निकालपत्र :- (दि.31.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी तक्रारदारांचे युक्तिवाद पूर्ण झालेनंतर लेखी युक्तिवाद दाखल केले आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला ही भागीदारी फर्म असून सामनेवाला क्र.2 व 3 हे सदर फर्मचे भागीदार आहेत. शहर कोल्हापूर येथील शिवाजी पार्क परिसरातील सि.स.नं.517/अ/1, ई वॉर्ड यावर बांधणेत आलेली ‘सुरेश शिल्प’ या अपार्टमेंट इमारतीमधील ग्राऊंड फ्लोअरवरील फ्लॅट युनिट नं.जी-1 क्षेत्र 65.74 चौ.मि. (707.36 चौ.फुट) बिल्टअप आणि 51.76 चौ.मि. खुली जागा ही मिळकत रक्कम रुपये 18,00,000/- इतक्या रक्कमेस दि.18.06.2009 रोजी खरेदी करणेबाबत तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये संचकारपत्र झाले आहे. सदर कराराप्रमाणे चेक व रोख स्वरुपात रुपये 18 लाख सामनेवाला यांना अदा केले आहेत. परंतु, सामनेवाला यांना वेळोवेळी भेटूनही सदर सदनिकेचे नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही. तसेच, याबाबत विचारणा केली असता सदरची मिळकत ही सामनेवाला यांनी ब-सत्ताप्रकारात येत असलेने त्याबाबतचा खरेदी विक्रीचा नाहरकत दाखला सक्षम अधिका-याकडून स्वखर्चाने घेवून खरेदीपत्र ताबडतोड पूर्ण करुन देतो असे सांगितले. त्यानंतर 3 महिन्यांनी सामनेवाला यांचेकडे खरेदीपत्र पूर्ण करुन देणेबाबत विचारणा केली असता सामनेवाला यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत दि.19.10.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना वकिलामार्फत नोटीस दिली. सदरची नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर फ्लॅट मिळकतीचे नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही. सामनेवाला यांच्या सेवेत त्रुटी झालेली आहे. सबब, तक्रारीत उल्लेख केलेल्या फ्लॅट युनिट नं.जी-1 चे नोंद खरेदीपत्र त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या व नाहरकत दाखले सामनेवाला यांनी स्वखर्चाने घेवून पूर्ण करुन देणेबाबत आदेश व्हावेत, तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व नोटीसचा खर्च रुपये 2,500/- व अर्जाचा खर्च देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत संचकारपत्र, सामनेवाला यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) दोन्ही बाजूंच्या वकिलांचे सविस्तर व विस्तृतपणे युक्तिवाद ऐकणेत आले. या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये फ्लॅट युनिट नं.जी-1 याबाबत नोंद संचकारपत्र झालेले आहे. तसेच, नोंद करारपत्र झालेनंतर करारत ठरलेली रक्कम रुपये 18 लाख सामनेवाला यांना तक्रारदारांनी अदा केली आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती सामनेवाला यांच्या वकिलांनी मान्य केले आहे. सामनेवाला यांच्या वकिलांनी सदर मिळकतीवर ब-सत्ताप्रकार असल्याने खरेदीपत्र करुन दिले नसल्याचे प्रतिपादन केले व सत्ताप्रकारात बदल करुन नोंद खरेदीपत्र करुन देत असल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.18.06.2009 रोजी करारपत्र झाले आहे. त्यापूर्वी सदर मिळकत विकसित करणेसाठी घेतली आहे, त्यानुसार पॉवर ऑफ अॅटॉर्नी घेतली आहे. त्यामुळे मिळकत निर्वेध व निजोखमी करुन देणेची जबाबदारी सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांची आहे. अद्याप सदरची मिळकत निर्वेध व निजोखमी करुन दिलेली नाही. करारपत्रात ठरलेली रक्कम स्विकारुनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही. सबब, सामनेवाला यांच्या सेवेत त्रुटी झाल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. तसेच, तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी दि.18.06.2009 रोजीच्या करारपत्रात उल्लेख केलेप्रमाणे फ्लॅट युनिट नं.जी-1 चे नोंद खरेदीपत्र करुन द्यावे व त्या अनुषंगाने लागणारे सर्व परवानग्या, ना-हरकत दाखले सामनेवाला यांनी स्वखर्चाने घेवून पूर्ण करुन घ्यावेत. 3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रार अर्जाचा खर्च रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |