-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक-06 सप्टेंबर, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द त्याने गाडीसाठी घेतलेल्या कर्जा संबधी फसवणूकी केल्या बद्दल दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष क्रं-1) मे.महिन्द्रा आणि महिन्द्रा लिमिटेड कंपनी निर्मित गाडी, विरुध्दपक्ष क्रं-2) उन्नती मोटर्स, खैरी, नागपूर यांचे कडून विकत घेतली होती आणि त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-3) इंडुसिंड बँकेनी त्याला कर्ज दिले होते. ती गाडी विरुध्दपक्ष क्रं-4) प्रादेशिक परिवहन अधिकारी, (RTO) नागपूर यांचेकडे नोंदणीकृत करण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं-5) हे आर्बिट्रेटर (Arbitrator) आहेत.
03. तक्रारीतील मुद्दा असा आहे की, तक्रारकर्ता नियमित कर्जाची परतफेड करीत असताना सुध्दा विरुध्दपक्षाने त्याचकडे जास्त रक्कम थकीत आहे असे दर्शवून त्याच्या कडून रकमेची मागणी सुरु केली आणि त्यानंतर त्याचे विरुध्द आर्बिट्रेशन प्रोसेडींग सुध्दा सुरु केली. तसेच त्याची गाडी जप्त करण्यात आली, म्हणून त्याने विरुध्दपक्षाने त्याची गाडी जप्त करुन व त्याचे विरुध्द आर्बिट्रेशन प्रोसेडींगची कार्यवाही सुरु केल्याने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे घोषीत करण्यासाठी आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली.
04. विरुध्दपक्षाने तक्रारीतील सर्व आरोप फेटाळून लावलेत. तक्रारकर्ता हा नियमित कर्जाची परतफेड करीत नव्हता, म्हणून त्याचे विरुध्द करारनाम्या प्रमाणे आर्बिट्रेशन प्रोसेडींग सुरु करण्यात आली व त्यामध्ये त्याचे विरुध्द अवार्ड पण पारीत झालेला आहे त्यामुळे ही तक्रार आता ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही असा आक्षेप घेतलेला आहे.
05. तक्रारकर्त्याला बरीच संधी देऊनही त्याने या तक्रारीत प्रतीउत्तर किंवा इतर कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच लेखी युक्तीवाद सुध्दा दाखल केलेला नाही, त्यामुळे ही तक्रार मौखीक युक्तीवादासाठी नेमण्यात आली परंतु त्यावेळी सुध्दा तक्रारकर्त्या तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही.
06. विरुध्दपक्षाने आर्बिट्रेशन अवार्डची (Arbitration Award) प्रत दाखल केलेली आहे, ज्या कारणासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे, त्याच कारणास्तव आर्बिट्रेशन प्रोसेडींग (Arbitration Proceeding) झाली होती व त्यामध्ये अवार्ड (Award) पण पारीत झालेला आहे. एकदा आर्बिट्रेशन प्रोसेडींग मध्ये अवार्ड पारीत झालेला असेल तर त्याच कारणास्तव ग्राहक तक्रार चालू शकत नाही. तक्रारकर्त्याला आर्बिट्रेशन प्रोसेडींग मधील पारीत अवार्डला आव्हान देण्याची सुविधा कायद्दाने दिलेली आहे व त्यामध्ये तो आपली बाजू मांडू शकतो.
07. या सर्व कारणास्त ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालण्या योग्य नाही तसेच तक्रारकर्त्या कडून कुठलाही पुरावा वा प्रतीउत्तर वा लेखी युक्तीवाद सुध्दा दाखल केल्या गेलेला नसल्याने ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
::आदेश ::
(01) तक्रारकर्ता श्री श्याम मंसाराम गुप्ता यांची विरुध्दपक्ष क्रं-1) मे.महिन्द्रा आणि महिन्द्रा लिमिटेड, मुंबई आणि इतर-4 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.