तक्रारदार : स्वतः हजर.
सा.वाले : वकील बिमल भदाडा हजर.
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे फर्नीचर वस्तुंचे विक्रेते आहेत. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून एक कॉप्युटर टेबल किंमत रु.2,990/- दिनांक 4.6.2008 रोजी खरेदी करण्याचे ठरविले. व त्याच दिवशी तक्रारदारांनी सा.वाले यांना कॉप्युटर टेबलची किंमत रु.2,990/- अदा केले व पावती घेतली. सा.वाले यांनी तक्रारदारांना कॉप्यु.टेबल तक्रारदारांचे घरी दिनांक 6.6.2008 रोजी पोहोचते केले.
2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे कॉप्यु.टेबलची फीटींग बरोबर नव्हती. स्क्रृ घंट्ट बसविलेले नव्हते. तो टेबल स्थिर राहू शकत नव्हता. व या प्रकारे कॉप्यु.टेबलची बांधणी सदोष होती. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दूरध्वनीवर संपर्क साधला व आपली तक्रार सांगीतली. व सा.वाले यांनी त्यांचे प्रतिनिधी तक्रारदारांकडे पाठविण्याचे कबुल केले. परंतु काही कार्यवाही केली नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 11.9.2008 रोजी नोटीस दिली व कॉप्यु.टेबलची किंमत परत करण्यात यावी असे सूचविले. सा.वाले यांनी त्या नोटीसीला प्रतिसाद दिलेला नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 19.9.2008 रोजी वैयक्तिकरित्या सा.वाले यांना नोटीस बजावली तरी देखील सा.वाले यांनी कॉप्यु.टेबल मधील दोष दूर केला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये कॉप्यु.टेबलची किंमत रु.2,990/- 21 टक्के व्याजासह परत करावी. त्या व्यतिरिक्त तक्रारदारांना झालेल्या गैरसोय व मनस्तापा बद्दल रु.10,000/- नुकसान भरपाई अदा करावी अशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये कॉप्यु.टेबल हा सा.वाले यांच्या सांताक्रृझ येथील शोरुम मध्ये ठेवण्यात आलेला होता व तक्रारदारांनी तो आहे त्या परिस्थितीमध्ये पसंद केल्यामुळे तक्रारदारांचे विनंती वरुन कॉप्यु.टेबलची मुळ किंमत रु.5,990/- या मध्ये रु.3000/- ची सुट देऊन तक्रारदारांना तो कॉप्यु.टेबल रु.2,990/- रुपयास दिनांक 4.6.2008 रोजी विक्री केला. तक्रारदारांच्या विनंती वरुन कॉप्यु.टेबल दिनांक 6.6.2008 रोजी तक्रारदारांकडे पोहचता करण्यात आला. तक्रारदारांनी तपासनी करुन कॉप्यु.टेबल स्विकारला व कुठलीही तक्रार केली नाही. त्यानंतर कॉप्यु.टेबल तिन महीने वापरल्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 11.9.2008 रोजी सा.वाले यांना कॉप्यु.टेबल सदोष असल्याबद्दल पत्र दिले. त्या पत्रातील मजकूरा वरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना असे कळविले की, कॉप्यु.टेबलची कुठलीही वॉरंटी नव्हती. तरी देखील सौजंन्याचा भाग म्हणून सा.वाले यांनी आपले प्रतिनिधी यांना तक्रारदारांचे निवासस्थानी कॉप्यु.टेबल दुरुस्त करणेकामी पाठविले. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांचे प्रतिनिधीस प्रवेश दिला नाही. त्यानंतर पुन्हा एक वेळ सा.वाले यांनी आपले प्रतिनिधी यांना तक्रारदारांकडे कॉप्यु.टेबलमध्ये दोष असल्यास ते दुरुस्त करणेकामी पाठविले होते. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांचे प्रतिनिधीस प्रवेश दिला नाही. त्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 19.9.2008 रोजी सर्व घटना नमुद करुन तक्रारदारांकडे एक पत्र पाठविले व कॉप्यु.टेबल सा.वाले दुरुस्त करुन देण्यास तंयार आहेत परंतु तक्रारदारांनी प्रतिनिधी भेटीचा खर्च रु.250/- सा.वाले यांना अदा करावा अशी विनंती केली. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून आलेले पत्र स्विकारण्यास नकार दिला. सा.वाले यांनी ते पत्र रजिस्टर पोस्टाने पाठविले. या प्रकारे सा.वाले कॉप्यु.टेबलमध्ये काही दोष असल्यास तो दुरुस्त करुन देण्यास तंयार होते व सा.वाले यांनी तक्रारदारांना कॉप्यु.टेबलचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीला प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले, व पुन्हा वेगळे शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी देखील त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचा व सा.वाले यांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना सदोष कॉप्यु.टेबलची विक्री केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतलेल्या दादी मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी सा.वाले यांना कॉप्यु.टेबल टेबलची किंमत रु.2,990/- अदा केली व सा.वाले यांनी कॉप्यु.टेबल तक्रारदारांना दिनांक 6.6.2008 रोजी पोहचते केले या बद्दल वाद नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्र.8 मध्ये असे कथन केले आहे की, वादग्रस्त कॉप्यु.टेबल सा.वाले यांचे सांताक्रृझ येथील शोरुम मध्ये ठेवलेला होता व तक्रारदारांनी तिथेच टेबल पसंद केला. व तक्रारदारांचे विनंती वरुन त्यांना रु.3000/- सुट देण्यात आली व किंमत रु.2,990/- निश्चित करण्यात आली जी सा.वाले यांनी तक्रारदारांकडून स्विकारली. तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये सा.वाले यांचे कैफीयतीमधील या मुद्यावरील कथनास स्पष्टपणे नकार दिलेला नाही व असे कथन केले की, सा.वाले आपल्या ग्राहकांना सदोष वस्तु विक्री करु शकत नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीमधील परिच्छेद क्र.8 मधील घटनाक्रमास व कथनास स्पष्ट नकार दिलेला नाही. या वरुन सा.वाले यांचे कथना प्रमाणे कॉप्यु.टेबल सांताक्रृझ येथील शोरुम मध्ये ठेवण्यात आलेला होता व तिथेच तो तक्रारदारांनी पसंद केला. व तिथेच किंमत निश्चित करण्यात आली हे सिध्द होते. तक्रारदारांनी शोरुम मधून कॉप्यु.टेबल निवडला असेल तर निश्चितच तक्रारदारांनी त्याची पहाणी व तपासणी केलेली असेल व सदोष वस्तु निश्चितच तक्रारदार निवडणार नाहीत. या सर्व बाबी तक्रारदारांचे कथनास छेद देतात.
7. सा.वाले यांनी तक्रारदारांना कॉप्यु.टेबलची पोच दिनांक 6.6.2008 रोजी तक्रारदारांचे निवासस्थानी केली. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन नाही की, तक्रारदार घरी नसतांना व त्यांचे अनुपस्थितीमध्ये सा.वाले यांचे प्रतिनिधी यांनी कॉप्यु.टेबल तक्रारदारांचे निवासस्थानी पोहचते करुन निघून गेले. तक्रारदारांचे उपस्थितीमध्ये सा.वाले यांनी जर कॉप्यु.टेबल तक्रारदारांकडे पोहचते केले असेल तर निश्चितच तक्रारदारांनी त्याची तपासणी केलेली असेल व तो सदोष असता तर निश्चितच तक्रारदारांनी तो स्विकारला नसता. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे कॉप्यु.टेबल त्यांना पोहचता झाल्यानंतर त्यातील दोष तक्रारदारांना दिसून आले. व तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे प्रत्यक्ष व दूरध्वनीवर संपर्क प्रस्तापित केला. सा.वाले यांनी तक्रारदारांचे या कथनास नकार दिलेला आहे. व दिनांक 11.9.2008 पर्यत तक्रारदारांकडून कॉप्यु.टेबल बद्दल कुठलीही तक्रार प्राप्त नव्हती असे कथन केले आहे. दरम्यानचे काळात कॉप्यु.टेबल तक्रारदारांचे ताब्यात होता. तक्रारदारांनी दिनांक 11.9.2008 रोजी म्हणजे कॉप्यु.टेबलची पोच प्राप्त झाल्यानंतर तिन महिन्यानंतर सा.वाले यांना पत्र पाठविले व व्यवहार रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान तिन महिन्याचा अवधी गेलेला होता. हा सर्व घटनाक्रम तक्रारदारांचे कथनास छेद देतो.
8. तक्रारदारांनी त्यांचे पत्र दिनांक 11.9.2008 ची प्रत तक्रारीसोबत हजर केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, सा.वाले यांचे प्रतिनिधींनी पोच पावतीवर तक्रारदारांची सही खोटेपणाने घेतली व कॉप्यु.टेबलची बांधणी त्याच दिवशी केली नाही व नंतर केली. म्हणजे तक्रारदार ही बाब मान्य करतात की, कॉप्यु.टेबल सा.वाले यांनी तक्रारदारांचे उपस्थितीत त्यांचे निवासस्थानी पोहचता केला व नंतर सा.वाले यांचे
प्रतिनिधींनी त्या कॉप्यु.टेबलची जोडणी/बांधणी केली. नोटीसमध्ये असा उल्लेख नाही की, ती जोडणी/बांधणी ( Installed ) तक्रारदारांचे गैरहजेरीत केली. या वरुन कॉप्यु.टेबलची पोच तक्रारदारांचे उपस्थितीत झाली असेल, तसेच बांधणी/जोडणी तक्रारदारांचे उपस्थितीत झाली असेल तर तक्रारदारांनी त्या मधील दोष सा.वाले यांचे प्रतिनिधीस समक्ष समजावून सांगीतले असते व कॉप्यु.टेबल मधील दोष राहू शकला नसता. या वरुन तक्रारदारांची कॉप्यु.टेबल मधील दोषा संबंधीची कथने क्रृत्रीम व अविस्वसनीय स्वरुपाची आहेत असा निष्कर्ष काढावा लागतो.
9. तक्रारदार तक्रारीत असे कथन करतात की, दिनांक 11.9.2008 ची नोटीस सा.वाले यांना प्राप्त झालेली होती असे कथन केले आहे व सा.वाले यांनी ती बाब मान्य केली आहे. परंतु सा.वाले यांचे असे कथन आहे की, त्यांनी तक्रारदारांना व्यवहार रद्द होणार नाही व किंमत परत मिळणार नाही असे कळविले व सौंजन्यतेचा भाग म्हणून आपला प्रतिनिधी सा.वाले यांचेकडे कॉप्यु.टेबलचे दुरुस्तीकामी पाठविला. परंतु तक्रारदारांनी त्या प्रतिनिधीस आपले जागेमध्ये प्रवेश दिला नाही. तक्रारदारांनी आपले प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये सा.वाले यांच्या वरील कथनास नकार दिलेला आहे. सा.वाले यांनी त्यानंतर असे कथन केले आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडे दिनांक 19.9.2008 रोजी प्रतिनिधीव्दारे पत्र पाठविले व सा.वाले यांचे प्रतिनिधी टेबल दुरुस्त करुन देतील असे तक्रारदारांना कळविले. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून आलेले पत्र स्विकारले नाही. त्यानंतर सा.वाले यांनी ते पत्र पोस्टाव्दारे पाठविले व तक्रारादारांना ते मिळाले. सा.वाले यांनी त्यांनी पाठविलेल्या दिनांक 19.9.2008 च्या पत्राची प्रत कैफीयत सोबत दाखल केलेली आहे. त्यामध्ये कॉप्यु.टेबल तक्रारदारांनी शोरुम मधून खरेदी केला होता व त्या टेबलची काही वॉरंटी नव्हती. व तक्रारदारांचे वापरामुळे त्यामध्ये दोष निर्माण झाले असे सा.वाले यांनी कथन केले. त्या पत्रात सा.वाले यांनी असेही कथन केले की, सा.वाले यांचे सुतार तक्रारदारांकडे आले होते परंतु तक्रारदारांनी दुरुस्तीकामी त्यांना प्रवेश दिला नाही. हे पत्र पोस्टाव्दारे पाठविल्या बद्दलची पावतीची प्रत सा.वाले यांनी कैफीयती सोबत दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी तोंडी युक्तीवादाचे दरम्यान इंडीया पोस्टचे प्रमाणपत्र हजर केले. त्यामध्ये सा.वाले यांनी पाठविलेले 22.9.2008 सा.वाले यांना परत करण्यात आलेले आहे असे प्रमाणपत्र आहे. या वरुन असे दिसते की, सा.वाले यांनी पाठविलेले दिनांक 19.8.2009 चे पत्र तक्रारदारांनी स्विकारलेले नाही. त्यामुळे पोस्टाने ते पत्र परत सा.वाले यांचेकडे पाठविले. त्या पत्रातील कथने सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देतात.
10. येवढेच नव्हेतर सा.वाले हयांचे प्रतिनिधी श्री.अमित लखानी यांनी मंचा समक्ष दिनांक 18.10.2010 रोजी असे निवेदन केले की, सा.वाले हे त्यांचे प्रतिनिधी तक्रारदारांकडे पाठवून कॉप्यु.टेबलची पहाणी करतील. सा.वाले यांचे निवेदन प्रकरणाचा दिनांक 18.10.2010 च्या रोजनाम्यामध्ये नमुद करण्यात आले आहे. सा.वाले यांचे रोजनाम्यामध्ये नमुद केलेले वरील कथन सा.वाले यांचे कैफीयतीमधील कथनास पुष्टी देते.
11. वरील पुराव्या वरुन असे दिसते की, मुळातच तक्रारदारांनी शोरुम मध्ये पहाणी करुन टेबल निवडला तरी देखील त्यामध्ये काही दोष असल्यास सा.वाले आपले प्रतिनिधी मार्फत कॉप्यु.टेबलची दुरुस्ती करुन देण्यास तंयार होते. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांचे प्रतिनिधीस प्रवेश दिला नाही व टेबलची पहाणी करु दिली नाही. कारण तक्रारदारांना मुळची रक्कम व्याजासह परत पाहिजे होती.
12. तक्रारदारांनी कॉप्यु.टेबल सदोष असल्याबद्दल टेबलची तपासणी करुन अन्य व्यक्तीचे अथवा तज्ञाचे शपथपत्र दाखल केलेले नाही. तक्रारदारांनी आपल्या मित्राचे किंवा नातेवाईकांचे देखील शपथपत्र दाखल केलेले नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(2) प्रमाणे ही बाब आवश्यक आहे.
13. एकूणच तक्रारदारांचे वर्तन अप्रमाणिक पणाचे व असमजस्याचे दिसते. तक्रारदारांचा सा.वाले यांचेकडून रक्कम परत पाहिजे हा आग्रह अवास्तव व अप्रमाणिकपणाचा दिसतो. एकूणच तक्रारदार सा.वाले यांचे सेवेमधील त्रृटी सिध्द करु शकले नाहीत. सबब सा.वाले यांचेकडून कुठलीही दाद मिळण्यास पात्र नाहीत.
14. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 123/2009 रद्द करण्यात येते.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 30/05/2013