तक्रारदार ः- स्वतः
सामनेवाले ः- एकतर्फा.
(युक्तीवादाच्या वेळेस)
न्यायनिर्णय - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
न्यायनिर्णय
(दि. 22/01/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या व्यायाम शाळेकरीता सदस्य म्हणून नोंदणी केली होती व वार्षीक सदस्यता फि साठी रू. 23,186/-,भरले होते. परंतू, सामनेवाले यांनी त्यांची शाखा मध्येच बंद केल्यामूळे, परताव्याच्या रकमेवरून वाद निर्माण झाल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली. सामनेवाले यांना नोटीस दि. 14/03/2017 ला प्राप्त झाली. त्याबाबत संचिकेमध्ये ट्रॅक रिपोर्ट दाखल आहे. परंतू सामनेवाले हे मंचात उपस्थित न झाल्यामूळे व लेखीकैफियत दाखल न केल्यामूळे त्यांचे विरूध्द दि. 16/05/2017 ला एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
2. तक्रारदारानी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र सादर केले व निवेदन केले की, त्यांना लेखीयुक्तीवाद सादर करावयाचा नाही. तक्रारदार यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
3. तक्रारदारानी तक्रारीसोबत रू.18,000/-,व रू. 5,186/-,भरल्याबाबत पावत्या सादर केल्या आहेत. तसेच, सामनेवाले यांना परताव्याबाबत दिलेले पत्र सुध्दा दाखल आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रू.12,629/-,परत केले आहे. परंतू, तक्रारदार यांचेनूसार सहा महिन्याची फि रू. 18,000/-,आहे व त्यांना कमीतकमी रू. 18,000/-,परत करणे आवश्यक आहे. तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून रू. 23,186/-, 15 टक्के व्याजासह मागणी केली आहे. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे.
4. तक्रारदार यांनी त्यांचे दि. 22/11/2016 चे पत्र दाखल केले आहे. त्या पत्रावर सामनेवाले यांचा शेरा आहे की, ते प्रस्तापित व्यवहाराप्रमाणे रक्कम परत करतील. आमच्या मते ही समरी ट्रॉयल असल्यामूळे सामनेवाले यांनी परत केलेली रक्कम ढोबळमानाने व सामान्यपणे बरोबर व योग्य आहे काय ? ते पाहणे आवश्यक आहे. तक्रारदारानी 12 महिन्याकरीता रू. 23,186/-,भरले होते व याप्रमाणे दरमहा रू. 1,932/-,अशी रक्कम निश्चित होते. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या व्यायाम शाळेचा उपयोग साडे चार महिने केलेला आहे. तेव्हा या दरानी साडे चार महिन्याची रक्कम रू. 8,694/-, होते. हि रककम एकुण रकमेतुन वजा केल्यास उर्वरीत रक्कम रू. 14,492/-,होते. आमच्या मते तक्रारदार या रकमेस पात्र आहेत. परंतू, सामनेवाले यांनी त्यांना रू. 12,629/-,फक्त अदा केले. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रू. 1,863/-,परत करणे आवश्यक आहे.
5. तक्रारदार यांनी पूर्ण फी ची मागणी केली आहे. आमच्या मते तक्रारदारानी सामनेवाले यांच्या सेवेचा साडे चार महिने उपभोग घेतल्यामूळे त्यांची ही मागणी अवाजवी वाटते.
6. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
- तक्रार क्र 58/2017 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी सेवेमध्ये कसुर केला व अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली असे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांना रू. 1,863/-,(एक हजार आठशे त्रेसष्ठ) दि. 28/02/2018 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/03/2018 पासून द.सा.द.शे 15 टक्के व्याज लागु राहील.
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चाकामी रू. 1,000/-(एक हजार) दि. 28/02/2018 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/03/2018 पासून द.सा.द.शे 15 टक्के व्याज लागु राहील.
- तक्रारदारांच्या मंजूर न झालेल्या मागणया फेटाळण्यात येतात.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-