(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक– 29 नोव्हेंबर, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांचे विरुध्द तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दावा नामंजूर केल्याने प्रस्तुत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती हिचे पती यांचे मालकीची मोटारसायकल वाहन क्रं-MH-36/V-8632 असून त्यांनी सदर वाहनाचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे दिनांक-05.09.2016 ते दिनांक-04.09.2017 या कालावधी करीता उतरविला होता. सदर वाहनाचे पॉलिसीचा क्रं-30005/33561444/10322/000 असा आहे. दिनांक-03.05.2017 रोजी तक्रारकर्तीचे पती श्री राधेश्याम कुलरकर हे डोंगरगाव ते भंडारा या मार्गावर सदर विमाकृत मोटरसायकलने जात असताना साधारणतः दुपारी 2.30 वाजताचे दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांचे मोटरसायकलला धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला व गंभिर स्वरुपाच्या ईजा झाल्यामुळे त्यांना स्पर्श मल्टीस्पेशॉलिटी हॉस्पिटल, भंडारा येथील डॉ.चौधरी यांचे दवाखान्यात वैद्यकीय उपचारा करीता भरती करण्यात आले होते. सदर वैद्यकीय उपचारा दरम्यान दिनांक-29.05.2017 रोजी तक्रारकर्तीचे पतींचा मृत्यू झाला. सदर अपघात व मृत्यूची नोंद पोलीस स्टेशन भंडारा येथे करण्यात आली व भंडारा पोलीसांनी एफ.आय.आर.क्रं 265/2017 प्रमाणे अज्ञात वाहन चालकाचे विरुध्द नोंदविला.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, अपघाता दरम्यान तिचे पतीने मोटरसायकल सोबत पिशवी मध्ये ठेवलेले वाहनाचे दस्तऐवज व इतर दस्तऐवज होते ती पिशवी हरवली. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. त्यावर विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे दिनांक-27.07.2017 रोजीचे पत्रान्वये वाहनचालक परवान्याची प्रत हैद्राबादयेथील पत्त्यावर पाठविण्यास सुचित केले होते, त्याप्रमाणे तक्रारकर्तीने दिनांक-03.10.2017 रोजी दस्तऐवजाचे प्रतीची पुर्तता सुध्दा केली होती. विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-30.10.2017 रोजीचे ईमेल व्दारे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर झाल्याचे कळविले परंतु विमा दावा नामंजूर केल्या बाबतचे कारण कळविले नाही. तक्रारकर्तीचे माहिती प्रमाणे तिचे पती श्री राधेश्याम यांचे जवळ वैधवाहन चालक परवाना होता आणि तो दिनांक-13.12.2015 पर्यंत वैध होता परंतु त्या नंतर सदर परवान्याचे नुतनीकरण केले होते किंवा नाही याची तिला माहिती नाही. वैयक्तिक अपघात विमा दाव्या मध्ये वैध वाहन चालक परवान्याची आवश्यकता नसते. म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्यात यावे की, तक्रारकर्तीला तिचे मृतक पतीचे वाहनाचे विमा पॉलिसी संबधाने देय होणारी संपूर्ण रक्कम अपघात झाल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह द्यावी.
(02) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-20,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्दपक्ष विमा कंपनीने द्याव्यात.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीने सदर आदेशाचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत आदेशित रक्कमा न दिल्यास सदरच्या रक्कमा प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्तीला देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनीला ग्राहक मंचातर्फे नोटीस पाठविली असता त्यांनी पान क्रं 35 ते 38 वर लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी आपले लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ती हिचे पती यांनी त्यांचे मालकीची असलेली हिरो होंडा मोटरसायकलची विमा पॉलिसी तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे त्यांचे कडून काढल्याची बाब मान्य केली. तसेच सदर पॉलीसी ही मालक-चालक अशी होती. वैयक्तिक अपघात पॉलिसी प्रमाणे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास रुपये-1,00,000/- विमा राशी देय होती. पुढे विरुध्दपक्ष विमा कंपनीने असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे पतीचा अपघात हा दिनांक-03.05.2017 रोजी भंडारा डोंगरगाव मार्गावरती झाला तसेच वैद्यकीय उपचारा दरम्यान दिनांक-29.05.2017 रोजी त्यांचा मृत्यू झाला या बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्तीचे मृतक पती यांचे जवळील वाहनचालक परवान्याची मुदत ही दिनांक-14 डिसेंबर, 2010 पासून ते दिनांक-13 डिसेंबर, 2015 पर्यंत होती परंतु तक्रारकर्तीचे पतीचा अपघात हा दिनांक-03.05.2017 रोजी झालेला आहे. तक्रारकर्तीचे पतींनी अपघाती घटने पूर्वी सदर वाहन परवान्याचे नुतनीकरण सुध्दा केलेले नव्हते. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे अपघाती घटनेच्या वेळी वाहनचालका जवळ वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे. करीता तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यू संबधीचा विमा दावा नामंजूर करुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेले नाही सबब प्रस्तुत तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारकर्तीने पान क्रं 10 वरील यादी नुसार अक्रं 1 ते 5 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने एफआयआरची प्रत, तक्रारकर्तीचे पतीचा शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, विरुध्दपक्ष विमा कंपनीने पाठविलेली ईमेलची प्रत अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपले उत्तरासोबत पान क्रं 39 वर (डिटेल्स ऑफ ड्रॉयव्हींग लायसन्स क्रं-एम.एच.-36/20110000228) अहवाल दाखल केला.
06. तक्रारकर्तीची तक्रार तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील लेखी दस्तऐवज व शपथपत्रे, लेखी युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
(1) | त.क. ही वि.प.विमा कंपनीची ग्राहक होते काय? | होय. |
(2) | वि.प.यांनी त.क.चा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | नाही. |
(3) | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं-1 बाबत-
07. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्तीचे मृतक पती यांनी वि.प.विमा कंपनीकडून त्यांचे मालकीच्या मोटरसायकल वाहनाची वैयक्तिक अपघात चालक-मालक विमा पॉलिसी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढली होती, तिचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर तक्रारकर्ती ही पत्नी व कायदेशीर वारसदार या नात्याने वि.प. विमा कंपनीची ग्राहक होते ही बाब स्पष्ट होते, करीता आम्ही मुद्या क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं-2 व 3 बाबत-
08. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तिचे पतीचा अपघात हा दिनांक-03.05.2017 रोजी डोंगरगाव भंडारा मार्गावरती झाला आणि वैद्यकीय उपचारा दरम्यान दिनांक-29.05.2017 रोजी तिचे पतीचा मृत्यू झाला या बाबी सिध्द होतात आणि त्याबद्यल उभय पक्षांमध्ये विवाद नाही. पृष्ट क्रं 39 वर दाखल केलेल्या वाहनचालक परवान्याचे प्रतीवरुन तक्रारकर्तीचे मृतक पती यांचे जवळील वाहनचालक परवान्याची मुदत ही दिनांक-14 डिसेंबर, 2010 पासून ते दिनांक-13 डिसेंबर, 2015 अशा कालावधीसाठी होती आणि तिचे पतीचा अपघात हा दिनांक-03.05.2017 रोजी झालेला आहे म्हणजेच अपघाती घटनेच्या वेळी तक्रारकर्तीचे पतीचे वाहन परवान्याचे नुतनीकरण करण्यात आलेले नव्हते. थोडक्यात वाहन चालक परवान्याची मुदत संपलेली होती.
09. त्याच प्रमाणे विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे अपघाती घटनेच्या वेळी वाहनचालका जवळ वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे. तसेच पृष्ट क्रं 24 वर तक्रारकर्तीने दाखल केलेल्या विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता त्यामध्ये खालील प्रमाणे अट नमुद आहे-
Driver-Any person including insured: provided that a person driving holds an effective driving license at the time of the accident and is not disqualified from holding or obtaining such license. Provided also that the person holding an effective Learner’s License may also drive the vehicle and that such a person satisfy the requirement of rule 3 of the Central Motor Vehicle Rule-1989.
त्यामुळे उपरोक्त नमुद वस्तुस्थिती तसेच मोटर कायद्यातील तरतुदी आणि विमा पॉलिसीतील अटी व शर्ती पाहता विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रारीमध्ये ग्राहक मंचाव्दारे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्दची खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्यल कोणतेही आदेश नाहीत.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेल्या “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.