तक्रारदार : प्रतिनिधी वकील श्री रणजीत जोशी मार्फत हजर.
सामनेवाले 1 व 2 चे : वकील एस एस बिजलानी मार्फत हजर.
सामनेवाले 3 : प्रतिनिधी वकील श्री विराज कदम मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 व 2 ही विमान सेवा पुरविणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.3 हे तिकिटाचे आरक्षण करणारी कंपनी आहे. तिन्ही तक्रारदारांना दिनांक 24.5.2008 रोजी कलकत्ता येथे शैक्षणिक उपक्रमाकरीता हजर राहणे आवश्यक होते व तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचे मार्फत सा.वाले क्र.1 यांचे विमानाची दिनांक 24.5.2008 रोजीची कलकत्ता ते मुंबई अशी परतीची तिन तिकिटे आरक्षीत केली होती. विमान सुटण्याची वेळ संध्याकाळी 8.25 मिनिटाची होती.
2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार हे दिनांक 24.5.2008 रोजी कलकत्ता विमानतळावर संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचले परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांना बोर्डींग पास देण्याबाबत नकार दिला. तक्रारदारांनी त्या बद्दल लेखी खुलासा मागीतला असता सा.वाले यांचे अधिका-यांनी उर्मट उत्तरे दिली. परीणामतः तक्रारदारांना कलकत्ता येथे मुक्काम करावा लागला व तक्रारदारांची प्रचंड प्रमाणात गैरसोय व कुचंबणा झाली. तक्रारदारांनी कलकत्ता ते मुंबई येथे परत येणेकामी दिनांक 25.5.2008 रोजीची विमानाची तिकिटे आरक्षीत केली व तक्रारदारांना त्या बद्दल वेगळा खर्च करावा लागला. तक्रारदारांनी दिनांक 25.5.2008 रोजीच्या ई-मेल संदेशाव्दारे सा.वाले यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी केली. त्यास सा.वाले यांनी उत्तर दिले नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 23.7.2008 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिली. त्यासही सा.वाले यांनी उत्तर दिले नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 5.3.2009 रोजी दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईची मागणी केली.
3. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, विमान सुटण्याची वेळ संध्याहाळी 8.25 मिनिटाची होती परंतु तक्रारदार हे बोर्डींग पासच्या कक्षामध्ये 8.15 मिनिटांनी आले व तो पर्यत बोर्डींगचे दरवाजे बंद करण्यात आलेले होते. या प्रमाणे तक्रारदारांनी विमानतळावर विमान सुटण्याचेपूर्वी एक तास येण्याचे ऐवजी केवळ 15 मिनिटे पुर्वी आल्याने तक्रारदारांना बोर्डींग पास देण्यात आलेला नव्हता. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या तक्रारारांच्या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीस प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले व तक्रारदार हे विमानतळावर 7.15 वाजता पोहचते होते या कथनाचा पुर्नउच्चार केला. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र तसेच कागदपत्र दाखल केले. सा.वाले यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.अब्दुल हमीद यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे संर्भात सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत ? | नाही. |
3 | अंतीम आदेश | तक्राररद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये विमान कंपनी व प्रवासी यांचे दरम्यानच्या शर्ती व अटीचा संदर्भ दिलेला आहे. व त्यामध्ये विमान सुटण्याचे पूर्वी प्रवाशाने 40 मिनिटे आधी बोर्डींग पासाकरीता हजर रहावे असे नमुद आहे. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हे बोर्डींग पासच्या कक्षामध्ये 8.15 मिनिटांनी पोहचले. म्हणजे केवळ 10 मिनिटे पोहोचले. वस्तुतः बोर्डींग पासचा कक्ष हा विमान सुटण्याचे पूर्वी 30 मिनिटे बंद होत असतो व विमानात प्रवेशाचे दरवाजे 15 मिनिटे आधी बंद होतात.
7. प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये तक्रारदार आपल्या तक्रारीमध्ये असे कथन करतात की, ते विमानतळावर संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचले म्हणजे विमान सुटण्यापूर्वी 45 मिनिटे पोहोचले. तरी देखील तक्रारदारांना सा.वाले यांनी बोर्डींग पास जारी केला नाही. तक्रारदारांचे तक्रारीत कोठेही असे कथन नाही की, सा.वाले यांनी त्या विमानाची ज्यादा तिकिटे विक्री केली होती व तक्रारदारांची आरक्षीत आसने अन्य व्यक्तीस विक्री केली होती. तक्रारदार या प्रकारचा पुरावा दाखल करु शकले असते. या उलट सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हया बोर्डींग पासच्या कक्षामध्ये वेळेवर पोहचल्या नसल्याने त्यांना त्या विमानाकरीता “गैरहजर” ( No show ) असे दाखविण्यात आले. सा.वाले यांनी विमानाची जर ज्यादा तिकिटे विक्री केली नसतील व विमानातील तक्रारदारांची आरक्षीत आसने खुली असतील तर सा.वाले यांना तक्रारदारांना बोर्डींग पास जारी करण्यास तसेच विमानामध्ये प्रवेश देण्यास कुठलाही प्रत्यव्याय नव्हता. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना बोर्डीं पास जारी केला नाही. या वरुन असाच निष्कर्ष काढावा लागतो की, तक्रारदार हे विमानतळावर उशिराने म्हणजे सा.वाले म्हणतात त्या प्रमाणे केवळ 15 मिनिटे आधी पोहचले होते. या संबंधातील तक्रारदारांचे कथन समाधान कारक नसून सा.वाले यांचे कथन तर्कास पटते व ते योग्य दिसते.
8. या व्यतिरिक्त तिन्ही तक्रारदार हया वेगवेगळया व्यक्ती आहेत व त्या तिन कुटुंबातील आहेत. तरी देखील तक्रारदारांनी आपली एकत्रित तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांना सा.वाले यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कारण ( Cause of action ) हे निच्छितच वेगवेगळे होते. ते समान असून चालत नाही तर एकच असावे लागते. प्रस्तुतचे प्रकरणात तसे दिसून येत नाही. या पार्श्वभुमीवर ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12(क) ची बाधा प्रस्तुत तक्रारीस येते व तक्रारदारांची तक्रार सदोष आहे असा निष्कर्ष काढावा लागतो.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 148/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.