(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 15/04/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 26.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्यानी नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून स्वतःचे उपजिवीकेकरीता वाहन मॉडेल क्र. 2515-सी रु.20,92,961/- ला खरेदी केला. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला वाहनाची किंमत दि.13.01.2010 रोजी धनाकर्षाव्दारे दिली, त्या संबंधीची पावती गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला दिली व वाहन 2 ते 3 दिवसांत देण्यांत येईल असे सांगितले. सदर वाहन गैरअर्जदारांकडून मिळणार होते, त्यामुळे परिवहन विभागामधे सदर वाहन चालविण्या संबंधी एक करारनामा केला व वाहन चालविण्या करता चालक व वाहक यांची सुध्दा नोंदणी केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारकर्त्यानुसार दोन महिने वाट बघुन सुध्दा गैरअर्जदारांनी वाहन आवंटीत केले नाही, तसेच एक महिन्याचा कालावधी निघुन गेल्यानंतर दि.19.10.2010 रोजी गैरअर्जदारांनी बँकेला पत्र पाठवुन व वाहनाचे आवंटणासंबंधी समस्या असल्यामुळे ताबा देऊ शकत नसल्याचे कळविले. त्यानुसार बँक ऑफ इंडियाने दि.24.02.2010 रोजी पत्र पाठवुन रु.20,92,961/- व त्यावरील व्याजाचे रु.32,256/- असे एकूण रु.21,25,217/- परत करण्यांस सांगितले. परंतु गैरअर्जदारांनी रु.21,01,321/- बँकेला परत केले, त्यामुळे उर्वरित रक्कम बँकेने तक्रारकर्त्याकडून वसुल केल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी वाहनाचा ताबा दिला नाही व बँकेकडून तक्रारकर्त्याचे कर्जाची उचल केली आणि बँकेस संपूर्ण रकमेची परतफेड केली नाही व वाहन आवंटीत करण्यामध्ये अटचण असल्याचे दोन महिन्यांनंतर कळविले, ही बाब गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन ती व्दारे रु.23,896/- बँकेचे व्याज, रु.20,000/- चालक व वाहक यांचे पगाराचा खर्च, दोन महिने गैरअर्जदारांचे कार्यालयात सतत येण्या-जाण्याकरता आलेला खर्च रु.5,000/-, बँक ऑफ इंडियाकडुन कर्ज घेण्याकरता करावा लागलेला खर्च रु.10,000/- व मानसिक व आर्थीक त्रासाचे रु.50,000/- असे एकूण रु.1,08,896/- ची मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दाखल केलेले आहे... गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने दि.21.01.2010 रोजी धनाकर्षाव्दारे रु.20,92,961/- दिल्याचे मान्य केलेले आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, जरी वाहन देण्यांस विलंब लागला तरी वाहनाची रक्कम जमा केल्यानंतर 8 दिवस पर्यंत जर वाहन आवंटीत केल्या गेले नाही तर जमा केलेल्या रकमेवर द.सा.द.शे.6% व्याज गैरअर्जदारांकडून तक्रारकर्त्याला मिळणार होती. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने नोंदविलेले वाहन निर्धारीत वेळेत मिळू शकत नाही याची कल्पना दिली होती. तेव्हा तक्रारकर्त्याने LPT/2515/COWL CHASSIS ही गाडी घ्यावयाचे ठरविले होते व त्या गाडीचे बॉडीचा खर्च गैरअर्जदार करणार होते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन त्यांनी सेवेत कुठलीही त्रुटी दिली नसल्याचे नमुद केले आहे. 4. सदर तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.30.04.2011 रोजी आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे वाहन नोंदणीकृत केले होते व त्या करीता गैरअर्जदारांना रु.20,92,961/- दिले होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होत असल्यामुळे व सदर बाब गैरअर्जदारांनी सुध्दा आपल्या उत्तरात मान्य केले असल्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्याने वाहनाची रक्कम गैरअर्जदारांकडे दि.21.01.2010 रोजी धनाकर्षाव्दारे जमा ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होते. त्यानंतर तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे नोंदणी (बुक) केलेले वाहन मॉडेल क्र. 2515-सी होते व ते वेळेवर देण्यांस गैरअर्जदारांना अडचण होती ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र. 4 वरुन स्पष्ट होते. त्यासंबंधाने वाहन देण्याकरता काय नेमकी अडचण होती याचा स्पष्ट खुलासा गैरअर्जदारांनी केलेला नाही. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरामधे सदर बाब तक्रारकर्त्याला कळविली व त्याने LPT/2515/COWL CHASSIS हे वाहन खरेदी करण्याकरता संमती दर्शविल्याचे म्हटले आहे आणि त्याबाबतचा दस्तावेज सुध्दा गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. परंतु तक्रारकर्त्याने नोंदविलेले वाहन देण्यांस गैरअर्जदार असमर्थ आहे ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.4 ज्याचा दि.19.02.2010 वरुन स्पष्ट होते. 7. तक्रारकर्त्याने बॅंक ऑफ इंडिया यांचेकडून कर्ज घेतले होते व बँकेने दि.2402.2010 रोजी गैरअर्जदारांना पत्र पाठविले व त्याव्दारे रु.20,92,961/- व त्यावरील व्याजाचे रु.32,256/- असे एकूण रु.21,25,217/- ची मागणी केली ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या बँकेने गैरअर्जदाराला पाठविलेल्या पत्रावरुन (दस्तावेज क्र.2) स्पष्ट होते. परंतु प्रत्यक्षात गैरअर्जदाराने बँक ऑफ इंडियाला रु.21,01,321/- परत केले, ही बाब सुध्दा तक्रारकत्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 वरुन स्पष्ट होते. म्हणजेच गैरअर्जदारांनी बँकेला रु.23,896/- कमी परत केले, मंचाचे असे मत आहे की, जे वाहन आवंटीत करण्याकरता गैरअर्जदार/विक्रेत्याला अडचण होती अश्या वाहनाची नोंदणी करते वेळीच त्यांनी तक्रारकर्त्यास परत द्यावयास पाहिजे होती. परंतु तशी कोणतीही सुचना अथवा कल्पना तक्रारकर्त्यास दिली असल्याचे कोणत्याही दस्तावेजावरुन स्पष्ट होत नाही. त्यामुळे गेरअर्जदाराच्या चुकीमुळे व सेवेतील त्रुटीमुळे गैरअर्जदारांनी कमी दिलेली रक्कम बँकेने तक्रारकर्त्याकडून वसुल केली, म्हणून ती रक्कम रु.23,896/- मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्त्याने सदर वाहन आपल्या उपजिवीकेकरीता घेतले होते व ती व्दारे तो व्यवसाय करुन कुटूंबाचे पालन पोषण करणार होता. परंतु गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी देऊन वाहन आवंटीत केले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यास साहजिकच आर्थीक नुकसान झाले व शारीरिक, मानसिक त्रासाकरीता त्याने रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी ही अवास्तव असली तरी तक्रारकर्ता हा रु.10,000/- मिळण्यांस पात्र ठरतो तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याची इतर मागणी पुराव्या अभावी अमान्य करण्यांत येत आहे. 9. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की त्यांनी तक्रारकर्त्यास बँकेने वसुल केलेली रक्कम रु.23,896/- आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत द्यावी अन्यथा सदर रकमेवर रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासह देय राहील. 4. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासपोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |