तक्रारदारातर्फे वकील श्रीः - महेश सहस्त्रबुध्दे
सामनेवाले -क्र 1 एकतर्फा.
सामनेवाले -क्र 2 गैरहजर.
आदेश - मा. शां. रा. सानप, सदस्य. ठिकाणः बांद्रा (पू.)
निकालपत्र
(दिनांक 26/10/2016 रोजी घोषित)
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचा आरोप करून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थेाडक्यात खालीलप्रमाणे आहे.
3. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारानी ग्रा.सं.कायदा 1986, कलम 12 अन्वये मंचात दाखल केली आहे.
4. प्रस्तुतच्या तक्रारीतील सामनेवाले क्र 1 हे संगणक विक्रेते व सर्व्हिस सेंटर आहेत. तर सामनेवाले क्र 2 हे संगणक उत्पादक आहेत. सदरचा संगणक हा तक्रारदारांनी में. इनफिनीट रिटेल मालाड (प.) मुंबई यांचेकडून दि. 06/08/2008 ला बिल क्र 102/172846 अन्वये एकुण रू. 25,999/-,अदा करून विकत घेतला होता.(पृ.क्र 13) वारंटी कार्ड (पृ.क्र 14) वर दाखल आहे.
5. तक्रारदार व सामनेवाले हे तक्रारीतील पत्यावर वास्तव्यास असून व व्यवसाय करतात. सामनेवाले क्र 1 हे संगणकाचे विक्रेते/सर्व्हिस सेंटर आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदारास तक्रारीत नमूद केलेल्या पत्यावर सदरील संगणक दि. 09/08/2008 ला पोहचविला/स्थापन केला.
6. तक्रारदारांचे पुढेही असेही कथन आहे की, प्रस्तुत संगणक सामनेवाले क्र 1 यांनी विकल्यापासून काही दिवसाच्या आतच प्रस्तुत संगणकात बिघाड/त्रृटी आढळून आल्या. तसेच, तक्रारदारानी सामनेवाले क्र 1 यांना त्याबाबत वेळोवळी कळविले व सामनेवाले यांनी सदर संगणकात महत्वाचे घटक/पार्ट बदलवूनही प्रस्तुतचा संगणक सुरळीत चालला नाही. प्रस्तुतचा संगणक तक्रारदारानी खरेदी केल्यापासून तर आजपर्यंत तक्रारदार प्रस्तुत संगणकाचा अविरत उपभोग/लाभ घेऊ शकला नाही व सदरील संगणक सतत खराब होत राहिला. म्हणून, तक्रारदाराला वेळोवेळी गैरसोय व मानसिक त्रास सोसावा लागला.
7. प्रस्तुत संगणकातील बिघाड/त्रृटी त्या अनुषंगाने सामनेवाले यांनी अनेकवेळा सदर संगणकात दुरूस्तीचे काम केले व अनेक वेळा महत्वाचे पार्ट/घटक बदलविले. तरीही, संगणक व्यवस्थीत चालत नव्हता. यावरून, तक्रारदारांच्या लक्षात आले की, प्रस्तुत संगणकात काही तांत्रीक व मुलभूत उत्पादनातील दोष/त्रृटी असल्याचे तक्रारदारांची खात्री झाली. प्रस्तुत संगणकातील बिघाड/दोष/त्रृटी सामनेवाले यांच्या तंत्रज्ञांनानी अनेक प्रयत्न करूनही ते संगणकातील बिघाड/दोष/त्रृटी दुरूस्त करू शकले नाही व सदर संगणक दुरूस्त करण्यास सामनेवाले यांच्या तंत्रज्ञानांना अपयश आले. त्याबाबतचे सर्व्हिस रिपोर्ट दि. 27/08/2008, 28/08/2008, 18/03/2008, 31/07/2009 व 07/08/2009 संचिकेत दाखल आहेत. (पृ. क्र. 15 ते 19) त्यानंतर सामनेवाले यांच्या तंत्रज्ञानाने प्रस्तुतच्या संगणकातील मदर बोर्ड दि. 27/08/2008 रोजी बदलविला. तरीही, संगणक व्यवस्थीत चालत नव्हता. त्यानंतर, सामनेवाले यांच्या तंत्रज्ञानाने प्रस्तुत संगणकाचा कि-बोर्ड व माऊस दि. 28/08/2008 रोजी बदलविला. तरीही, संगणकातील मुलभूत/उत्पादनातील दोष दुर करण्यास सामनेवाले यांना अपयश आले व संगणक नादुरूस्तच अवस्थेत पडून राहिला. त्यानंतर सामनेवाले यांच्या तंत्रज्ञानाने प्रस्तुतच्या संगणकातील हार्डडिस्क दि. 18/03/2009 रोजी काढून घेऊन ती सामनेवाले क्र 1 यांच्या कार्यालयात नेली व तक्रारदारांना सामनेवाले क्र 1 यांनी अवगत केले की, सदर संगणकामध्ये व त्यातील ऑपरेटींग सिस्टीममध्ये बिघाड झालेला आहे. त्याकामी आम्ही सदर हार्डडिस्क घेऊन जात आहोत. त्यानंतर, संगणकामध्ये सदरील दुरूस्त केलेली हार्डडिस्क सामनेवाले यांनी पुन्हा स्थापीत केली. तरीही, संगणकातील दोष निवारण्यास सामनेवाले यांना अपयश आले. त्यानंतर, सामनेवाले यांच्या तंत्रज्ञानानी पुन्हा संगणकातील हार्डडिस्क, मदरबोर्ड व रॅम दि. 28/08/2008 रोजी काढून सामनेवाले क्र 1 यांच्या कार्यालयात/सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेले. म्हणजेच, सदर संगणकातील हार्डडिस्क, मदरबोर्ड व रॅम हे एका वर्षाच्या आत सामनेवाले क्र 1 यांच्या कार्यालयात/सर्व्हिस सेंटरमध्ये दुरूस्तीसाठी न्यावे लागले. त्यानंतर, दि. 07/09/2008 रोजी सामनेवाले यांच्या तंत्रज्ञानाने सदर संगणकात एक वेगळा मदरबोर्ड आणुन बसविला. सदर मदरबोर्ड हा सदर संगणकाचे निरीक्षणासाठी म्हणून सामनेवाले क्र 1 यांनी मूळ मदरबोर्ड न बसविता त्यांच्याकडील दुसरा मदरबोर्ड सदर संगणकात बसविला. तरीही, सदर संगणकात निरीक्षणार्थ बसविलेला मदरबोर्ड हा ही एक दिवसाच्या आतच आपले कार्य व्यवस्थीत करू शकला नाही व सदर संगणक पुन्हा नादुरूस्त अवस्थेत तक्रारदारांकडेच पडून राहिला. विशेष म्हणजे दि. 08/09/2009 पासून सामनेवाले यांचे कोणतेही तंत्रज्ञ सदर संगणक व्यवस्थीत चालु आहे किंवा नाही याची चौकशी व पाहणी करण्यासाठी तक्रारदाराकडे आले नाही. म्हणजेच, सदर संगणक दि. 08/09/2009 पासून बंदच आहे. तक्रारदारांनी, सामनेवाले क्र 1 यांना अनेकवेळा विनंती करूनही सामनेवाले यांनी तक्रारदारांचा संगणक दुरूसत करून दिला नाही व तक्रारदारांना संगणक दुरूस्तीबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही व तरीही त्यांनतर तक्रारदारानी सामनेवाले क्र 1 यांचेशी पुन्हा प्रत्यक्ष संपर्क साधून व दुरध्वनीद्वारे सदर संगणकातील बिघाड/दोष/त्रृटी दुरूस्त करण्याबाबत वारंवार विनंत्या केल्या. परंतू, सामनेवाले यांनी तक्रारदारांना थातुरमातुर उत्तरे देऊन त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले व संगणक दुरूस्त करून दिला नाही.
8. त्यांनतर, सामनेवाले क्र 2 यांनी दि. 05/08/2011 रोजी आपली लेखीकैफियत दाखल करून निवेदन केले की, तक्रारदारानी सामनेवाले क्र 2 यांचेविरूध्द खोटी तक्रार दाखल करून व घटनेस काही कारण घडलेले नसतांनाही, सामनेवाले क्र 2 यांचेकडून पैसे उकळण्याच्या हेतूने सदरची तक्रार दाखल केली आहे. म्हणून सदर तक्रार खारीज करण्यात यावी. सामनेवाले क्र 2 यांनी तक्रारदाराना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. परंतू, वेळोवेळी तक्रारदारांना वारंटी कालावधीमध्ये संगणक दुरूसत करून दिला आहे. म्हणून सदरची तक्रार खारीज करण्यात यावी व सदर संगणकामध्ये कोणताही दोष नाही. परंतू, वेळोवेळी संगणकामधील आवश्यक नादुरूस्त पार्ट/घटक सामनेवाले क्र 1 यांनी बदलवून दिलेले आहे. तसेच, त्यांनी सदर संगणकातील मदरबोर्ड, हार्डडिस्क, की-बोर्ड व माऊसही बदलवून दिली आहे. म्हणून, तक्रारदारांनी तक्रारीत सामनेवाले क्र 2 यांचेविरूध्द केलेले कथन चुकीचे आहे. म्हणून, सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
9. तक्रारदारांचे पुढे असेही कथन आहे की, सदर संगणकाबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्या अगोदर एक शेवटचा प्रयत्न म्हणून तक्रारदारानी सामनेवाले क्र 1 यांना त्यांच्या वकीलामार्फत दि. 16/01/2010 रोजी नोटीस पाठविली. त्यानंतर तक्रारदारानी सामनेवाले क्र 2 यांचा नवा पता शेाधुन सदरच्या नोटीशीची प्रत सामनेवाले क्र 2 यांनाही पाठविली. परंतू, तरीही सामनेवाले क्र 1 व 2 यांनीही सदर संगणक दुरूस्ती करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही व सदर नोटीशीला सामनेवाले यांचेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही व सदरील संगणक हा सामनेवाले यांनी पुन्हा दुरूसतीसाठी त्यांच्या कार्यालयात/सर्व्हिस सेंटरमध्ये दि. 02/05/2011 रोजी नेला व तो तक्रारदाराना दुरूस्त करून परतही केला नाही. शेवटी, कंटाळून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार, सामनेवाले यांनी तक्रारदारांना मूळताच उत्पादनातील दोषयुक्त असलेला संगणक विकल्याबद्दल व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली या बाबी अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली. म्हणजेच, सदर संगणक दि. 06/08/2008 रोजी खरेदी केल्यापासून ते दि. 02/05/2011 पर्यंत सतत बंदच आहे. म्हणून सदरची तक्रार, तक्रारदारांनी मंचात दाखल करून पुढील मागण्या आपल्या प्रार्थना कलमात केल्या आहे.
(1) सामनेवाले यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या प्रस्तुत संगणकाऐवजी एक नवा व दोषमुक्त असलेला आणि प्रस्तुत संगणकाएवढा किंवा उच्चप्रतीचा संगणक तक्रारदारांना दयावा. अन्यथा-
(2) सामनेवाले यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराला संगणकाची किंमत रक्कम रू. 25,999/-, ही 18 टक्के द.सा.द.शे दराने परत करावी.
(3) सामनेवाले यांनी तक्रारदाराना झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रू. 50,000/-,सामनेवाले यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदारांना अदा करावे. तसेच, तक्रार खर्च म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदाराना 15,000/-,अदा करावे.
(4) सामनेवाले यांनी तक्रारदाराना मुलभूत/दोषपूर्ण/उत्पादनातील दोष असलेला संगणक विकला व तक्रारदारांना सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करावे अशी विनंती मंचास केली.
10. सामनेवाले क्र 1 यांना मंचाची नोटीस मिळून सुध्दा सामनेवाले क्र 1 हे मंचासमोर वेळेत हजर झाले नाही व आपली लेखीकैफियतही दाखल करण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे सामनेवाले यांचेविरूध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात येऊन सदरची तक्रार एकतर्फा चालविण्याचे ठरविण्यात आले. तसेच, सामनेवाले क्र 2 यांनी आपली लेखीकैफियत व पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. परंतू, सामनेवाले क्र 2 यांना वारंवार संधी देऊनही त्यांनी आपला लेखीयुक्तीवाद दाखल केला नाही. सबब, प्रकरण सामनेवाले क्र 2 यांचे पुराव्याचे शपथपत्र विचारात घेऊन त्यांच्या लेखीयुक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात येईल. तसेच तक्रारदारानी मंचापुढे दि. 30/09/2014 रोजी निवेदन केले की, त्यांचे पुराव्याचे शपथपत्र हाच त्यांचा लेखीयुक्तीवाद समजण्यात यावा व त्यांची विनंती मान्य करण्यात आली व त्यानूसार प्रकरण उभयपक्षकारांच्या तोंडीयुक्तीवादाकामी नेमण्यात आले. तरीही, सामनेवाले क्र 2 गैरहजर राहिले. त्यामुळे, दि. 31/08/2016 रोजी तक्रारदारांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला व सामनेवाले क्र 2 हे गैरहजर असल्यामूळे तसेच प्रकरण जुने असल्यामूळे सामनेवाले यांनी दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे विचारात घेऊन प्रकरण न्यायनिर्णयाकामी नेमण्यात आले.
