निकालपत्र (पारित दिनांक 24 मार्च, 2011) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता श्री गणपत पांडूरंग मेश्राम यांनी सदर ग्राहक तक्रार ही ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे संदर्भात दाखल केली असून मागणी केली आहे की, विरुध्दपक्ष यांचेकडून त्यांना रुपये 99,135/- ही रक्कम 24% व्याजासह मिळावी. ..2.. ..2.. 2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 त्यांचे लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली ही व्यवसायीक कारणासाठी घेतलेली असल्यामुळे सदर ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात यावी. 3. विरुध्दपक्ष क्रमांक 2 त्यांचे लेखी उत्तरात म्हणतात की, त्यांनी डिमांड ड्राप्ट हा विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्या खात्यात जमा केल्यानंतर तक्रारकर्ता यांच्या लोन खात्यात ती रक्कम दर्शविण्यात आली व त्यावर व्याज लावण्यात आले त्यामुळे त्यांच्या विरोधातील तक्रार ही खारीज करण्यात यावी. कारणे व निष्कर्ष 4. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना ट्रॅक्टर व ट्रॉली करीता दिनांक 04/01/2010 रोजी रुपये 2,50,000/- हे नगदी दिले आहेत व रुपये 4,50,000/- ही रक्कम विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून तक्रारकर्ता यांनी दिनांक 07/01/2010 रोजी घेतलेल्या लोन व्दारा देण्यात आली आहे. शिवाय विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना दिलेले दिनांक 23/12/2009 चे कोटेशन हे रुपये 7,00,000/- चे आहे व विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना दिनांक 27/01/2011 रोजी अधिवक्ता व्दारा दिलेल्या नोटीस मध्ये ट्रॅक्टर व ट्रॉली करीता रुपये 7,00,000/- प्राप्त झाले ही बाब मान्य केली आहे. 5. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना दिनांक 23/12/2009 रोजी मॉडेल नंबर 255 YU, चेसीस व सिरियल नंबर BLM 12108 हा ट्रॅक्टर दिला. तक्रारकर्ता यांचे म्हणणे प्रमाणे जानेवारी-2010 मध्ये नागरमध्ये निर्मीती दोष आल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी नागर हा ट्रॅक्टरसह परत घेतला. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना दिनांक 26/04/2010 रोजी तक्रारकर्ता यांना नोंदणी क्रमांक MH-35/G 3689 हा नविन ट्रॅक्टर दिला आहे, ज्याचा चेसीस व इंजिन नंबर BLM-13071 असा आहे. 6. तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी ट्रॉली नोंदणी क्रमांक MH-35/6756, नोंदणी दिनांक 18/02/2010 ही दिली आहे परंतू ट्रॅक्टर दिनांक 26/04/2010 रोजी मिळाल्यामुळे तक्रारकर्ता ट्रॉलीचा वापर करु शकले नाही ही बाब कबूल करता येते. 7. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडून दिनांक 07/01/2010 रोजी रुपये 4,50,000/- लोन घेतले आहे त्याचे व्याजासह हप्ते सुरु झाले मात्र दिनांक 26/04/2010 पर्यंत विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडून ट्रॅक्टर प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता यांचे आर्थीक नुकसान झाले ही बाब मान्य करता येण्यासारखी असली तरी तक्रारकर्ता यांनी ट्रॅक्टर ..3.. ..3.. चालकास रुपये 12,000/- दिले व त्यांचे शेतीविषयक कामाचे रुपये 30,000/- नुकसान झाले ही बाब कोणताही पुरावा नसल्यामुळे स्विकारता येत नाही. 8. तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना आर्थीक सुरक्षेसाठी कोरा धनादेश क्रमांक 721576, सिंडीकेट बँक, गोंदिया हा देण्यात आला होता जो पूर्ण पैसे देवून झाल्यानंतरही विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी परत केला नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांचे विरोधात या धनादेशासंदर्भात रुपये 32,000/- चा हा धनादेश न वटता परत आला या कारणावरुन न्याय दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, तुमसर यांचे न्यायालयात फौजदारी फिर्याद, परकाम्य अभिलेख (Negotiable Instrument Act) च्या कलम 138 व 142 व भा.द.वि. च्या कलम 420 अंतर्गत दाखल केली आहे, जी सदर न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात ट्रॉली पासींग करीता लागणारी रक्कम रुपये 32,000/- करीता तक्रारकर्ता यांनी दिनांक 10/08/2010 चा हा धनादेश दिला होता अशी भुमिका विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी घेतली आहे. मात्र विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्या दिनांक 11/12/2009 च्या करारनाम्यात रुपये 32,000/- बद्दल उल्लेख नाही. 9. संपूर्ण रक्कम प्राप्त झाल्यानंतरही योग्य ट्रॅक्टर तक्रारकर्ता यांना जवळपास 4 महिने न देणे हा विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा सेवादोष आहे. 10. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांना दिनांक 07/01/2010 रोजी रुपये 4,50,000/- ही रक्कम लोन म्हणून दिलेली आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्या दृष्टीबंधन सह ऋण करारातील सहाव्या अनुसूचीत पहिला कर्जहप्ता हा रुपये 7,500/- असा नमूद केला असून देय तिथी ही दिनांक 31/03/2010 अशी दर्शविली आहे. मात्र विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांचे बचत खात्यातून क्रमांक 921910110000676 नॉर्मल इंटरेस्ट म्हणून दिनांक 30/01/2010 रोजी रुपये 3107/- लोन खात्यात वळते केले, दिनांक 26/02/2010 रोजी रुपये 3626/-असे व्याज म्हणून घेतले आहे व रुपये 750/- डेबीट केले आहेत. तसेच दिनांक 26/02/2011 रोजी दस्ताऐवजाकरीता म्हणून रुपये 1500/- अशी एकूण रक्कम रुपये 8983/- घेतली आहे ही विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचे सेवेतील न्युनता आहे. 11. तक्रारकर्ता यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली ही व्यवसायीक कारणासाठी घेतली हे विरुध्दपक्ष यांनी सिध्द केलेले नाही. असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 2,50,000/- (अक्षरी रुपये दोन लाख, पन्नास हजार फक्त) या रक्कमेवर दिनांक 04/01/2010 ..4.. ..4.. पासून दिनांक 25/04/2010 पर्यंत तर रुपये 4,50,000/- (अक्षरी रुपये चार लाख, पन्नास हजार फक्त) या रक्कमेवर दिनांक 07/01/2010 पासून दिनांक 25/04/2010 पर्यंत 7% या दराने व्याज दयावे. 2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना शारिरीक व मानसिक त्रासासाठी रुपये 3000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000 दयावेत. 3. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी रुपये 8983/- ही रक्कम तक्रारकर्ता यांच्या पुढील कर्जहप्त्यांमध्ये समायोजीत करुन घ्यावी. 4. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये 2000/- ही रक्कम दयावी. 5. आदेशाचे पालन हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी आदेशाचे तारखेपासून 2 महिण्याचे आत करावे.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |