Maharashtra

Nagpur

CC/10/569

Nitin Arvind Vyavhare - Complainant(s)

Versus

M/s. Blue Dart Expess Ltd. - Opp.Party(s)

Adv. Smita Deshpand

10 Jan 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/569
1. Nitin Arvind VyavharePlot No. 154, Abhyankar Nagar, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. Blue Dart Expess Ltd.179, North Ambazari Marg, Ground Floor, Andhra Association Building, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 10 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 10/01/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, त्‍याला गैरअर्जदार क्र. 2 तर्फे मे. ओरीएंट ट्रॅव्‍हल्‍स अँड टूर्सचे माध्‍यमातून मुंबई-क्‍वालालमपुर-बाली-जकार्ता-सिंगापुर असा विमान प्रवास करण्‍याकरीता व्हिसा प्राप्‍त करावयाचा होता. सदर प्रवासाकरीता तिकिटाचा खर्च रु.75,149/- एटीआर एएसएलए कंपनीस व रु.8,000/- गैरअर्जदार क्र. 2 ला दि.10.03.2010 ला रोख दिले. तक्रारकर्त्‍याने मलेशिया प्रवासाकरीता लागणारे व्हिसा प्राप्‍त करण्‍याकरीता चारही जुने पासपोर्ट (तक्रारकर्ता क्र. 1 व 2 आणि त्‍यांची दोन मुले) मुंबई येथील कार्यालयाला पाठविण्‍याकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 सोबत करार केला व पारपत्रे गैरअर्जदार क्र. 1 यांना देण्‍यात आली. त्‍यावेळेस ती चांगल्‍या स्थितीत होती. परंतू विदेशात जाण्‍याची वेळ आली असता सदर पारपत्रें अतिशय वाईट व जीर्ण अवस्‍थेत असल्‍याचे गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्‍याला कळविले. अशा पारपत्रांवर प्रवास करणे शक्‍य नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने परत नवीन पारपत्र बनविण्‍याकरीता सेवाशुल्‍क, व्हिसा शुल्‍क याबाबत रु.33,800/- गैरअर्जदार क्र. 2 ला दिले. तसेच सिंगापूर व मलेशियाचा व्हिसा प्राप्‍त केला व नविन तिकिटे या पारपत्रानुसार तयार केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मलेशिया व इंडोनेशिया या प्रवासाचा रु.1,30,000/- इतका जास्‍त खर्च आला.
 
      याबाबत तक्रारकर्त्‍याने झालेल्‍या नुकसानाची रक्‍कम मागण्‍याकरीता विनंती केली. तसेच कायदेशीर नोटीसही पाठविली. परंतू गैरअर्जदारांनी सदर रक्‍कम दिली नाही. गैरअर्जदार क्र. 1 ने सदर पारपत्रे गैरअर्जदार क्र. 3 मार्फत पाठविल्‍याचे गैरअर्जदार क्र. 2 द्वारे कळविले. सर्व गैरअर्जदारांनी त्‍यांची जबाबदारी नाकारली. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन तक्रारीचा खर्च, रु.1,30,000/- पारपत्र पुन्‍हा बनविण्‍याकरीता लागलेला खर्च, व्हिसा परत बनविण्‍याकरीता लागलेला खर्च रु.16,000/-, मानसिक त्रासाबाबत रु.34,000/-, तसेच नुकसानाबाबत रु.75,000/- अशी एकूण रु.2,75,000/- ची मागणी केलेली आहे.
 
