(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 03/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 24.02.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्ता हा CG-04/G-5215 या ट्रकचा मालक आहे. सदर ट्रक एचडीएफसी बँक लिमिटेड, नागपूर यांचेकडे तारण करारा अंतर्गत तारण होता. तक्रारकर्ता व श्री सुनिल भिवगडे, राह. लाखनी, तहसिल-जिल्हा भंडारा यांचेसोबत सदर ट्रकच्या खरेदी-विक्रीचा करार ठेवला होता. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याचेकडून सदर वाहन खरेदी करण्यासाठी खरेदी करणा-याला कर्जाची आवश्यकता होती आणि त्या दृष्टीने त्याने रु.6,75,000/- इतकी कर्जाऊ रक्कम मिळण्याकरीता गैरअर्जदाराशी संपर्क साधला. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, कर्ज मिळण्याकरता एचडीएफसी बँक लिमिटेड यांचे तारण कर्ज रद्द होणे आवश्यक होते. त्याकरीता तक्रारकर्त्यास सुनिल भिवगडे यांचेकडून ट्रकची संपूर्ण रक्कम रु.6,75,000/- प्राप्त होत नाही तोपर्यंत वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र एचडीएफसी बँकेचे नाव वगळण्यांस तक्रारकर्ता सुरवातीला कधीही तयार नव्हता. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांच्या कमर्शियल फायनान्स विभागाचे मॅनेजर श्री.मनीष शास्त्री हे त्याला भेटले आणि सांगितले की, एचडीएफसी बँकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही तर कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे श्री. सुनिल भिवगडे यांना कर्ज मंजूर होऊ शकत नाही. तसेच श्री. मनीष शास्त्री यांनी असे आश्वासीत केले की, प्रक्रीया व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर रु.6,75,000/- चा धनादेश तक्रारकर्त्याचे नावे हस्तांतरीत करण्यांत येईल. तक्रारकर्त्याने असे नमुद केले आहे की, दि.05.10.2007 रोजी तक्रारकर्त्याला गैरअर्जदारांचे दि.29.09.2007 रोजीचे पत्र प्राप्त झाले परंतु रु.6,75,000/- चे कर्ज मंजूर झाले असुन श्री. सुनिल भिवगडे यांचेकडून नोंदणी प्रमाणपत्र, विमा आणि नोंदणी विषयीचे इतर सोपस्कार हे आमच्या नावे पृष्ठांकित करावे असे कळविले व त्यानंतरच कर्ज देण्यांत येईल असे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने एचडीएफसी बँक लिमिटेड यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन सदर वाहन श्री. सुनिल भिवगडे यांच्या नावे स्थानांतरीत केले आणी ट्रकच्या विक्रीपोटी ठरविलेली रक्कम रु.6,75,000/-घेण्यासाठी गैरअर्जदाराशी संपर्क साधला असता गैरअर्जदारांचे मॅनेजर श्री. मनीष शास्त्री यांनी काही कागदपत्रांची पूर्तता व्हायची आहे असे सांगून तक्रारकर्त्यास थांबावयास सांगितले. 3. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदारांशी वारंवार संपर्क साधला असता त्याला वाहनाची रक्कम तर मिळालीच नाही या उलट गैरअर्जदारांनी श्री. सुनिल भिवगडे यांना रक्कम अदा केल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याने श्री.सुनिल भिवगडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनीही काही तसदी घेतली नाही. तक्रारकर्त्याने जुलै-2008 मध्ये खरेदीदाराशी भेट घेतली तेव्हा त्याला माहित पडले की, खरेदीदार आणि गैरअर्जदारास रु.7,28,000/- आधीच अदा केलेले आहे. तक्रारकर्त्याने वारंवार गैरअर्जदारांशी संपर्क साधला असता त्यांना रक्कम अदा करण्यांत येईल असे सांगितले परंतु दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे व रु.7,28,000/- ची 24% व्याजासह मागणी केलेली आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीचे नोटीस गैरअर्जदाराला बजावण्यांत आली असता त्यांनी आपल्या लेखी जबाबातील प्राथमिक आक्षेपात सदर तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार नसल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही व तो ग्राहक या संज्ञेतसुध्दा मोडत नाही. तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचा कोणत्याही प्रकारे करार झालेला नसुन त्यांनी कोणतीही सेवा दिलेली नसल्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक ठरु शकत नाही असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने श्री. सुनिल भिवगडे यांना सदर प्रकरणात गैरअर्जदार म्हणून समाविष्ट केलेले नाही. तसेच त्यांनी आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तकारकर्ता हा CG-04/G-5215 या ट्रकचा मालक असल्याचे मान्य केलेले आहे. सदर ट्रकच्या खरेदी करता सुनिल भिवगडे यांनी कर्जाची मागणी केलेली होती हे सुध्दा मान्य केलेले आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्ता व सुनिल भिवगडे यांचेमध्ये कोणता करार झालेला होता, याची त्यांना माहिती नाही व त्यांनी सुनिल भिवगडे हा त्याचा ग्राहक असल्यामुळे कर्जाची रक्कम सुनिल भिवगडेला देण्यांत आली व सुनिल भिवगडेने सदर रक्कम तक्रारकर्त्यास दिली किंवा नाही याबाबत सुध्दा त्यांना माहिती नसल्याचे नमुद केलेले आहे. याशिवाय त्यांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व आक्षेप नाकालेले असुन सदर प्रकरण खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 5. सदर तक्रार मंचासमक्ष दि.20.10.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकला. मंचासमक्ष दाखल दस्तावेज व दोन्ही पक्षांचे कथन यांचे निरीक्षण करता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्ता हा ट्रक क्र. CG-04/G-5215 या ट्रकचा मालक होता ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने सदर ट्रक विकण्याकरता श्री. सुनिल भिवगडे याचेसोबत कोणत्या प्रकारचा करार केला होता व त्या करारातील अटी व शर्ती काय होत्या ही बाब स्पष्ट करणारा कोणताही दस्तावेज तक्रारकर्त्याने मंचासमक्ष दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी घेतलेल्या आक्षेपानुसार तक्रारकर्त्याने सुनिल भिवगडे यांना पक्ष करणे आवश्यक होते, तसे त्यांनी केले नाही. 7. तक्रारकर्त्याने सदर ट्रक विकण्याचा करार हा सुनिल भिवगडे याचेसोबत केला होता, ही बाब तक्रारीतील कथनावरुन स्पष्ट होते व सदर ट्रक एचडीएफसी बँकेकडे तारण होते ही बाब सुध्दा तक्रारकर्त्याचे कथनावरुन स्पष्ट होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला कर्जाची रक्कम देऊ केली होती असे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे परंतु त्याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही. 8. गैरअर्जदाराने तक्रारकर्ता हा त्याचा ग्राहक नसल्याचे आपल्या उत्तरात नमुद केली आहे. तक्रारकर्त्याने तो गैरअर्जदाराचा ग्राहक कसा होतो ही बाब सिध्द केली नाही. तसेच सदर प्रकरणामध्ये सुनिल भिवगडे व गैरअर्जदारांमध्ये कर्जासंबंधीचा करार झाला होता व त्या आधारे तक्रारकर्त्यास गैरअर्जदाराने कर्जाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते असे तक्रारकर्त्याचे कथन आहे. यावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक ठरत नाही, असे मंचाचे मत आहे. 9. तक्रारकर्त्याने मंचासमक्ष राष्ट्रीय आयोगाचा न्याय निवाडा 2006 (2) CCC 470 (NS), “ Vin Sum Exports –v/s- James Mackintosh & Co. Pvt. Ltd and another” दाखल केलेला आहे. सदर न्याय निवाडयातील तथ्य व तक्रारीतील प्रस्तुती यामध्ये तफावत आहे, त्यामुळे सदर न्याय निवाडा या प्रकरणाला लागू पडत नाही. 10. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्याचे कथन व मंचासमक्ष दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता गैरअर्जदाराचा ग्राहक ठरत नसल्यामुळे तक्रारकर्त्याचे सदर तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही, त्यामुळे सदर तक्रार खारिज होण्यांस पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |