतर तसेच तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाद्वारे निकालाकरीता खालील मुदद्यांचा विचार करण्यात आलाः
मुद्देः
1. तक्रार खोटी असून खारीज करणेस पात्र आहे काय?
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?
3. जर होय तर तक्रारदार काय दाद मिळणेस पात्र आहे काय?
स्पष्टिकरणः
मुद्दा क्र. 1-
सामनेवाले यांनी तक्रारदाराविरुध्द आक्षेप घेतला की, करारानुसार उर्वरीत रक्कम न देऊन तक्रारदाराने त्यांचेविरुध्द प्रस्तुत खोटी तक्रार दाखल केली आणि म्हणून ती खर्चासह खारीज होणेस पात्र आहे. सामनेवालेंचे कथन की, तक्रारदाराने करारानुसार उर्वरीत रक्कम देणे टाळणेसाठी हेतूने सदर खोटी तक्रार दाखल केलेली आहे. मंचाचेमते सामनेवाले यांचा बचाव योग्य व रास्त नाही कारण उच्च दर्जाचे काम करुन देण्याची जबाबदारी सामनेवालेवर होती आणि करारानुसार त्यांची जबाबदारी ही करारापासून पाच वर्षांकरीता होती असे उभय पक्षांचे सहीने ठरल्यानुसार करारात नमूद करण्यात आलेले आहे आणि कथीत दोषांबद्दलची जबाबदारी सामनेवाले यांनी स्विकारलेली आहे आणि म्हणून इमारतीमधील केलेल्या प्लंबिंगच्या कामामध्ये तसेच रंगकामामध्ये दोष उद्भवल्याने ते दूर करुन देण्याचीसुध्दा जबाबदारी सामनेवाले यांची होती ती पूर्ण न झाल्याने सामनेवाले विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे आणि म्हणून मंचाचेमते सामनेवाले यांचा आक्षेप फेटाळण्यात येतो.
मुद्दा क्र. 2 व 3 -
मंचासमोर दि. 23/12/2005 चा करार दाखल करुन त्यानंतर वर्क ऑर्डर प्रकरणात दाखल आहे. त्यानुसार विशिष्ट काम सामनेवाले यांनी करुन देणे होती व त्याकरीता तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेल्या दस्तऐवजावरुन पासबुकवरील नोंदींवरुन तसेच सामनेवाले यांनी मान्य केलेवरुन स्पष्ट होते की काही रक्कम ही त्या वर्षाचे शेवटी म्हणजेच दि. 31/12/2006 ला देय होती.
मंचासमोर आर्कीटेक्ट श्रीमती सुहासिनी जठार यांचा अहवाल व त्याअनुषंगाने प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल आहे. सामनेवाले यांनी सदर अहवाल खोटा व बनावट असल्याचे नमूद केले आहे. परंतु सदर अहवालाच्या विरोधात अन्य स्वतंत्र अहवाल दाखल केलेला नाही तसेच सदर अहवाल देणा-या व्यक्तीची उलट तपासणी करण्याचा विनंती अर्ज केलेला नाही कारण प्रकरणात दाखल दस्तऐवजांवरुन म्हणजेच आर्कीटेक्टचे प्रतिज्ञालेख 9 ऑगस्ट, 2010 ला दाखल आहे असे दिसून येते. तसेच मंचामार्फत सदर तक्रारदाराचे सोसायटीच्या इमारतीमधील सामनेवाले यांनी केलेले दुरुस्ती व रंगकाम पाहणी अहवालासाठी व अहवाल मिळणेसाठी कोणताही विनंती अर्ज दाखल केलेला नाही आणि म्हणून मंचाचेमते विरोधासाठी विरोध असा सामनेवाले यांचा पवित्रा दिसतो.
सामनेवाले यांनी तक्रारदारावर पैसे न दिल्याचा आक्षेप घेतलेला आहे. परंतु उर्वरीत रक्कम घेणे आहे व त्याकरीता सामनेवाले यांनी तक्रारदारास एकदा रक्कम मागणी केल्याचे दिसून येते. परंतु त्यानंतर कोणताही पाठपुरावा नाही किंवा लिगल नोटीस नाही किंवा रक्कम वसुलीसाठी दिवाणी दावा दाखल नाही. 1 ऑक्टोबर,2006 ला सामनेवाले यांनी तक्रारदारास पेमेंट मागणारे पत्र दिले आहे. परंतु 15 ऑगस्ट, 2006 ला तक्रारदाराद्वारे दोष दाखविण्यात आले व त्याप्रमाणे तक्रारदाराचे सभासदांनी वेळोवेळी लिकेज, इमारतीचे सामनेवाले यांनी केलेले निकृष्ट कामाबद्दलच्या तक्रारी संस्थेला प्राप्त झालेल्या दिसून येतात. मंचाचेमते सभासदांच्या तक्रारी, तज्ञ अहवाल तसेच करारनाम्यातील डिफेक्ट लायबिलिटी कालावधीची अट पाहता मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेचे इमारतीचे बाहेरील प्लॅस्टर व इतर दुरुस्ती काम योग्य दर्जाचे केलेले नाही आणि सदर प्लॅस्टर योग्य दर्जाचे केलेले नाही आणि सदर प्लॅस्टर योग्य नसल्याने तक्रारदारास लिकेजचा प्रॉब्लेमला सामोरे जावे लागत आहे आणि तज्ञ अहवालानुसार सदर प्लॅस्टर योग्यत-हेने केले गेलेले नाही आणि त्यामुळे इमारतीचे नुकसान झालेला आहे आणि म्हणून मंचाचेमते सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेशी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास योग्य दर्जाची सेवा न देता दोषपूर्ण सेवा दिलेली आहे असे मंचासमोर सिध्द होते.
तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून करारानुसार दोष दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा दिलेली रक्कम मागितली आहे तसेच नुकसान भरपाईची रक्कम मागितली आहे. सामनेवाले यांनी तक्रारीस विरोध केलेला आहे. मंचासमोर ही बाब स्पष्ट होते की तक्रारदाराचे इमारतीचे बांधकाम 1996 असून त्यातील तिस-या मजल्यावरील काही फ्लॅटमध्ये लिकेजबद्दल सोसायटीकडे तक्रार केल्याचे दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. तसेच सदर इमारतीचे बाहेरील प्लॅस्टर योग्य नाही व असे तज्ञांनी अहवालात नमूद केले आहे आणि म्हणून मंचाचे असे स्पष्ट मत आहे की सामनेवाले यांनी तक्रारदाराचे इमारतीमधील योग्य दर्जाचे काम न करुन तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आहे आणि म्हणून सामनेवाले तक्रारदाराकडे केलेल्या कामामधील दोष दुरुस्त करुन देण्यास प्रथमतः जबाबदार आहेत. तज्ञ अहवाल प्रकरणात दाखल आहे. परंतु सामनेवाले यांनी त्याचा विरोध दर्शवून ते खोटे असल्याचे नमूद केले. एकंदरीत मंचाचेमते सदर प्लॅस्टर व रंगकामामधील दोष दुरुस्त करण्याचे आदेशीत केल्यास पुन्हा त्यावर देखरेखीबाबतचा व दर्जावरुन वाद पुन्हा उपस्थित होणार आहे आणि म्हणून योग्य दर्जाचे न झालेले कामाबद्दल नुकसान भरपाई मंजूर करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच या निकृष्ट दर्जाचे कामामुळे संस्थेचे सभासदांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आणि या सदराखाली सामनेवाले तक्रारदार संस्थेस नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत झाले आहे.
मंचासमोर ही बाब सिध्द होते की, करारानुसार पाच वर्षे जबाबदारी सामनेवालेवर टाकली होती. सदर इमारतीमधील सामनेवाले यांनी सूचना मिळूनही वेळेचे आंत दोष दुरुस्ती केलेले नाहीत. सामनेवाले यांनी बचाव घेतला की त्यांनी तक्रारदार संस्थेचे पदाधिका-यांना असे सांगितले होते की त्यांनी टेरेसचे वॉटर प्रुफींग जुने झाले असल्याने पुन्हा नविन करुन घ्यावे. असे असते तर तक्रारदाराचे पत्रास उत्तर देऊन सामनेवाले यांनी स्पष्ट केले असते. परंतु तक्रारदाराचे नोटीसला देखील सामनेवाले यांनी कोणतेही उत्तर दिले नाही आणि म्हणून टेरेसचे वॉटर प्रुफींग काम जुने व खराब झाले होते आणि त्याबद्दल सामनेवाले यांनी तक्रारदारास तज्ञ सल्ला दिला होता हे सामनेवाले यांचे विधान मंच फेटाळत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहे
आ दे श
1. तक्रारदार संस्थेला सामनेवाले यांनी करारानुसार योग्य दर्जाचे काम करुन न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि निम्न दर्जाचे काम करुन सूचना मिळूनही दोष दुरुस्त न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास दोष दुरुस्तीकरीता रक्कम रु. 4,00,000/- (अक्षरी रुपये चार लाख) देय करावे व त्यावर रक्कम जमा तारखेपासुन संपुर्ण रक्कम चुकती होईपर्यंत दरसाल दर शेकडा 7 टक्के प्रमाणे व्याज देय करावे.
3. संस्थेला व सभासदांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी नुकसानीपोटी रु. 3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लाख) देय करावे असे मंच आदेशीत करते.
4. सामनेवाले यांनी तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- (रक्कम रुपये दहा हजार) तक्रारदार संस्थेस दयावे.
5. उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवाले यांनी या आदेशाचे प्रत मिळालेपासून 30 दिवसांचे आंत करावे. अन्यथा आदेश रकमेवर रक्कम जमा तारखेपासुन संपूर्ण रक्कम चुकती होईपर्यंत द.सा.द.शे. 7% ऐवजी 9% प्रमाणे व्याज देय राहील याची सामनेवाले यांनी नोंद घ्यावी.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांस निःशुल्क देण्यात यावी.
दिनांकः 12/06/2012.