1. विरूध्द पक्ष क्र.1 हे विरूध्द पक्ष क्र.2 यांचे चंद्रपूर येथील अधिकृत मोबाईल विक्रेता आहेत. तक्रारकर्त्याने स्वतःच्या शैक्षणीक वापराकरीता दि. 28.04.2016 रोजी वि.प. क्र. 1 यांचेकडून मॉडेल नं.ईबी-90S55 ईसीएन पॅनासॉनिक एल्युगा आयकॉन हा मोबाईल रु. 11,000/- ला विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतांनाच त्या मोबाईलच्या डब्याचे कव्हर हे पाणी लागल्याने खराब झालेले असल्याने तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांना सदर मॉडेलचा दुसरा मोबाईल देण्याची विनंती केली होती, परंतु वि.प.क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास सदर मोबाईलमध्ये कोणतीही नादुरूस्ती येणार नाही व आल्यांस वि.प.क्र.1 हे स्वतः मोबाईलची जबाबदारी घेतील असे आश्वासीत केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांचेवर विश्वास ठेवून सदर मोबाईल विकत घेतला. परंतु सदर मोबाईल, व्यवस्थीतरीत्या चालू नसून विकत घेण्यापूर्वीपासूनच त्यामध्ये बिघाड आलेला होता. सदर मोबाईल हा चालू होत नसल्याने तक्रारकर्त्याने वि.प. क्र.1 यांचेकडे मे,2016 मध्ये तक्रार केली तेव्हा दि.1.6.2016 रोजी वि.प. क्र.1 यांचे मेकॅनीकने तक्रारकर्त्याला सांगितले की सदर मोबाईलमधील बिघाड हा दुरूस्त करण्यासारखा नाही व झाला तरीही तो पुर्णपणे दुरूस्त होणार नाही.याव्यतिरीक्त काहीही सांगितले नाही व तरीपण वि.प. क्र.1 यांनी उपरोक्त मोबाईल दि.13.6.2016 पर्यंत दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करून पाहण्यासाठी स्वतःजवळ ठेवून घेतला. त.क.ने वि.प. क्र.1 यांना, त्यांनी सदर मोबाईल खरेदी करतेवेळी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली असता ते म्हणाले की आम्ही कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नाही व वॉरंटी ही कंपनीने दिलेली आहे, आम्ही नाही. त्यामुळे आम्ही जबाबदार नाही. वि.प. क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास सुव्यवस्थीत चालु मोबाईल देणे व त्यामध्ये बिघाड निर्माण झाल्यांस दुरूस्त करून देणे आवश्यक आहे. परंतु तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करूनही वि.प. क्र.1 ने उपरोक्त मोबाईल दुरूस्त करून दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे शैक्षणीक नुकसान झाले तसेच शारिरीक व मानसीक त्रास झाला. तक्रारकर्त्याने दि.2.12.2016 रोजी विरूध्द पक्षांना नोटीस दिली परंतु वि.प. नी त्याची पुर्तता न करून तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिल्याने तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, तक्रारकर्त्याला वि.प.नी दिलेली सेवा ही न्युनतापूर्ण व अनुचीत व्यापार पध्दती असल्याचे घोषीत करावे तसेच उपरोक्त वर्णन केलेला तक्रारकर्त्याचा मोबाईल बदलवून नवीन निर्दोष मोबाईल वि.प. यांनी द्यावा किंवा मोबाईल किंमत रक्कम रु. 11,000/- तक्रारकर्त्यास परत करावी व तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 35,000/- आणी तक्रारखर्च रू.10,000/- वि.प. नी तक्रारकर्त्यांस द्यावा अशी विनंती केली आहे. 3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. क्र. 1 यांना नि.क्र.8 नुसार मंचाची नोटीस प्राप्त होवूनही ते प्रकरणात हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध मंचाने नि.क्र.1 वर दि.09.08.2018 रोजी एकतर्फा आदेश पारित केले. वि.प. क्र. 2 यांनी तक्रारीत हजर होवून आपले लेखी कथन इंग्रजी भाषेतून दाखल केले व त्याची प्रत तक्रारकर्त्याचे वकीलांना मिळाली. त्यानंतर वि.प. क्र. 2 यांनी मराठीतून लेखी म्हणणे दाखल करण्याची परवानगी मागीतली, परंतु पुरेशी संधी देवूनही त्यांनी मराठीतील लेखी कथन दाखल केले नाही. वि.प. क्र. 2 यांनी इंग्रजी भाषेतून दाखल केलेल्या लेखी कथनामध्ये तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबूल करून नमूद केले की तक्रारकर्त्याने दिनांक 24.4.2016 रोजी वि.प. क्र.1कडून मोबाईल खरेदी केला तसेच तक्रारकर्त्याने दिनांक 1.6.2016 रोजी सर्व्हिस सेंटरला भेट देऊन सदर मोबाईलमध्ये (पॉवर नसल्याचे) बंद असल्याबाबत तक्रार केली. त्यानंतर सर्व्हिस सेंटरने सदर मोबाईलचे निरीक्षण / तपासणी केली असता तक्रारकर्त्याने चुकीच्या पध्दतीने मोबाइ्ल हाताळल्याने त्याची दुरूस्ती ही हमी (वॉरंटी) मध्ये येत नाही असे तक्रारकर्त्यास सांगून सदर मोबाईलच्या दुरूस्तीकरीता येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक सांगितले, परंतु तक्रारकर्त्याने सदर मोबाईलच्या दुरूस्तीचा खर्च देण्यास नकार दिल्याने मोबाईल दुरूस्ती न करताच तक्रारकर्त्यास परत दिला. त्यानंतर तक्रारकर्ता वि.प.कडे न येता त्याने मंचासमक्ष चुकीची व वाईट हेतूने स्वतःची चुक असतांनासुध्दा सदर तक्रार वि.प.विरूध्द दाखल केली. तक्रारकर्ता हा दिनांक 18.4.2016 रोजी वि.प. क्र.1कडे गेला होता हे वि.प. क्र.2 यांना माहिती नाही. सदर मोबाईलमध्ये कोणताही दोष नाही. सदर तक्रार दाखल करण्यांस कोणतेही कारण घडले नाही. तक्रारकर्ता हा तक्रारीतील प्रार्थनेप्रमाणे कोणतीही दाद मिळण्यांस पात्र नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 4. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, शपथपत्र, व वि.प. क्र. 2 यांनी इंग्रजी भाषेतून दाखल केलेले लेखी म्हणणे, तसेच तक्रारकर्ता यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हा वि.प.क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय 2. वि.प. क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या सेवेत कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? नाही 3. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 6. वि. प. क्र. 2 हि मोबाईल मार्केटींग कंपनी असून विरुद्ध पक्ष क. 1 हे वि.प.क्र.2 चे अधिकृत मोबाईल विक्रेता आहेत. तक्रारकर्त्याने स्वतःच्या शैक्षणीक वापराकरीता दि. 28.04.2016 रोजी वि.प. क्र. 1 यांचेकडून मॉडेल नं.ईबी-90S55 ईसीएन पॅनासॉनिक एल्युगा आयकॉन हा मोबाईल रु. 11,000/- ला विकत घेतला. यासंदर्भात तक्रारकर्त्याने नि.क्र.5 वर दस्त क्र.1 मोबाईल खरेदी केल्याचे बिल दाखल केले आहे. यावरून तक्रारकर्ता हा वि.प.क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- तक्रारकर्त्याने तक्रारीत कथन केले आहे की, तक्रारकर्त्याने स्वतःच्या दि. 28.04.2016 रोजी वि.प. क्र. 1 यांचेकडून सदर मोबाईल विकत घेतला, पण सदर मोबाईल संच, दुरूस्त व सुरळीतरीत्या चालू असलेला मोबाईल संच नसून त्यात विकत घेण्यापूर्वीपासूनच बिघाड होता. तक्रारकर्त्याने तक्रारीत पुढे असेही कथन केले आहे की, मे,2016 मध्ये सदर मोबाईल संच चालू होत नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथनांमध्ये विरोधाभास आहे. सदर मोबाईलमध्ये दिनांक 28.4.2016 रोजी विकत घेतेवेळीच दोष होता की मे, 2016 मध्ये म्हणजेच त्यानंतर तो निर्माण झाला हे निश्चीत नाही. सदर मोबाईलमध्ये दिनांक 28.4.2016 रोजी विकत घेतेवेळीच दोष होता व तो दुरूस्त करण्यायोग्य नाही, हे तक्रारकर्त्याने कोणताही पुरावा, वा अहवाल दाखल करून सिध्द केलेले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिलेली नाही हे सिध्द होते. सबब प्रस्तूत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क. 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 3 बाबत :- 7. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतिम आदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 185/2017 खारीज करण्यात येते. 2. उभय पक्षांनी आपआपला तक्रारखर्च सोसावा. 3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. |