तक्रारदारातर्फे वकील : श्रीमती. रमा शर्मा,
सामनेवालेतर्फे वकील : श्री. राजेश हूकेरी, :
आदेशः- श्री. एम.वाय. मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
न्यायनिर्णय
1. सामनेवाले हे विग (डोक्यावर घालायचा केसांचा टोप) करीता प्रसिध्द आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांच्याकरीता विगची मागणी नोंदविली व रक्कम अदा करून विग प्राप्त केला. परंतू विगच्या गुणवत्तेबाबत व सामनेवाले यांच्या सेवेबाबत समाधान न झाल्यामूळे ही तक्रार दाखल केली. सामनेवाले हे नोटीस प्राप्त झाल्यानंतर मंचात हजर झाले व सविस्तर कैफियत दाखल करून आरोप फेटाळून लावला.
2. तक्रारदारानूसार सामनेवाले हे विग बनविण्याकरीता व त्याची विक्री करण्याकरीता प्रसिध्द आहेत. तक्रारदार यांना विगची आवश्यकता असल्यामूळे ते सामनेवाले यांच्याकडे दि. 13/05/2008 ला गेले व दाखविलेल्या नमुन्यापैकी त्यांनी एक स्वतःकरीता पसंत केला. सामनेवाल यांनी ते बनविण्याचे मान्य केले व त्याकरीता रू. 18,000/-,किंमत ठरली. सामनेवाले यांनी विगकरीता मोजमाप घेतले. तक्रारदारांनी रू. 1,500/-,अग्रिम राशी म्हणून जमा केले. ठरल्याप्रमाणे तक्रारदारानी दि. 15/06/2008 ला रू. 16,500/-,अदा केले. परंतू, विगची गुणवत्ता दाखविलेल्या नमुन्यापेक्षा निकृष्ट स्तराची होती व त्याचा आकार व रूपरेखा बरोबर नव्हती. ते विग सामनेवाले यांनी मान्य केल्याप्रमाणे नव्हते. परंतू सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ते स्विकारण्याबाबत आग्रह धरला व ते काही दिवस वापरून पाहण्यासाठी सांगीतले व तक्रारदार यांना ते आवडले नाही तर त्यांना बदलवून नविन विग देण्यात येईल असे आश्वस्त केले. तक्रारदारांनी विग वापरण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. विगच्या केसांचा गुंता होत होता. केसांना शॅम्पुनी धुतल्यानंतर सुध्दा केसांना पडलेल्या गाठी सुटत नव्हत्या. आंघोळ घेतांना तक्रारदाराना प्रत्येक वेळी त्यांचा विग व्यवस्थीत करण्याकरीता भरपूर वेळ खर्च करावा लागत होता. विग घातल्यानंतर तक्रारदारांची छवी चांगली दिसत नव्हती. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांना दि.13/08/2008 ला परत भेटल्या व विग बाबत त्यांची तक्रार नोंदविली व त्यांना विग बदलवून देण्याबाबत विनंती केली. परंतू सामनवेाले यांनी त्यांना आश्चर्याचा धक्का देत त्याकामी रू. 5,000/-,ची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामूळे त्यांनी नाईलाजाने रू. 1,000/-,अग्रीम राशी म्हणून दिले व त्यांच्याकडे असलेला विग सामनेवाले यांच्याकडे दिला. सामनेवाले यांनी तक्रारदारांना 15 दिवसानंतर बोलाविले व त्यांना एक पावती दिली.
3. तक्रारदारानी 15 दिवसानंतर नविन विग घेण्याकरीता रू. 4,000/-,सोबत घेऊन गेले असतांना त्यांना त्यांचा जुना विग दुरूस्त करून देण्यात आला. तक्रारदारांना सामनेवाले यांच्या व्यवहारामुळे धक्का पोहचला व फसवणुक झाल्याचे वाटले. त्यांनी सामनेवाले यांना दिलेले रू. 1,000/-, मागीतले असता सामनेवाले यांनी त्यास नकार दिला. तक्रारदारांनी सामनेवाले यांना स्पष्टपणे सांगीतले की, विग दुरूस्ती करीता दिला नव्हता. व त्यांना दुरूस्ती केलेला विग नको होता. त्यांनी सामनेवाले यांनी त्यांना पूर्ण रक्कम प्राप्त करावी अशी विनंती केली. सामनेवाले यांनी ते अमान्य केले. तक्रारदारानी नोटीस पाठविली व नंतर ही तक्रार दाखल करून दिलेले रू. 19,000/-,व्याजासह व नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारदारानी तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केली.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विग करीता मागणी नोंदविल्याबाबत मान्य केले व त्यांच्याकरीता विशेष करून विग तयार करण्यात आला होता असे कथन केले. तक्रारदारांनी जेव्हा दि. 15/06/2008 ला विग स्विकारला तेव्हा ते त्याबाबत पूर्ण समाधानी होत्या. तक्रारदार यांना विगबाबत कोणतीही अडचण किंवा त्रास झाला नाही. तक्रारदारांनी दोन महिने विग वापरल्यानंतर तो बदलवून मागीतला व रू. 1,000/-,अग्रीम राशी दिली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या निर्देशानूसार नविन विग तयार केला. सामनेवाले यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
5. उभयपक्षकारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला तक्रारदार यांच्या वतीने त्यांच्या वकीलांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला. सामनेवाले हे गैरहजर असल्यामूळे त्यांच्या प्लिडींग्स व लेखीयुक्तीवाद विचारात घेऊन अंतिम निर्णय पारीत करण्यात येत आहे.
6. उपरोक्त बाबींचा विचार करता खालील बाबी मान्य आहेत असे म्हणता येईल.
तक्रारदारानी विगची मागणी सामनेवाले यांच्याकडे नेांदविली होती. तक्रारदारानी रू. 18,000/-,अदा केल्यानंतर विग प्राप्त केला. तक्रारदारानी अंदाजे दोन महिने वापरल्यानंतर तो सामनेवाले यांना परत केला. तक्रारदारानी रू. 1,000/-, अग्रीम राशी म्हणून विग परत करतांना अदा केले. विग सामनेवाले यांच्याकडे आहे.
7. तक्रारदारानूसार विग स्विकारतांनाच त्या समाधानी नव्हत्या. परंतू सामनेवाले यांनी आश्वस्त केल्यामूळे त्यांनी तो स्विकारला. परंतू वापरतांना त्यांना त्रास जाणवू लागला. शेवटी दोन महिने वापरल्यानंतर तो परत केला व नविन विगची मागणी नोंदविली व रू. 5,000/-,पैकी रू. 1,000/-,अग्रीम राशी म्हणून अदा केली. सामनेवाले यांच्या प्रमाणे त्यांनी नविन विग तयार केला होता. तक्रारदार यांच्या प्रमाणे तो त्यांचा जुना विग दुरूस्त करून तयार ठेवला होता. जर खरेच तो विग नविन होता व तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे होता तर आमच्या मते तो नाकारण्यास काहीच कारण नव्हते. सामनेवोले यांनी दि. 13/08/2008 ची रू. 1,000/-,ची पावती तक्रारदाराना दिली. जी संचिकेत दाखल आहे. परंतू, या पावतीवरून जुना विग परत केला या बाबीचा उलगडा होत नाही व जुन्या विगकरीता तक्रारदार यांना किती मोबदला देण्यात आला होता हे सुध्दा नमूद नाही. पावतीमध्ये आकारण्यात येणारी रक्कम कशा करीता आहे हे सुध्दा स्पष्टपणे नमूद नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पहिल्या विगकरीता रू. 18,000/-,आकारलेत परंतू दुस-या नविन विगकरीता फक्त रू. 5,000/-,आकारले हे संयुक्तिक व संभवनीय वाटत नाही. ज्याअर्थी सामनेवाले यांनी पावतीमध्ये स्पष्टपणे लिहीले नाही, त्याअर्थी तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे किती रक्कम दुरूस्तीकरीता घेण्यात आली होती संयुक्तिक व संभवनीय वाटते. सामनेवाले यांनी व्यवहारात पारदर्शकता दाखविली नाही व एक प्रकारे अनुचित व्यापार पध्दत अवलंबीली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसुर केला व अनुचित व्यापारी पध्दत अवलंबीली हे सुध्दा सिध्द होते व त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाईकरीता पात्र आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचा विग अंदाजे दोन महिने वापरला त्याकरीता रक्कम आकारणे योग्य व उचित होईल त्याकरीता आमच्या मते रू. 1,000/-,दरमहा प्रमाणे दोन महिन्याकरीता रू. 2,000/-,वजा करणे योग्य होईल.
8. उपरोक्त चर्चेनूसार व निष्कर्षानूसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
9. या मंचाचा कार्यभार व इतर प्रशासकिय बाबी विचारात घेता ही तक्रार यापूर्वी निकाली काढता आली नाही.
आदेश
- तक्रार क्र. 269/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसुर केला व अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली असे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रू.17,000/-,(सतरा हजार) दि. 01/09/2008 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याजानी दि. 31/08/2016 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/09/2016 पासून 15 टक्के व्याज लागु राहिल.
- तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासाकरीता रू. 10,000/-,(दहा हजार) व तक्रारीचा खर्च रू. 10,000/-(दहा हजार) दि. 31/08/2016 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि.01/09/2016 पासून 10 टक्के व्याज लागु राहिल.
- तक्रारदार यांच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निःशुल्क पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
- npk/-