तक्रारदार : गैर हजर.
सा.वाले क्र.1व 2 : एकतर्फा.
सामनेवाले 3 : गैर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री. स. व. कलाल , सदस्य, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. श्री. आशिष प्रकाश साळुंखे (यापुढे तक्रारदार असा उल्लेख केला आहे.) रा. अब्दुल रहीम चाळ, नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्चिम) मुंबई 400 086 यांनी मे. क्रोमा लिमिटेड (यापुढे सा.वाले क्र.1 असा उल्लेख केला आहे.) व मे. इन्फीनिटी रिटेल लि., (यापुढे सा.वाले क्र.2 असा उल्लेख केला आहे.) आणि मे. एसर इंडिया प्रा.लि. (यापुढे सा.वाले क्र.3 असा उल्लेख केला आहे.) यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या सबबी खाली ग्राहक मंचापुढे तक्रार दाखल केलेली आहे.
2. सा.वाले क्र.1 यांची एल.बी.एस.मार्ग, घाटकोपर (पश्चिम) येथे व्यवसायाची जागा आहे व अधेरी (पूर्व) येथे नोंदणीकृत कार्यालय आहे. तर सा.वाले क्र.2 यांची व्यवसायाची जागा एल.बी.एस.मार्ग, घाटकोपर(पश्चिम), येथे असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय मरोळ, अंधेरी (पूर्व) येथे आहे. सा.वाले क्र.3 यांचे अधेरी (पूर्व) मुंबई 69 येथे शाखा कार्यालय असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय बेंगलोर येथे आहे. सा.वाले क्र. 1 व 2 यांच्या व्यवसायाची जागा एकाच ठिकाणी असून सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे प्रसिध्द क्रोमा नावाचा वापर इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री वाढण्यासाठी करीता असतात. तक्रारीचे वर्णण थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
3. तक्रारदार यांनी दिनांक 28.07.2011 रोजी सा.वाले क्र.1 व सा.वाले क्र.2 यांचे घाटकोपर (पश्चिम) येथील दुकानामधुन एसर कंपनीचा लॅपटॉप रु.29,238/- इतक्या किंमतीस खरेदी केला. खरेदी बिल क्रमांक SLF 02A035020019586 दिनांक 28.07.2011 अशी आहे.
4. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना दाखविलेल्या लॅपटॉपच्या प्रात्यक्षीका नुसार व किंमतीचा विचार करुन त्यांनी एसर कंपनीचा लॅपटॉप घेण्याचे ठरविले. परंतु त्यांना प्रात्यक्षीक दाखविण्यात आलेल्या लॅपटॉपचा साठा दुकानात उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षीक पाहीलेला एसर कंपनीचा लॅपटॉप घेण्याचे ठरविले. सदर लॅपटॉप पुढे काही दिवसानंतर व्यवस्थित चालत नसल्यामुळे तक्रारदाराने सा.वाले क्र. 3 यांचेकडे दिनांक 24.12.2011 रोजी तक्रार केली. तक्रार क्रमांक 122411-739 सदर तक्रार नोंदविताना लॅपटॉपचा अनुक्रमांक LXR 4301020048673B 71601 नमुद करण्यात आला. त्यानंतर सा.वाले क्र.3 यांचेकडे तक्रार नोंदविल्या बाबतचा संगणीकृत अहवालाची प्रत घेतली असता त्यावर तक्रारदारास ग्राहकाचे नांव या ठिकाणी श्री. नितीन या अन्य त्रयस्त व्यक्तीचे नांव दिसून आले. सदर अहवालातील इतर सर्व बाबी हया अचुक दिसून आल्या. यावरुन तक्रारदारांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी खरेदी केलेला लॅपटॉप हा पूर्वी अन्य व्यक्तीस विक्री झाला होता या बाबत तक्रारदाराने सा.वाले क्र.3 यांचेकडे चौकशी केली असता विवादीत लॅपटॉप हा पूर्वीच श्री नितीन या व्यक्तीस विकण्यात आला होता व सदर व्यक्तीने सा.वाले क्र.3 यांचेकडे लॅपटॉप बाबत दिनांक 23.5.2011 रोजी तक्रार नोंदविली होती. तक्रार क्रमांक 051411-576 या तक्रारीचा अहवाल परिशिष्ट E प्रमाणे आहे. त्यानुसार पूर्वीच्या ग्राहकास लॅपटॉप बदलून देण्याबाबत निर्णय झालेला होता व सदर विवादीत लॅपटॉप दुरुस्त करुन सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास विक्री केल्याचे तक्रारदाराने कथन केले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सदर बाब ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व ग्राहकाची फसवणूक या सदरात मोडते. म्हणून तक्रारदारांनी सा.वाले क्र.1,2 व 3 यांना ई-मेलव्दारे संपर्क करुन लॅपटॉप बदलून देण्याची विनंती केली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदाराच्या विनंतीची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारदारांनी मंचासमोर ग्राहक संरक्षण कायद्या अंर्तगत तक्रार दाखल करुन तक्रारदाराने सा.वाले क्र. 1 व 2 यांचे कडून नविन लॅपटापॅ बदलून मिळावा, तसेच मानसिक त्रासापोटी रु.2 लाख मिळावेत व तक्रारीच्या खर्चापोटी रु.20,000/- ची मागणी केलेली आहे.
5. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत लॅपटॉप खरेदीचे बिल, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व सा.वाले क्र. 1,2 व 3 यांचेकडे ई-मेलव्दारे केलेल्या पत्र व्यवहारांच्या प्रती सादर केलेल्या आहेत.
6. या उलट सा.वाले क्र. 1 व 2 यांना नोटीसची बजावणी होऊन देखील ते मंचासमोर हजर झाले नाहीत. म्हणून त्यांचे विरुध्द दिनांक 28.10.2013 रोजी एकतर्फा आदेशासाठी प्रकरण नेमण्यात आले होते. परंतू सा.वाले क्र.1 व 2 आज अखेर पर्यत मंचासमोर हजर झाले नाहीत. म्हणून मंच त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
7. सा.वाले क्र.3 यांनी आपली कैफीयत व पुरावा शपथपत्र दाखल केलेले आहे. सा.वाले क्र.3 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची तक्रार खोटी व लबाडपणाची आहे. तक्रारदार हे सा.वाले यांचे कडून पैसे लुबाडण्याचे हेतुने मंचासमोर आलेले आहेत. सा.वाले क्र.3 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने तक्रारीमध्ये सा.वाले क्र.3 यांचे विरुध्द कोणतेही आरोप केलेले नाहीत. तसेच तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेला लॅपटॉप सा.वाले क्र.3 यांनी सा.वाले क्र. 1 व 2 यांचेकडे किरकोळ विक्रीसाठी पाठविला ही बाब सा.वाले क्र.3 मान्य करतात. सा.वाले क्र.3 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने लॅपटॉप विकत घेतल्यानंतर त्यामध्ये 149 दिवसापर्यत कुठलीही तक्रार नव्हती. त्यानंतर दिनांक 24.12.2012 रोजी सा.वाले क्र.3 यांच्याकडे प्रथमच तक्रारदारांकडून तक्रार प्राप्त झाली. सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारास लॅपटॉपचा तक्रार क्र.122411-739 दिनांक 24.12.2011 नुसार ग्राहकाचे नांव अन्य त्रयस्त व्यक्तीचे आहे ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सा.वाले क्र.3 यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला ही बाब सा.वाले क्र.3 यांना मान्य नाही. सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.3 यांचे अधिकृत सेवा पुरवठादार आहेत. सा.वाले क्र. 3 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची तक्रार मुख्यत्वेकरुन सा.वाले क्र.1 यांचे विरुध्द आहे. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारीत नमुद केलेला लॅपटॉप दोन वेगवेगळया ग्राहकांना विकला या बाबतची कोणतीही माहिती सा.वाले क्र.3 यांचेकडे नाही. म्हणून सा.वाले क्र.1 यांच्या कृतीस सा.वाले क्र.3 हे जबाबदार नाहीत. त्यामुळे तक्रारदारास सा.वाले क्र.3 यांचेकडून दोषयुक्त लॅपटॉप मिळाला हा आरोप निराधार व पूर्णपणे चुकीचा आहे.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. युक्तीवादाचेकामी तक्रारदार व सा.वाले क्र.3 हे गैरहजर राहील्याने मंचाने अभिलेखाचे अवलोकन करुन तक्रारीचे निकालाकामी खालील मुद्दे कायम केले.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले क्र.1,2 व 3 यांनी तक्रारदार यांना लॅपटॉपच्या दुरुस्ती व विक्री संबंधी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला ही बाब तक्रारदार सिंध्द करतात काय ? | होय. अशतः |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | होय. अशतः |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः- तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 व 2 यांचे कडून एसर कंपनीचा लॅपटॉप रु.29,238/- इतक्या किंमतीस खरेदी केला. खरेदी बिल क्रमांक SLF 02A035020019586 दिनांक 28.07.2011 अशी आहे. ही बाब उभय पक्षकारांना मान्य आहे. सा.वाले क्र.3 हे लॅपटॉपचे मुळ उत्पादक आहेत ही बाब उभय पक्षकारांना मान्य आहे.
9. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सा.वाले क्र. 1 व 2 यांनी त्यांना वापरलेला व जुना लॅपटॉप विक्री केला व त्यासाठी नविन लॅपटॉपची किंमत घेतली ही बाब अनुचित व्यापारी प्रथेमध्ये मोडते. यासाठी तक्रारदारांनी लॅपटॉप खरेदीची बिल सादर केले आहे व तक्रारदारांचा लॅपटॉप वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झाल्यामुळे त्यांनी सा.वाले क्र.3 यांचेकडे तक्रार नोंदविली असता त्यांना सा.वाले क्र.3 यांचेकडेन संगणकीकृत तक्रार अहवालाची प्रत मिळाली. त्यानुसार सदरचा लॅपटॉप हा तक्रारदारांनी खरेदी करण्यापूर्वी श्री. नितीन या नांवाचे व्यक्तीने वापरलेला होता व सदर व्यक्तीने देखील दिनांक 14.5.2011 रेाजी लॅपटॉपच्या दुरुस्ती बाबत सा.वाले क्र.3 यांचेकडे तक्रार नोंदविली होती. तक्रार प्रकरण क्र. एसर OL-051411-576 सदर तक्रारीच्या संगणीकीकृत अहवालानुसार सदर लॅपटॉप बदलून देण्याबाबतचा निकाल नमुद केलेला आहे. सदर अहवालावरुन असे दिसते की, तक्रारदाराने दिनांक 28.7.2011 रोजी सा.वाले क्र.1 व 2 यांचे कडून लॅपटॉप खरेदी केला, परंतु त्यापूर्वी तोच लॅपटॉप श्री. नितीन या नावाच्या व्यक्तीने वापरेला असून त्याच्या दोष दुरुस्ती बाबतची तक्रार दिनांक 14.05.2011 रोजी सा.वाले क्र 3 यांच्याकडे नोंदविण्यात आलेली आह. या वरुन तक्रारदार यांनी खरेदी केलेला लॅपटॉप हा जुना आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे. या बाबत सा.वाले क्र. 1 व 2 यांना नोटीसची बजावणी होऊन देखील ते मंचासमोर हजर झालेले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सा.वाले क्र. 1 व 2 यांचे विरुध्द प्रतिकुल निष्कर्ष ( Adverse Inference ) काढण्या व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय मंचासमोर उपलब्ध नाही.
10. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार त्यांना सा.वाले क्र.1 व 2 यांचेकडून जुना लॅपटॉप मिळाल्या बद्दलचे आरोप हे केवळ सा.वाले क्र. 1 व 2 यांचे विरुध्द आहेत. सा.वाले क्र.3 हे जरी लॅपटॉपचे मुळ उत्पादक असेले तरी त्याचे विक्रेते सा.वाले क्र. 1 व 2 हे आहेत. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास लॅपटॉपची विक्री करताना जी काही प्रथा अवलंबविली त्यामध्ये सा.वाले क्र.3 यांची कोणतीही भुमिका व सहभाग नाही. त्यामुळे सा.वाले क्र. 1 व 2 यांच्या कृतीस सा.वाले क्र.3 यांना जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे मत झाले आहे.
11. वरील परिच्छेद क्र.9 व 10 लक्षात घेता सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांस जुना लॅपटॉप विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष मंच काढत आहे.
12. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 32/2012 ही अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना लॅपटॉपच्या विक्री संबंधी
सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब केला असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी एकत्रित किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदार
यांचा लॅपटॉप पूर्णपणे 10 दिवसात बदलून द्यावा तसे न केल्यास
तक्रारदारांस लॅपटॉप खरेदीची किंमत रु.29,238/- व त्यावर तक्रार
दाखल दिनांकापासून रक्कम वसुल होईपर्यत 10 टक्के व्याजासह
रक्कम परत करावी असा आदेश मंच पारीत करीत आहे.
4. सा.वाले क्र.1 व 2 यांनी एकत्रित किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदारांना
मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रु.2,000/- अदा करावेत असे आदेश पारीत करण्यात
येतात.
5. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी सदर आदेशाची पुर्तता/नापुर्तता करणेबाबत शपथपत्र दाखल करणेकामी नेमण्यात येते दिनांक 15.02.2015
6. सा.वाले क्र.3 यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही.
7. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 06/01/2015