Dated the 07 Oct 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. सामनेवाले नं.1 हे तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या फ्रीजचे उत्पादक असुन सामनेवाले नं.2 हे त्यांचे डिलर आहे. तक्रारदार यांनी सदर फ्रीज ता.08.03.2009 रोजी (Godrej Refrigerator-DC-23C2) रु.10,500/- या किंमतीस सामनेवाले नं.2 यांचेकडून विकत घेतला असुन सदर फ्रीज खरेदी करतांना तक्रारदार यांना देण्यात आलेल्या वॉरंटी कार्डनुसार फ्रीजच्या कोणत्याही भागातील (पार्ट) बिघाडाबाबत 1 वर्षाची वॉरंटी तसेच कॉम्प्रेसरसाठी 5 वर्षांची वॉरंटी देण्यात आली होती, तसेच सदर फ्रीजच्या खरेदीपासुन 10 वर्षांपर्यंत सदर फ्रीजबाबत “10 वर्षांचा रस्ट प्रोटेक्शन प्लॅन” (पान क्रमांक-33) तक्रारदार यांना देण्यात आला. त्यानुसार फ्रीजचा कोणताही भाग (Body Pant) गंजला असल्यास तो पुन्हा पुर्ववत करुन देणे/रंगवुन देणे किंवा पुर्ण फ्रीज कोणतेही शुल्क न आकारता रंगवून देणे याबाबत सामनेवाले नं.1 यांनी लिखीत स्वरुपात वॉरंटी दिलेली आहे.
तक्रारदार यांच्या फ्रीजच्या दाराला खरेदी केल्यापासुन दोन वर्षांच्या आंत गंज चढू लागल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना त्याबाबत कळविले. सामनेवाले यांनी रोजी त्याबाबत तक्रारदाराकडे सामनेवाले यांचे टेक्निशियन पाठवून फ्रीजचे दार बदलून दुसरे लावून दिले. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रक्कम रु.550/- अदा केली. त्यानंतर तक्रारदार यांनी पुन्हा सन-2014 मध्ये सामनेवाले यांना सदर फ्रीजचे बदलून दिलेले दुसरे दार देखील गंजू लागल्याने त्याबाबत कळविले. सामनेवाले यांनी ता.30.08.2014 रोजी तक्रारदार यांच्या फ्रीजचे दार पुन्हा बदलून देण्याबाबत तक्रारदार यांना रु.625/- सामनेवाले यांना अदा करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सदर रक्कम रु.625/- सामनेवाले यांना अदा केली. परंतु फ्रीजच्या दाराचा गंज चढण्याचा प्रॉब्लेम वाढत असल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता.30.08.2014, ता.31.08.2014, ता.02.10.2014 व ता.11.10.2014 रोजी दुरध्वनीव्दारे संपर्क करुन सदर दार बदलून देण्याची विनंती केली. त्यानंतरही अनेकवेळा तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पत्रव्यवहार करुन सदर फ्रीजचे दार बदलून सहकार्य न केल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले नं.1 व 2 यांना ता.20.11.2014 रोजी कायदेशीर नोटीस पाठवली, त्याला सामनेवाले नं.1 यांनी उत्तर दिले. परंतु सामनेवाले नं.2 यांना कायदेशीर नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार सामनेवाले नं.1 व 2 विरुध्द दाखल केली असुन तक्रारीच्या प्रार्थना कलमांत नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडून मागण्या केल्या आहेत. सामनेवाले नं.1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी हजर होऊन कैफीयत दाखल न केल्याने त्यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश ता.30.05.2016 रोजी पारित करण्यात आले. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र दाखल केले, व लेखी युक्तीवादाची पुरसिस दाखल केली आहे.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रारंचे अवलोकन करुन तक्रारीच्या निराकरणार्थ मंचाने खालील मुदयांचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
1.सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा
दिली आहे का ?..................................................................................होय
2. तक्रारीत काय आदेश ?..............................................तक्रार अंशतःमंजुर करण्यात येते.
कारण मिमांसा
अ. तक्रारदार यांनी ता.08.03.2009 रोजी सामनेवाले नं.2 यांचेकडून वर नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले नं.1 यांनी उत्पादित केलेला फ्रीज ब्रँड-डीसी-23-सी-2 क्रॉष्टस्टील हा रक्कम रु.10,500/- या किंमतीस खरेदी केला, त्याबाबतचे इनव्हाईस क्रमांक-309980 तक्रारदार यांनी पान क्रमांक-31 वर सादर केले आहे. त्यामध्ये सामनेवाले नं.2 यांना तक्रारदार यांनी सदर फ्रीजच्या खरेदीबाबत रोख रकमेच्या स्वरुपात रु.10,500/- अदा केले असुन तक्रारदार यांना सदर फ्रीजची डिलेव्हरी ता.08.03.2009 रोजी देण्यात आल्याचे दिसुन येते. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पान क्रमांक-33 वर सदर फ्रीज बाबत सामनेवाले नं.1 यांचे वारंटी कार्ड जोडले असुन सदर वारंटी कार्डमध्ये सदर फ्रीज खरेदी केल्यापासुन सदर फ्रीजचा कोणताही भाग बिघडल्यास त्याबाबत एक वर्षाची वारंटी व फ्रीजच्या कॉम्प्रेसरबाबत 5 वर्षाची वारंटी दिल्याचे दिसुन येते. तसेच सदर फ्रीज खरेदी करतांना सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांना सदर फ्रीज बाबत “A Unique Ten Year rust Protection Plan ” दिला असुन सदर प्लॅननुसार खालील प्रमाणे नमुद करण्यात आलेले आहे.
Your New Godrej refrigerator comes with a unique 10 year rust protection plan. The body of your refrigerator is thus protected from the problems of rust. In the unlikely event that you find rust formation on any painted surface of your refrigerator within the period of 10 years from the date of purchase, we offer to make good i.e. repaint part/entire refrigerator free of cost.
तक्रारदार यांनी सदर फ्रीज खरेदी केल्यापासुन दोन वर्षाच्या आंतच सदर फ्रीजच्या दाराला गंज चढू लागल्यामुळे तक्रारदार यांनी त्याबाबत सामनेवाले यांना संपर्क करुन तक्रार केल्याने सामनेवाले यांचेतर्फे सदर फ्रीजचे दार ता.23.09.2011 रोजी बदलून देण्यात आले, त्याबाबत तक्रारदार यांना रु.550/- शुल्क अदा करावे लागले. त्यानंतर काही कालावधी लोटल्यावर पुन्हा ता.31.08.2014 रोजी तक्रारदार यांच्या फ्रीजचे दार गंजू लागल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना त्याबाबत अवगत केले, व सामनेवाले यांना सदर फ्रीजचे दार बदलून देण्यासाठी सामनेवाले यांच्या मागणी प्रमाणे तक्रारदार यांनी रक्कम रु.625/- ऐवढे शुल्क अदा केले. त्यानंतर देखील तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता.30.08.2014, ता.31.08.2014,ता.02.10.2014 व ता.11.10.2014 रोजी दुरध्वनीव्दारे संपर्क करुन तक्रारदार यांच्या फ्रीजचे दार बदलून देण्यास सांगितले, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतेही सहकार्य केलेल नाही. ता.2011.2014 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले नं.1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठवली, सदर कायदेशीर नोटीसला सामनेवाले नं.1 यांनी उत्तर दिल्याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. परंतु सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदार यांनी तक्रारीत सदर फ्रीजच्या गंजलेल्या दाराचे फोटोग्राफ्स सादर केले आहेत. सामनेवाले नं.1 यांनी ता.08.12.2014 रोजी तक्रारदार यांच्या कायदेशीर नोटीसला उत्तर देतांना तक्रारदार यांना अतिरिक्त वारंटीबाबत सदर प्लॅननुसार 10 वर्षाची वारंटी दिली असल्याचे मान्य केले आहे, व सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराच्या फ्रीजचे गंजलेले दार विनामुल्य दुरुस्त करुन व पुन्हा रंगकाम करुन देण्यास तयार असल्याचे नमुद केले आहे. परंतु तक्रारदार यांचा सदर नोटीसमध्ये नमुद केलेला क्लेम रक्कम रु.1,14,175/- देण्यास सामनेवाले नं.1 यांनी नकार दिलेला आहे.
तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीत सामनेवाले यांच्या टेक्नीशियनने ता.02.05.2009 च्या सर्व्हिस ऑर्डरप्रमाणे तक्रारदाराच्या फ्रीजचे दार दुरुस्त करणेबाबत केलेल्या कार्यवाही बाबतची व त्यापुर्वीच्या कार्यवाहीबाबतची जॉबशिट्स तक्रारीत सादर केल्या आहेत. त्या अभिलेखात उपलब्ध आहेत. यावरुन तक्रारदार यांच्या फ्रीजचे दार हे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांना दिलेल्या “A Unique Ten Year rust Protection Plan ” नुसार 10 वर्षाचे आंत गंजलेले असल्याने सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांना ते विनामुल्य दुरुस्त करुन देणे आवश्यक असुन, त्याबाबत तक्रारदार यांना दिलेल्या ता.08.12.2014 रोजीच्या तक्रारदार यांच्या कायदेशीर नोटीसला दिलेल्या उत्तरामध्ये सामनेवाले नं.1 यांनी नमुद केल्याप्रमाणे अदयापपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे दिसुन येते. तसेच सामनेवाले नं.2 यांचेकडून तक्रारदार यांनी सदर फ्रीज खरेदी केला असल्याने व सामनेवाले नं.2 यांना सदर फ्रीजच्या गंजलेल्या दाराच्या तक्रारीबाबत अनेकवेळा संपर्क करुनही सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना कोणतेही सहकार्य न केल्याने तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे दिसुन येते.
