मंचाचा निर्णयांन्वये श्री. मिलींद केदार, सदस्य आ दे श (पारित दिनांक : 15/10/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्त्याची थोडक्यात अशी आहे की, त्याच्या आजीचे श्रीमती नर्मदादेवी अग्रवाल यांचे डॉ. माहूरकर यांचेकडे हृदयरोगाचे उपचार चालू असल्याने त्याने दि.29.07.2009 गैरअर्जदाराकडून वेगवेगळया औषधी खरेदी केल्या. सदर औषधाच्या सेवनाने तक्रारकर्त्याच्या आजीची तब्येत बिघडली व तिला त्रास झाला. सखोल चाचणी केली असता डॉक्टरांनी ‘लोसर 25’ हे औषध मुदतबाह्य असल्याचे सांगण्यात आले. तक्रारकर्त्याच्या मते सदर दुकान हे गैरअर्जदार क्र. 1 यांच्या मालकीचे असून गैरअर्जदार क्र. 2 ते चालवितात. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना सदर बाबींबाबत तक्रार केली. तसेच कायदेशीर नोटीस पाठविला व अन्न, औषध प्रशासन विभागाला लेखी तक्रार दिली. तसेच मंचासमोर तक्रार दाखल केली. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदाराने लेखी उत्तर दाखल करुन प्राथमिक आक्षेप उपस्थित केलेले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोसार 25 एम.जी. ही औषध तक्राकर्त्याच्या आजीने सेवन केलेली असल्यामुळे व तिने तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यास कोणतेही अधिकार दिले नसल्याने तक्रारकर्ता सदर प्रकरणी ग्राहक ठरत नाही, म्हणून सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार गैरअर्जदारांनी आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात नाकारलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.06.10.2010 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तऐवज व दाखल कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्त्याने त्याच्या आजीकरीता गैरअर्जदार क्र. 1 कडून दि.29.07.2009 रोजी औषध विकत घेतले होते. ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज पृष्ठ क्र. 10 वरुन स्पष्ट होते. सदर दस्तऐवजाचे अवलोकन केले असता त्यामध्ये रुग्णाचे नाव श्रीमती नर्मदादेवी अग्रवाल इतकाच उल्लेख केलेला आहे व डॉक्टरांचे नाव श्री. माहूरकर असा उल्लेख केलेला आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याची आजी श्रीमती नर्मदादेवी अग्रवाल यांचेकरीता डॉ. माहूरकर यांनी लिहून दिलेले औषध खरेदी केले होते. सदर बाब स्पष्ट करण्याकरीता दस्तऐवज पृष्ठ क्र. 8 वर दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्याच्या आजीचे वय 75 वर्ष असल्यामुळे साहजिकच तक्रारकर्ता स्वतः औषध आणण्याकरीता गेला. त्यामुळे गैरअर्जदाराने घेतलेला आक्षेप व तक्रारकर्ता हा ग्राहक संज्ञेत येत नाही हे म्हणणे मान्य करण्यासारखे आहे. तरीही गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरले तरीही आजीच्या वतीने तक्रारकर्ता हा तक्रार दाखल करु शकतो व तो ग्राहक या संज्ञेत येतो. परंतू सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याची आजी 75 वर्षाची असून हृदय रोगाची रुग्ण होती ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याचे आजीकरीता गैरअर्जदाराकडून औषध खरेदी केले होते ही बाब मान्य करण्यासारखे असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्याचा मुख्य आक्षेप असा आहे की, त्याने गैरअर्जदाराकडून लोसार 25 एम.जी. या गोळया विकत घेतल्या होत्या व त्या मुदतबाह्य आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज पृष्ठ क्र.10 चे अवलोकन केले असता त्यामध्ये बॅच क्र. BLSL08018 हा आहे व त्याची मुदत ऑक्टोबर 2010 पर्यंत असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेले पृष्ठ क्र. 11 चे अवलोकन केले असता त्यामध्ये बॅच क्र.506006 असून त्यामध्ये मुदत ही एप्रिल 2008 ची आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांनी घाई गडबड असल्यामुळे त्यांनी औषधावरील बॅच क्रमांक व गैरअर्जदाराने दिलेला बॅच क्रमांक ह्यांचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन चुकीचा बॅच क्रमांक देयकामध्ये नमूद केला. गैरअर्जदाराने आपल्या बचावामध्ये त्याने दिलेला बॅच क्रमांक हा तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेल्या बॅच क्रमांकाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे. 7. मंचाने दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराकडून बॅच क्र. 506006 चे लोसार 25 एम.जी. खरेदी केल्यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही. तसेच सदर औषध गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला विकले आहे याबाबत कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल करुन सिध्द केलेले नाही. तक्रारकर्त्याने औषधावरील बॅच क्रमांक न पाहता घाईघाईने औषध घेतले. याबाबीसुध्दा मान्य करण्यासारख्या नाही. तक्रारकर्त्याने सदर औषध नेल्यानंतर त्याच्या आजीला दिले व त्यामध्ये तिची प्रकृती खालावली यासंबंधीचा विशेष तज्ञांचा किंवा तक्रारकर्त्याच्या आजीला उपचाराकरीता नेलेल्या डॉक्टरांचे कोणतेही तज्ञ मत दाखल नसल्यामुळे तक्रारकर्त्याच्या आजीची प्रकृती खालावली ही बाब सिध्द होत नाही. तसेच गैरअर्जदाराने मुदतबाह्य औषध तक्रारकर्त्याल विकले ही बाबसुध्दा स्पष्ट होत नाही. 8. तक्रारकर्त्याने माहितीचा अधिकार कायदा अन्वये प्राप्त केलेले दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर दस्तऐवजांचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र. 1 भारती मेडीकल स्टोर्समध्ये श्री. अविनाश एकरे गैरअर्जदार क्र. 2 उपस्थित होते व तेच औषधांची विक्री करतात आणि रजिस्टर्ड फार्मसीचे अनुपस्थितीत औषधांची विक्री गैरअर्जदार क्र. 2 द्वारे केली जाते ही बाब पृष्ठ क्र. 78 वरुन स्पष्ट होते. ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी असून अक्षम्य निष्काळजीपणा असल्याचे मंचाचे मत आहे. सदर बाबीकरीता गैरअर्जदार क्र. 1 जबाबदार आहे. परंतू या गंभीर बाबीकरीता कायदेशीर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार अन्न व औषधी प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचेकडे आहे. तक्रारकर्त्याने याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करावा व योग्य कायदेशीर कारवाई करावी असे मंचाचे मत आहे. 9. गैरअर्जदार क्र. 1 यांनी रजिस्टर फार्मसीचे अनुपस्थितीत औषध विक्री करणे ही गंभीर बाब असल्यामुळे सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. परंतू सदर सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रास झाल्याचे स्पष्ट होत नाही. वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. 2) तक्रारकर्त्यांनी योग्य न्यायाधिकरणासमोर जाऊन आपला वाद सोडवून घ्यावा. 3) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |