न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वर नमूद पत्त्यावर काजूगराचे उत्पादन, प्रक्रिया व विक्री करणेच्या अनुषंगाने उद्योग सुरु करणेचे ठरविले. त्याअनुषंगाने त्यांनी शासनाकडे उद्योग आधार योजनेखाली नोंदणी केली. काजूगर प्रक्रियेकामी कॅश्यु मॉईश्चर मशीन असणे आवश्यक असते. सबब, तक्रारदारांनी याकामी वि.प. यांची भेट घेतली व त्यांचेकडून मशीनचे कोटेशन घेतले. वि.प. यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 64,900/- चे कोटेशन दिले. याशिवाय सदर मशिनचे शिफ्टींग, फिटींग व सर्व्हिसचे वेगळे चार्जेस रक्कम रु. 24,000/- सांगितले. त्यापैकी रक्कम रु. 64,900/- चे फायनल बिल रक्कम प्राप्त होताच मशीनसोबत पाठवून देण्याचे मान्य व कबूल केले व त्याप्रमाणे उभयतांमध्ये दि. 13/6/2019 रोजी व्यवहार ठरला. तक्रारदार यांनी वि.प. यांना दि. 13/6/19 रोजी रक्कम रु.45,000/- दि. 9/07/2019 रोजी रक्कम रु.19,900/- व दि. 02/07/19 रोजी रक्कम रु.24,000/- असे एकूण रक्कम रु.88,900/- वि.प. यांचे खात्यावर जमा केले. सदर रक्कम मिळाल्यानंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना जुलै व ऑगस्टमध्ये दोन हप्त्यात या मशिनची डिलीव्हरी दिली. परंतु वि.प. यांनी सदरील मशीन चालू करुन व प्रात्यक्षिक दाखवून दिले नाही. म्हणून तक्रारदाराने अनुभवी व्यक्तींच्या मदतीने सदर मशिनचे प्रात्यक्षिक घेतले असता सदर मशीन अपेक्षेप्रमाणे काम करत नसलेचे दिसून आले. सदर मशिन हे फॅनसोबत मोठया प्रमाणात पाणी फेकत असलेचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीचे 80 किलो काजूगर खराब झाले. याबाबत तक्रारदारांनी वि.प. यांना वारंवार फोन केले असता वि.प यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तदनंतर तक्रारदाराने मशिनचे काळजीपूर्वक निरिक्षण केले असता सदर मशीन हे जुनी असलेचे व त्यास रंगरंगोटी करुन तक्रारदार यांना विक्री केलेचे दिसून आले. याशिवाय वि.प. यांनी मशीनचे फायनल बिल व वॉरंटी कार्ड दिले नाही. सदर मशिनमध्ये तक्रारदार यांना खालीलप्रमाणे दोष दिसून आले.
- मशिनचे योग्य प्रात्यक्षिक वि.प. यांनी दाखवले नाही.
ब) हवा येण्याकरिता जोडलेली मीटर योग्य जोडलेली नाही.
क) सदर मशिनची केबीन मोटर चालू करताच अवास्तव आवाज करते व व्हायब्रेट होते.
ड) हवेची मोटर हवेपेक्षा जासत प्रमाणात पाणी फेकते, त्यामुळे तक्रारदाराचे 80 किलो काजू खराब झाले.
इ) मशीनच्या मटेरियलची क्वालीटी सांगितल्याप्रमाणे नाही.
ई) एअर व वॉटर पंप मोटर ही सेकंड हँड आहे. त्यावरचे सिल अगोदरच फोडलेले होते व आहे. त्यातील पार्ट जुने व रंगरंगोटी केलेचे दिसून येते.
उ) ट्रेमधील काजूगराचे मटेरियल योग्य पध्दतीने मॉईश्चराईज्ड होत नाही.
ऊ) सदर मशिनचे फायनल बिल व वॉरंटी कार्ड दिलेले नाही.
सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना दि 9/10/2019 रोजी नोटीस पाठविली. परंतु वि.प. यांनी सदर नोटीस स्वीकारली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास वि.प. यांचेकडून मशिनची किंमत रक्कम रु. 88,900/-, मशीनमुळे खराब झालेल्या काजूगराची नुकसानभरपाई रु. 90,000/-, व्यवसायाचे नुकसानीपोटी रु. 2,50,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत उद्योग आधार नोंदणीपत्र, तक्रारदाराचे उद्योगाचे नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसाय सुरु केल्याबाबतची सूचना पावती, जी.एस.टी. नोंदणीपत्र, जी.एस.टी. जोडपत्र बी, वि.प. यांनी दिलेले कोटेशन, तक्रारदार यांनी वि.प. यांना रक्कम अदा केलेबाबत बँकेचा खाते उतारा, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेले ईमेल्स, नोटीस, नोटीस परत आलेबाबतचा लखोटा, वटमुखत्यारपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांना याकामी नोटीसची बजावणी होवून देखील ते याकामी हजर झाले नाहीत, सबब, वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाईपोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांनी सन 2019 मध्ये नुकतीच ताम्रपर्णी कॅश्यु इंडस्ट्री नावाने दिलेल्या पत्त्यावर काजूगराचे उत्पादन करणे, प्रक्रिया करणे व विक्री करणेच्या अनुषंगाने सूक्ष्म उद्योग/लघु उद्योग/गृहोद्योग सुरु करणेचे ठरविले. त्या अंतर्गत शासनाकडे उद्योग आधार योजनेखाली नोंदणी केली व प्रोसेसिंग/प्रॉडक्शन कामी आवश्यक साधनांची व मशिनरीची जुळवाजुळव केली. काजूगर प्रक्रियेकामी कॅश्यु मॉइश्चर केबीन आवश्यक असते. तक्रारदार यांना वि.प. यांचेकडे सदर कॅश्यु मॉइश्चर मशीन विक्री कामी उपलब्ध असलेचे समजून आले. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून जून 2019 मध्ये सदर मशिनचे कोटेशन मागून घेतले. वि.प. यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 64,900/- चे कोटेशन दिले. याशिवाय सदर मशिनचे शिफ्टींग, फिटींग व सर्व्हिसचे वेगळे चार्जेस रक्कम रु. 24,000/- सांगितले. त्यापैकी रक्कम रु. 64,900/- चे फायनल बिल रक्कम प्राप्त होताच मशीनसोबत पाठवून देण्याचे मान्य व कबूल केले व त्याप्रमाणे उभयतांमध्ये दि. 13/6/2019 रोजी व्यवहार ठरला. तक्रारदार यांनी वि.प. यांना दि. 13/6/19 रोजी रक्कम रु.45,000/- दि. 9/07/2019 रोजी रक्कम रु.19,900/- व दि. 02/07/19 रोजी रक्कम रु.24,000/- असे एकूण रक्कम रु.88,900/- वि.प. यांचे खात्यावर जमा केले. सदर रक्कम वि.प. यांना मिळालेली आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार करता तक्रारदारांनी अ.क्र.1 ला ता. 29/1/2019 रोजीचे तक्रारदारांचे ताम्रपर्णी कश्यु इंडस्ट्रीजचे उद्योग आधार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय यांचे विभागाचे सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन यांनी दिलेले रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम 2018 अंतर्गत सूचना दिलेची पावती, जी.एस.टी. नोंदणी सर्टिफिकेट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदारांचा उद्योग सूक्ष्म व लघु उद्योगात समाविष्ट आहे. तसेच ता. 13/6/2019 रोजीचे वि.प. यांनी दिलेले मॉइश्चर केबीनचे कोटेशन दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी वेळोवेळी वि.प. यांना सदर मॉइश्चर केबीनचे खरेदीपोटी आयसीआयसीआय बँक तसेच मशीन शिफ्टींग, फिटींग सर्व्हिस व इतर रकमा दिलेच्या अनुषंगाने खातेउतारा दाखल केला आहे. सदरचे खातेवरुन तक्रारदारांनी वि.प. यांना सदरचे मॉइश्चर केबीनचे खरेदीपोटी रकमा दिलेल्या आहेत ही बाब स्पष्ट होते. सदरची रक्कम वि.प. यांनी आयोगात हजर होवून नाकारलेली नाही. सबब, सदरचे तक्रारदारांचे रकमांचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून सदर मशीन घेतलेनंतर सदरचे मशिनची क्षमता एकाच वेळी 100 किग्रॅ काजूगर मॉइश्चर करणेची आहे मात्र सुरुवात म्हणून तक्रारदार यांनी 80 किलो काजूगरचे प्रात्यक्षिक घेतले असता सदर मशिन अपेक्षेप्रमाणे काम करत नसलेचे दिसून आले. तक्रारदारांनी 80 किलो काजुगरावर प्रात्यक्षिक घेतले तथापि मशिन हे सोबत जोडलेल्या फॅनसोबत मोठया प्रमाणावर पाणी फेकत असलेचे दिसून आले. त्यामुळे तक्रारदारांचे सुरुवतीचे 80 किलो काजूगर खराब झाले. सदरचे मशीनचे काळजीपूर्वक निरिक्षण केले असता मशिन जुनी असलेचे व त्यास रंगरंगोटी करुन तक्रारदार यांना विक्री केलेचे दिसून आले. सर्व रक्कम घेवूनही तक्रारदार यांना सदरचे मशिनचे बिल व वॉरंटी कार्ड तक्रारदार यांना दिले नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडे वादातील मशिनची खरेदीची संपूर्ण रक्कम स्वीकारुन देखील तक्रारदार यांना सदोष मशीन देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी अ.क्र.1 ला सदरचे केबीन तक्रारीबाबत ता. 4/09/2019, 7/09/2019 व 16/09/2019 रोजी वि.प. यांना ईमेल पाठविलेले आहेत. सदरचे ईमेलचे अवलोकन करता -
Upon receiving this delivery you were supposed to provide demonstration of this new machine but its not yet completed from you after many follow up over phone.
We would like to inform you that this moisture cabin is not working as expected, it is throwing lot of water alongwith air and due to which our NW material is wasting and we are having financial loss.
सदर ईमेलला प्रतिसाद न दिल्याने तक्रारदार यांनी वि.प. यांना वकीलामार्फत ता. 9/10/2019 रोजी पाठविलेली नोटीस व सदची नोटीस वि.प. यांनी न स्वीकारलेने परत आलेला लखोटा ता. 19/10/2019 चा बंद लखोटा इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. प्रस्तुतकामी वि.प. याना संधी असताना देखील वि.प. यांनी सदर कामी हजर होवून तक्रारदारांचे तक्रारीस म्हणणे दाखल केलेले नाही. त्याकारणाने वि.प. यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.
7. प्रस्तुतकामी तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्रात तक्रारदार यांनी सदर मशिनचे काळजीपूर्वक निरिक्षण केले असता मशीन जुनी असलेचे व त्यास रंगरंगोटी करुन तक्रारदार यांना विक्री केलेचे दिसून येते. कॅश्यु मॉइश्चर मशीन बाबत खालील दोष दिसून आले.
- मशिनचे योग्य प्रात्यक्षिक वि.प. यांनी दाखवले नाही.
ब) हवा येण्याकरिता जोडलेली मीटर योग्य जोडलेली नाही.
क) सदर मशिनची केबीन मोटर चालू करताच अवास्तव आवाज करते व व्हायब्रेट होते.
ड) हवेची मोटर हवेपेक्षा जासत प्रमाणात पाणी फेकते, त्यामुळे तक्रारदाराचे 80 किलो काजू खराब झाले.
इ) मशीनच्या मटेरियलची क्वालीटी सांगितल्याप्रमाणे नाही.
ई) एअर व वॉटर पंप मोटर ही सेकंड हँड आहे. त्यावरचे सिल अगोदरच फोडलेले होते व आहे. त्यातील पार्ट जुने व रंगरंगोटी केलेचे दिसून येते.
उ) ट्रेमधील काजूगराचे मटेरियल योग्य पध्दतीने मॉईश्चराईज्ड होत नाही.
ऊ) सदर मशिनचे फायनल बिल व वॉरंटी कार्ड दिलेले नाही.
सबब, तक्रारदारांचे पुराव्याचे व दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून खरेदी केलेले वादातील मशीन ज्या कारणासाठी खरेदी केले होते, त्या कारणासाठी सदरचे मशिनमध्ये वर नमूद दोष अ ते ऊ असलेने वापरता आले नाही. प्रस्तुतकामी वि.प. यांनी संधी असताना देखील तक्रारदारांचे तक्रारीतील तसेच पुराव्याचे शपथपत्रातील कथने नाकारलेली नाहीत. त्याकारणाने सदरचे शपथपत्रातील कथने ही नाकारता येत नाही. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांना ईमेलद्वारे तसेच नोटीसीद्वारे वेळोवेळी कळवूनदेखील वि.प. यांनी तक्रारदार यांना कोणताही प्रतिसाद अथवा उत्तर दिले नाही. तक्रारदार यांनी वकीलामार्फत ता. 9/10/2019 रोजी सदर मशिनमधील संपूर्ण त्रुटी काढून मशीन सुस्थितीत आणून देण्याची मागणी केली तसेच फायनल टॅक्सेबल बिलाची मागणी केली. परंतु वि.प. यांनी सदरचे कोणत्याही नोटीसीस अद्याप उत्तर दिलेले नाही. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून वादातील मशिनची खरेदीची संपूर्ण रक्कम स्वीकारुन देखील तक्रारदार यांना सदोष मशिन देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी वि.प यांचेकडून मशिनची खरेदीपोटी रक्कम रु. 88,900/- ची मागणी केली आहे. सदरकामी तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र व दाखल आयसीआयसीआय बँक व एस.बी.आय. बँकेचे तक्रारदारांचे खातेउता-यांचे अवलोकन करता तक्रारदारांनी वि.प. यांना ता. 13/6/2019 रोजी रक्कम रु. 45,000/-, ता. 09/07/2019 रोजी रु. 19,900/- व ता. 2/07/2019 रोजी रक्कम रु.24,000/- असे एकूण रक्कम रु. 88,900/- वि.प. यांचे खात्यावर जमा केलेले आहेत. सदरच्या रकमा वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प यांचेकडून सदोष मशीनचे खरेदीची रक्कम रु.88,900/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 10/12/2020 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार यांनी वि.प. यांना वादातील कॅश्यु मॉइश्चर मशीन हे सदोष मशीन परत द्यावे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
9. तक्रारदारांनी सदरकामी 80 किलो काजूगर मशीनमध्ये खराब झालेबाबतची नुकसान भरपाईची रक्कम रु.90,000/- तसेच तक्रारदारांचा व्यवसाय ठप्प झालेने त्याची नुकसान भरपाई रक्कम रु.2,50,000/- ची मागणी केली आहे. तथापि सदर कथनाचे अनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा अथवा परिस्थितीजन्य पुरावा दाखल केलेला नाही. तथापि दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे व्यावसायिक नुकसान झालेची बाब नाकारता येत नाही. त्या कारणाने तक्रारदार हे सदरचे व्यावसायिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 30,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.4
10. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष कॅश्यु मॉइश्चर मशिनचे खरेदीपोटी तक्रारदार यांनी वि.प. यांना अदा केलेली रक्कम रु. 88,900/- अदा करावी तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 10/12/20 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- तक्रारदारयांनी वादातील कॅश्यु मॉइश्चर मशीन वि.प. यांना परत द्यावे.
- वि.प. यांनी तक्रारदारांना व्यावसायिक नुकसानीपोटी रक्कम रु.30,000/- अदा करावी.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|