( मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलिंद केदार, सदस्य) //- आदेश -// (पारित दिनांक – 14/02/2011) 1. सदर तक्रार तक्रारकर्तीने आममुखत्यापत्र धारक कु. नेहा शरद लिंगायतवाणी हिच्यामार्फत दाखल केलेली असून तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय असा आहे की, तिने मुलांसह गैरअर्जदाराने वर्तमान पत्रात प्रकाशित केलेल्या त्यांच्या विविध लेआऊटची जाहिरात वाचून, गैरअर्जदाराचे कार्यालयात त्याचेशी संपर्क साधून माहिती घेतली व नंतर लेआऊट पाहिल्यानंतर ख.क्र.23, प.ह.क्र.3, हनुमाननगर जवळ गोरेवाडा नागपूर येथील भुखंड क्र.77, क्षेत्रफळ 1750 चौ.फु., प्रति रु.100/- चौ.फु.प्रमाणे एकूण किंमत रु.1,75,000/- मध्ये घेण्याचे ठरविले. ईसारादाखल रु.10,000/- तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना दिले आणि गैरअर्जदारांनी त्याबाबत रीतसर पावती क्र. 34, दि.14.07.2005 रोजी दिली. तसेच दि.30.07.2005 रोजी रु.77,500/- चा धनादेश क्र.482951 गैरअर्जदारांना त्यांच्या मागणीप्रमाणे दिला. याचीही पावती व पूर्वी दिलेल्या रु.10,000/- ची पावती गैरअर्जदाराने एकत्रितपणे तक्रारकर्तीला दिली. उर्वरित रकमेकरीता गैरअर्जदाराने तगादा लावल्याने तक्रारकर्तीने रु.87,500/- धनादेश क्र.482953 दि.21.10.2005 रोजी गैरअर्जदाराला दिला व याचीही पावती गैरअर्जदाराने दिली. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे भुखंडाची संपूर्ण रक्कम अदा करुनही गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला विक्रीपत्र करुन दिले नाही व जमिनीचे गैरकृषीकरण न झाल्याने विक्रीपत्र होऊ शकत नाही असे सांगितले. तसेच कायदेशीर नोटीस बजावल्यानंतरही तक्रारकर्तीच्या मागणीप्रमाणे रक्कम व्याजासह परत केली नाही.
तक्रारकर्तीने नागपूर सुधार प्रन्यास व तहसिलदार, नागपूर यांचेकडे माहितीच्या अधिकार कायद्याने माहिती मागविली असता सदर लेआऊटचे मालक गैरअर्जदार नसून एक त्रयस्थ व्यक्ती असल्याची माहिती देण्यात आली. तसेच भुखंडाचे नियमितीकरणाकरीता गैरअर्जदाराने कोणताही अर्ज सादर केलेला नसल्याची माहिती पुरविण्यात आली. वारंवार गैरअर्जदाराच्या कार्यालयात जाऊन यासंबंधी विचारणा केली असता व रकमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने तक्रारकर्तीच्या मागणीस दाद दिली नाही. तक्रारकर्तीच्या मते संपूर्ण रक्कम घेऊन गैरअर्जदाराने विक्रीपत्र करुन न दिल्याने व रक्कमही परत न केल्याने तक्रारकर्त्याने सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून तिने मंचासमोर तक्रार दाखल करुन रु.1,75,000/- ही रक्कम दरमहा दीड टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी एक लाख रुपये, तक्रारीचा खर्च मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत. आपले तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्तीने एकूण 15 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदारांनी सदर नोटीस ‘घेण्यास नकार’ या शे-यासह परत आला. म्हणून मंचाने गैरअर्जदाराविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.03.02.2011 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्तीचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. तसेच सदर प्रकरणी तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तऐवलांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष-
4. मंचाने दस्तऐवज क्र. 3 ते 5 चे अवलोकन केले असता ख.क्र.23, प.ह.क्र.3, हनुमाननगर जवळ गोरेवाडा नागपूर येथील भुखंड क्र.77 हा क्षेत्रफळ 1750 चौ.फु.चा रु.1,75,000/- मध्ये घेण्याकरीता संपूर्ण रक्कम धनादेशाद्वारे दिल्याचे व गैरअर्जदाराने ते स्विकारुन पावती अदा केल्याचे स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ती ही गैरअर्जदाराची ग्राहक ठरते असे मंचाचे मत आहे.
5. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे भुखंडाची पूर्ण किंमत गैरअर्जदाराला दिल्यावर तिने गैरअर्जदाराकडे भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याबाबत मागणी केली. परंतू अधिक चौकशीअंती व माहितीच्या अधिकारांतर्गत तिने तहसिलदार, नागपूर यांना माहिती मागविली असता त्यांनी पुरविलेल्या माहितीनुसार गैरअर्जदार ज्या स..क्र.23 अंतर्गत जमिनीची लेआऊट पाडून भुखंडाची विक्री करीत आहेत, मुळात ते त्यांच्या नावावर नाही व ते त्याचे मालकही नाही ही बाब निदर्शनास आली. ते श्री.संदीपकुमार राजेश्वर भगत यांच्या नावावर असल्याचे दस्तऐवज क्र.13 वर सातबाराचे उता-यावरुन स्पष्ट होते. म्हणजेच गैरअर्जदार हे त्याच्या नावावर नसलेल्या व मालकी नसलेल्या भुखंडाची विक्री अनुचितपणे ग्राहकांना करीत आहेत. गैरअर्जदाराची सदर कृती ही अनुचित व्यापार प्रथे अंतर्गत मोडते असे मंचाचे मत आहे. 6. तसेच नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडून मागविलेल्या माहितीनुसार ख.क्र.23 नियमितीकरणाकरीता कुठलाही अर्ज त्यांच्या कार्यालयाला प्राप्त नसल्याची माहिती पुरविली आहे. यावरुन गैरअर्जदाराने भुखंडाची पूर्ण किंमत घेऊनही लेआऊट नियमितीकरण केलेले नाही ही बाब सिध्द होते. तसेच तक्रारकर्तीकडून भुखंडाची संपूर्ण किमत घेऊन तिला विक्रीपत्र करुन न देणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी असल्याचे मचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदार विवादित ख.क्र.चे मालक नसल्याने ते विक्रीपत्र करण्यास असमर्थ आहेत. तेव्हा न्यायोचितदृष्टया व कायदेशीरदृष्टया तक्रारकर्ती सदर प्रकरणी तिने गैरअर्जदाराला अदा केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यास पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला रु.1,75,000/- ही रक्कम दि.21.10.2005 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने .द्यावी.
7. सदर प्रकरणी गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला लेआऊटचा नकाशा हा स्वतःच्या नावावर दर्शवून तिची फसवणूक केल्याने व भुखंडाची किंमत देऊनही विक्रीपत्र करुन न दिल्याने तक्रारकर्तीला मानसिक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्ती मानसिक त्रासाच्या भरपाईपोटी रु.20,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- तक्रारकर्तीला द्यावे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने, तक्रारकर्तीला रु.1,75,000/- ही रक्कम दि.21.10.2005 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने .द्यावी. 3) तक्रारकर्तीला गैरअर्जदाराने मानसिक त्रासाच्या भरपाईपोटी रु.20,000/- द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला रु.2,000/- द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |