द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले ही मालकी हक्क स्वरुपातील इमारत बांधकाम व्यावसायिक संस्था आहे. तक्रारदार हे मुलुंड मुंबई येथील रहिवासी आहेत. सामनेवाले यांनी विकसित करावयाच्या मान्य केलेल्या प्रकल्पातील खोली तक्रारदारांनी विकत घेण्याचा व्यवहार सामनेवाले यांचेशी केल्यानंतर सामनेवाले यांनी खोलीचे बांधकाम करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात देवून विविध आकाराच्या खोल्यांचे बांधकाम प्रायोजित केले होते व सदर जाहीरातीनुसार खोलीची किंमत किफायतशीर वाटल्याने तक्रारदारांनी 350 चौ.फुट क्षेत्रफळाची खोली रु. 3.50 लाख इतक्या किमतीस विकत घेण्याचा व्यवहार सामनेवाले यांचेबरोबर दि. 11/06/2013 रोजी केला व दि. 11/06/2013 ते दि. 23/03/2014 पर्यंत तक्रारदारांनी सामनेवाले यांना रु. 1,18,750/- दिले. यानंतर एप्रिल 2014 मध्ये तक्रारदारांनी प्रत्यक्ष जागेवर भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम आढळले नाही. यानंतर सामनेवाले यांचेकडे विक्री करारनामा करण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही शिवाय बांधकामही केले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन, खोली विक्रीचा करारनामा करुन मिळावा, सामनेवाले यांना दिलेल्या रु. 1,18750/- या रकमेवर 21% व्याज मिळावे, नुकसान भरपाई रु. 1 लाख व तक्रार खर्च रु. 25,000/- मिळावा, अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना पाठविलेली तक्रारीची नोटिस, ‘अपुरा पत्ता’ या पोस्टल शे-यासह मंचामध्ये परत आल्याने, सामनेवाले यांना हजर राहणेसाठी जाहीर नोटिस देण्यात आली. तथापी, सामनेवाले यांना बरीच संधी देवुनही ते सुनावणीस गैरहजर राहिल्याने तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र दाखल केले. लेखी युक्तिवादाची पुरसिस दिली. तक्रारदाराच्या वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र यांचे वाचन मंचाने केले त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) सामनवाले यांनी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केलेल्या जाहीरातीनुसार विविध आकाराच्या किफायतशिर किंमतीच्या खोल्या बांधण्याचा प्रकल्प नेवाळी नाका, कल्याण येथे हाती घेतल्याचे जाहीर केल्यानंतर तक्रारदारांनी दि. 11/06/2013 रोजी रु. 5,000/- सामनेवाले यांना देवून 350 चौ.फु क्षेत्रफळाची खोली रु. 3.50 लाख किमतीस विकत घेण्याचा व्यवहार केला. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 11/06/2013 ते दि. 23/03/2014 दरम्यान रु. 1,18,750/- इतकी रक्कम दिल्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
पावती क्र. | तारीख | रक्कम |
24 | 11/06/2013 | 5,000/- |
24 | 07/07/2013 | 50,000/- |
24 | 28/07/2013 | 25,000/- |
24 | 02/02/2014 | 15,000/- |
24 | 02/02/2014 | 3,750/- |
24 | 23/03/2014 | 20,000/- |
| | 1,18,750/- |
उपरोक्त रक्कम स्वीकारल्याप्रीत्यार्थ सामनेवाले यांनी पावत्या दिल्या असुन तक्रारदारानी त्या आपल्या कथनाच्या पृष्टयार्थ दाखल केल्या आहेत.
क) तक्रारदाराच्या कथनानुसार त्यांनी एप्रिल 2014 मध्ये प्रत्यक्ष बांधकाम जागेवर भेट दिली असता त्यांना तेथे कोणतेही बांधकाम आढळुन आले नाही. त्यामुळे त्यांनी सामनेवाले यांची अनेकवेळा भेट घेवुन करारनामा करण्याबद्दल तसेच, खोलीचा ताबा देणयाची मागणी केली परंतु सामनेवाले यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही व अनेकवेळा मागणी करुनही खोली विक्री करारनामा करुन दिला नाही.
ड) सामनेवाले यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात देवून प्रायोजित बांधकामाचे आकर्षक प्रलोभन दिल्याचा पुरावा अभिलेखावर आहे. त्यानुसार, सामनेवाले यांनी तक्रारदाराशी खोली विक्रीचा व्यवहार करुन, तक्रारदाराकडुन त्यापोटी स्वीकालेल्या रकमांचा पुरावा तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केला आहे. त्यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन खोलीच्या किंमतीपैकी 35% पेक्षा जास्त रक्कम स्वीकारुनही, त्यांनी तक्रारदाराशी सदनिका विक्री करारनामा केला नाही. तसेच खोलीचे बांधकाम केले नाही, याबाबी तक्रारदारांनी सादर केलेल्या पुराव्यावरुन व तक्रारीमधील कथनानुसार स्पष्ट होतात.
5. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 834/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विकलेल्या खोली संदर्भात त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विकलेल्या खोलीचा नोंदणीकृत करारनामा दि. 15/12/2016 पुर्वी करुन द्यावा.
4. सामनेवाले यांनी विवादीत खोलीचे बांधकाम, जाहीर केलेल्या संपुर्ण सोयी सुविधांसह दि. 31/12/2016 पुर्वी पुर्ण करावे व खोलीचे बांधकाम तपासण्याची मुभा तक्रारदारांना द्यावी.
5. सामनेवाले यांनी खोलीचे बांधकाम जाहीर केलेल्या सोयीसुविधांप्रमाणे केलेले असल्यास, खोलीची उर्वरित किंमत रु. 2,31,250/- (अक्षरी रु. दोन लाख एकतीस हजार दोनशे पंन्नास फक्त) तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि.31/01/2017 रोजी द्यावी व त्याचदिवशी व त्याचवेळी खोलीचा सुस्थितीतील ताबा सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावा.
6. तक्रारदारांना सदर खोलीचा ताबा देणे शक्य होत नसल्यास, सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रक्कम रु. 1,18,750/- दि.01/04/2014 पासून 12% व्याजासह दि. 31/12/2016 पुर्वी तक्रारदारांना परत करावी. सदर आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि.01/04/2014 पासून 15% व्याजासह संपुर्ण रक्कम तक्रारदारांना द्यावी.
7. तक्रारदारांना झालेल्या शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रु.25,000/- (अक्षरी रु. पंचवीस हजार फक्त) व तक्रार खर्चाबद्दल रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 31/12/2016 पुर्वी द्यावेत. सदर रक्कम नमुद कालावधीमध्ये न दिल्यास दि. 01/01/2017 पासून आदेशपुर्ती होईपर्यंत 6% व्याजासह संपुर्ण रक्कम अदा करावी.
8.आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.