तक्रारदार : यांचे वकील श्री.एस.एच.पाटील हजर.
सामनेवाले : यांचे वकील श्रीमती सपना भुपतानी हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारदार हे बँकिंग कंपनी आहे. तर सा.वाली ही कुरीयर व्यवसाय करणारी कंपनी आहे. तक्रारदार बँकेने त्यांचे खातेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी यांचेकरीता 11 पोस्टल ऑर्डर ज्याची एकूण किंमत रु.1,08,000/- अशी होती. हया सा.वाले यांचेकडे बर्कलेज बँक लंडन, यांचेकडे सुपुर्द करणेकामी दिल्या. त्याबद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 3.6.2006 रोजी बिल दिले. तक्रारदारांनी सुपुर्द केलेले 11 पोस्टल ऑर्डरचे पाकीट बर्कलेज बँक लंडन, यांचेकडे सुपुर्द केले नाही. त्यानंतर बर्कलेज बँक लंडन, तक्रारदार व सा.वाले याचे दरम्यान पत्र व्यवहार झाला व असे निष्पन्न झाले की, सा.वाले यांच्या निष्काळजीपणामुळे ते पाकीट गहाळ झाले व बर्कलेज बँक लंडन, यांना प्राप्त झाले नाही. परीणामतः तक्रारदारांना बर्कलेज बँक लंडन, यांचे मार्फत पोस्टल ऑर्डरची रक्कम रु.1,08,000/- प्राप्त होऊ शकली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले यांनी तक्रारदारांना पोस्ट ऑर्डर रवानगी संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला व सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई बद्दल मूळ रक्कम रुपये 1,08,000/- त्यावर 17.5 टक्के व्याज व नुकसान भरपाई रु.5 लाख सा.वाले यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी दाद मागीतली.
2. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये तक्रारदारांना एअरवे बिल अदा दिले गेले होते हे मान्य केले.म्हणजेच पोस्टल ऑर्डरचे पाकीट तक्रारदारांकडून वितरीत करणेकामी प्राप्त झाले होते ही बाब मान्य केली. तथापी तक्रारदारांनी त्या संबंधात संपूर्ण माहिती दिली नसल्याने चौकशी होऊ शकली नाही असे कथन केले.
3. सा.वाले यांनी असेही कथन केले की, एअरवे बिलातील तरतुदीप्रमाणे तक्रारदार हे जास्तीत जास्त 100 यु.एस.डॉलर येवढी रक्कम प्राप्त करण्यास पात्र आहेत असेही कथन केले. सा.वाले यांनी तक्रारदारांना पाकीट वितरीत करण्याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदारांनी आपले तक्रारीसोबत एअरवे बिलाची प्रत तसेच पत्र व्यवहाराच्या प्रती हजर केल्या. सा.वाले यांनी देखील आवश्यक कागदपत्रे आपल्या कैफीयतीसोबत हजर केली. तक्रारदारांनी त्यांचे अधिकारी श्री.दिनेशकुमार शर्मा यांचे पुरावयाचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.सोईबखान यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी न्याय निर्णयाच्या प्रती हजर केल्या. दोन्ही बाजुंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांकडुन प्राप्त केलेले पाकीट बर्कलेज बँक लंडन, यांना सुपुर्द केलें नसल्याने सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही.,100 यु.एस.डॉलर.अधिक व्याज व खर्च. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे बर्कलेज बँक लंडन, यांना सुपुर्द करणेकामी एक पाकीट दिले हेाते. व त्याबद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना एअरवे बिल दिले होते. तक्रारदारांनी या बद्दल आवश्यक ते शुल्क सा.वाले यांना अदा केले हेाते. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कुठेही कथन केले नाही की, त्यांनी तक्रारदारांकडून प्राप्त केलेले पाकीट बर्कलेज बँक लंडन, यांना कराराप्रमाणे सुपुर्द केले. सा.वाले असे म्हणतात की, तक्रारदारांकडून आवश्यक ती माहिती प्राप्त न झाल्याने सा.वाले तक्रारदारांना त्या पाकीटाचे संदर्भात पूर्ण माहिती देवू शकले नाहीत. सा.वाले यांनी तक्रारदारांकडून दिनांक 3.6.2006 रोजी पाकीट स्विकारल्यानंतर व तक्रारदारांना एअरवे बिल दिल्यानंतर त्या बिला बद्दलची चौकशी करणे ही जबाबदारी सा.वाले यांची होती. तथापी सा.वाले तक्रारदारांनी पूर्ण माहिती दिली नाही असे कथन करतात. मुळ एअरवे बिलाची सत्यप्रत सा.वाले यांनी हजर केलेली आहे. त्यातील तपशिलाप्रमाणे सा.वाले चौकशी करु शकले असते. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांवर उलट आरोप केला. सा.वाले यांनी तक्रारदारांना सुपुर्द केलेले पाकीट बर्कलेज बँक लंडन, यांना सुपुर्द केले नाही ही बाब तक्रारदारांचे शपथपत्र तसेच सा.वाले यांची कैफीयत या वरुन सिध्द होते. सा.वाले यांनी कराराप्रमाणे बर्कलेज बँक लंडन, यांना पाकीट सुपुर्द केलेले नसल्याने कुरीयर सेवेच्या संदर्भात तक्रारदार यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते.
