::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 11/07/2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्तीने दि. 11/4/2014 रोजी विरुध्दपक्ष यांचे दुकानातुन रु. 1,96,830/- चे सोन्याचे निरनिराळे दागिने खरेदी केले, त्यात मंगळसुत्र हा सोन्याचा दागिना सुध्दा खरेदी केला. सदरहू मंगळसुत्रात मण्यांचे वजन कमी करुन व सोन्याचे पदक धरुन वजन 36 ग्रॅम 950 मि.ग्रॅ. इतके आहे. परंतु सदरचे दागीने घेतल्यानंतर काही दिवसांनी मंगळसुत्राचे सोन्याचे 4 मणी निघाले व त्यामुळे तक्रारकर्तीने सदरचे दागिना परतवाडा स्थित ढोमणे ज्वेलर्स यांना जानेवारी 2015 मध्ये दाखविला व त्यांनी सदरचा दागिना हा दोषपुर्ण असल्याचे सांगितले. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाच्या दुकानात दि. 2/2/2015 रोजी जाऊन सदरचा दागिना दाखवून तो दोषपुर्ण आहे, ही बाब विरुध्दपक्षाच्या निदर्शनास आणून दिली. विरुध्दपक्षाने सुध्दा सदर दागिणा दोषपुर्ण असल्याबाबत मान्य करुन बदलून देण्याचे तोंडी आश्वासन दिले, परंतु त्यावेळेस विरुध्दपक्षाने अट ठेवली की, 10 ग्रॅम वजन बट्टा दागिना घेतांना कमी करण्यात येईल व नविन दागिना देतांना त्यावर मजुरी खर्च वेगळा लागेल. परंतु तक्रारकर्तीने विनंती केली की, या मध्ये तक्रारकर्तीची कोणतीही चुक नाही व दागिना बदलून देण्याची संपुर्ण जबाबदारी विरुध्दपक्षाची आहे. परंतु विरुध्दपक्षाने सदर दागिना बदलून देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्तीने दि. 4/2/2015 ला विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली व त्यानंतर वकीलामार्फत दि. 19/9/2015 रोजी नोटीस पाठविली. परंतु विरुध्दपक्षांनी सदर नोटीसला कोणताही जबाब दिला नाही. विरुध्दपक्षाच्या या वर्तनामुळे तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून घेतलेले दागिने तेवढ्याच वजनाचे व शुध्दतेचे बदलून देण्याचा आदेश व्हावा. विरुध्दपक्षाने नुकसान भरपाईचे रु. 25,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 25,000/- तक्रारकर्तीस द्यावे तसेच प्रकरणाचा खर्च विरुध्दपक्ष यांनी द्यावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 12 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना प्रकरणाची नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 गैरहजर राहीले, त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द मंचाने एकतर्फी आदेश केल्याने फक्त तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व दस्त यांचा सखोल अभ्यास करुन मंचाने खालील प्रमाणे निष्कर्ष काढला तो येणे प्रमाणे…
तक्रारकर्तीने दि. 11/4/2014 रोजी एकूण रु. 196830/- चे सोन्याचे दागीने विरुध्दपक्षाकडून खरेदी केले. त्यात मंगळसुत्राचे वजन एकूण 36 ग्रॅम 950 मिली ग्रॅ. इतके होते. हे सोने खरेदी करण्याची पावती तक्रारकर्तीने सोबत जोडली आहे. यावरुन तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची ग्राहक आहे, हे सिध्द होते.
तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने मे खंडेलवाल अलंकार केंद्र, अकोला यांच्या कडून दि. 11/4/2014 रोजी रु. 1,96,830/- चे सोन्याचे दागीने खरेदी केले. त्यामध्ये एक सोन्याचे मंगळसुत्र होते, त्याचे वजन 36 ग्रॅ 950 मि.ग्रॅ. इतके होते. काही दिवसानंतर मंगळसुत्र दागीण्याचे चार मणी निघाले, म्हणून परतवाडा येथील ढोमणे ज्वेलर्स यांना दाखविले व त्यांनी सदरचे मंगळसुत्र दोषपुर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी प्रतिज्ञापत्र सुध्दा करुन दिले, ते सदर तक्रारीमध्ये जोडले आहे. त्यानंतर दि. 2/2/2015 ला तक्रारकर्तीने खंडेलवाल ज्वेलर्स यांच्याकडे दाखविले. विरुध्दपक्षाने ते बदलून देण्याचे मान्य केले, परंतु 10 टक्के बट्टा कपात करुन व नविन दागीना तयार करण्याची मजुरी, हे सर्व तक्रारकर्तीला द्यावे लागेल, तरच ते बदलून दिले जाईल, असे विरुध्दपक्षाने सांगितले. तक्रारकर्तीने दागीण्याचे पुर्ण मुल्य चुकते केल्यावरही तिला सदोष दागिना विरुध्दपक्षाने दिला, त्या अनुषंगाने तक्राकरर्तीने दि. 4/2/2015 ला विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली व नंतर दि. 12/3/2015 रोजी ग्राहक पंचायत अमरावती यांचेकडे तक्रार केली. दि. 19/9/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली व दागीने बदलून देण्याचे कळविले. परंतु विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला सदर तक्रार ग्राहक मंचात दाखल करावी लागली.
तक्रार दाखल केल्यानंतर विरुध्दपक्ष क. 1 व 2 यांनी मंचाची नोटीस मिळाल्यानंतर देखील विरुध्दपक्ष मंचात हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने त्यांच्या विरुध्द एकतर्फी आदेश पारीत केला.
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार व तिने दाखल केलेल्या दस्तांवरुन सदर प्रकरणात आदेश पारीत करण्यात येत आहे.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून दि. 11/4/2014 रोजी रु. 1,96,830/- चे दागीने खरेदी केले, त्यात मंगळसुत्र हा एक दागीना आहे, तो 36 ग्रॅम 950 मि.ग्रॅम इतका आहे. सदरचे मंगळसुत्र दोषपुर्ण असल्यामुळे ते बदलून देयासाठी विरुध्दपक्षाने 10 प्रतिशत बट्टा व नविन दागीना तयार करण्याची मजुरी, हा खर्च मागीतला आहे. सदर मंगळसुत्र हे दोषपुर्ण आहे, याचा पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाकडून सदर मंगळसुत्र बदलून मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
विरुध्दपक्ष हे मंचात हजर झाले नाही व तक्रारकर्तीचे कोणतेही मुद्दे खोडून काढले नाही. परंतु दि. 15/6/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे सदरील प्रकरणात पुरसीस दाखल करण्यात आली. त्याव्दारे त्यांनी असे नमुद केले की, त्यांचे नांव रवी मदनलाल खंडेलवाल आहे व दुस-या विरुध्दपक्षाचे नाव नितीन मदनलाल खंडेलवाल आहे. ते खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक आहेत व तक्रारीत नमुद खंडेलवाल अलंकार केंद्र या संस्थेशी त्यांचा संबंध नाही. परंतु सदर पुरसीसमध्ये नमुद केलेल्या बाबींच्या समर्थनार्थ विरुध्दपक्षाने कोणताच सबळ पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर पुरसीस मधील नमुद केलेल्या बाबी ग्राह्य धरता येणार नाहीत. म्हणून केवळ तक्रारकर्तीच्या तक्रारीवरुन व दाखल पुराव्यावरुन विरुध्दपक्षाने सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच पोहचले आहे. म्हणून तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाकडून नुकसान भरपाई घेण्यास पात्र आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तरित्या तक्रारकर्तीस, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून घेतलेला मंगळसुत्र हा दागीना तेवढयाच वजनाचा व शुध्दतेचा बदलून नविन द्यावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तरित्या तक्रारकर्तीस शारीरिक आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.