तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही भ्रमणध्वनी सेवा पुरविणारी कंपनी आहे व सा.वाले यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनी क्रमांक 9892391461 या क्रमांकावर भ्रमणध्वनी सेवा पुरविली होती. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांचा भ्रमणध्वनी त्यातील सिमकार्डसह दिनांक 6.5.2009 रोजी हरवला. त्यानंतर तक्रारदारांनी दुसरे दिवशी दिनांक 7.5.2009 रोजी सा.वाले यांच्या सांताक्रुझ (पश्चिम) येथील विक्री केंद्रातून दुस-या सीमकार्डची मागणी केली. त्यावेळी तक्रारदारांना सांताक्रुझ(पश्चिम) मधील ग्राहक केंद्राकडे संपर्क साधण्याची सूचना देण्यात आली. त्या प्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 9.5.2009 रोजी सा.वाले यांच्या केंद्रामधून रु.75/- अदा करुन दुसरे सीमकार्ड प्राप्त करुन घेतले. सा.वाले यांचे प्रतिनिधींनी तक्रारदारांना असे सांगीतले की, दुसरे सीमकार्ड लवकरच कार्यान्वयीत होईल. परंतु ते कार्यान्वयीत करण्यात आले नाही. तक्रारदारांनी त्या बद्दल वेळोवेळी सा.वाले यांचेकडे पाठपुरावा केला. व सा.वाले यांच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करुन देखील दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत केले नाही. तक्रारदारांचे असे कथन आहे की, या प्रकारची सा.वाले यांची वर्तणूकीमुळे तक्रारदार आपल्या भ्रमणध्वनी सुविधेचा लाभ घेऊ शकले नाही. व त्यांची खुपच कुचंबणा व गैरसोय झाली. तक्रारदारांनी त्यानंतर प्रस्तुतची तक्रार दाखल करुन सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई दाखल रु.1 लाख प्राप्त करुन मिळावेत अशी दाद मागीतली.
2. सा.वाले यांनी आपले कैफीयतीचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये तक्रारदारांचा भ्रमणध्वनी दिनांक 6.5.2009 रोजी हरवला व तक्रारदारानी दुस-या सिमकार्डची मागणी केली होती ही बाब मान्य करतात. त्यानंतर तक्रारदारांना 9771 हे शेवटचे चार अंक असलेले नविन सिमकार्ड पाठविण्यात आले हे देखील मान्य केले. तथापी सा.वाले यांचे असे कथन आहे की, दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत करण्याकामी तक्रारदारांनी केलेल्या विनंतीस लगेचच प्रतिसाद देण्यात आला. व त्यांना सूचना देण्यात आली व दिनांक 30.5.2009 रोजी दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत करण्यात आले आहे असे देखील कळविण्यात आले. व तक्रारदारांना काही सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्याचे तक्रारदारांनी पालन केले नसल्याने तक्रारदारांना भ्रमणध्वनीचा फायदा घेता आला नाही. या प्रमाणे सा.वाले असे कथन करतात की, सा.वाले यांचे स्तरावर त्यांनी आवश्यक ती कार्यवाही सा.वाले यांनी केली परंतु तक्रारदारांनी सूचनांचे पालन न केल्याने तक्रारदार भ्रमणध्वनीचा फायदा घेऊ शकले नाहीत.
3. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. व पुराव्याचे शपथपत्र दाखल केले.
4. तक्रार प्रलंबीत असतांना सा.वाले यांनी दिनांक 11.08.2010 रोजी असा अर्ज दिला की, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या जनरल मॅनेजन टेलीकॉम विरुध्द कृष्णन व इतर सिव्हील अपील क्र.7687/2004 दिनांक 1.9.2009 या मधील निकालाप्रमाणे प्रस्तुत ग्राहक मंचास सा.वाले यांचे विरुध्द तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. त्या बद्दलही दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रस्तुत मंचाने मुळ तक्रारदारांचा सुनावणीकामी तक्रारीत युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाचे तक्रार, कैफीयत, शपथपत्र, व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सदर मंचास प्रस्तुत तक्रार सुनावणीस घेण्याचा व त्यामध्ये निर्णय देण्याचा अधिकार आहे काय ? | होय. |
2 | सा.वाले यांनी तक्रारदारांना पुरविलेले दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत केले नाही व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई बद्दल रु.1 लाख मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. रुपये 25,000/- |
4. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. प्रस्तुत मंचाने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या जनरल मॅनेजन टेलीकॉम विरुध्द कृष्णन व इतर सिव्हील अपील क्र.7687/2004 दिनांक 1.9.2009 या प्रकरणावर आधारीत अन्य प्रकारच्या तक्रारीमध्ये जे आक्षेपाचे अर्ज होते त्या अर्जावर सुनावणी घेवून सविस्तर आदेश दिनांक 20.9.2010 राजी पारीत केला. त्या आदेशामध्ये प्रस्तुत मंचाने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या जनरल मॅनेजन टेलीकॉम विरुध्द कृष्णन व इतर या केसमधील निकाल तसेच अन्य निकाल व ट्राय अॅक्ट मधील तरतुदी याचा एकत्रित विचार करुन असा निष्कर्ष नोंदविला की, कृष्टणचे प्रकरणातील निकालाचा या प्रकारच्या तक्रारींवर परीणाम होणार नसून सदर मंचास या प्रकारच्या तक्रारीत सुनावणी घेण्याचा अधिकार आहे असा निष्कर्ष नोंदविण्यात आलेला आहे. प्रस्तुतची तक्रार 639/2009 ही प्रस्तुत मंचाचे आदेश दिनांक 20.9.2010 यामध्ये नमुद केलेली नसली तरीही त्या आदेशामध्ये असे नमुद केलेले आहे की, या स्वरुपाच्या अन्य तक्रारीमध्ये देखील त्याच स्वरुपाचा आक्षेप घेतला गेल्यास तो आदेश त्या आक्षेपांना होईल. प्रस्तुत मंचाच्या दिनांक 20.9.2010 च्या आदेशास त्या मधील पक्षकारांनी मा. राज्य आयोगाकडे आव्हान दिले आहे अथवा नाही या बद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. परंतु मा. राज्य आयोगाने प्रस्तुत मंचास दिनांक 20.9.2010 च्या आदेशाच्या विपरीत काही अन्य आदेश दिलेले आहेत असा देखील पुरावा उपलब्ध नाही. या वरुन प्रस्तत मंचाचा दिनांक 20.9.2010 चा आदेश अंतीम झालेला आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. त्या आदेशाप्रमाणे सदर मंचास या स्वरुपाच्या तक्रारीमध्ये सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा अधिकार आहे असा निष्कर्ष नोंदविला आहे. व त्या निष्कर्षास अनुसरुन या तक्रारीमध्ये देखील प्रस्तुत मंचास सदर तक्रारीमध्ये सुनावणी घेवून निर्णय घेण्याचा अधिकार आहे असा निष्कर्ष नोंदविता येतो.
7. तक्रादारांचे मुळचे सिमकार्ड दूरध्वनीसोबत दिनांक 6.5.2009 रोजी हरवले या बद्दल वाद नाही. तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 9.5.2009 रोजी 9771 (शेवटचे चार अंक) हे सिमकार्ड रु.75/- प्राप्त करुन पूरविले या बद्दल देखील वाद नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्र.3 मध्ये ही बाब मान्य केली. सा.वाले असे कथन करतात की, त्यांनी तक्रारदारांना असे सूचविले होते की, दुसरे सिमकार्ड चार तासाचे आत कार्यान्वयीत करण्यात येईल. सा.वाले आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्र.4 मध्ये असे कथन करतात की, तक्रारदार दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत करण्याबद्दल पाठपुरावा करीत होते व सा.वाले यांनी दिनांक 22.5.2009 चे ई-मेल पत्राव्दारे तक्रारदारांना सिमकार्ड कार्यान्वयीत करण्याच्या काही कार्यपध्दती समजावून सांगीतल्या. परंतु तक्रारदारांनी त्या सूचनांचे पालन न केल्याने दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत होऊ शकले नाही. सा.वाले असेही कथन करतात की, याच स्वरुपाच्या सूचना तक्रारदारांना दिनांक 30.5.2009 च्या ई-मेल पत्राव्दारे देण्यात आलेल्या होत्या.
8. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याच्या शपथपत्रामध्ये तक्रारीतील कथनांचा पुर्नउच्चार केलेला आहे. व सा.वाले यांच्या सूचनांचे पालन केल्या नंतरही दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत होऊ शकले नाही असे कथन केले. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सा.वाले यांना दुस-या सिमकार्ड बद्दल रु.75/- अदा केल्याची पावती जोडली आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे ई-मेल पत्र दिनांक 10.6.2009 व तक्रारदारांनी त्यास दिलेल्या उत्तराचे ई-मेल पत्र दिनांक 10.6.2009 च्या पत्राची प्रत तक्रारी सोबत जोडली आहे. त्यामध्ये तक्रारदार असे कथन करतात की, सा.वाले यांच्या सर्व सूचनांचे पालन करुन देखील त्यांचे सिमकार्ड कार्यान्वयीत होऊ शकले नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांना वेळोवेळी जी ई-मेल पत्रे पाठविली त्याच्या प्रती जोडलेल्या आहेत. सा.वाले तक्रारदारांना असे कळवित होते की, संगणकातील त्यांचे नोंदी प्रमाणे तक्रारदारांचे दुसरे सिमकार्ड कार्यान्वीत झालेले होते व तक्रारदार सा.वाले यांना पत्र देवून ते अद्याप कार्यान्वयीत झालेले नाही असे कळवितात. तक्रारदारांच्या दिनांक 22.5.2009 रोजीचा ई-मेल पत्रातील मजकूर हेच दर्शविते की, सा.वाले यांनी पुरविलेले दुसरे सिमकार्ड जर खरोखरच कार्यान्वयीत झाले असते तर तक्रारदारांना या स्वरुपाचे पत्र देण्याचे काही कारण नव्हते. परंतु तक्रारदार हे सा.वाले यांचेकडे वारंवार पत्र व्यवहार करुन दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत करण्याबाबत विनंती करीत होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या अभिलेखावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी दूरध्वनी संचालकांकडे पत्र व्यवहार करुन सा.वाले यांच्या निष्काळजीपणा बद्दल आक्षेप नोंदविला होता. सिमकार्ड कार्यान्वयीत झाल्यानंतर एखादी व्यक्ती आपला वेळ व कार्यक्षमता खर्ची करुन खोटा पत्र व्यवहार करेल किंवा खोटी कथने नमुद करुन काही कार्यवाही करेल ही शक्यता दिसत नाही. तक्रारदार हे जिवन विमा निगम कार्यालयात अधिकारी असून तक्रारीतील कथना प्रमाणे त्यांच्या कार्यालयीन कामात ते व्यस्त असतात. तरी देखील कार्यालयीन कामातून वेळ काढून त्यांनी दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत होण्याच्या प्रकरणाचा पाठपूरावा केला. तरी देखील शेवट पर्यत सिमकार्ड कार्यान्वयीत होऊ शकले नाही. प्रकरणातील एकंदर कागदपत्रे विचारात घेता व कथनांचा विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत होण्याचे संदर्भात योग्य ते सहकार्य केले नाही, योग्य ती कार्यवाही केली नाही व निष्काळजीपणा दाखविला. या मुळे दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत होऊ शकले नाही. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना दुस-या सिमकार्डच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
9. तक्रारदारांनी नुकसान भरपाई बद्दल रु.1 लाखाची मागणी केलेली आहे. वरील भागात कथन केल्याप्रमाणे तक्रारदार हे जिवन विमा निगम येथे अधिकारी आहेत. त्यांच्या दैनंदिन कामाकरीता त्यांना भ्रमणध्वनीची सेवा आवश्यक होती असे तक्रारीमध्ये कथन आहे. सा.वाले यांनी दुसरे सिमकार्ड कार्यान्वयीत न केल्याने तक्रारदारांची गैरसोय झाली असेल व निश्चीतच त्यांची कुचंबणा झाली असेल व त्यांना मानसीक त्राससुध्दा झाला असेल. प्रकरणातील कथनांचा एकत्रित विचार करता व तक्रारदारांना पोहचलेला मानसीक त्रास, गैरसोय, व कुचंबणा याचा एकत्रित विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रुपये 25,000/- अदा करणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 639/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेंवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रु.25,000/- तसेच तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
3. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत करावी. अन्यथा नुकसान भरपाईच्या रक्कमेवर विहीत मुदत संपल्यापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.