11. प्रस्तुत मंचाने तक्रारदाराची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद, पावती, वॉरंटी कार्ड, सर्व्हिस रिपोर्ट, वकीलांची नोटीस कागदपत्रे, यांचे वाचन व अवलोकन केले. त्यानूसार तक्रार सामनेवाले क्र 1 यांचेविरूध्द एकतर्फा तर सामनेवाले क्र 2 यांच्या विरूध्द विना लेखीयुक्तीवादाशिवाय चालवून, निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे | निष्कर्ष |
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदारानी सिध्द केले आहे काय ? | होकारार्थी |
2. मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत काय ? | अंशतः होकारार्थी |
3. काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2
12. तक्रारदारानी सदरील संगणक दि.06/08/2008 ला सामनेवाले क्र 1 यांच्याकडून खरेदी केला व त्यानंतर थोडयाच कालावधीत तक्रारदाराच्या असे लक्षात आले की, सदर संगणकामध्ये बिघाड झाला आहे, तसेच सदर संगणक हा मधुनमधुन बंदही पडत आहे. म्हणून, तक्रारदारानी सदरचा संगणक हा सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी दुरूस्तीसाठी देऊनही, व सामनेवाले यांनी सदर संगणकाचा मदरबोर्ड, हार्डडिस्क, कि-बोर्ड व माऊसही बदलवूनही सदरचा संगणकामधील बिघाड सामनेवाले हे दुरूस्त करून देऊ शकले नाही. तसेच, सामनेवाले यांच्या इंजिनीअरने सदर संगणकामधील मदरबोर्ड, हार्डडिस्क, कि-बोर्ड व माऊसही दोन वेळेस बदलवूनही सामनेवाले क्र 1 यांच्या तंत्रज्ञांनाना सदर संगणकातील दोष निवारण्यास अपयश आले. हे मंचाच्या स्पष्टपणे असे निदर्शनास आले. सदर संगणकामध्ये मूळताच दोष होता व तो मुळताच दोषयुक्त असलेला संगणक सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदाराना विक्री करून/माथी मारून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराना सदर संगणकाची विक्री केल्याचे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे व सदर बाब सामनेवाले क्र 1 यांच्या तत्रंज्ञानानाही वेळोवेळी निदर्शनास आली आहे. सबब, सामनेवाले यांनी मूळताच उत्पादनातील दोष असणारा संगणक तक्रारदाराना विकला यात आता कोणताही वाद नाही व मंचाच्या मनातही शंका नाही. ही एकप्रकारे सेवेतील मोठी त्रृटीच आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच, सदरच्या संगणकामधील बिघाड हा उत्पादनातीलच दोष (MANUFACTURING DEFECT) असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. तसेच, तक्रारदारानी सामनेवाले यांच्याकडे सदरचा संगणक वारंवार दुरूस्त करण्यासाठी दिला असतांनाही सामनेवाले यांना सदरच्या संगणकामधील दोष निवारण्यास अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच, तक्रारदाराना संगणकाची किंमत रू. 25,999/-,चा परतावा केला नाही. ही एकप्रकारे सेवेतील त्रृटीच आहे याबाबत मंचाच्या मनात कोणतीही शंका नाही व तक्रारदारांचे म्हणणे व तक्रारीतील मागण्या, योग्य, संयुक्तिक व न्यायोचित आहे याबाबत मंचात दुमत नाही.
13. मंचाने खरेदी पावती, सर्व्हिस रिपोर्ट, वारंटी कार्ड, कागदपत्र याचे अवलोकन केले असता, मंचाच्या असे निदर्शनास आले की, सदर संगणकमध्ये पूर्वीपासूनच बिघाड होता व तो उत्पादनाच्याच वेळेचाच बिघाड झालेला संगणक तक्रारदारांना विकलेला दिसून येतो व सदरचा बिघाड तक्रारदारानी सामनेवाले यांचेकडे वारंटी कालावधीमध्येच निदर्शनास आणून दिला होता. तरीही सामनेवाले यांनी सदर संगणक व्यवस्थीत दुरुस्त करुन दिला नाही व संगणकाच्या किंमतीचा परतावाही केला नाही. तसेच, सदर संगणक दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन देऊनही ते सामनेवाले यांनी पाळले नाही सदर संगणक हा दि. 02/05/2011 रोजी सामनेवाले क्र 1 यांनी त्यांच्या कार्यालयात/सर्व्हिस सेंटरमध्ये दुरूसतीसाठी नेला तो तक्रारदाराना आजपर्यंत परतही केला नाही. ही बाब मंचाच्या, म्हणजेच सा.वाले यांनी तक्रारदाराचा संगणक न दुरुस्त करुन व संगणकाच्या किंमतीचा परतावा न करुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा सुविधा पुरविण्यास कसूर केली आहे हे स्पष्टपणे मंचाचे निदर्शनास आले आहे. सबब, सदरील मंच हया निष्कर्षापर्यंत आला आहे की, सामनेवाले यांनी निश्चीतच सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली आहे. याबाबत मंचाच्या मनात आता कोणतीही शंका नाही.
14. सामनेवाले क्र 1 यांना नोटीस मिळून सुध्दा त्यांनी मंचात आपली कैफियत दाखल केली नाही व त्यांना ती दाखल करण्याची संधीही देण्यात आली होती ती त्यांनी टाळली असल्यामुळे, त्यांचेविरूध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांची तक्रारीतील, सामनेवाले क्र 1 यांच्या बाबतीतील, तक्रारदारानी केलेली कथने “अबाधित“ राहतात. परंतू, सामनेवाले क्र 2 यांनी आपली लेखीकैफियत व पुराव्याचे शपथपत्र दाखल करून, सामनेवाले क्र 2 यांनी पुढे असेही कथन केले की, तक्रारदाराना वारंटी कालावधीत सर्व सेवासुविधा पुरविल्या आहेत व सामनेवाले क्र 2 यांनी पुढे असेही निवेदन केले की, तक्रारदारानी सदरची खोटी तक्रार दाखल करून सामनेवाले यांचेकडून पैसे उकळण्याच्या हेतूने तक्रार मंचात दाखल केली आहे. परंतु, मंचाचे असे निदर्शनास आले आहे की, सामनेवाले क्र 2 यांनी आपल्या लेखीकैफियतीमध्ये व पुराव्याच्या शपथपत्रामध्ये स्वतःहून नमूद केले आहे की, सदर संगणकातील मदरबोर्ड, हार्डडिस्क, कि-बोर्ड व माऊसही बदलवूनही दिले आहे. यावरून मंच या निष्कर्षाप्रत आला आहे की, सामनेवाले क्र 2 यांनी, तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीत केलेले आरोपांना एकप्रकारे पृष्टीच मिळते. म्हणजेच, सामनेवाले क्र 2 यांनी संगणकातील मदरबोर्ड, हार्डडिस्क, कि-बोर्ड व माऊसही बदलवूनही सदर संगणक हा आजही नादुरूस्त अवस्थेत सामनेवाले क्र 1 यांच्याकडे पडून आहे. म्हणजेच एका अर्थाने सामनेवाले क्र 2 यांनी उत्पादनातील मूळ दोष असलेला संगणक सामनेवाले क्र 1 तर्फे तक्रारदाराना विकला आहे. म्हणजेच, एका अर्थाने सामनेवाले क्र 2 हे ही लाभार्थी आहेतच शिवाय सामनेवाले क्र 2 यांनी उत्पादनातील दोषयुक्त संगणक बाजारात विकण्यास पाठविला. म्हणून सामनेवाले क्र 2 हे सुध्दा तितकेच दोषी आहेत. म्हणून, सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून सेवासुविधा पुरविण्यात कसूर केली असल्याचे तक्रारदार सिध्द करतात.
15. सबब, तक्रारदार हे सामनेवाले क्र 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या सदरील सदरील संगणकाची किंमत, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पात्र आहेत याबाबत मंचात कोणतेही दुमत नाही. अतएव, मुद्दा क्र.1 यांचे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते व मुद्दा क्र.2 याचे उत्तर अंशतः होकारार्थी नोंदविण्यात येते.
16. वरील सविस्तर चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्रमांक 644/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली असे मंच जाहीर करीत आहे.
3. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराना संगणकाची किंमत रु.25,999/-,(पंचवीस हजार नवशे नव्यानव) ही द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह दि.06/08/2008 पासून ते दि. 30/11/2016 पर्यंत रक्कम अदा करावी. तसे न केल्यास दि. 01/12/2016 पासून सदरहू रकमेवर, रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याज लागु राहील.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/-,(दहा हजार) वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या अदा करावे. तसेच तक्रारीचा खर्च वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या रक्कम रु.5,000/-,(पाच हजार) तक्रारदाराना आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत अदा करावी. नुकसान भरपाईची रक्कम 30 दिवसाच्या आत अदा न केल्यास सामनेवाले क्र 1 व 2 हे तक्रारदाराना वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या द.सा.द.शे. 12 टक्के व्याज तक्रार दाखल दिनांकापासून देण्यास जबाबदार राहतील.
5. सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
npk/-