मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या. - आदेश - (पारित दिनांक – 20/06/2011) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार कंपनी ही ससे पालन करण्याकरीता व मागणीनुसार विक्री करणारी नोंदणीकृत कंपनी असून, तक्रारकर्तीनी सन 2008 मध्ये त्यांचेशी संपर्क साधून, ससे पालन प्रशिक्षण घेण्याकरीता रु.3,530/- दि.13.08.2008 रोजी गैरअर्जदारांना अदा केले. गैरअर्जदारांनी दि.05.09.2008 रोजी हॉटेल हरदेव, नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले. परंतू तक्रारकर्तीला दिलेल्या प्रमाणपत्रावर सदर प्रशिक्षण हे बेळगाव कर्नाटक येथे देण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. तसेच 16.12.2008 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रावर सदर प्रशिक्षण हे मुंबई येथे देण्यात आलेले आहे असे नमूद आहे. तक्रारकर्तीने ससे खरेदी करण्याची तयारी दर्शविली असता तिला मुंबईला बोलाविण्यात आले व 19.11.2008 रोजी करारनामा करुन दोन युनिट ससे (चार नर व चार मादी) चे तक्रारकर्तीस कोटेशन दिले, त्याप्रमाणे विक्री संदर्भात रु.25,000/- घेऊन 45 दिवसाचे आत 2 युनिट ससे देण्याचे ठरले. सदर रक्कम दिल्याबाबत गैरअर्जदारांनी पावतीही तक्रारकर्तीला दिली. परंतू 24.12.2008 रोजी रक्कम जमा करुनही अद्यापपर्यंत तक्रारकर्तीला 2 युनिट ससे पाठविण्यात आले नाही किंवा रक्कमही परत केलेली नाही. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार कंपनीने रक्कम स्विकारुन कराराप्रमाणे ससे न पुरविल्याने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे, म्हणून तिने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, ससे खरेदी करण्याकरीता दिलेले रु.25,000/-, प्रशिक्षणाकरीता दिलेले रु.3,530/- व करारनाम्याकरीता लागलेला खर्च हा व्याजासह मिळावा, शारिरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्तीने तक्रारीचे पुष्टयर्थ प्रमाणपत्राची प्रत, करारनामा, कोटेशन व बँकेची आणि पोच पावती दाखल केलेली आहे. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता त्यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.19.05.2011 ला पारित केला. 3. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.09.06.2011 रोजी आल्यानंतर मंचाने तक्रारकर्तीचा युक्तीवाद तिच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तऐवज यांची छाननी केली असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्रावरील तक्रार व सोबत असलेले प्रमाणपत्र (नि.क्र.2) व करारनामा (नि.क्र.3) यांचे अवलोकन केले असता प्रामुख्याने ही बाब निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने स्वयंरोजगाराकरीता ससे पालनाचे प्रशिक्षण घेतले होते व त्या संदर्भाने 2 युनिट ससे (चार नर, चार मादी) खरेदी करण्याकरीता गैरअर्जदार कंपनीला रु.25,000/- ही दि.24.12.2008 ला दिल्याचे बँकेच्या पावतीवरुन स्पष्ट होते. परंतू खरेदीबाबत करारनामा करुन 2 युनिट ससे यांचा मोबदला घेऊनही गैरअर्जदार कंपनीने तक्रारकर्तीला दोन युनिट ससे आश्वासित केल्याप्रमाणे पुरविलेले नाही आणि हीच गैरअर्जदार कंपनीच्या सेवेतील त्रुटी होय असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदारांनी मंचासमोर येऊन तक्रारकर्तीची तक्रार ही दस्तऐवजासह आपले म्हणणे दाखल करुन नाकारलेली नसल्याने, तक्रारकर्तीची शपथपत्रावर आणि दस्तऐवजासह असलेल्या तक्रारीत तथ्य असल्याबाबत निर्णयाप्रत हे मंच येते. तक्रारकर्तीने स्वयंरोजगाराकरीता प्रशिक्षण हे रु.3,530/- शुल्क देऊन घेतलेले आहे. तक्रारकर्तीने सदर शुल्क परत मिळण्याची मागणी केलेली आहे. मंचाचे मते गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला ससे पालनाचे प्रशिक्षण दिलेले आहे व ते पूर्ण केल्याबाबत प्रमाणपत्रही अदा केलेले असल्याने तक्रारकर्तीची सदर मागणी ही रास्त वाटत नाही. परंतु गैरअर्जदारांनी सदरचे प्रशिक्षण नागपूर येथे दिल्याचे सदर प्रमाणपत्रात नमुद करावयास हवे होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीकडून ससे विकत घेण्याकरीता रु.25,000/- ही रक्कम स्विकारुन तक्रारकर्तीस 2 युनिट ससे दिले नाही ही गैरअर्जदारांची कृती सेवेतील कमतरता आहे व त्यामुळे तक्रारकर्तीच्या नुकसान भरपाईस गैरअर्जदार जबाबदार आहे, असे या मंचाचे मत आहे. सबब आदेश. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला रु.25,000/- ही रक्कम दि.24.12.2008 पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाईदाखल रु.5,000/- द्यावे व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे. 4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |