तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले : प्रतिनिधी वकीलासोबत हजर. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. प्रस्तुतचे अर्जदार यांनी प्रस्तुतचे सा.वाले यांचे विरुध्द तक्रार क्रमांक 1195/1999 दाखल केली होती. व त्या तक्रारीमध्ये तक्रारदारांच्या सदनिकेस बाहेरच्या बाजूने असलेली गळती थांबविण्यात यावी असे आदेश सा.वाले यांना देण्यात यावेत अशी दाद मागीतली होती. तक्रारदार हे सदनिकाधारक आहेत. तर सा.वाले हे विकासक/बिल्डर आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार सुनावणीअंती दिनांक 25.8.2006 रोजी निकाली काढण्यात आली व तक्रार मान्य होऊन सा.वाले यांना तक्रारदारांच्या सदनिकेच्या भिंतीस बाहेरुन बाजूने असलेली गळती तीन महिन्याचे आत इमारतीची दुरुस्ती करुन थांबविण्यात यावी असे आदेश देण्यात आले. सा.वाले यांनी अन्यतः दरमहा रु.1,000/-दंड तक्रारदारांना द्यावयाचा होता. 2. प्रस्तुत मंचाचे आदेशापमाणे सा.वाले यांनी कार्यवाही केली नाही. असा आरोप करुन मुळचे तक्रारदारांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 प्रमाणे दाखल केला. अर्जामध्ये मुळचा खर्च रु.1,57,900/- नुकसान भरपाई व्याज व खर्च असे एकूण रु.7,60,900/- वसुलीची मागणी केली. 3. सा.वाले यांनी तक्रारदारांचे अर्जाला उत्तर दाखल केले. व त्यामध्ये असे कथन केले की, प्रस्तुत मंचाचे आदेशाप्रमाणे इमारतीची दुरुस्ती वर्षे 2006 मध्येच करण्यात आलेली असून तक्रारदारांनी अर्जासोबत त्यांचे पत्र दिनांक 15.11.2006 दाखल केले आहे. त्यामध्ये ही बाब मान्य केली आहे. सा.वाले यांनी असेही कथन केले की, मुळ आदेशामधील नुकसान भरपाई रु.12,000/- व दुरुस्तीचे दरम्यान तक्रारदारांच्या सदनिकेचे झालेले नुकसान व त्याबद्दल नुकसान भरपाई रु.4,264/- तक्रारदारांना अदा करण्यात आलेले आहे. सा.वाले यांनी आपल्या म्हणण्यासोबत धनादेश पाठविलेल्या पत्राची प्रत हजर केली. या प्रमाणे प्रस्तुत मंचाचे आदेशाची पुर्तता करण्यात आलेली आहे असे सा.वाले यांनी कथन केले. 4. तक्रारदारांचे अर्जावरुन मान्यताप्राप्त अभियंत्याची नियुक्ती कमिशनर म्हणून करण्यात आली. व दोशी आणि कंपनीचे अभियंता श्री.नितीन दोशी यांनी तक्रारदारांच्या सदनिकेला भेट दिली व आपला अहवाल प्रस्तुत मंचापुढे सादर केला. सा.वाले यांनी त्या अहवालाला आपल्या आक्षेपाचे म्हणणे दाखल केले. सा.वाले यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. त्यानंतर दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. 5. तक्रारदारांचे अर्जावरुन नेमणूक करण्यात आलेले अभियंता श्री.दोशी यांच्या अहवालाचे निरीक्षक केल्यानंतर असे दिसते की, श्री.दोशी यांनी आपला अहवाल तक्रारदारांचे सदनिकेचे आतील व बाहेरील बाजुचे भिंती,फरसी, तसेच सौयंपाक घराचा ओटा, याचे निरीक्षण करुन दिलेला आहे. मुळातच प्रस्तुत मंचाचा आदेश सदनिकेचे अंतर्गत बांधकाम अथवा अवस्था या बद्दल नव्हता तर तक्रारदाराच्या सदनिकेच्या बाहेरील बाजुच्या भिंतीतून गळती बंद करावी असा होता. सबब श्री.दोशी यांना अहवाल संपूर्णतः स्विकारता येत नाही. 6. सा.वाले यांनी आपल्या म्हणण्यासोबत त्यांचे पत्र दि.29 नोव्हेंबर, 2006 ची प्रत हजर केली. त्यातील मजकुरावरुन असे दिसते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.12,000/- मुळ आदेशाप्रमाणे तसेच नुकसान भरपाईबद्दल रु.4,264/- एकूण रक्कम रु.16,264/- धनादेशाचे पाठविले. तो धनादेश वटल्याची नोंद सा.वाले यांचे बँकेच्या खाते उता-यावरुन दिसून येते. 7. सा.वाले यांनी त्यांचे कैफीयतमध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 15.11.2006 रोजी एक पत्र दिले होते व त्यामध्ये सा.वाले यांनी प्रस्तुत मंचाचे आदेशाप्रमाणे दुरुस्ती केलेली आहे. परंतु दुरुस्ती करीत असतांना सा.वाले यांचे कर्मचा-यांनी तक्रारदारांच्या सदनिकेचे फरसीचे नुकसान केले व त्याबद्दल नुकसान भरपाई रु.3,264/- + सौयंपाक घरातील कपाटाचे नुकसानी बद्दल नुकसान भरपाई रु.1000/- एकूण रु.4,264/- अशी मागणी केली. सा.वाले यांनी आपले पत्र दि.29.11.2006 प्रमाणे तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे ही रक्कम तक्रारदारांना धनादेशाने अदा केली. याप्रमाणे तक्रारदारांचे स्वतःचे पत्र दिनांक 15.11.2006 मधील मजकुरावरुन सा.वाले यांनी प्रस्तुत मंचाचे आदेशाप्रमाणे सदनिकेच्या बाहेरील भिंतीची दुरुस्ती पूर्ण केली तसेच नुकसान भरपाईची रक्कम अदा असे दिसून येते. 8. या व्यतिरिक्त तक्रारदारांनी दिनांक 11.6.2007 रोजी संस्थेचे सचिव यांना पत्र दिले होते व त्यामध्ये सा.वाले यांनी प्रस्तुत मंचाचे आदेशाप्रमाणे सदनिकेची दुरुस्ती केली ही बाब मान्य केली. त्या पत्रातील मजकुरावरुन असे दिसते की, संस्थेने देखील इमारतीच्या दुरुस्तीची कार्यवाही करण्याचे ठरविले होते. तथापी तकारदारांनी असा आक्षेप नोंदविला की, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ग्राहक मंचाची परवानगी घेण्यात यावी. तक्रारदारांचे 11 जुन, 2007 चे पत्रातील मजकुर देखील सा.वाले यांचे कथनास पुष्टी देतो. 9. श्री.दोशी अभियंता यांनी तक्रारदारांच्या सदनिकेचे बाहेरील बाजूस भिंतीचा काही भाग ओला दिसून आला असे नमुद केलेले आहे. श्री.दोशी यांनी तक्रारदारांच्या सदनिकला भेट 19.8.2010 रोजी दिली. तर सा.वाले यांनी केलेली दुरुस्ती ही 2007 मध्ये केली होती. दरम्यान चार वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. श्री.दोशी अभियंता यांचे नजरेस आलेली ओल ही प्रस्तुत मंचाने दिलेल्या आदेशाचे पुर्ततेनंतर निर्माण झाली असल्यास सा.वाले यांनी प्रस्तुत मंचाचे आदेशाची पुर्तता केली नाही असा निष्कर्ष काढता येत नाही. इथे एक बाब नूमद करणे आवश्यक आहे की, सा.वाले यांनी 2006 चे शेवटी दुरुस्ती केल्यानंतर वर्षे 2007,08,09 हे पावसाळे होऊन गेले. दरम्यान तक्रारदाराने सा.वाले यांनी प्रस्तुत मंचाचे आदेशाप्रमाणे सदनिकेची दुरुस्ती केली नाही असा अर्ज दिला नाही व सा.वाले यांनी दुरुस्ती पार पाडल्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजे 13.10.2009 रोजी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला व त्यामध्ये भरमसाठ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 10. वरील सर्व निष्कर्षानुरुप व चर्चेवरुन असे दिसून येईल की, सा.वाले यांनी प्रस्तुत मंचाचे आदेशाची पुर्तता केली असून तक्रारदारांना सा.वाले यांचेकडून काहीही रक्कम वसुल करणे नाही. 11. उक्त परिस्थितीत पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदारांचा अंमलबजावणी अर्ज निकाली काढण्यात येतो. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |