तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : वकील श्रीमती सुधा चौहान यांचे मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे संगणक उत्पादन करणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे त्यांचे विक्री ,वितरण व सुविधा पुरविणारे केंद्र आहे. या पुढे दोन्ही सा.वाले यांना एकत्रितपणे केवळ सा.वाले असे संबोधिले जाईल.
2. तक्रारदारांनी दिनांक 17.12.2006 रोजी सा.वाले यांनी उत्पादित केलेला लॅपटॉप रु.66,490/- किंमतीस खरेदी केला. लॅपटॉप खरेदी केलेल्या दिवसापासून त्यामध्ये दोष दिसून आला. व खरेदीच्या दुस-याच दिवशी लॅपटॉप सा.वाले यांनी बदलून दिला. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे बदलून दिलेल्या लॅपटॉप मध्ये देखील आवाजाचा दोष, चित्र दिसण्याचा दोष इ.दोष आढळून आले. व एका वर्षामध्ये तो लॅपटॉप चार वेळेस सा.वाले यांच्याकडून दुरुस्त करुन घेण्यात आला. त्यानंतर एप्रिल,2007 मध्ये लॅपटॉप पुन्हा बिघडला व तक्रारदारांनी तो लॅपटॉप सा.वाले यांचेकडे दुरुस्तीकामी दिला. सा.वाले यांनी तो लॅपटॉप दुरुस्त करण्याचे ऐवजी तक्रारदारांना दुरुस्तीकामी रु.35,014/- खर्च येईल असे देयक दिले. वास्तविक पहाता लॅपटॉप सतत नादुरुस्त होत असल्याने तो दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी सा.वाले यांची होती. तरी देखील सा.वाले यांनी लॅपटॉपच्या दुरुस्तीच्या खर्चाबाबत रु.35,014/- ची मागणी केली, ती तक्रारदारांनी अमान्य केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सा.वाले यांना लॅपटॉपची दुरुस्ती करुन द्यावी अशी वेळोवेळी विनंती केली. परंतु सा.वाले यांनी त्यास दाद दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना वकीलामार्फत दिनांक 2.7.2008 रोजी व 4.7.2008 रोजी दोन नोटीसा दिल्या. त्यास सा.वाले यांनी दाद दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 26.9.2008 रोजी अंतीम नोटीस दिली व लॅपटॉपची दुरुस्ती करुन देण्यात यावी अशी सा.वाले यांचेकडे मागणी केली. त्यासही सा.वाले यांनी दाद दिली नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 20.3.2009 रोजी प्रस्तुतची तक्रार सा.वाले यांचे विरुध्द दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना लॅपटॉपची किंमत रु.66,490/- व नुकसान भरपाई रु.50,000/- अदा करावी अशी मागणी केली.
3. सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयतीचे शपथपत्र दाखल केले व त्यामध्ये सा.वाले यांनी उत्पादित केलेला लॅपटॉप तक्रारदारांनी दिनांक 17.12.2006 रोजी रु.66,490/- या किंमतीस खरेदी केला ही बाब मान्य केली. तथापी लॅपटॉपमध्ये मूलभुत दोष होता या कथनास नकार दिला. सा.वाले यांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे खरेदी केलेला लॅपटॉप तक्रारदारांना दुस-या दिवशी बदलून देण्यात आला. त्यानंतर तक्रारदार सा.वाले यांचेकडे लॅपटॉपच्या दुरुस्ती बद्दल विनंती करीत होते व त्याप्रमाणे सा.वाले यांनी 4 वेळेस तो लॅपटॉप दुरुस्त करुन दिला. त्यानंतर पुन्हा दिनांक 29.4.2008 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे लॅपटॉपची दुरुस्ती करणेकामी सुपूर्द केला. परंतु हमी कालावधी संपलेला असल्याने सा.वाले यांनी तो निशुल्क दुरुस्त करण्याचे नाकारले. व दुरुस्तीकामी देयक रु.35,014/- तक्रारदारांकडे पाठविले. परंतु तक्रारदारांनी दुरुस्तीचा खर्च अदा करण्यास नकार दिल्याने सा.वाले यांनी लॅपटॉपची दुरुस्ती केली नाही. या प्रकारे लॅपटॉप दुरुस्तीचे संदर्भात सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास सा.वाले यांनी नकार दिला.
4. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. त्या व्यतिरिक्त आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद व पुराव्याचे कागपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना बदलून दिलेला लॅपटॉप देखील सदोष होता ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून लॅपटॉपची किंमत व नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. परंतू दुसरा लॅपटॉप बदलून मिळण्यास पात्र आहेत. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अशतः मंजूर |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून सा.वाले यांनी उत्पादित केलेला लॅपटॉप दिनांक 17.12.2006 रोजी रु.60,490/- येवढया किंमतीस खरेदी केला हया बाबत उभय पक्षकारामध्ये वाद नाही. तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी अ येथे लॅपटॉप खरेदीचे बिल दिनांक 17.12.2006 दाखल केलेले आहे. त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून दिनांक 17.12.2006 रोजी रु.66,490/- येवढया किंमतीस लॅपटॉप खरेदी केलेला आहे असे दिसून येते. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे दिनांक 17.12.2006 रोजी खरेदी केलेला लॅपटॉप सदोष होता व दुस-याच दिवशी तो सा.वाले यांचेकडे घेऊन जावे लागला व सा.वाले यांनी तो बदलून दिला. तक्रारदारांच्या तक्रारीतील या प्रकारच्या कथनास सा.वाले यांनी नकार दिलेला नाही. या उलट सा.वाले यांनी कैफीयतीचे परिच्छेद क्र.7 मध्ये त्या बद्दल अज्ञान व्यक्त केलेले आहे. परंतु लेखी युक्तीवादाच्या परिच्छेद क्र.6 मध्ये त्या बाबत मान्य केलेले आहे. या वरुन तक्रारदारांनी दिनांक 17.12.2006 रोजी खरेदी केलेला लॅपटॉप सामनेवाले यांनी बदलून दिला ही बाब सिध्द होते. त्यानंतर तक्रारदार असे कथन करतात की, बदलून दिलेला लॅपटॉप सदोष असल्याने तो सा.वाले यांच्या सेवाकेंद्राकडे दुरुस्तीकामी न्यावा लागला व सा.वाले यांनी तो दुरुस्त करुन दिला. तक्रारदारांच्या या कथनास दुरुस्त आदेशाची प्रत निशाणी अ यामधील मजकूरावरुन पुष्टी मिळते. त्यानंतर तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे दिनांक 6.11.2006 रोजी लॅपटॉपमध्ये चित्र एकदम लाल रंगाचे होत होते व लॅपटॉप मधील पंख्या मधून आवाज येत होता. तक्रारदारांच्या शपथपत्रातील कथनाप्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 6.11.2007 रोजी सा.वाले यांचेकडे तक्रार दिली व त्यानंतर तो लॅपटॉप दुरुस्त करुन देण्यात आला. तक्रारदारांच्या या कथनास शपथपत्रा सोबतचे दुरुस्ती आदेश निशाणी-ब या वरुन पुष्टी मिळते. त्यातील नोंदी तक्रारदारांच्या शपथपत्रातील कथनास पुष्टी देतात.
7. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे लॅपटॉप वरील दोन्ही वेळेस दुरुस्त केल्यानंतर देखील पुन्हा तिस-या वेळेस म्हणजे दिनांक 27.11.2007 रोजी तो बिघडला व अॅडॉप्टर काम करेनासा झाला व सा.वाले यांच्याकडे दुरुस्तीकामी लॅपटॉप देण्यात आला व सा.वाले यांनी तो दुरुस्त करुन दिला. तक्रारदारांच्या या प्रकारच्या कथनास शपथपत्रासोबतचे दुरुस्ती आदेशाची प्रत निशाणी-क यामधून पुष्टी मिळते. त्यानंतर पुन्हा दिनांक 28.4.2008 रोजी लॅपटॉप मधील चित्र विरळ होत होते व लॅपटॉपची स्क्रीन कोरी दिसत होती. त्याबद्दल सा.वाले यांचेकडे तक्रार देण्यात आली. परंतु या वेळेस सा.वाले यांनी लॅपटॉप दुरुस्त करण्याचे ऐवजी तक्रारदारांना दुरुस्तीकामी कामाचे देयक रु.35,000/- मागीतले. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रासोबत निशाणी-ड येथे सा.वाले यांचेकडे दुरुस्तीकामी दिलेल्या तक्रारीची प्रत दिनांक 28.4.2008 हजर केलेली आहे. त्यामधील नोंदी तक्रारदाराच्या कथनास पुष्टी देतात.
8. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन असे दिसून येते की, सा.वाले यांचेकडून खरेदी केलेला लॅपटॉप सदोष असल्याने दुस-याच दिवशी तो बदलून देण्यात आला. परंतू बदलून दिलेला लॅपटॉप देखील सदोष असल्याने त्यामध्ये वारंवार बिघाड होत होता. व तक्रारदारांनी सा.वाले यांच्याकडे तो दुरुस्तीकामी दिला होता व सा.वाले यांनी तो दुरुस्त करुन दिला. तक्रारदारांना बदलून दिलेला लॅपटॉप सा.वाले यांचेकडे वारंवार दुरुस्तीकामी न्यावा लागला व सा.वाले यांनी तो दुरुस्त करुन दिला ही बाब असे दर्शविते की, बदलून दिलेला लॅपटॉप देखील सदोष असल्याने तक्रारदारांना त्याच्या दुरुस्ती बाबत वारंवार सा.वाले यांचेकडे जावे लागले व सा.वाले यांनी तो दुरुस्त करुन दिला. तक्रारदारांनी लॅपटॉपमध्ये दोष असल्या बद्दल तज्ञाचा वेगळा अहवाल अथवा शपथपत्र दाखल केलेले नाही. परंतु तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन असे सिध्द होते की, बदलून दिलेला लॅपटॉप देखील सदोष असल्याने त्यामध्ये वेळोवेळी दोष निर्माण होत होते व तो दुरुस्तीकामी सा.वाले यांच्याकडे घेऊन जावे लागत असे. या परिस्थितीमध्ये सा.वाले यांनी बदलून दिलेला लॅपटॉप देखील सदोष होता असा निष्कर्ष काढावा लागतो.
9. सा.वाले यांनी बदलून दिलेला लॅपटॉप सदोष असल्याने व त्यामध्ये वेळोवेळी दोष निर्माण होत असल्याने हमी कालावधी शिल्लक आहे अथवा संपलेला आहे ही बाब गौण ठरते. सा.वाले यांनी बदलून दिलेला लॅपटॉप सदोष असल्याने साहजीकच तक्रारदारांना तो वापरणे अशक्य झाले व तक्रारदारांनी सा.वाले यांना लॅपटॉपचा अदा केलेल्या किंमतीचा त्यांना मोबदला मिळू शकला नाही. तक्रारदारांनी लॅपटॉपची मुळ किंमत परत मागीतलेली आहे. परंतु प्रकरणाचा एकंदर विचार करता तक्रारदारांनी त्यांचे जवळ असलेला लॅपटॅाप आहे त्या स्थितीत सा.वाले यांना परत करावा व सा.वाले यांनी तक्रारदारांना सदोष लॅपटॉप बदलून द्यावा व त्या बद्दलचा हमी कालावधी वाढवून द्यावा. असा आदेश देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात
तो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 203/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष लॅपटॉप पुरवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना बदलून दिलेला लॅपटॉप पुन्हा बदलून द्यावा व त्या बदलून दिलेल्या लॅपटॉपचा हमी कालावधी देखील पुन्हा एका वर्षाकरीता वाढवून द्यावा. सद्य स्थितीत त्याच मॉडेलचा लॅपटॉप उपलब्ध नसल्यास अद्ययावत मॉडेलचा परंतु त्याच सेवा सुविधा असलेला लॅपटॉप तक्रारदारांनी आपल्या कडील लॅपटॉप परत केल्यानंतरच तक्रारदारांना देण्यात यावा असा आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रितपणे रु.5,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.