तक्रारदार :वकील श्री.वासनीक यांचे मार्फत हजर.
सामनेवाले :प्रतिनिधी वकील श्री.रुपेश गावकर यांचे मार्फत हजर.
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. तक्रारदार हे हॉटेल आहे. तर सा.वाले हे गॅस पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे हॉटेलचे उपयोगाकरीता नैसर्गिक गॅस पाईपलाईन जोडणी करुन मिळावी असा अर्ज दिला व त्याकामी रु.6,000/- सा.वाले यांचेकडे जमा केले. सा.वाले यांनी मंजूरी आदेश दिनांक 8.11.2004 रोजी पारीत केला व त्यामध्ये फेब्रृवारी 2005 पर्यत पाईप लाईन जोडणी करण्यात येईल असे नमुद केले. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांनी आपले आश्वासनाची पुर्तता केलेली नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे वेळोवेळी पत्रे पाठविली. व तगादा लावला तरी देखील सा.वाले यांनी पाईपची गॅस जोडणी तक्रारदारांच्या हॉटेलमध्ये करुन दिली नाही. सरते शेवटी निराश होऊन तक्रारदारांनी दाद मिळणेकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुवीधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे व नुकसान भरपाई रु.4,50,000/- मिळावेत व पाईप लाईन गॅस जोडणीचे आदेश सा.वाले यांना द्यावेत अशी दाद मागीतली.
2. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदार हे हॉटेल असून वाणिज्य व्यवसाय करणारी कंपनी आहे. व वाणिज्य व्यवसाय करणेकामी पाईप गॅस जोडणी त्यांनी मागीतलेली असल्याने ग्राहक तक्रार निवारण मंचास सदरहू तक्रार दाखल करुन घेण्याचा अधिकार नाही. सा.वाले यांनी असेही कथन केले आहे की त्यांनी तक्रारदार हॉटेलला गॅस पाईप जोडणी करण्याचे प्रमाणिक प्रयत्न केले. परंतु ज्या भागामध्ये खोदणी करण्यात आली त्या भागामध्ये अन्य व्यवसाईकांचे केबल व पाईप लाईन असल्याने सा.वाले यांना खोदकाम करणे अशक्य झाले. सा.वाले यांनी असेही कथन केले की, त्यांनी अन्य जागेतून 35 मिटर पर्यत खोदकाम केले परंतु तेथे देखील हिच समस्या उद्भवली व सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून गॅस पाईप जोडणेकामी खोदकाम करणे अशक्य झाले. या प्रमाणे सा.वाले यांनी असे कथन केले की, या प्रकारचे प्रमाणिक प्रयत्न करुनही सा.वाले हे तक्रारदारांचे हॉटेलला गॅस पाईप जोडणी करु शकले नाहीत.
3. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत प्रस्तुत मंचाच्या अधिकार क्षेत्रास आव्हान देणारा अर्ज दिला. व त्यात असे कथन केले की, वाणिज्य व्यवसायाकामी तक्रारदारांनी सेवा सुवीधा स्विकारल्याने प्रसतुतची तक्रार ग्राहक तक्रार मंचाकडे दाखल होऊ शकत नाही. त्यास तक्रारदारांनी उत्तर दिले. दोन्ही बाजुनी आपले पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
4. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (डी) प्रमाणे ग्राहक होतात काय ? |
नाही. |
2 |
प्रस्तुत तक्रार सुनावणीस घेण्याचा व न्याय नीर्णय देण्याचा ग्राहक तक्रार निवारण मंचास अधिकार आहे काय ? |
नाही. |
3 |
अंतीम आदेश ? |
तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. तक्रारदार हे हॉटेल असून तक्रारीमध्ये तक्रारदारांचे नांव मे.आदित्य रेस्टॉरंट(प्युअर वेज), असे दिलेले आहे. तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र.1 मध्ये तक्रार ही भागीदारीचे एका भागीदारामार्फत दाखल करण्यात येत आहे असे नमुद केलेले आहे. सा.वाले यांनी कैफीयतीचे परिच्छेद क्र.15 मध्ये प्रस्तुत मंचाने तक्रार दाखल करुन घेण्याबाबत आक्षेप नांदिविला आहे व तसा वेगळा अर्ज दाखल केलेला आहे. सा.वाले यांनी कागदपत्रांची यादी दिनांक 16.12.2009 सोबत तक्रारदारांची गॅस पाईप जोडणी नोंदणीची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये कलम 7 मध्ये वाणिज्य व्यवसायाकामी
( Commercial ) असे स्पष्टपणे नमुद केले आहे. सा.वाले यांच्या आक्षेपाच्या अर्जाचे सुनावणीकामी तक्रारदारांनी यादीसोबत दिनांक 15.2.2012 रोजी त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप स्पष्ट करणारी काही कागदपत्रे दाखल केली. त्यामध्ये मुंबई दुकाने अधिनियम 1948 अंतर्गत आस्थापना नोंदणीचे प्रमाणपत्राची प्रत दाखल आहे. तक्रारदार हॉटेल मधील कर्मचा-यांची संख्या 15 अशी नमुद आहे. त्याखाली मस्टर रोलची प्रत दाखल आहे. तक्रारदारांनी आपली तक्रार त्यांचे भागीदार शिवराम के.शेट्टी यांचे मार्फत दाखल केलेली आहे. सा.वाले यांनी श्री.प्रमोद शिवराम शेट्टी यांचे आयकर प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये श्री.प्रमोद शेट्टी हे व्यवसायाचे भागीदारी आहे असे नमुद आहे. तक्रारीच्या परिच्छेद क्र.1 मध्ये देखील तक्रारदार हे भागीदारी आहे ही बाब नमुद आहे. सा.वाले यांनी कागदपत्रासोबत तक्रारदार हॉटेलच्या उत्पन्नाचे संबंधात लेखापालाचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये आर्थिक वर्षे 2011-12 करीता एकंदर नफा रु.1,95,521/- असे नमुद असून रु.18,000/- आयकर हॉटेलने शासनास जमा केलेला आहे. या वरुन तक्रारदार ही भागीदारी संस्था असून वाणिज्य व्यवसायाकामी नैसर्गिक पाईप गॅस जोडणी तक्रारदारांना हवी होती असे दिसून येते.
6. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (डी ) प्रमाणे मोबदला देऊन सेवा सुवीधा स्विकारणारी व्यक्ती ग्राहक होते परंतु वाणिज्य व्यवसायाकामी सेवा सुवीधा स्विकारणारी व्यक्ती ग्राहक होत नाही. या वर मात करण्याचे उद्देशाने तक्रारदारांनी तक्रारीत असे नमुद केले की, ते स्वतःचे उपजिविकेसाठी व स्वयंरोजगारासाठी हा व्यवसाय चालविला जातो. एका पेक्षा अधिक व्यक्त्ी एकत्र येऊन त्यातही नोकर चाकर ठेऊन एखादा व्यवसाय चालविला जात असेल तर त्या व्यक्तीचा गट स्वयंरोजगाराकामी अथवा उपजिविकेचे साधन म्हणून तो व्यवसाय करीत आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. सबब तक्रारदारांचे या संदर्भातील तक्रारीच्या पृष्ट क्र.1 मधील कथन केवळ या मुद्या वरील आक्षेपा पासून बचाव करणेकामी केलेले आहे असा निष्कर्ष काढावा लागतो.
7. तक्रारदारांचे वकीलांनी तरी देखील असा युक्तीवाद केला की, प्रस्तुतचा व्यवहार हा वाणिज्य व्यवसायाकामी स्विकारलेली सेवा सुवधा असा होऊ शकत नाही व त्याकामी तक्रारदारांचे वकीलांनी Civil Appeal No 1879 of 2003 with 7784 of 2002 dt. 9/2/2009 Karnataka Power Transmission Corpn. Ltd & Anr. v/s Ashok Iron Works Pvt. Ltd. WITH H.V. Bhlachandra Rao 2009 AIR SCW 1502 या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचा आधार घेतला. त्या मधील घटना हया वर्ष 1992 मध्ये घडलेली होती. तर वर्ष 2003 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1) (डी) यामये बदल करण्यात आलेला असून वाणीज्य व्यवसायाकामी सेवा सुवीधा स्विकारणारी व्यक्ती ग्राहक होत नाही असा बदल अंतर्भुत करण्यात आलेला आहे. सबब 2003 पूर्वीचे धटनावर आधारीत न्याय निर्णय प्रस्तुतच्या प्रकरणास लागू होत नाही. त्यातही त्या प्रकरणामध्ये कंपनी तक्रारदार होऊ शकते किंवा नाही हा मुद्दा होता. तो मुद्दा प्रस्तुतचे तक्रारीमध्ये नाही.
8. वरील सर्व पुराव्यांचा विचार करता तक्रारदार हॉटेल यांनी वाणिज्य व्यवसायाकामी सेवा सुवीधा स्विकारणेकामी सा.वाले यांचेसोबत व्यवहार केला. व त्या व्यवहारामध्ये काही त्रृटी सा.वाले यांचेकडून घडली असल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचास सदरहू तक्रार चालविण्याचा अधिकार रहात नाही असा निष्कर्ष काढावा लागतो.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 317/2009 रद्द करण्यात येतात.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.