7. तक्ररदारांनी सा.वाले यांचे मार्फत जे कागदपत्र पाठविले होते त्याव्दारे बर्कलेज बँक लंडन, यांचे मार्फत तक्रारदारांचे खातेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी यांना रु.1,08,000/- प्राप्त होणार होते. परंतु सा.वाले यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदारांचे खातेदारांना ती रक्कम प्राप्त होऊ शकली नाही. त्यानंतर तक्रारदारांचे खातेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी यांनी सा.वाले यांचेकडे रु.1,08,000/- व त्यावर व्याज अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली. या प्रमाणे तक्रारदारांचे खातेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी यांचे नुकसान झाले. तक्रारदार बँकेने खातेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी यांना सेवा सुविधा पुरविण्याचे कबुल केल्याने सा.वाले यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदारांना त्यांचे खातेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी यांचे आरोपांना सामोरे जावे लागले. व नुकसान भरपाईची मागणीस तोंड द्यावे लागले. याप्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना संतबाबा नरेंद्रसिंगजी यांचे कागदपत्र बर्कलेज बँक लंडन, यांना सुपुर्द करणेकामी कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते.
8. तक्रारदारांनी त्यांचे खातेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी यांना बर्कलेज बँक लंडन, यांचे मार्फत प्राप्त होणारी रक्कम रु.1,08,000/- व त्यावर व्याज अशी नुकसान भरपाईची मागणी केली. या संदर्भात सा.वाले यांचे असे कथन आहे की, कुरीयरच्या बिलावरील शर्ती व अटी प्रमाणे सा.वाले तक्रारदारांना जास्तीत जास्त 100 यु.एस.डॉलर नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. तक्रारदारांनी कुरीयर बिलाची समोरील बाजुची प्रत हजर केलेली आहे परंतु सा.वाले यांनी दोन्ही बाजू असलेली कुरीयर बिलाची स्थळप्रत हजर केलेली आहे. त्या बिलावरील मागील बाजुस छापलेल्या शर्ती व अटी प्रमाणे असे दिसून येते की, शर्ती व अटीच्या कलम 6 प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जास्तीत जास्त 100 यु.एस.डॉलर अशी ठरली होती. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जे पाकीट सुपुर्द केले हेाते त्या पाकीटावर आतमधील कागदपत्रांची माहिती नमुद केलेली नव्हती. तसेच कागदपत्रांचा विमाही काढलेला नव्हता. या परिस्थितीमध्ये सर्वसाधारण कागदपत्र किंवा वस्तुंकरीता देय असलेली नुकसान भरपाई कुरीयर बिलामधील शर्ती व अटी प्रमाणे देय होईल. वर नमुद केल्याप्रमाणे कुरीयर बिलाचे शर्ती व अटी मधील कलम 6 प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जास्तीत जास्त 100 यु.एस.डॉलर अथवा वस्तुच्या वजनाचे किलोग्राम प्रमाणे राहील. प्रस्तुतचे प्रकरणात सा.वाले यांनी सुपुर्द करावयाचे पाकीट हे केवळ कागदपत्र असल्याने किलोग्राम दराचे ऐवजी जास्तीत जास्त 100 यु.एस.डॉलर ही रक्कम नुकसान भरपाईदाखल देय होईल.
9. वरील निष्कर्षास मा.राष्ट्रीय आयोगाचे डीएचएल वर्डवाईड एक्सप्रेस कुरीयर डिव्हीजन ऑफ एअरफ्राईट लिमिटेड विरुध्द भारती निटींग अपील क्रमांक 317/1993 निकाल दिनांक 17 जानेवारी,1996 1875(NS) या प्रकरणातील निकालपत्राप्रमाणे पुष्टी मिळते. त्या प्रकरणात देखील मुळचे सा.वाले ही, डी.एच.एल. कुरीयर कंपनी होती जी प्रस्तुतचे प्रकरणात देखील सा.वाली आहे. त्या प्रकरणात देखील प्रस्तुत प्रकरणाप्रमाणे सा.वाले कंपनीने कागदपत्र हरवले होते. मा.राज्य आयोगाने नुकसान भरपाई रक्कम 4,29,392/- सा.वाले कुरीयर कंपनीने तक्रारदार यांना अदा करावी असा आदेश दिला होता. तथापी मा.राष्ट्रीय आयोगाने कुरीयरचे बिलामध्ये कलम 5 व 7 यांचा विचार करुन नुकसान भरपाईची रक्कम कराराप्रमाणे जास्तीत जास्त 100 यु.एस.डॉलर राहू शकते असा निष्कर्ष नोंदविला. प्रस्तुतचे प्रकरणातील कुरीयर बिलामधील कलम क्र.6 हे त्या प्रकरणातील कुरीयर बिलाचे कलम 5 शी मिळते जुळते आहे. या प्रमाणे भारतीनिटींग या प्रकरणातील न्यायनिर्णय प्रस्तुत प्रकरणास लागू होतो.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 264/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना कुरीयर सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा
पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल 100 यु.एस.डॉलर म्हणजे आजच्या दराने रु.5,233/-ही रक्कम अदा करावी. या व्यतिरिक्त त्या रक्कमेवर दिनांक 3.6.2006 पासून 18 टक्के दराने व्याज द्यावे. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तक्ररीचे खर्चाबद्दल रु.10,000/- अदा करावेत.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.