मंचाचे निर्णयांन्वये श्री. मिलिंद केदार, सदस्य. - आ दे श – (पारित दिनांक : 29/03/2011) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.2 व 3 चे वडिलांसोबत मौजा झिंगाबाई टाकळी येथील 11,000 चौ.फु.चा प्लॉट घेण्याचा करार हा दि.21 मार्च 1993 रोजी केला होता व त्याचा ताबाही दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासकडे नियमितीकरणाकरीता अर्जही केला होता. परंतू नंतर तक्रारकर्त्याचे निदर्शनास आले की, सदर भुखंड हा गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी विक्रीस काढलेला आहे. त्याबाबत तक्रारकर्त्याने आधीच्या करारनाम्याचे व नियमितीकरणाचे दस्तऐवज गैरअर्जदारांना दाखवून त्यांच्यामध्ये अटी व शर्ती ठरल्यानुसार मौजा झिंगाबाई टाकळी, प.ह.क्र.11, ख.क्र.106/1, प्लॉट क्र. 25, एकूण क्षेत्रफळ 11,000 चौ.फु. दि.22.02.2006 रोजी रु.4,00,000/- मध्ये घेण्याचा करार करण्यात आला व त्याबाबत कराराप्रसंगी रु.3,70,000/- देण्यात आले आणि उर्वरित रक्कम रु.30,000/- रजिस्ट्रीच्या प्रसंगी देण्याचे ठरले व भुखंडाचा ताबाही देण्यात आला. नागपूर सुधार प्रन्यासकडे सादर केलेल्या अर्जानुसार नियमितीकरणाच्या शुल्काची मागणी करणारे पत्र प्राप्त झाल्यावर दोन महिन्याच्या आत गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला विक्रीपत्र करुन देण्याचे गैरअर्जदार क्र. 1 यांनी मान्य केले होते. दि.06.04.2009 रोजी ना.सु.प्र.चे सदर प्रस्ताव पत्र व मागणी पत्र येऊनही गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला अट क्र. 5 नुसार विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्ता रु.30,000/- देण्यास तयार असून गैरअर्जदार विक्रीपत्र करुन देण्यास टाळाटाळ करीत आहे. याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 यांचेवर नोटीस बजावली. परंतू त्याचीही दखल गैरअर्जदार क्र. 1 ने घेतली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने मंचासमोर तक्रार दाखल करुन तीद्वारे मागणी केली की, उर्वरत रक्कम घेऊन विक्रीपत्र करुन द्यावे व प्रत्यक्ष ताबा द्यावा, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 1. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 2. 3. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, तक्रारकर्ता व श्री. वासुदेव सुर्यवंशी यांच्यात दि.21.03.1993 रोजी करार झाला होता व ती बाब त्यांनी गैरअर्जदार क्र. 3 पासून लपवून ठेवली होती. दि.22.02.2006 चा करार गैरअर्जदारांना मान्य आहे. तक्रारकर्त्याने ना.सु.प्र.कडे नियमितीकरणाकडे अर्ज केला होता व त्याला गैरअर्जदारांनी योग्य साथ दिली. परंतू तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना कोणतीही पूर्वसुचना न देता नियमितीकरणाबाबतचे पत्र व प्रस्ताव स्वतःच्या ताब्यात घेतले व उर्वरित रक्कम रु.30,000/- देण्याची टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याने ना.सु.प्र.च्या मागणीनुसार संपूर्ण शुल्क भरावे अशी विनंती तक्रारकर्त्यास करण्यात आली होती. तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याची इतर सर्व विपरीत विधाने अमान्य केली असून तक्रार खारीज करण्याची विनंती केली. 3. 4. सदर तक्रार मंचासमक्ष दि.16.03.2011 रोजी युक्तीवादाकरीता आली असता उभय पक्षांच्या लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले व तोंडी युक्तीवाद ऐकला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांसोबत कडून मौजा झिंगाबाई टाकळी, प.ह.क्र.11, ख.क्र.106/1, प्लॉट क्र. 25, एकूण क्षेत्रफळ 11,000 चौ.फु. खरेदी करण्याकरीता दि.22.02.2006 रोजी करारनामा केला होता, ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन तसेच तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 15 वरुन स्पष्ट होते. सदर करारनामा अंतर्गत भुखंडाची किंमत ही रु.4,00,000/- ठरली होती व त्याबाबत तक्रारकर्त्याने रु.3,70,000/- गैरअर्जदार क्र. 1 यांना दिल्याचे सदर करारनाम्यावरुन स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदार क्र. 2 व 3 ह्यांनी पॉवर ऑफ अटर्नी गैरअर्जदार क्र. 1 ह्यांना करुन दिले होते ही बाबसुध्दा दस्तऐवज क्र. 3 वरुन सिध्द होते व त्याद्वारे गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यासंबंधी व त्याचा विकास करण्यासंबंधी अधिकार प्रदान केले होते व त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे ऍड. श्री. सुरेश वाटकर, ऍड. श्री. बी. आर. देशमुख आणि ऍड. श्री. बी. पी. कुंभलकर यांनी वकालतनामा नि.क्र.8, पृष्ठ क्र.30 वर दाखल केलेला आहे व त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे उत्तर दाखल केले असून सदर उत्तराला प्रतिज्ञार्थी म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ह्यांनी स्वाक्षरी केली. गैरअर्जदार क्र. 1 ह्यांनी सदर उत्तरात नमूद केले की, ते गैरअर्जदार क्र. 2 व 3 चे आम मुखत्यार पत्रधारक असल्याने त्यांनी या प्रकरणात उत्तर दाखल केले आहे. त्यांनी आपल्या उत्तरामध्ये तक्रारकर्त्यासोबत 22.02.2006 रोजी भुखंडाचे विक्रीसंबंधीचा करार झाल्याची बाब मान्य केली. रु.3,70,000/- देणे बाकी असल्याचे नमूद केले आहे. ही बाब सुध्दा तक्रारकर्त्याने तक्रारीतील कथनात नमूद केली. 7. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये त्यांनी ना.सु.प्र.कडे नियमितीकरणाकरीता रु.4,28,761/- भरणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. तर गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात ही बाब मान्य केली असून सदर रक्कम भरण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे ही बाब नमूद केली आहे. तसेच करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार सदर रक्कम भरण्याची जबाबदारी ही खरेदीदाराची/तक्रारकर्त्याची राहील असे नमूद केले आहे. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यासचे नियमितीकरणाची रक्कम रु.4,28,761/- भरणे ही जबाबदारी तक्रारकर्त्याची असल्याचे मंचाचे मत आहे. सदर रक्कम भरल्यानंतर तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम रु.30,000/- गैरअर्जदारांकडे जमा करावे व रक्कम मिळाल्यापासून गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला 30 दिवसाचे आत विक्रीपत्र करुन द्यावे असे मंचाचे मत आहे. 8. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन घेण्याकरीता आवश्यक बाबी कोणत्या आहेत, त्या करण्याबाबत सुचविले नाही. तसेच भुखंडा बाबतची बहुतांश रक्कम स्विकारुनसुध्दा विक्रीपत्र करुन दिलेले नाही ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. 9. तक्रारकर्त्याने सदर प्रकरणी आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.6,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव असून तक्रारकर्त्याने नियमितीकरणाची रक्कम न भरल्याने विक्रीस विलंब लागला आहे, त्यामुळे तक्रारकर्ता सदर मानसिक व शारीरिक त्रासाची रक्कम मिळण्यांस पात्र नसल्याचे मंचाचे मत आहे. वरील सर्व निष्कर्षांच्या आधारे मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) तक्रारकर्त्याने भुखंड नियमितीकरणाचे शुल्क नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा करावे. 3) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्याने नियमितीकरणाचे शुल्क ना.सु.प्र.कडे भरल्यानंतर व तक्रारकर्त्याकडून उर्वरित रक्कम रु.30,000/- गैरअर्जदारांना मिळाल्यानंतर गैरअर्जदारांनी रक्कम मिळाल्यापासून एक महिन्याचे आत तक्रारकर्त्याला मौजा झिंगाबाई टाकळी, प.ह.क्र.11, ख.क्र.106/1, प्लॉट क्र. 25, एकूण क्षेत्रफळ 11,000 चौ.फु. चे विक्रीपत्र करुन द्यावे. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्याने सोसावा. 4) उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |