::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदाराने मसर्स लक्ष्मी नगर लेआउट, दहेली ता. बल्लारपुर तर्फे सर्वादिन रामनरेश तिवारी गैरअर्जदार क्र. ६ द्वारा दिनांक ०३.१२.२०१३ रोजी बल्लारपूर मुक्कामी साक्षीदारा समक्ष विसारपत्रानुसार तलाठी साझा क्र. १८ भुमापन क्र. ६० प्लॉट क्र. ३१ आराजी १८४०.७५ चौ. फुट मिळकतीची संपूर्ण किंमत रक्कम रुपये ३,५०,०००/- पैकी रक्कम रु. १,००,०००/- दिनांक ०४.१२.२०१३ रोजी गैरअर्जदार क्र. १ ते ५ यांचे अधिकृत मुख्त्यारी गैरअर्जदार क्रमांक ६ यांना नगदी दिले, प्लॉट ची उर्वरीत रक्कम रु. २,५०,०००/- भूखंडाच्या विक्रीखत करावयाच्या वेळेस द्यावयाचे ठरले होते. विक्रीखत करण्याची दिनांक ३१.०३.२०१४ हि दिनांक निश्चित करण्यात आलेली होती. भूखंड क्रमांक ३१ खरेदीखताच्या वेळी दिनांक ३१.०३.२०१४ रोजी मेसर्स लक्ष्मीनगर लेआउट, दहेली चे कोणतेही भागीदार किंवा गैरअर्जदार क्रमांक १ ते ५ व त्यांचे अधिकृत मुख्त्यारी गैरअर्जदार क्र. ६ यापैकी कोणीही सहनिबंधक कार्यालय, बल्लारपूर येथे आले नाही. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांना संपर्क केल्यानंतर लवकर आपले काम करुन देवु असे सांगीतले. त्यानंतर अर्जदारांनी दिनांक १०.०१.२०१४ रोजी गैरअर्जदार क्र. ६ यांनी अर्जदाराकडे येऊन प्लॉटचा दुसरा हप्ता देण्याबाबत मागणी केली. अर्जदाराला सुध्दा प्लॉट चा लवकरात लवकर ताबा हवा असल्याने अर्जदाराने दिनांक १०.०१.२०१४ रोजी साक्षीदारा समक्ष रक्कम रु. १,००,०००/- गैरअर्जदार क्र. ६ यांना दिले. त्यावेळेस गैरअर्जदार क्र. ६ यांनी अर्जदाराला लवकर विक्री करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर पुन्हा गैरअर्जदार क्र. ६ यांनी मेसर्स लक्ष्मीनगर लेआउट मधिल प्लॉट क्र. ३१ चे विक्रीखत करतांना प्लॉटची उर्वरीत रक्कम रु. १,५०,०००/- प्लॉटच्या विक्रीखताच्या वेळी देण्याचे ठरले. परंतु गैरअर्जदार क्रमांक यांनी ६ यांनी अर्जदाराला उर्वरीत रक्कमेची मागणी करुन प्लॉटचे विक्रीपत्र लवकरात लवकर करुन देण्याचे आश्वासन दिले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. ६ यांनी आश्वासन दिले असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. ६ यांना रक्कम रु. १,००,०००/- नगदी स्वरुपात व रक्कमरु. ५०,०००/- धनादेशाव्दारे दिले. अर्जदाराने प्लॉटची संपुर्ण रक्कम रु. ३,५०,०००/- गैरअर्जदारक्र. ६ यांना दिले. व विक्रीखताकरीता रक्कम रु. १०,०००/- असे एकुण रक्कम रु. ३,६०,०००/- दिले. सदर रक्कमेची नोंद गैरअर्जदाराने विसारपत्राच्या मागच्या बाजुला घेतली आहे. संपुर्ण रक्कम गैरअर्जदारला देवुन सुध्दा अर्जदाराला विक्रीपत्र करुन न दिल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ ते ६ यांना वकिलामार्फत नोटीस पाठवुन सुध्दा गैरअर्जदार क्र. १ ते ६ यांनी अर्जदाराला विक्रीपत्र न करुन दिल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ ते ६ यांच्या विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली
३. अर्जदाराची तक्रार मंचात स्वीकृत करून गैरअर्जदार क्रमांक १ ते ६ यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र. १ ते ४ यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. १ ते ४ यांनी त्यांचे लेखी उत्तरात अर्जदाराने तक्रारीत केलेले कथन अमान्य करून अर्जदार क्र. ६ हा गैरअर्जदार क्र. १ ते ४ यांचा अधिकृत मुख्त्यारी नसुन अर्जदार क्र. १ ते ४ यांचा कोणताही संबंध नाही किंवा कोणतीही सेवापुरविली नाही, म्हणून त्यांनी गैरअर्जदार क्रमांक १ ते ४ विरुद्ध केलेली तक्रार खर्चासहित अमान्य करुन खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. १ ते ४ यांनी मंचास केली. गैरअर्जदार क्र. ५ यांना मंचाची नोटीस नोटीस प्राप्त होऊन सुद्धा तक्रारीत उपस्थित न राहिल्यामुळे गैरअर्जदार क्र. ५ विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक ०७.०७.२०१७ रोजी पारित करण्यात आला.
४. गैरअर्जदार क्रमांक ६ यांनी प्रकरणात उपस्थित राहून त्यांनी अर्जदार यांनी केलेले कथन केले की, अर्जदाराने तक्रारीतील केलेले सर्व कथन अमान्य करत त्यांच्या विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार गैरअर्जदार क्रमांकाचे ६ चे ग्राहक नाहीत. त्यामुळे सदर तक्रार विद्यमान मंचास चालवण्याचा अधिकार नाही. सदरची तक्रार गैरअर्जदार क्रमांक ६ ग्राहक या संज्ञोत येत नसल्याने सदर तक्रार गैरअर्जदार क्र. ६यांच्या विरुध्द खारीज करण्यात यावी. सदर तक्रारीतील वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याने तक्रार दाखल करण्याचा अर्जदाराला कोणताही अधिकार नाही. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्ताऐवजवरून असे दिसून येते की, अर्जदार यांचेकडे असलेले विसारपत्र याच्यावर गैरअर्जदार क्र. ६ यांची स्वाक्षरी नाही, त्यामुळे अर्जदाराचा गैरअर्जदार क्र. ६ सोबत कोणतेही विसारपत्र झाले नाही या कारणावरून अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी. सदर विक्री विसारपत्र खोटे व बनावट असुन असुन सदर तक्रारखर्चासह अमान्य करण्यात यावी.
५. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार क्र. १ ते ४ यांचे तसेच गैरअर्जदार क्र. ६ यांचे लेखी युक्तीवाद, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी प्लॉट विक्री कराराप्रमाणे सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार
सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार नुकसान भरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :-
६. अर्जदाराने दिनांक ०६.१२.२०१३ रोजी गैरअर्जदार क्र. १ ते ५ च्या वतीने गैरअर्जदार क्रमांक ६ यांनी सदर प्लॉट क्र. ३१ प्रति चौरस फूट रुपये १९०/- प्रमाणे १८४०.७५ चौ. फुट याची किंमत रक्कम रुपये ३,५०,०००/- निश्चित करून विसारपत्र करून दिले. सदर विसारपत्र दिनांक ०३.१२.२०१३ रोजी करुन रक्कम रु. १,००,०००/- नगदी गैरअर्जदार क्र. ६ यांना अर्जदारांनी दिले आहेत. हि बाब दस्ताऐवजावरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदार क्र. ६ यांनी लेखी उत्तरात विसारपत्रावर असलेली स्वाक्षरी त्यांची नाही असा आक्षेप घेतलेला आहे. परंतु अर्जदाराचे दाखल दस्तावेज व गैरअर्जदार क्रमांक ६ यांनी दाखल केलेले वकीलपत्र व दाखल दस्ताऐवजयावरुन कि, सदर रक्कम अर्जदाराकडून गैरअर्जदार क्रमांक ६ ने घेतली हे सिद्ध होते. गैरअर्जदार क्रमांक १ ते ४ यांनी त्यांच्या उत्तरात विसारपत्र त्यांनी केलेले नसुन व सदर भुखंड त्यांच्या मालकीचा नाही, तसेच गैरअर्जदार क्रमांक ६ यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही असे नमूद केलेले परंतु सदर भुखंडाचा ७/१२ उता-यावरुन हे सिध्द होत आहे कि, गैरअर्जदार क्र. १ ते ५ यांचे नावांने असल्याने सदर प्लॉट गैरअर्जदार क्र. १ ते ५ यांच्या मालकीचा आहे. तक्रारीतील ही बाब स्पष्ट झाली आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. १ ते ६ चा ग्राहक असून दहेली येथील तलाठी साझा क्र. १८ भुमापन क्र. ६० प्लॉट क्र. ३१ आराजी १८४०.७५ चौ. फुट चे विसारपत्र गैरअर्जदार क्रमांक ६ यांनी गै.क्र. १ ते ५ च्या वतीने अर्जदारास करून दिले व रक्कम रु. १,००,०००/- अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक ६ यांना दिली व दिनांक ०३.१२.२०१३ रोजी बाकीची रक्कम विक्रीखत करतांना द्यायची होती. विसारपत्रनुसार गैरअर्जदार क्र. ६ यांनी खरेदीखत करुन दिले नाही. परंतु त्यानंतर अर्जदारांकडुन दिनांक १०.०१.२०१४ रोजी रक्कम रु. १,००,०००/- व त्यानंतर दिनांक ३०.०१.२०१५ रोजी रक्कम रु. १,००,०००/- व रक्कम रु. ५०,०००/- धनादेशाव्दारे गैरअर्जदार क्रमांक ६ यांनी अर्जदाराकडून घेऊन त्यांना आश्वासीत केले की, सदर विक्रीखत लवकरात लवकर करून देणार या आशेने अर्जदाराने रक्कम रु. ३,५०,०००/- गैरअर्जदार क्र. ६ यांना दिली. सदर रक्कम मिळाल्या बद्दल विसारपत्राच्या मागील बाजुस अर्जदारांनी साक्षीदारा समक्ष सदर रक्कम दिली व गैरअर्जदार क्र. ६ ती स्विकारुन त्यावर साक्षीदारा समक्ष स्वाक्षरी केलेली आहे असे स्पष्ट होत आहे. तसेच अर्जदाराने सदर प्लॉटच्या विक्रीसाठी बनवल्या दस्ताऐवजवरुन सुध्दा गैरअर्जदार क्रमांक १ ते ५ चे छायाचित्र लावलेले दिसून येत आहे. तसेच गैरअर्जदार क्र. १ ते ६ यांच्या मालकीचा ७/१२ सुद्धा प्रकरणात दाखल आहे. गैरअर्जदार क्रमांक ६ गैरअर्जदार क्रमांक १ ते ५ च्या वतीने प्रकरणातील प्लॉटचे विसारपत्र करून देऊन विक्रीबाबतची संपूर्ण रक्कम प्राप्त झाल्यावर सुद्धा नमूद प्लॉटची विक्री करून न देऊन अर्जदार प्रती सेवेत न्यूनता दिली आहे ही बाब सिद्ध होते. अर्जदार यांनी केलेली मागणी केलेल्या प्रकरणातील माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाझीयाबाद डेव्हलपमेंट ऍथॉरिटी विरुद्ध बलबीरसिंग (२००३) ५ SC ६५ ,part ६ प्रमाणे अर्जदार हा गैरअर्जदारांनी कराराप्रमाणे विक्रीची पुर्ण रक्कम देवूनही विक्रीखत करीता नकार दिल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई व्याजासहित मिळण्यास पात्र आहे. या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
मुद्दा क्र. ३ बाबत :-
७. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २९/२०१६ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार क्रमांक १ ते ६ अर्जदाराला यांनी दहेली येथील तलाठी
साझा क्र. १८ भुमापन क्र. ६० प्लॉट क्र. ३१ आराजी १८४०.७५ चौ. फुट चे
विक्रीपत्र या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवासांच्या आंत करुन द्यावे.
३. वर नमुद क्र. २ ची पुर्तता विहीत मुदतीत गैरअर्जदार क्र. १ ते ६ यांनी न
केल्यास अर्जदाराकडून घेतलेली रक्कम रुपये ३,५०,०००/- गैरअर्जदार क्र. १ ते ६
यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे दिनांक ०३.०३.२०१६ पासुन अदा करेपर्यंत ९ टक्के
व्याजासह अदा करावी.
४. गैरअर्जदार क्र.१ ते ६ यांनी प्लॉट विक्री कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात
कसूर करुन तक्रारदार यांना मानसिक,शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार
खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १,००,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३०
दिवसात तक्रारदार यांना अदा करावे.
५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती.किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)