(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक 15 डिसेंबर, 2011)
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदार श्री सुधीर शिवडेकर यांची गैरअर्जदार यांचेविरुध्द तक्रार थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदार नं.2 ही बँक आहे आणि गैरअर्जदार नं.1 ही सेवा देणारी संस्था आहे. तक्रारदाराचे गैरअर्जदार नं.2 बँकेमध्ये खाते आहे. गैरअर्जदार नं.1 चे प्रतिनिधीने तक्रारदाराला आमीष दाखवून सभासद बनण्यास प्रवृत्त केले आणि रुपये 18,649/- एवढी रक्कम त्यांचेकडून घेऊन पुढे दरमहा रुपये 3,022/- ईसीएसद्वारे गैरअर्जदार नं.2 कडे वळती करणे सुरु केले. शेवटपर्यंत वसूली केली, मात्र कोणतीही सेवा तक्रारदारास दिलीच नाही. तक्रारदाराने एकूण रुपये 1,20,880/- एवढी रक्कम गैरअर्जदार नं.1 चे खात्यात टाकली. यासंबंधात त्यांनी वेळोवेळी गैरअर्जदार यांचेशी संपर्क साधला आणि शेवटी नोटीस दिली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. म्हणुन शेवटी नाईलाजाने तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे जमा केलेली रक्कम रुपये 1,39,529/- त्यावरील 15% व्याजासह परत मिळावी, जे रुपये 56,474/- एवढे होते ते व त्यांना त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबाबत रुपये 75,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 20,000/- एवढी रक्कम मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
यातील गैरअर्जदार नं.1 यांना मंचातर्फे नोटीस बजविण्यात आली, मात्र ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत, वा आपला लेखी जबाब सुध्दा दाखल केला नाही. म्हणुन त्यांचेविरुध्द दिनांक 4/10/2011 रोजी मंचाने एकतर्फी आदेश पारीत केला.
यातील गैरअर्जदार नं.2 यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला आणि तक्रारदाराची सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांच्या सेवेमध्ये कोणताही दोष नाही. तक्रारदार व गैरअर्जदार नं.1 यांचेमध्ये झालेल्या व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि त्याबाबतची त्यांना कोणतीही माहिती नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार नं.2 यांना निष्कारण या प्रकरणात गैरअर्जदार केले. म्हणुन त्यांचेविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, सोबत सभासद दाखला, बँक खात्याचे विवरण, उभय पक्षातील पत्रव्यवहार, नोटीस इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदाराचे खातेविवरण व कस्टमर प्रोफाईल याप्रमाणे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत.
सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद मंचाने ऐकला.
यातील गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारीस कोणतेही उत्तर दिले नाही व आपला बचाव केला नाही. तक्रारदाराने मंचासमक्ष दाखल केलेल्या सर्व दस्तऐवजावरुन आणि त्यांचे प्रतिज्ञालेखावरुन गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारदाराजवळून रुपये 18,649/- एवढी सभासद फी घेतली व पुढे त्यांचे खात्यातून वेळोवेळी रुपये 3,022/- एवढी रक्कम एकूण 32 वेळा म्हणजे रुपये 96,704/- एवढी रक्कम गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या बँक खात्यामधून वळती केल्याचे दिसून येते. अशाप्रकारे एकंदरीत रुपये 1,15,353/- एवढी रक्कम तक्रारदाराजवळून घेतल्याचे दिसते, मात्र त्याबाबतची कोणतीही सेवा तक्रारदारास दिलेली नाही, आणि ही तक्रारदारास दिलेल्या सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे.
गैरअर्जदार नं.2 यांनी आपल्या व्यवस्थेत तक्रारदाराकडून सूचना प्राप्त झाल्यावर सुध्दा दुरुस्ती न करता तक्रारदाराचे खात्यातून रकमा वळती करुन गैरअर्जदार नं.1 यांच्या खाती टाकल्या आहेत, जेंव्हा की, तक्रारदाराने त्यांना रकमेचे प्रदान थांबविण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेली होती. मात्र त्यांनी योग्य ती दरुस्ती केली नाही व रकमेचे व्यवहार थांबविले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला, ही त्यांचे सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-/// अं ती म आ दे श ///-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारदारास रुपये 1.15.353/- एवढी रक्कम ती जेंव्हा—जेंव्हा स्विकारली त्या—त्या तारखेपासून द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम, रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो परत करावी.
3. तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदार नं.1 यांनी रुपये 25,000/- (रुपये पंचेवीस हजार फक्त) व गैरअर्जदार नं.2 यांनी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) एवढी नुकसान भरपाई द्यावी. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत प्रत्येकी रुपये 1,000/- याप्रमाणे एकूण रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
4. गैरअर्जदार यांनी वरील आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून एक महिन्याचे आत करावे. नपेक्षा उपरोक्त रकमेवर द.सा.द.शे. 12% ऐवजी 15% दराने दंडनिय व्याज गैरअर्जदार देणे लागतील.