2.    सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्‍यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला असता गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले.
3.    गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी उत्‍तरात गैरअर्जदार क्र. 2 ने त्‍यांच्‍याशी करार केला व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने पारपत्र गैरअर्जदार क्र. 2 ला देण्‍यात आले व त्‍याची कस्‍टमर रसिद त्‍यांनी दिली. त्‍यांच्‍या चुकीमुळे पारपत्रे खराब झाल्‍याची बाब त्‍यांनी नाकारली आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 3 मार्फत पारपत्रे पाठविल्‍याबाबत बाब मान्‍य करुन तक्रारकर्त्‍याने कायदेशीर नोटीस पाठविल्‍याचेही मान्‍य केले आहे.
      गैरअर्जदार क्र. 1 च्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी 24.04.2010 पत्रानुसार तक्रारकर्त्‍याचे पारपत्र दि.15.03.2010 ला गैरअर्जदार क्र. 3 कडे चांगल्‍या स्थितीत दिले. तक्रारकर्त्‍याचे इतर कथन त्‍यांनी नाकारले आहे. आपल्‍या विशेष कथनात गैरअर्जदार क्र. 1 ने विशेषत्‍वाने नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र. 2 ने पॅक केलेले सामान मुंबईला नेण्‍याची त्‍यांची जबाबदारी होती. आधिच बंद करुन ठेवलेले दस्‍तऐवज किंवा सामान गैरअर्जदार क्र. 1 च्‍या कार्यालयात त्‍यांचा माणूस/प्रतिनीधी आणतो. त्‍यामुळे त्‍यात काय आहे हे त्‍यांना माहित नसते. याचे वेगळे एअरवे बील क्र.12794036021 गैरअर्जदार क्र. 2 ला दिलेले आहे. त्‍यामुळे त्‍यांचा संबंध गैरअर्जदार क्र. 2 सोबत आहे व तक्रारकर्त्‍याशी नाही. त्‍यामुळे सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
4.    गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी उत्‍तरामध्‍ये नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 3 च्‍या अक्षम्‍य निष्‍काळजीपणामुळे पारपत्रे खराब झालेली आहे, त्‍यामुळे सदर तक्रारीतून त्‍यांचे नाव वगळण्‍यात यावे.
      गैरअर्जदार क्र. 2 यांनी ते फक्‍त प्रवासाबाबतची सेवा देतात व प्रवासाची तिकिटा आरक्षीत करतात. तक्रारकर्त्‍याच्‍या संमतीने गैरअर्जदार क्र. 1 च्‍या कुरीयरमार्फत त्‍यांनी पारपत्रे पाठविली होती. दस्‍तऐवजावरुन पारपत्रे खराब होण्‍यास ते जबाबदार नसल्‍याचे नमूद केले आहे. दस्‍तऐवज क्र. 17 प्रमाणे पारपत्र हे गैरअर्जदार क्र. 1 द्वारे खराब झाल्‍याचे आरोप आहेत व तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांचे निष्‍काळजीपणामुळे खराब झाल्‍याचे आरोप आहेत. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 3 हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत. म्‍हणून त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केलेली आहे.
5.    गैरअर्जदार क्र. 3 ने त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याचा सदर अर्ज चालविण्‍यायोग्‍य नाही. कारण तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 3 यांच्‍यामध्‍ये कोणताही करार अस्तित्‍वात नसून त्‍यांनी कोणतीही सेवा तक्रारकर्त्‍यांना पुरविलेली नाही, म्‍हणून तक्रारकर्ता हा त्‍यांचा ग्राहक नाही. गैरअर्जदार क्र. 3 च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे, तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 कडे चार पारपत्रे दिली व नागपूरहून मुंबईला पाठविण्‍याकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 ची सेवा घेतली. जेव्‍हा उपरोक्‍त पारपत्र मुंबईला पोहोचले तेव्‍हा ते वाईट व जिर्ण अवस्‍थेत होते. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 ला सदर माल सुपूर्द केल्‍याचा उल्‍लेख केलेला नाही. तसेच जिर्ण प्रमाणपत्रामध्‍ये जो माल ए.डब्‍ल्‍यू.बी. 058-38209102 नुसार पाठविण्‍याकरीता दिल्‍याचा उल्‍लेख आहे, तो गैरअर्जदार क्र. 1 ने नव्‍हे तर इझी हॉल प्रायव्‍हेट लिमि. यांनी दिलेला आहे. म्‍हणजेच सदर करार हा त्‍यांच्‍यामध्‍ये व गैरअर्जदार क्र. 3 मध्‍ये होता आणि सदर कंपनीला गैरअर्जदार म्‍हणून समाविष्‍ट केलेले नाही. पारपत्रे ही प्रवासादरम्‍यान खराब झाली हे दिसून येत नसल्‍याने सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
6.    सदर प्रकरण मंचासमोर युक्‍तीवादाकरीता दि.22.12.2010 रोजी आले असता उभय पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच मंचाने सदर प्रकरणी उभय पक्षांकडून दाखल शपथपत्रे, दस्‍तऐवज यांचे निरीक्षण करता मंचाचे निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.
-निष्‍कर्ष-
7.    तक्रारकर्त्‍याने प्रवासासंदर्भात गैरअर्जदार क्र. 2 मे. ओरीएण्‍ट ट्रॅव्‍हल अँड टुर्स, नागपूर यांना पारपत्रे दिली होती ही बाब तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍या कथनावरुन स्‍पष्‍ट होते. व सदर पारपत्रे मलेशियाचा व्हिसा प्राप्‍त करण्‍याकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 द्वारा मुंबई येथे दि.10.03.2010 ला पाठविले होते ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज क्र. 2 वरुन स्‍पष्‍ट होते व त्‍याकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्‍याकडून सेवाशुल्‍क घेतले होते, त्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 1 चा लाभार्थी ठरतो व गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक असून तक्रारकर्त्‍याच्‍याच रकमेतून गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 ला रक्‍कम दिली होती ही बाब गैरअर्जदार क्र. 2 च्‍या लेखी उत्‍तरावरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 3 ची सेवा गैरअर्जदार क्र. 1 द्वारे घेतली होती ही बाब जरीही स्‍पष्‍ट होत असली तरीही गैरअर्जदार क्र. 3 च्‍या कोणत्‍याही निष्‍काळजीपणामुळे गैरअर्जदार क्र. 1 ला दोषी धरता येते व तक्रारकर्ता यांचा गैरअर्जदार क्र. 3 च्‍या सेवेसोबत प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्षरीत्‍या कोणताही संबंध येत नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 3 ची सेवा घेतली आहे व सदर सेवा ही गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांचे मधील वैयक्‍तीक करारानुसार आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 3 च्‍या कोणत्‍याही त्रुटीसाठी गैरअर्जदार क्र. 1 जबाबदार आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 3 चे तक्रारकर्ते ग्राहक ठरत नाही.
8.    तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 ला पारपत्रे दिली होती ती गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 मार्फत मुंबई येथे पाठविण्‍यात आली होती ही बाब दस्‍तऐवज क्र. 1 वरुन स्‍पष्‍ट होते व सदर पारपत्रे गैरअर्जदार क्र. 1 च्‍या द्वारे खराब झाली ही बाब गैरअर्जदार क्र. 2 चे पत्र तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 8 वरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 ला पारपत्रे दिली तेव्‍हा ती चांगल्‍या अवस्‍थेत होती ही बाब उभय पक्षांनी मान्‍य केलेली आहे. अशा परिस्‍थीतीत सदर पारपत्रे ही गैरअर्जदार क्र. 1 यांनी स्विकारल्‍यानंतर ती पाठविण्‍याच्‍या दरम्‍यान ती खराब झाली असा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष यातून निघतो. कारण तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 6 चे अवलोकन केले असता सदर पत्र इंडियन एयर लाईन्‍स चे आहे. त्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 कडून पारपत्रे खराब अवस्‍थेत मिळाली आहे याचा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे. यावरुन मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, सदर पारपत्रे ही गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे खराब झाली होती. गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्‍या उत्‍तरामध्‍ये त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून सदर पोस्‍टल लिफाफे स्विकारले तेव्‍हा त्‍यात काय आहे यांची जाणिव नव्‍हती असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने 23.03.2010 च्‍या पत्रामध्‍ये पारपत्राचा उल्‍लेख केला असून ती खराब झाल्‍याचे संदर्भात माफी मागितली आहे. सदर बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 7 वरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन सदर पारपत्रे ही गैरअर्जदार क्र. 2 कडून गैरअर्जदार क्र. 1 ने स्विकारली होती व त्‍याबाबतची जाणिव त्‍यांना होती हे स्‍पष्‍ट होते. यावरुन गैरअर्जदार क्र. 1 चे मते ती पारपत्रे खराब झाली ही बाब स्‍पष्‍ट होते.
 
