(आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक– 13 जानेवारी, 2017 )
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारकर्त्याने तक्रारीत असे कथन केले आहे की, विरुध्द पक्षाचा जमीन खरेदी विक्री करुन, त्यावर भुखंड व बंगले तयार करुन ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे एक बंगला क्रमांक-92 नोंदवुन रक्कमेचा भरणा केलेला आहे. त्याबद्दलची कागदपत्रे तक्रारकर्त्याकडे उपलब्द असुन ते तक्रारीसोबत जोडलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन सदर बंगल्याची कागदपत्रे प्राप्त करण्याकरिता मागणी केली असता विरुध्द पक्षाने सतत टाळाटाळ केली त्यामुळे तक्रारकर्त्याला शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्त्याने वि.प. ला दिलेली रक्कम रु.2,64,000/- व्याजासह परत करावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली.
तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्षास प्राप्त होवूनही विरुध्द पक्ष तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन नि.क्रं.1 वर दिनांक 07.10.2016 रोजी विरुध्द पक्षा विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तऐवज, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता खालील प्रमाणे मंचाचा निष्कर्ष देण्यात येतो.
निष्कर्ष
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 18.9.2010, बंगला क्रं.92,शिवालय, हुडकेश्वर, नागपूर येथे पैशाचा भरणा करुन नोंदविली होती. त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे रुपये 2,64,000/- रुपये भरणा केलेले आहे ही बाब तक्रारीत दाखल नि.क्रं.2 वरील दस्त क्रं.1 वरुन सिध्द होते म्हणुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे असे सिध्द होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन रुपये 2,64,000 घेऊनही योजनेचे बांधकाम सुरु केले नाही याबाबत विरुध्दपक्षा विरुध्द सोनेगाव, पोलीस स्टेशन, येथे तक्रार दाखल केली ही बाब तक्रारीत दाखल नि.क्रं.2 वरील दस्त क्रं.9 वरुन सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याकडुन विरुध्द पक्षाने बांधकामाकरिता घेतलेली रक्कम परत देण्यास नाकारले म्हणुन दिनांक 30.12.2015 ला नोटीस पाठविली व ती नोटीस विरुध्द पक्षाला मिळाली ही बाब तक्रारकर्त्याने दाखल नि.क्रं.2 दस्त क्रमांक 11,12,13 वरुन सिध्द होते. तरीही विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच विरुध्द पक्ष नोटीस मिळूनही तक्रारीत हजर झाले नाही व आपली बाजू मांडली नाही यावरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षावर लावलेले आरोप खरे आहेत. यावरुन असे सिध्द होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रुपये 2,64,000/-, दिनांक 18.09.2010
पासुन द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्यास
अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत, नुकसान भरपाई दाखल रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त ) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/-( रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4. वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30
दिवसाचे आत करावे.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.