(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 05 ऑगष्ट 2016)
1. तक्रारकर्ता क्र.1 ते 3 यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. विरुध्दपक्ष हे मेसर्स, डी.टी.एन.एन.बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय करीत असून श्री नलिनी मोहन पाराशर हे या संस्थेचे संचालक आहे. सर्व तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांनी बांधलेल्या बहुमजली सदनिकेत ज्याचे नांव हॅबीटेट हंसराज या नावाच्या ईमारतीत सर्व तक्रारदारांनी तेथील सदनिका राहण्यासाठी खरेदी केलेल्या आहेत. तसेच सर्व तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांना सन 2008 मध्ये खरेदीखत नोंदवून सदनिकेचा ताबा दिलेला आहे. तक्रारदार पुढे असे नमूद करतो की, सर्व तक्रारदारांना राहण्याकरीता गैरसोय असल्या कारणास्तव सदनिकेचे संपूर्ण बांधकाम होण्यापूर्वीच तक्रारदारांना ताबा देण्यात आला व विरुध्दपक्ष यांनी सर्व तक्रारदारांना ताबा देतांना आश्वासन देण्यात आले की, राहिलेले अपूर्ण बांधकाम पूर्ण करुन देण्यात येईल. विरुध्दपक्ष यांनी खरेदीखत नोंदवितांना व ताबा देतांना, विरुध्दपक्ष यांचेवर विश्वास ठेवून त्यांच्या अभिवचनाला समजून ताबा घेतला व राहण्यास सुरुवात केली. विरुध्दपक्ष यांना तक्रारदारांनी त्यानंतर वेळोवळी उर्वरीत बांधकाम पूर्ण करण्याकरीता व तसेच निकृष्ठ दर्जाचे बांधकाम दुरुस्त करण्याकरीता विनवणी केली, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष दाखविले. तसेच तक्रारदारांनी दुरुस्ती करण्याकरीता लागणारा खर्च देण्याचे कबूल केले, परंतु विरुध्दपक्षाने उर्वरीत बांधकाम पूर्ण केले नाही, तसेच निकृष्ठ दर्जाचे बांधकाम दुरुस्त केले नाही.
3. तक्रारदारांनी पुढे असे नमूद केले आहे की, सदनिकाधारक व तक्रारदार यांनी दिनांक 29.11.2009 रोजी सार्वनजनिक बैठकीकरीता विरुध्दपक्ष यांना बैठकीत बोलाविले, परंतु त्याला सुध्दा विरुध्दपक्ष उपस्थित राहिले नाही. याप्रकारे 3-4 बैठकी अयोजीत केल्या, परंतु विरुध्दपक्ष त्याला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सरते शेवटी सदनिकाधारक व तक्रारदार यांनी दिनांक 8.12.2008 रोजी विरुध्दपक्ष यांना कायदेशिर नोटीस पाठविली व त्यामध्ये सदनिकेचे अपूर्ण बांधकाम व गैरसोयी नमूद केल्या, त्यात प्रामुख्याने सदरकेच्या ईमारतीच्या भिंतीस तडे गेलेले आहेत त्यामुळे नुकसान होऊ शकते, ईमारतीमध्ये संपूर्ण संडास बाथरुम व पाईपलाईनला गळती असल्याने त्यामुळे होणा-या रोगट वातावरणामुळे ईमारतीतील व्यक्तींचे जीवन ञासदायक झाले, ईमारतीमध्ये पिण्याचे पाण्याकरीता असलेल्या टाकीवर झाकण नसल्यामुळे विविध आजाराला तोंड द्यावे लागते, आग विझविण्याकरीता वेगळ्या पाण्याची टाकी छतावर बसविण्यात आली नाही व तसेच पार्कींग मध्ये तळात नेहमी पाणी साचुन राहात असल्यामुळे फ्लोरींगला तळे गेलेले आहे, गडरचे चेंबरला झाकण नसल्यामुळे बरेचदा राहणा-या लोकांच्या वाहनाला इजा पोहचलेल्या आहे त्याकरीता रुपये 50,000/- चे नुकसान झाले, ईमारतीत विद्युत ट्रान्सफरमरला योगय कुंपण नसल्याने कोणताही अपघात होऊ शकतो, ईमारतीचे मुख्यव्दार रंगविहीन असल्याने ते गंजलेले आहे, ईमारतीतील विहिरीचे बांधकाम व त्याला ग्रिलचे झाकण नसल्यामुळे स्वच्छता होत नाही, ईमारतीत तळ मजल्यावर संडास बाथरुमची सोय नाही, ईमारतीत जीआय पाईप निकृष्ठ दर्जाचे वापरलेले आहे, तसेच बेसमेंटमध्ये साचलेले पाणी बाहेर फेकण्याकरीता कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे ईमारतीचे बांधकामास धोका होऊन ईमारत लवकरच पडण्याची शक्यता आहे. याप्रमाणे अनेक ञुट्या विरुध्दपक्षाकडून झालेल्या असून तक्रारदार यांनी आपल्या कायदेशिर नोटीसमध्ये नमूद केलेल्या असून विरुध्दपक्षाला कायदेशिर नोटीस प्राप्त होऊन सुध्दा त्यांनी सदनिकेच्या निकृष्ठ दर्जाचे बांधकामाची सुधारणा केली नाही, तसेच राहिलेले बांधकामाची पुर्तता सुध्दा पूर्णपणे केलेली नाही. पुढे तक्रारकर्ता असे नमूद करतो की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना विहित मुदतीत सदनिका राहण्यायोग्य सुस्थितीत बांधून दिलेली नसल्याने त्याने त्याच्या व्यवसायात अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला व उर्वरीत बांधकाम पूर्ण न करुन सेवेत ञुटी केली आहे. त्यामुळे सरते शेवटी तक्रारदारांनी सदरची तक्रार मंचामध्ये दाखल करुन खालील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना विहित मुदतीत सदनिका राहण्यायोग्य संपूर्ण सोयीनिशी ताब्यात न दिल्याने तसेच दिलेली सदनिकेमध्ये तक्रारीतील नमूद दोष अस्तित्वात असल्याने व विरुध्दपक्षाने सदर दोष तक्रारकर्त्याच्या विनंतीनुसार काढून न दिल्याने त्याने त्याच्या व्यवसायात अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला व ञुटी केलेली आहे असे घोषित करावे.
2) तसेच विरुध्दपक्षाने सदनिकेतील दोष स्वखर्चाने काढून द्यावे तसेच तक्रारकर्त्याच्या सदरनिका निवासी योग्य व सुरक्षित करुन द्याव्यात व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने स्वतः सदनिका दुरुस्ती हेतू केलेला खर्च विरुध्दपक्षाकडून देण्याचा आदेशीत व्हावे.
3) विरुध्दपक्ष यांनी सेवेत ञुटी केल्याने तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये 50,000/- द्यावे व तक्रार खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
4. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. मंचाची नोटीस पाठवून व नोटीस मिळून सुध्दा विरुध्दपक्ष मंचात उपस्थित झाले नाही, तसेच पोष्टाव्दारे पाठविण्यात आलेली नोटीस मंचाला परत आली नाही, त्यामुळे मंचाने कलम 28(3) प्रमाणे बजावलेली नोटीस ही परत न आल्यामुळे कायद्याप्रमाणे गृहीत धरुन विरुध्दपक्षाचे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 15.1.2014 ला निशाणी क्र.1 वर पारीत केला. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी बरोबर 1 ते 6 प्रमाणे दस्ताऐवज दाखल केलेले असून त्यात प्रामुख्याने तक्रारकर्ता 1 ते 3 याचे खरेदीखत, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना पाठविलेली नोटीस व पोष्टाची पोचपावती व विरुध्दपक्ष यांनी नोटीसला पाठविलेले उत्तर इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेले आहे. अभिलेखावरील दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक होतात काय ? : होय.
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रादार यांचेप्रती अनुचित व्यापार : होय.
पध्दतीचा अवलंब केला आहे काय व सेवेत ञुटी दिली
आहे काय ?
- निष्कर्ष –
5. तक्रारकर्त्याची तक्रार ही विरुध्दपक्ष यांनी बांधून व विक्री करुन दिलेल्या सदनिकेत निकृष्ठ दर्जाचे बांधकाम व ताबा देतेवेळी उर्वरीत असलेले बांधकाम पूर्ण करुन दिले नाही, याबाबतची तक्रार आहे. तक्रारदारांना आपल्या तक्रारीतील परिच्छेद क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या ञुटी बाबत परिच्छेद क्रमांक 5 मध्ये ‘अ’ पासून ‘ल’ पर्यंत असलेल्या ञुटी व सेवेतील कमतरतेबाबत नमूद केलेले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्दपक्ष यांना नोटीस बजावून ती नोटीस परत न आल्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 28(3) प्रमाणे सदर प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले व विरुध्दपक्ष यांनी आपली बाजु प्रकणात मांडली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार विरुध्दपक्षाने ईमारतीतील उर्वरीत बांधकाम व तसेच दोषपूर्ण सेवा याची पुर्तता करुन द्यावे, असे मंचाचे मत आहे. करीता तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्षाला आदेश देण्यात येते की, तक्रारदारांना विक्री केलेल्या सदनिकेतील राहिलेले उर्वरीत बांधकाम व ञुटी स्वखर्चाने पूर्ण करुन द्यावेत.
(3) तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी प्रत्येकी रुपये 15,000/- व तक्रार खर्च म्हणून प्रत्येकी रुपये 5,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 05/08/2016