9.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरासोबत पृष्‍ठ क्र. 90 वर ब्‍लयू डार्ट एक्‍सप्रेस लिमिटेडचे अटी व शर्ती जोडलेल्‍या आहेत. परंतू सदर अटी व शर्ती गैरअर्जदार क्र. 2 यांना पुरविल्‍या होत्‍या याबाबतचा कोणताही स्‍पष्‍ट पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सदर अटी व शर्ती या इतक्‍या बारीक आहेत की त्‍या सामान्‍य डोळयांनी वाचणे अशक्‍य आहे. अशा परिस्थितीमध्‍ये मा. राष्‍ट्रीय आयोगाने अनेक न्‍याय निवाडयामध्‍ये दिलेल्‍या निर्णयांद्वारे असे सुचित केले आहे की, ज्‍या अटी व शर्ती सामान्‍य डोळयांनी वाचण्‍यायोग्‍य स्‍पष्‍ट नसतील, वाचनीय नसतील व त्‍या ग्राहकांना पुरविण्‍यात आल्‍या नसतील तर अशा अटी व शर्ती ग्राहकांवर बंधनकारक नसतात. सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याची पारपत्रे ही गैरअर्जदार क्र. 1 च्‍या सेवेतील त्रुटीमुळे व निष्‍काळजीपणामुळे खराब झाली व त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याला नविन पारपत्रे बनविण्‍याकरीता रु.20,000/- खर्च व व्हिसा बनविण्‍याकरीता रु.16,000/- खर्च आला. त्‍यामुळे ती रक्‍कम मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र ठरतो. तसेच सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास झाला. त्‍यामुळे सदर त्रासाची भरपाई मिळण्‍याकरीता तक्रारकर्ता पात्र ठरतो. तक्रारकर्त्‍याने 34,000/- ची मागणी केलेली आहे. ती मागणी मंचाचे मते अवास्‍तव असली तरीही न्‍यायिकदृष्‍टया तक्रारकर्ता रु.10,000/- मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या इतर मागण्‍या या पुराव्‍याअभावी अमान्‍य करण्‍यात येत आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 यांनी सेवेत त्रुटी व निष्‍काळजीपणा केल्‍याचे घोषित करण्‍यात  येते.
3)    गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍याला पारपत्रे नविन बनविण्‍याकरीता आलेला खर्च      रु.20,000/- व व्हिसा परत बनविण्‍याकरीता लागलेला खर्च रु.16,000/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाच्‍या आत द्यावे अन्‍यथा दोन्‍ही रकमेवर      गैरअर्जदार क्र. 1 ने द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज रक्‍कम अदा होईपर्यंत देय राहील.
4)    गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई     म्‍हणून रु.10,000/- द्यावे.
5)    गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याला तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
6)    गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
7)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30    दिवसाच्‍या आत करावे.
 
 
      (मिलिंद केदार)                    (विजयसिंह राणे)
         सदस्‍य                           अध्‍यक्ष           
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT