Exh.No.15
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 12/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि.05/03/2012
तक्रार निकाल झाल्याचा दि.02/05/2013
श्री राजू उर्फ गुरुदत्त श्रीधर बिर्जे
ए-1, नूतन को.ऑ.सोसायटी
सबनीसवाडा, सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) मे.बाळकृष्ण टेलिव्हेन्चर,
दुकान नं.3, साईनाथ प्लाझा,
उभाबाजार, सावंतवाडी
2) रेपल टेलिकॉम, दुकान नं.8 व 9,
वैश्यभवन, गवळीतिठा, सावंतवाडी
3) नोकिया केअर, वाटिका बिझनेस सेंटर तर्फे
रिजनल मॅनेजर, सुट नं.6, लेव्हल नं. 5, ‘सी’ विंग, टेकपार्क,
एअरपोर्ट रोड, येरवडा, पूणे- 411 006
4) नोकिया मॅन्युफॅक्चरर,
नोकिया केअर मॅनेजर, नोकिया इंडिया कंपनी,
एस.पी. इन्फोसिटी, इंडस्ट्रीअल प्लॉट II, 243,
उद्योगविहार फेज I, धुंदहारा,
गुरगाव, हरीयाणा-122 016 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे- गैरहजर.
निकालपत्र
(दि. 02/05/2013)
श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्याः- तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून नोकीया कंपनीचा मोबाईल रक्कम रु.13,900/- ला खरेदी केला परंतू सदरहू मोबाईल घेतलेनंतर वॉरंटी कालावधीतच मोबाईलमध्ये फोन हँग होणे, नेटवर्क न मिळणे वगैरे तक्रारी निर्माण झाल्यामुळे आपणांस सदरहू मोबाईलची व्याजासह किंमत, आर्थिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई तसेच विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेमुळे त्यांना दंड व शासन होणेकरीता तक्रारदाराने सदरहू तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारदाराचे तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून दि.27/07/2011 रोजी नोकीया कंपनीचा मॉडेल नं.C6-01-EMIE NO. 353759047631449 हा मोबाईल रक्कम रु.13,900/- ला खरेदी केला, परंतु सदरहू फोन खरेदी केलेनंतर त्यामध्ये फोन हॅंग होणे नेटवर्क न मिळणे इत्यादी तक्रारी आल्यामुळे त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 ला सांगितले असता त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे दुरुस्तीस देण्यास सांगितले व त्याप्रमाणे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे दुरुस्तीस दिला. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 ने दोन तासात दुरुस्त करुन दिला, पुन्हा बिघाड झाल्याने नोकिया केअर, म्हापसा याठिकाणी दि.01/08/2011 रोजी तक्रारदाराने दुरुस्तीस दिला, परंतु त्यानंतरही पुन्हा बिघाड आल्याने पुन्हा विरुध्द पक्ष क्र.1 कडे दिला. त्यानंतरही मोबाईलमधील बिघाड कायमच होता. त्यानंतर पाच वेळा विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिला, परंतू विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सदरहू मोबाईल वि.प.क्र.3 कडे पाठवायला पाहिजे असे सांगून प्रत्येक वेळी 10 ते 15 दिवस स्वतःकडे ठेऊन नंतर दुरुस्त करुन तक्रारदाराला दिला, परंतु शेवटपर्यंत तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्त झाला नाही, म्हणून तक्रारदाराने दि.29/12/2011 रोजी तोच तोच बिघाड पुन्हा पुन्हा होत असल्याने विरुध्द पक्ष क्र.2 कडे सदरहू मोबाईल दुरुस्तीसाठी दिला व मोबाईल बदलून मिळणेविषयी विंनती केली, परंतू त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधण्यास कळविले. त्यानंतर विरुध्द पक्षाच्या ई-मेल आयडीवर तक्रारदाराने सविस्तर तक्रार दिली. त्यानंतर तक्रारदाराने कस्टमर केअरशी वेळोवेळी संपर्क साधला तसेच ई-मेल आयडीवर मेल केले तरी कोणतीही दखल घेतले नसलेने तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांना दि.04/02/2012 रोजी रजिस्टर नोटीस पाठविली, परंतु विरुध्द पक्ष यांनी मोबाईल बदलून न दिलेने तसेच नुकसान भरपाई न दिलेमुळे तक्रारदाराने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे.
3) सदरहू तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष 1 ते 4 यांना पाठवण्यात आलेली आहे. सदरहू नोटीशीची बजावणी विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांचेवर झालेली आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हे या कामी हजर झाले परंतू त्यांनी म्हणणे दिलेले नाही. त्यांचे म्हणणेविना सदरहू तक्रार पुढे चालवण्यात आली. विरुध्द पक्ष 1,3,4 यांना नोटीस बजावणी होऊन ते हजर झाले नाहीत. त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालवणेचे आदेश मंचाने दि.23/04/2013 रोजी पारीत केले. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराने हजर केलेले कागदपत्रांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष यांनी त्रुटी केली आहे का ? | होय |
2 | तक्रारदाराला विरुध्द पक्ष हे त्यांनी खरेदी केलेल्या मोबाईलची रक्कम व्याजासहीत परत करणेस पात्र आहेत का? | होय |
3 | तक्रारदाराला मोबाईल बिघडलेला मिळाल्याने मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
- कारणमिमांसा –
4) मुद्दा क्र.1 ः- तक्रारदाराने दि.27/07/2011 रोजी मोबाईल खरेदी केल्यानंतर लगेचच मोबाईलमध्ये बिघाड झाला. विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे विरुध्द पक्ष क्र.1 चे सांगणेनुसार दुरुस्तीस दिला, परंतू पुन्हा बिघाड झाल्यामुळे दि.01/08/2011 रोजी नोकीया केअर म्हापसा-गोवा या ठिकाणी दिला, परंतू पुन्हा मोबाईलमध्ये मोबाईल हँग होणे नेटवर्क न मिळणे या तक्रार चालूच राहिल्याने दि.30/09/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.2 ने सदरहू मोबाईल विरुध्द पक्ष क्र.3 कडे पाठवावा लागेल असे सांगून 15 दिवसांनी मदर बोर्ड बदलला असे सांगून तक्रारदारास परत दिला. तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे दि.30/09/2011 रोजी दुरुस्तीस मोबाईल दिलेली जॉबशिट नि.3/2 सोबत हजर केलेले आहे. त्यामध्ये Major symptoms मध्ये फोनमधील तक्रारीचा उल्लेख केलेला आहे. तक्रारदाराने नि.3/1 वर विरुध्द पक्ष क्र.1 कडून मोबाईल खरेदी केलेले टॅक्स इन्हॉईस हजर केलेले आहे. दि.30/09/2011 रोजी दिलेला मोबाईल 15 दिवसांनी दुरुस्त करुन मिळालेनंतर पुन्हा दुस-याच दिवशी तोच बिघाड आढळल्यामुळे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.2 कडे दि.17/10/2011 पुन्हा मोबाईल दुरुस्तीस दिला. सदरहू जॉबशिट नि.3/3 वर तक्रारदाराने हजर केलेले आहे. त्यात फोन हँग होणे, सर्व्हीस न मिळणे इत्यादी तक्रारींचा उल्लेख आहे तसेच सदरहू जॉबशिटमध्ये comment या सदरात Sometime Handset Hang असे नमूद करण्यात आलेले आहे. सदरहू मोबाईल 15 दिवसांनी तक्रारदारास देण्यात आला. त्यावेळी त्याचा GMIE नंबर बदलण्यात आलेला आहे असे तक्रारदारास कळवण्यात आले. परंतू पुन्हा मोबाईल बिघडलेने पुन्हा 07/12/2012 रोजी वि.प.क्र.2 कडे दिला, वि.प.क्र.2 ने वि.प.क्र.3 कडे पाठवावा लागेल असे सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने सदरहू मोबाईल वारंवार नादुरुस्त होत असल्याने बदलून मिळण्याची विनंती केली. त्यावेळी वि.प.क्र.2 ने वि.प.क्र.3 व 4 शी संपर्क साधून फोन बदलून देण्यात येईल असे तोंडी सांगितले परंतू त्यानंतर सदरहू मोबाईल बदलून न देता 10 दिवसांनी जुनाच फोन दुरुस्त करुन दिला. यावेळी देण्यात आलेली जॉबशिट तक्रारदाराने नि.3/4 वर हजर केलेली आहे. सदरहू जॉबशिटमध्ये “Network required to switch off then network comes repeat at problem ” असा शेरा मारलेला आहे. त्यावरुन मोबाईलमध्ये बिघाड होता हे स्पष्ट दिसून येते.
त्यानंतर पुन्हा तोच बिघाड उद्भवल्याने तक्रारदाराने पुन्हा दि.29/12/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 कडे पुन्हा मोबाईल दुरुस्तीस दिला परंतू त्यावेळी प्रिंटरला प्रॉब्लेम असल्याचे सांगितले. तक्रारदाराचे सांगणेवरुन त्यांचेकडे मोबाईल दिलेचा पुरावा म्हणून ELS Report वर फोन व बॅटरी दिलेचे नमूद करुन सदरचा रिपोर्ट तक्रारदाराला दिला. तो तक्रारदाराने नि.3/5 सोबत हजर केलेला आहे. त्यावरुन विरुध्द पक्षाकडे फोन दिल्याचे दिसते. यावेळीही तक्रारदाराने फोन बदलून मागितला असता वि.प.क्र.2 ने कस्टमर केअरचा नंबर दिला. यावेळी जॉबशिट घेणेस तक्रारदार गेले असता त्यांना नि.3/6 वरील जॉबशिट देण्यात आले. यावेळी तक्रारदाराने मोबाईलचे पैसे अथवा मोबाईल बदलून मागितला असता वि.प.क्र.2 यांनी टाळाटाळ केली व त्यांनी दिलेला कस्टमर केअर नंबर तक्रारदाराने वेळोवेळी तक्रारी केल्या तसेच वि.प. यांचेकडे Mail करुन वेळोवेळी तक्रारी दिल्या परंतू वि.प. यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. सदरहू मोबाईल दि.29/12/2012 पासून अद्यापही वि.प.क्र.2 यांच्याच ताब्यात आहे व त्याप्रमाणे तक्रारदाराने नि.14 वर पुरसीस दिलेली आहे. तक्रारदाराने दि.04/02/2012 रोजी विरुध्द पक्ष यांना सदरहू मोबाईल दुरुस्त करुन न दिल्याने रजिस्टर नोटीस पाठविली, सदरहू नोटीस तक्रारदाराने नि.3/7 वर हजर केलेली आहे. या कामी विरुध्द पक्ष यांना नोटीस पोहोचूनही ते या कामी हजर झालेले नाहीत. यासंदर्भात आपली बाजू वि.प. यांनी मांडलेली नाही अथवा तक्रारदाराची तक्रार नाकारलेली नाही तसेच वि.प. यांनी दि.04/02/2012 रोजी पाठविलेल्या नोटीशीला काहीही उत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराच्या मोबाईलबाबत तक्रार आहे याची स्पष्ट कल्पना विरुध्द पक्ष यांना असतांना त्याचे तक्रारीचे निवारण जाणूनबुजून केलेले नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने मोबाईल खरेदी केल्याचे 7 महिन्याच्या कालावधीत एकंदरीत 6 वेळा वि.प. यांचेकडे मोबाईल दुरुस्तीस देऊनही वि.प. यांनी तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्त करुन देण्यात असमर्थता दर्शविलेली आहे तसेच त्यांनी या कामी त्यांना नोटीस पोहोचूनही त्यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारलेली नाही किंवा मोबाईल मुदतीत दुरुस्त करुन देण्यास टाळाटाळ केलेली दिसते. त्यामुळे वि.प.क्र.1 व 4 यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केलेली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे .
5) मुद्दा क्र.2 व 3– एकंदरीत तक्रारदाराने 6 वेळा विरुध्द पक्ष यांचेकडे मोबाईल दुरुस्तीस एकाच प्रकारच्या बिघाडासाठी दिलेला आहे, असे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तसेच हजर केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. तसेच वि.प. यांनी स्वतः हजर होऊन ही वस्तुस्थिती नाकारलेली नाही. त्यामुळे सदरहू मोबाईलमधील बिघाड हा दुरुस्ती न होणारा असा दिसतो. त्यामुळे तक्रारदाराला त्यांनी मोबाईल खरेदी करण्यासाठी दिलेले पैसे व्याजासहीत विरुध्द पक्षाने परत करणे योग्य आहे असे आमचे मत आहे. तक्रारदार हे स्वतः व्यवसायाने इंजिनिअर आहेत. त्यांचा मोबाईल खरेदी केल्यानंतर निम्यापेक्षा जास्त दिवस वि.प. यांचेकडेच होता असे दिसून येते तसेच वेळोवेळी मोबाईल दुरुस्तीस दयावा लागत असलेने त्यातील महत्वाची माहिती नष्ट होणार हे साहजिकच आहे आणि त्यामुळे तक्रारदारास वि.प. यांनी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास दिला हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांनी खरेदी केलेल्या मोबाईलची किंमत रक्कम रु.13,900/- ही रक्कम सदरहू मोबाईल वि.प.क्र.2 यांचेकडे शेवटचा दुरुस्तीस दिल्या तारखेपासून म्हणजेच दि.29/12/2011 पासून 9% व्याजाने परत मिळणेस पात्र आहेत, तसेच तक्रारदाराला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे व तक्रारदारास आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आले हे सिध्द झालेमुळे तक्रारदार रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळणेस पात्र आहेत व त्यानुसार आम्ही खालील अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मोबाईलची रक्क्म रु.13,900/- (रुपये तेरा हजार नऊशे मात्र) ही दि.29/12/2011 पासून 9% व्याजाने अदा करावी.
3) विरुध्द पक्ष क्र. 1 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तक्रारदाराला देण्यात येणा-या सेवेत कसूर केलेमुळे तसेच आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी म्हणून तक्रारदारास अदा करावी.
4) विरुध्द पक्ष क्र. 1 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- (रुपये एक हजार मात्र) तक्रारदारास अदा करावी.
5) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सदोष हँडसेट विरुध्द पक्ष क्र.1 यांना दयावा.
6) विरुध्द पक्ष क्र 3 यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
7) तक्रारदाराच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात. सदरहू आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी सदरहू तक्रारीचा निकाल पोच झालेनंतर 45 दिवसांत करावी
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 02/05/2013
Sd/- Sd/- Sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.