तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सा.वाले यांची मेसर्स केरकर जिमखाना नावाची कंपनी आहे.
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांच्या मालाड शाखेच्या जिममध्ये परतीच्या योजनेमध्ये व्यायामासाठी त्यांचे व त्यांच्या भावाचे नाव तिन वर्षासाठी नोंदविले. त्यासाठी त्यांनी रूपये 40,000/-,शुल्क भरले. तक्रारदारांनी एकंदर रू.40,000/-,तिन वेगळया धनादेशाद्वारे दि. 17 मार्च 2011 रोजी दिले. व्यायाम शाळा दि.02 एप्रिल 2011 पासून सुरू होणार होते.
3. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी आजपर्यंत व्यायाम शाळा सुरू केली नाही किंवा त्यादिशेने कोणतेही पाऊल उचलले नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांच्याशी वारंवार संपर्क साधला अनेकवेळा स्मरणपत्र पाठविले तरीही सा.वाले यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
4. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदार जेव्हा चौकशीसाठी प्रत्यक्षात जून 2011 मध्ये भेटण्यास गेले त्यावेळेस सा.वाले यांनी जिम जूलै 2011 च्या पहिल्या आठवडयामध्ये सुरू होईल असे सांगीतले. परंतू त्यानूसार जूलै 2011 मध्ये जिम सुरू झाले नाही म्हणून तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे पैसे परतीची मागणी केली असता सा.वाले यांनी 18 दिवसांनी तक्रारदारांना असे कळविले की, जिम सुरू होणार नाही व पैसे परत देण्यास त्यांनी नकार दिला व पैसे तिन वर्षानंतर मिळतील असे सांगीतले.
5. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दि. 26.07.2011 रोजी नोटीस पाठविली तरीही सा.वाले यांनी तक्रारदारांच्या मागणीची पूर्तता केली नाही.
6. सबब तक्रारदारांनी तक्रार अर्ज प्रस्तुत मंचासमोर दाखल करून सा.वाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करावे तसेच सा.वाले यांनी रूपये 40,000/-,व्याजासह परत करावे. व रूपये 20,000/-,नुकसान भरपाई द्यावी. आणि रूपये रक्कम 30,000/-,मानसिक त्रास व धंदयामध्ये झालेल्या नुकसानीबद्दल द्यावे अशी मागणी केली.
7. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. सा.वाले यांना पाठविलेली नोटीस ‘अनक्लेम्ड’ म्हणून परत आली. तक्रारदार यांनी सा.वाले यांना नोटीस बजावल्याचे शपथपत्र दाखल केले. म्हणून तक्रार अर्ज सा.वाले यांचेविरूध्द एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला
8. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, याची पडताळणी करून पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | होय अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
9. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांचा जिमखाना आहे. तक्रारदारांनी दि.17.03.2011 रोजी रू.40,000/-,शुल्क भरून तक्रारदार श्री.राजेश टेलर व त्यांचे बंधू श्री.राहुल टेलर यांचेसाठी तीन वर्षाकरीता परतीच्या योजनेमध्ये व्यायामाकरीता सभासद झाले. तक्रारदारांनी ही रक्कम सा.वाले यांना तीन वेगवेगळया धनादेशाद्वारे दिले. तक्रारदारांनी अभिलेखाच्या पृष्ठ क्र 15 वर दि.17.03.2011 रोजी रू.40,000/-,ची भरल्याची पावती दाखल केलेली आहे. पावतीवर सा.वाले, तक्रारदार श्री.राजेश टेलर आणि श्री.राहुल टेलर यांचे नाव आहे. तक्रारदारांनी सोबत बॅकेचे पासबुकमधील नोंदीची प्रत दाखल केलेली आहे त्यावरून असे स्पष्ट होते की, सा.वाले यांना मोबदला तक्रारदारांच्या खात्यातून दिलेला आहे. त्यामूळे तक्रार अर्जात फक्त तक्रारदार श्री. राजेश टेलर यांचेच नाव दिसून येते.
10. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार व्यायाम शाळा एप्रिलच्या दुस-या आठवडयापासून सुरू होणार होते. परंतू तक्रार दाखल करेपर्यंत व्यायाम शाळा सुरू झाले नाही किंवा त्यादृष्टीने सा.वाले यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामूळे तक्रारदारांनी सा.वाले यांच्याशी वारंवार संपर्क साधले परंतू सा.वाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.म्हणून तक्रारदार जून 2011मध्ये प्रत्यक्ष जाऊन सा.वाले यांची भेट घेतली असता सा.वाले यांचे प्रतिनीधीने जूलै 2011च्या पहिल्या आठवडयात व्यायाम शाळा सुरू होतील असे सांगीतले परंतू त्यानंतरही व्यायाम शाळा सुरू झाले नाहीत.म्हणून तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून पैसे परतीची मागणी केली. त्यावेळेस अठरा दिवसानंतर सा.वाले यांनी तक्रारदाराना व्यायाम शाळा सुरू होणार नसल्याचे कळविले. म्हणून तकारदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पैसे परतीची मागणी केली असता सा.वाले यांच्या प्रतिनीधीने पैसे परत करण्यास नकार दिला व पैसे तीन वर्षानंतरच मिळतील असे सांगीतले.त्यामूळे तक्रारदार यांनी सा.वाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठविली त्यासही सा.वाले यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
11. तक्रारदारांच्या तंक्रार अर्जातील वरील कथनास सा.वाले यांनी हजर राहून उत्तर दिले नाही किंवा तक्रारदारांचे म्हणणे नाकारले नाही म्हणून तक्रारदारांचे म्हणणे अबाधीत राहते. तसेच तक्रारदारांच्या कथनास त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून पुष्टी मिळते. त्यामूळे तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते.
12. सा.वाले यांनी तक्रारदारांकडून व्यायाम शाळेचे शुल्क स्विकारूनही व्यायाम वर्ग सुरू केले नाही. यावरून सा.वाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे स्पष्ट होते उलट तक्रारदारांना व्यायाम सुरू होण्याबद्दल खोटी आश्वासने देत राहिली यामध्ये सा.वाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्हणावे लागेल.
13. सा.वाले यांनी तक्रारदारांनी भरलेले रू.40,000/-,त्यांना सेवासुविधा न पुरविता वापरले. त्यामूळे सा.वाले हे तक्रारदारांना रू.40,000/-,9% व्याजदराने पैसे भरल्या दिनांकापासून म्हणजेच दि.17.03.2011 पासून ते पैसे देईपर्यत व्याजासह देण्यास जबाबदार राहतील.
14. तक्रारदारानी सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई म्हणून रू.20,000/-,ची मागणी केली आहे परंतू भरलेली रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश दिल्याकारणाने वेगळी नुकसान भरपाई देता येणार नाही.
15. तसेच तक्रारदार यांनी त्यांना झालेल्या मानसिक त्रासामूळे व्यवसायात नुकसान झाले व तसेच वरील रक्कम धंदयामध्ये गुंतवू शकले नाही म्हणून झालेल्या नुकसानीबद्दल रू.30,000/-,ची मागणी केली आहे.परंतू मूळ रक्कम व्याजासह दिल्याने पुन्हा नुकसानीबद्दल आदेश नाही.
16. सा.वाले यांनी रू.10,000/-,तक्रार अर्ज खर्च तक्रारदारांना देण्यास जबाबदार राहतील
17. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 383/2011 अंशतः मान्य करण्यातयेते.
2. सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.40,000/-,9% व्याजदराने दि.17.03.2011
पासून ते पैसे देईपर्यंत व्याजासह परत करावे.
3. सा.वाले यांनी तक्रार अर्ज खर्च रू.10,000/-तक्रारदारांना द्यावे.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात
.