तक्रारदार यांनी तक्रारीच्या प्रार्थना कलम-14 (ए) ते 14 (ई) मध्ये नमुद केल्यानुसार सामनेवाले यांचेकडून मागण्या केल्या आहेत. त्यामधील मागणी क्रमांक-14 बी मध्ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून सदर फ्रीजच्या खरेदीची रक्कम रु.10,500/- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना परत दयावी अशी मागणी केली आहे. परंतु तक्रारदार यांच्या सदर फ्रीजबाबत कॉप्रेसरसाठी 5 वर्षांची वारंटी असुन इतर पार्ट बिघडल्यास केवळ एक वर्षाची वारंटी आहे, व तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार यांच्या फ्रीजमध्ये फ्रीजचे दार गंजण्या व्यतितरिक्त तक्रारदार यांची इतर कोणतीही तक्रार असल्याचे नमुद केलेले नाही. तसेच “A Unique Ten Year rust Protection Plan ” नुसार तक्रारदार त्यांच्या फ्रीजचे गंजलेले दार विनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास तसेच त्याचे रंगकाम करुन मिळण्यास पात्र असल्याने तक्रारदार यांची सदर फ्रीजच्या खरेदीसाठी भरलेली संपुर्ण रक्कम सामनेवाले यांनी परत दयावी याबाबतची मागणी फेटाळण्यात येते.
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या फ्रीजच्या गंजलेल्या दाराच्या दुरुस्तीबाबत सदर फ्रीज “A Unique Ten Year rust Protection Plan ” नुसार 10 वर्षाच्या वारंटीमध्ये असुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून फ्रीजच्या दाराच्या दुरुस्तीबाबत आकारलेली रक्कम रु.1,175/- चुकीच्या पध्दतीने आकारलेली असल्याने तक्रारदार यांना ती सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या परत दयावी.
तक्रारदार यांचा फ्रीज खरेदी केल्यापासुन सदर फ्रीजच्या दारास गंज येत असल्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना त्याबाबत तक्रार केल्यावर सामनेवाले यांनी “A Unique Ten Year rust Protection Plan ” सदर प्लॅननुसार तक्रारदार यांना त्यांच्या फ्रीजचे दार विनामुल्य दुरुस्त करुन न दिल्याने तक्रारदार यांना सामनेवाले यांना पत्रव्यवहार करणे, कायदेशीर नोटीस पाठविणे व फ्रीजचे दार दुरुस्त करुन मिळण्याबाबत वारंवार सामनेवाले यांचा पाठपुरावा करणे याबाबत झालेल्या मानसिक त्रासापोटी सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रक्कम रु.5,000/- आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावेत. तसेच प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात वकीलामार्फत दाखल करावी लागल्याने झालेल्या न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत तक्रारदार यांना दयावी. सदर न्यायिक खर्चाबाबतच्या रकमेत तक्रारदार यांनी मागणी केल्याप्रमाणे कायदेशीर नोटीसबाबतचा खर्चही अंर्तभुत करण्यात आलेला आहे.
वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-145/2015 सामनेवाले नं.1 व 2 यांचे विरुध्द अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाल नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांच्या सदर फ्रीज ब्रँड-डीसी-23-सी-2 क्रष्डस्टील चे
गंजलेले दार आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत विनामुल्य दुरुस्त करुन अथवा
बदलून दयावे.
4. सामनेवाले नं.1 व 2 यांनी मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- वैयक्तिक व संयुक्तीक
न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.3,000/- वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना आदेश
पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावी.
5. तक्रारदार यांच्या फ्रीज बाबत सदर फ्रीजचे इतर भाग खराब होणे, अथवा कॉम्प्रेसर खराब
होणे इत्यादिबाबत तक्रारीत उल्लेख नसल्याने व त्याबाबतची वारंटी संपलेली असल्याने
तक्रारदार यांनी सदर फ्रीजच्या खरेदीबाबत सामनेवाले यांना अदा केलेली संपुर्ण रक्कम
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना परत दयावी याबाबतची मागणी फेटाळण्यात येते.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.07.10.2016
जरवा/