::: नि का ल प ञ::: (मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 18/12/2019) |
|
१. अर्जदार हा वरील पत्त्यावर राहतो. गैरअर्जदार क्रमांक एक हि फायनान्स कंपनी असून गैरअर्जदार क्रमांक 3 ची मुख्य शाखा आहे व त्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक ३ मार्फत अर्जदारशी संपर्क साधून अर्जदारा च्या वाहनावर लोन मंजूर करून त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदार ने आयशर ट्रक 10.55 मॉडेल खरेदी केला गैरअर्जदाराने ७,५०,०००/- मंजूर केले,व अर्जदाराने 1,25,000/- जमा केली त्यानुसार हायर परचेस करारची अंमलबजावणी अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक एक यांच्यामध्ये ब्रांच ऑफिस चंद्रपूर येथे एग्रीमेंट नंबर xvpcdroooo1033593 दिनांक 31. 8 .2013 मधेय झाली.व त्यानुसार अर्जदाराने रुपये २१,८३३/-चे एकूण 45 व्याजासह देण्याचे मान्य केले व अर्जदाराने सर्व आवश्यक तसेच कोऱ्या कागदांवर सह्या गैरअर्जदार 1 व 3 च्या मागणीप्रमाणे केल्या. त्यानंतर अर्जदाराने २१,८३३/- रुपये दरमहा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे भरले. परंतु मार्केट ची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे ट्रान्सपोर्टचा काम जास्त मिळत नसल्याने काही किस्तीची रक्कम अर्जदारावर शिल्लक आहे व दिनांक ३० एप्रिल २०१५ पर्यंत अर्जदाराने ३,२६,१६४ /-रुपय गैरअर्जदार क्रमांक एक कडे जमा केलेले आहे इतकेच नाही तर एप्रिल 2015 पर्यंत अर्जदाराने ३,९२,९२४/-रुपये पैकी ३,२६,१६४/- कडे जमा केलेले आहे परंतु दिनांक एप्रिल 2015 मध्ये गैरअर्जदार ने अर्जदाराला नोटीस पाठवून लोनची परतफेड केली नसून अर्जदाराने ६,९४,४५१/- गैरअर्जदाराकडे भरायचे आहे व नोटीसची अंमलबजावणी न झाल्यास कर्जाची उर्वरित रक्कम चार टक्के प्रतिमहा व्याजदराने कर्जाची रक्कम देय वसुली करता फौजदारी कारवाई करू असे अर्जदाराला धमकावले त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारशी संपर्क साधून किस्तीची रक्कम भरतो असे आश्वासन दिले परंतु गैरअर्जदार क्रमांक एक है ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने कोणतीही पूर्वसूचना न देता अर्जदाराचे वाहन ट्रान्सपोर्ट च्या कामासाठी नागपूरला पाठवलेले असताना वाहन जप्त केले, जप्तीची कारवाई करताना पत्र काही दाखवले नाही व विद्यमान न्यायालयाच्या निदर्शनास चे पालन केले नाही अर्जदाराने गैरअर्जदाराच्या चंद्रपूर येथील कार्यालयात अनेकदा भेट देऊन विनंती केली परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराच्या विनंती कडे लक्ष दिले नाही. त्यानंतर फरवरी 2016 मध्ये गैरअर्जदाराने एक पत्र पाठवून त्यात कळविले की गैरअर्जदाराने वाहन कर्ज घेतलेले वाहन दिनांक 13. 1. 2016 रोजी विक्री केल्याचे कळवीले व वाहन विक्री करूनही ६,७७,००२/-अर्जदारावर शिल्लक राहत असून सात दिवसात परतफेड न केल्यास कारवाईची धमकी दिली तसेच अर्जदाराचे नाव हे डिफॉल्टर म्हणून क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो या कारवाईमध्ये समाविष्ट करण्याचे धमकावले. अर्जदार गैरअर्जदारा विरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत असताना अचानक गैरअर्जदार क्रमांक दोन चे नोटीस केस क्रमांक sp९७३/१५ चोलामंडलम इन्वेस्टमेंट फायनान्स विरुद्ध मोहम्मद सादिक अब्दुल जलील मध्ये दिनांक१९.०१.२०१६ रोजी हजर राहणे संबंधित प्राप्त झाले व कळले की श्री. सूचीत पलांडे आर्बीट्रेटर असून त्यांच्यासमोर अर्जदाराची केस चालू आहे व त्यात वरील करारनामा संबंधी अर्जदाराकडे ७,७७,१५५/- थकबाकी दाखवली अर्जदाराने त्याबाबत दिनांक २०.०१.२०१६ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवला परंतु मधल्या काळात अर्जदाराला दिनांक ११.०२.२०१६ रोजी नोटीस पाठवून सूचित केले की अर्जदाराची गाडी विकली असून त्यात विकल्यानंतर सुद्धा ६,७७,००२/- येणे बाकी आहे परंतु अर्जदाराची गाडी नऊ लाख रुपयाची गाडी फक्त दीड वर्षात २,११,४००/- किंमत येऊ शकत नाही. सबब गैर अर्जदाराने अर्जदाराची फसवेगिरी केलेली आहे व अधिकची रक्कम मिळवण्याकरिता खोटी माहिती अर्जदारास पुरवली. अर्जदाराने गैरअर्जदार विरुद्ध कलम ९ आर्बीट्रेटर व काँसिलिएशन अॅक्ट अंतर्गत माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टात MCA नो. ४२/१६ चालू असून विद्यमान जिल्हा न्यायाधीशांनी केस क्रमांक sp ९७३/१५ पुढे न चालविण्याकरिता स्थगिती दिलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सोबत झालेल्या कराराचे उल्लंघन करून अर्जदाराची गाडीची विक्री केलेली असून अधिक रक्कम लाटण्याच्या तयारीत दीड वर्ष जुनी गाडी सूचना न देता विकली. सबब अर्जदाराला मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला सबब हे गैर अर्जदाराने बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे सदर तक्रर अर्जदाराने दाखल केलेली आहे.
२. अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदारस गैरअर्जदाराचे अनुचित व्यापार प्रकारामुळे तसेच दोषपूर्ण सेवेमुळे सहन कराव्या लागलेल्या मानसिक शारीरिक त्रासापोटी गैरअर्जदाराने अर्जदारास रुपये २,००,०००/- भरपाई तसेच गैर अर्जदाराने अर्जदाराला फायनान्सचा वसुलीबाबत कोणतीही कारवाई करू नये व अर्जदाराला पैसे मागून त्रास देऊ नये तसेच अर्जदाराच्या वरील वाहन करार करीत असताना अर्जदाराकडून कोऱ्या कागदांवर सह्या केलेले धनादेश अर्जदारास परत करण्याबाबतचे आदेश गैरअर्जदार विरुद्ध पारित करण्यात यावे तसेच तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/-गैरअर्जदार यांच्यावर लादण्यात यावा.
३. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आले त्याप्रमाणे यांनी उपस्थित राहून तक्रारीतील म्हणणे खोडून काढत प्राथमिक आक्षेप दाखल केला की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक एक ते तीन विरुद्ध दाखल केलेली तक्रार ही खोटी बनावट असून मुद्याला अनुसरून नाही.. अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम दोन मध्ये आणि ग्राहक या व्याखेत मोडत नाही सदर वाहन वाणिज्य वापराकरिता चालवून त्यातून अर्जदार भरपूर नफा मिळवत होते अर्जदाराचे हे वाहन त्यांच्या उपजीविकेचे साधन नाही कारण अर्जदाराने कर्ज प्राप्तीसाठी गैरअर्जदार आकडे अर्ज केला तेव्हा त्या अर्जात कर्ज मिळण्यापूर्वी अर्जदाराचा धंदा व्यापार लिहिलेला आहे त्यामुळे अर्जदाराकडे या वाहनाने व्यतिरिक्त इतर व्यवसाय आहे. तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये कर्जाचा करारनामा झाला त्यात अर्जदाराने अटी वाचून सह्या केलेल्या होत्या तसेच त्यांच्यात जर कोणताही वाद निर्माण झाल्यास सदर तक्रार ही अरबीटेशन मध्ये दाखल करण्याची तरतूद आहे त्याप्रमाणे अर्जदाराने वरील तक्रार आर्बिटर कडे दाखल करणे आवश्यक होते परंतु तसे न केल्यामुळे दाखल तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही तसेच अर्जदाराने गैरअर्जदार कडून आयशर ट्रक खरेदी करिता रुपये ७,५५,०००/- कर्जाची मागणी केली अर्जदाराने अर्जदाराच गरज लक्षात घेता कर्ज मंजूर केले व अर्जदाराने वाहन खरेदी केले. त्याकरिता अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात कर्जाचा करारनामा लिहिण्यात आला व गैरअर्जदाराने अर्जदारास कर्जाच्या परतफेड करता ठरवले व त्याप्रमाणे अर्जदारास गैरअर्जदारकडे एकूण ४५ हप्त्यांमध्ये रुपये २१,८३३/- प्रमाणे किस्त जमा करायचे होते परंतु अर्जदार सुरुवातीपासूनच नियमित कर्जाचे हप्ते जमा करीत नव्हते करिता गैरअर्जदाराने अर्जदारास नोटीस पाठवून कर्जाच्या रकमेची परतफेडीचे मागणी केली अर्जदाराने त्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही शेवटी अर्जदार विरुद्ध आर्बीट्रेटर नियुक्त करून दिनांक ११.०२.२०१६ रोजी नोटीस पाठविण्यात आला त्या आधी सुद्धा अर्जदाराचे कर्जाची परतफेड करीत नसल्यामुळे करारनाम्यातील अटी शर्ती प्रमाणे २४.१०.२०१५ रोजी पोलीस स्टेशन कामठी नागपूर यांना लेखी सूचना देऊन नाईलाजास्तव अर्जदाराचे वाहन जप्ती करावे लागले व त्यानंतर सुद्धा सूचना देऊनही कर्जाची रक्कम परत न केल्यामुळे दिनांक ४.११.२०१५ रोजी रजिस्टर पोस्टाने पाठवला व त्यामध्ये रकमेची मागणी केली तेव्हा सुद्धा त्यांच्या सूचनापत्र कडे लक्ष दिले नाही त्यानंतर करारनाम्यातील अटी व शर्ती प्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन विक्री केले व विक्रीतून आलेली रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा केले व उर्वरित रक्कम ही दिनांक ११.०२.२०१६ रोजी नोटीस पाठवून मागणी केली सदर नोटीस मिळूनही अर्जदाराने उर्वरित रकमेची परतफेड न करता उलट गैरअर्जदार व बनावटी स्वरूपाची कारवाई दाखल केली सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावे.
४. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार १ ते ३ चे लेखी म्हणणे, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
कारण मिमांसा
5. गैरअर्जदार क्र..१ फायनान्स कंपनीचे मुख्य कार्यालय तर गैरअर्जदारक्र.२ हे त्यांचे चंद्रपूर येथील शाखा कार्यालय असून अर्जदारने स्वतःचे उपजिविकेकरीता आयशर ट्रक खरेदी करण्याकरीता गैरअर्जदारक्र.३ च्या चंद्रपूर येथे असलेल्या शाखा कार्यालय, गैरअर्जदारक्र.१ तर्फे रू ७,५०,०००/- कर्ज घेतले. सदर कर्जाबाबत दोन्ही पक्षांमध्ये करार झाला. सदर करारनामा गैर अर्जदाराना देखील मान्य असल्याने अर्जदार हा विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. कर्जाबाबत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारातील तरतुदींनुसार कर्जासंबंधीचा वाद हा लवादामा्र्फत सोडवून घेण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे मंचास सदर वाद चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही असा आक्षेप गैरअर्जदारनी घेतलेला आहे. परंतु त्यांचे हे म्हणणे ग्राहय धरण्यायोग्य नाही कारण ग्राहक संरक्षण कायदा,१९८६ हा कायदा इतर कायद्यांना पुरक कायदा असून त्यातील कलम ३ नुसार ग्राहक वादाचे निवारणासाठी अतिरीक्त यंत्रणा उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे. त्यामुळे प्रस्तूत वाद चालविण्यांचे मंचास अधिकारक्षेत्र आहे. गैरअर्जदार क्र.३ फायनान्स कंपनीचे शाखा कार्यालय असलेल्या गैरअर्जदार .क्र.१ कडून अर्जदारने ट्रक खरेदी करण्याकरीता रू. ७,५५,०००/- कर्ज घेतले. सदर कर्जाची व्याजासहीत परतफेड ही रू. २१,८३३/-च्या एकूण् ४५ मासीक किस्तींमध्ये करायची होती हि बाब दोन्ही पक्षांस मान्य आहे. अर्जदारकडे रू.३,९२,१६४/- थकीत होते,व अर्जदाराने ३,२६,१६४/- रुपय गैरअर्जदाराकडे जमा केले असे अर्जदारने स्वत: आपल्या तक्रारीत मान्य केलेले आहे,परंतु अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या खात्याचे विवरण पत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येत कि अर्जदाराने किस्तीची रक्कम वेळेवर गैरअर्जदाराकडे जमा केलेली नाही. अर्जदार हा थकीतदार असल्यामुळे गैरअर्जदारक्र.३ यांनी अर्जदारविरूध्द आर्बीट्रेटर नेमून आर्बीट्रेटर . प्रोसीडींगमध्ये अर्जदारला दिनांक १९.०१.२०१६ रोजी हजर राहण्यांस कळवून अर्जदारवर रुपये ७,७७,१५५/- बाकी आहेत असे नमूद केले. .परंतु अर्जदाराने arbitration प्रोसिडीग ला हजर राहण्यास नोटीस पाठवून असमर्थता दाखवली.व त्यानंतर सुद्धा अर्जदाराने थकीत रकमेचा भरणा न केल्यामुळे फरवरी २०१६ नोटीस देऊन गैरअर्जदारक्र.२ यांनी ट्रकचा ताबा घेऊन संपूर्ण थकीत रक्कम भरण्यांस सांगीतले व एकमुस्त रक्कम न भरल्यांस सदर ट्रक लिलावात विकून टाकणार व उर्वरीत रकमेकरीता त्यांच्यावर कारवाई करणार ह्याची अर्जदाराला कल्पना होती. अर्जदार हा थकीतदार असल्यामुळे गैरअर्जदार यांनी दिनांक २४.१०.२०१५ रोजी सदर ट्रकचा ताबा घेतला.गैरअर्जदारानी वाहन जप्ती करण्यापूर्वी दिनांक २४.१०.२०१५ रोजी कामठी पोलीस स्टेशन नागपूर यांचेकडे जप्तीपूर्वीचे तसेच सदर वाहन जप्त केल्यानंतर सुध्दा जप्तीनंतरचे सूचनापत्र कामठी पोलीस स्टेशन चंद्रपूर यांचेकडे दिले. सदर पत्र गैरअर्जदारांनी प्रकरणात दाखल केले आहे. त्यानंतरही अर्जदाराने कर्जाची थकीत रक्कम गैरअर्जदारकडे जमा न केल्यामुळे गैरअर्जदारनी सदर वाहन.विक्री केले व विक्रीतून मिळालेली रक्कम अर्जदारचे कर्जखात्यात जमा करून उर्वरीत रक्कम रू. ६,७७००२/- अर्जदारला दि.११.०२.२०१६ रोजीचे नोटीसद्वारे मागणी केली. सदर नोटीस हा अर्जदारनेच प्रकरणात दाखल केलेला आहे. त्यामुळे अर्जदार हा मंचासमक्ष स्वच्छ हाताने आलेला नाही व अर्जदारला गैरअर्जदारने मागणी केलेली थकीत रक्कम द्यावयाची नसल्याने अर्जदारने सदर तक्रार दाखल केलेली आहे असे निदर्शनांस येते. अर्जदार थकीतदार असल्याने गैरअर्जदाराने अर्जदाराचे प्रकरणातील वाहन दोन्ही पक्षातील झालेल्या करारनाम्यातील तरतुदींनूसार ताब्यात घेवून पूर्वसुचना देवून विक्री केलेले असल्यामुळे गैरअर्जदारानी अर्जदाराप्रती कोणतीही अनुचित व्यापार पद्धतिचा अवलंब केलेला नाही.
6. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) अर्जदाराची तक्रार क्र. १०७ /२०१६ खारीज करण्यात येते.
(२) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(३) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.
.
चंद्रपूर १८/१२/२०१८