नि.74 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर मूळ तक्रार क्रमांक : 62/2009 मूळ तक्रार दाखल झाल्याचा दि.07/03/2009 मूळ तक्रार निकाली झाल्याचा दि.13/11/2009 फेरचौकशी तक्रार क्रमांक : 32/2010 तक्रार फेरचौकशीस दाखल झाल्याचा दि.21/05/2010 निकाली झाल्याचा दि.01/11/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.संजय शंकर वाडकर रा.काळकाईकोंड, दापोली, ता.दापोली, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. मे. बाफना मोटार्स प्रा.लि., डि.69, एम.आय.डी.सी.मिरजोळे, ता.जि.रत्नागिरी 415 639. 2. टाटा मोटार्स लिमीटेड कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिट तिन हाथ नाका, ग्यान सदन कॉलेज सर्व्हीस रोड, एल.बी.एस.रोड, वाघळे इस्टेट, ठाणे (प.) ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.ए.एस.कदम,श्री.ए.ए.कदम सामनेवाले : विधिज्ञ श्री.एम.बी.भाटवडेकर. -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्या, श्रीमती स्मिता देसाई 1. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी विक्री पश्चात देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे म्हणून प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांचा फुले विक्रीचा व्यवसाय आहे. परंतु त्यातून फारशी अर्थप्राप्ती होत नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी सामनेवाला यांचकडून टेंपो खरेदी केला. टेंपोवर पगारी ड्रायव्हरची नियुक्ती केली. टेंपो घेतल्यानंतर थोडयाच दिवसात सदर टेंपोच्या ब्रेक, स्टिअरींगबाबत व ऑईल लीकेजबाबत दोष आढळून आले. तक्रारदार यांनी टेंपोच्या दोषांबाबत सामनेवाला यांचेशी वेळोवेळी संपर्क साधला व टेंपोच्या दुरुस्तीसाठी वारंवार सामनेवाला यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेले परंतु सामनेवाला यांनी टेंपोमधील दोष पूर्णपणे दूर केले नाहीत. टेंपोतील दोषांमुळे सदर टेंपोच्या टायर्समध्येपण दोष निर्माण झालेचे तक्रारदार यांना आढळून आले. तक्रारदार यांनी याबाबत सामनेवाला यांचेशी संपर्क साधला परंतु सामनेवाला यांनी तात्पुरत्या स्वरुपाची दुरुस्ती करुन दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी नंतर स्वतः खर्च करुन टायर बदलून घेतला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे टेंपोच्या दोषाबाबत वेळोवेळी तक्रार केली परंतु सामनेवाला यांनी टेंपोची तात्पुरती दुरुस्ती करुन दिली परंतु टेंपोतील मुख्य दोष दूर केले नाहीत व सदोष सेवा दिली. त्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेतील त्रुटीमुळे सोसाव्या लागलेल्या खर्चापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.1,00,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.50,000/- ची नुकसानभरपाई तसेच सदर टेंपोचा सामनेवाला यांनी मुख्य दोष दूर करावा अथवा त्या जागी नवीन टेंपो तक्रारदार यांना देण्यात यावा अशी मागणी करत प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पृष्ठयर्थ नि.2 वर शपथपत्र, नि.3 वर ड्रायव्हर सुभाष सुकाळे यांचे शपथपत्र, नि.5 वरच्या कागदपत्रांच्या यादी अन्वये कागदपत्रे नि.5/1 ते नि.5/4, नि.17 वर सामनेवाला क्र.2 यांना पक्षकार करण्यासाठी अर्ज, जो मंचातर्फे मंजूर करण्यात आला, नि.33 वर प्रतिउत्तर, नि.34 वर प्रतिउत्तरासोबतचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी प्रतिउत्तरामध्ये सामनेवाला यांचे नि.10 वरील म्हणण्यातील सर्व मजकूर हा वस्तुस्थितीशी विसंगत तसेच पूर्णपणे चूकीचा व खोडसाळ आहे असे नमूद करुन सामनेवाला यांचे म्हणणे अमान्य केले आहे. तसेच तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतरही तक्रार अर्जात नमूद कारणांसाठी टेंपो सामनेवाला यांचेकडे दुरुस्तीसाठी घेवून गेले होते परंतु अद्यापही सामनेवाला यांनी टेंपोमधील दोष दूर केले नाहीत असे तक्रारदार यांनी त्यांच्या प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. शेवटी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात यावा अशी मंचासमोर विनंती केली आहे. नि.37 वर लेखी युक्तिवाद व नि.46 अन्वये न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत. 3. सामनेवाला क्र.1 यांनी नि.10 वर आपले म्हणणे दिलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदार हे सदरचा टेंपो हा व्यापारी कारणासाठी वापरतात त्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होत नाहीत असा आक्षेप घेतलेला आहे. तक्रारदार यांना विक्री केलेल्या टेंपोमध्ये दोष नव्हते व नाहीत व तथाकथीत तक्रारदार यांच्या तक्रारीचे निराकरण सामनेवाला यांनी वॉरंटी कालावधीत करुन दिलेले आहे. तसेच तक्रारदार हे शास्त्रीय नियमाप्रमाणे वाहन चालवित नसल्याने वाहनामध्ये दोष निर्माण झाले होते असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.11 वर शपथपत्र, नि.12 अन्वये कागदपत्रांची यादी, त्याप्रमाणे नि.12/1 ते नि.12/11 वर कागदपत्रे, नि.36 वर लेखी युक्तिवाद, नि.43 कागदपत्रांची यादी, त्याप्रमाणे नि.43/1 वर एक कागद, नि.44 वर न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत. तसेच नि.68 च्या अर्जान्वये नि.68/1 वर कागदपत्रे हजर केली आहेत. 4. सामनेवाला क्र.2 यांनी नि.29 च्या अर्जाप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांचेप्रमाणेच सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणे आहे अशी पुरशीस दिलेली आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांवरुन न्यायमंचाने सदरचा तक्रार अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदी नुसार ग्राहक होत नाही असा निष्कर्ष नोंदवून दि.13/11/2009 रोजी नि.47 च्या निकालपत्रान्वये तक्रारदार यांचा तक्रार अर्ज क्र.62/2009 नामंजूर केला. 6. तक्रारदार यांनी तक्रार क्र.62/2009 च्या निकालाविरुध्द सन्मा.राज्य आयोग, मुंबई येथे अपिल क्र.1438/2009 दाखल केले. सदर अपिलाचा निकाल दि.25/02/2010 रोजी झाला व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच रत्नागिरी यांनी दिलेला आदेश रद्दबातल ठरवून तक्रार अर्ज क्र.62/2009 फेरचौकशीसाठी गुणागुणावर ठरविण्यासाठी परत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच रत्नागिरी येथे पाठविण्यात आला. नि.58 वर सन्मा.राज्य आयोगाने अपिल क्र.1438/2009 मध्ये दिलेल्या निकालाची सहीसूद नक्कल दाखल आहे. 7. तक्रारदार यांनी नि.48 दि.21/05/2010 रोजी अर्ज देवून प्रकरण क्र.62/2009 मध्ये फेरचौकशीचे आदेश सन्मा.राज्य आयोग यांनी दिले आहेत त्याच्या अनुषंगाने योग्य ते आदेश करण्यात यावेत अशी विनंती केलेली आहे व अर्जासोबत नि.49/1 वर अपिल क्र.1438/2009 ची सहीसूद नक्कल दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या नि.48 च्या वरच्या अर्जावर तक्रारदार व सामनेवाला यांना उपस्थित रहाण्यासाठी नोटीस काढण्यात यावी असा मंचातर्फे आदेश करण्यात आला. 8. तक्रारदार हे नि.56 च्या पुरशिस अन्वये व सामनेवाला क्र.1 व 2 हे नि.55 च्या पुरशिस अन्वये प्रस्तुत प्रकरणात उपस्थित झाले. 9. सन्मा.राज्य आयोगाने अपिल क्र.1438/2009 मध्ये प्रकरण क्र.62/2009 च्याबाबत दिलेल्या निर्देशाप्रमाणे न्यायमंचापुढे खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित झालेले आहेत. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | सामनेवाला क्र.1 व 2 यांनी विक्री पश्चात तक्रारदार यांना देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर. | 3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 10. मुद्दा क्र.1 – सामनेवाला क्र.2 यांनी सदर तक्रार अर्जामध्ये नि.29 वरील पुरशिसअन्वये सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेप्रमाणेच सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणे आहे असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी सदर तक्रार अर्जामध्ये दाखल केलेल्या नि.12/2, नि.12/11 व नि.68/1 वरील सर्व्हिस हिस्टरीचे अवलोकन करता तक्रारदार हे टेंपोच्या दोषांच्या दुरुस्तीसंदर्भात सामनेवाला यांच्या रत्नागिरी, चिपळूण व दापोली सर्व्हिस सेंटरमध्ये दि.10/09/2008 पासून दि.07/05/2010 पर्यंत वारंवार टेंपो घेवून जात होते हे स्पष्ट होते. तसेच सामनेवाला यांनी नि.12/1 वर दाखल केलेल्या वाहनाबाबतच्या माहितीवरुन वाहनांचा वॉंरंटी कालावधी वाहन खरेदी केल्यापासून तीन वर्षे अथवा 3,00,000 कि.मी. यापैकी जी बाब अगोदर होईल तोपर्यंत वाहनाचा वॉंरंटी कालावधी असतो असे नमूद आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या नि.68/1 वरील सर्व्हिस हिस्टरीचे अवलोकन करता तक्रारदार यांच्या टेंपोमध्ये वाहन खरेदी केल्यापासून वेळोवेळी वॉरंटी कालावधीतच दोष निर्माण झालेले आढळून येतात. तसेच तक्रारदार यांच्या टेंपोचे रनिंग 47,820 कि.मी. पर्यंत झालेले दिसून येते. तसेच सामनेवाला हे तक्रारदार यांच्या टेंपोच्या दोषांसंदर्भात दुरुस्ती करुन देत होते असेही सामनेवाला यांनी दाखल केलेल्या नि.68/1 वरील सर्व्हिस हिस्टरीवरुन स्पष्ट होते. परंतू सामनेवाला यांनी टेंपोच्या दोषाबाबत दुरुस्ती केल्यानंतरही तक्रारदार हे वांरवार टेंपोच्या ब्रेकच्या, ऑईल लिकेजच्या, टायरच्या दुरुस्तीच्या संदर्भात वेळोवेळी सामनेवाला यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये टेंपोच्या दोषांचे निराकरण करण्यासाठी जात होते असे तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. सामनेवाला यांनी नि.10 वरील म्हणण्यामध्ये तक्रारदार हे शास्त्रीय नियमाप्रमाणे वाहन चालवित नसल्यामुळे वाहनामध्ये दोष निर्माण झाले होते असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी नि.43 वर टायरबाबतचे फोटोग्राफस व माहितीपत्र, नि.12/3 वर जे.के.टायर्स अँड इंडस्ट्रीज यांचे तक्रारदार यांना दिलेल्या पत्राची झेरॉक्सप्रत, नि.12/4 वर सामनेवाला क्र.2 यांना सामनेवाला क्र.1 यांनी दिलेले पत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी नि.12/3 वर जे.के.टायर्स अँड इंडस्ट्रीज यांनी दिलेल्या पत्राची झेरॉक्सप्रत दाखल केलेली आहे परंतु त्यासंदर्भात जे.के.टायर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या पत्र दिलेल्या अधिकृत व्यक्तिचे शपथपत्र दाखल केलेले नाही त्यामुळे सामनेवाला यांनी नि.12/3 वर दाखल केलेला पुरावा ग्राहय धरणे उचित होणार नाही असे या मंचाचे मत झाले आहे. सदर तक्रार अर्जामध्ये तक्रारदार हे शास्त्रीय नियमाप्रमाणे वाहन चालवित नव्हते त्यामुळे टेंपोमध्ये दोष निर्माण झाले या आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ सामनेवाला यांनी तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदार हे शास्त्रीय नियमाप्रमाणे वाहन चालवित नव्हते म्हणून टेंपोमध्ये दोष निर्माण झाले ही बाब स्पष्ट होत नाही असे या मंचाचे मत झाले आहे. सामनेवाला यांनी नि.12/5 व नि.12/6 वर जॉब कार्ड हजर केले आहेत परंतु सदर जॉब कार्डावरुन तक्रारदार यांच्या टेंपोच्या दोषांचे पूर्णपणे निराकरण करण्यात आले होते ही बाब स्पष्ट होत नाही. तक्रारदार हे टेंपोच्या दुरुस्तीसंदर्भात संतुष्ट झाले होते, जॉब कार्डावर त्यांच्या सहया सामनेवाला यांनी घेतल्या होत्या असा पुरावाही सामनेवाला यांनी सदर तक्रार अर्जामध्ये दाखल केलेला नाही. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून खरेदी केलेल्या टेंपोमध्ये अनेक त्रुटी व दोष आढळून आले या तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील म्हणण्यामध्ये तथ्य आढळून येते. त्यामुळेच तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये वेळोवेळी दुरुस्तीसाठी जावे लागले हे तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जावरुन व तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द केले आहे असे या मंचाचे मत झाले आहे. या संदर्भात आम्ही खालील न्यायनिवाडा विचारात घेत आहोत. 2009 C.P.J. Page 417 Delhi SCDRC , TATA MOTORS LTD., V/S. MANOJ GADI ‘Once consumer proves from job cards that vehicle taken on number of occasion for removing defects – onus shift on manufacturers to prove that vehicle did not suffer from defects.’ असा निष्कर्ष नोंदविला आहे. सदर न्यायनिवाडयाचे निष्कर्ष विचारात घेता तक्रारदार यांना देण्यात येणा-या सेवेमध्ये सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्रुटी निर्माण केलेली आहे हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे अशा मताशी मंच येत आहे. सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या नि.10 वरील म्हणण्यामध्ये व नि.11 वरील शपथपत्रामध्ये सामनेवाला क्र.1 हे डिलर आहेत व त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत असे नमूद केले आहे. परंतू नि.5/2 वरील तक्रारदार यांनी दाखल केलेल्या टेंपोच्या खरेदी पावतीचे अवलोकन करता तक्रारदार यांनी दिलेली रक्कम सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 तर्फे स्विकारली होती असे निदर्शनास येते. त्यामुळे सामनेवाला क्र.1 व सामनेवाला क्र.2 हे दोघेही संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना दिलेल्या सदोष सेवेबाबत जबाबदार आहेत अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. या संदर्भात आम्ही खालील न्यायनिवाडे विचारात घेत आहोत. 1. 2009 C.P.J. Page 80 NCDRC SHANKAR AUTO MOBILES V/S. DEEPAK KUMAR SINGH ‘Dealer having received amount undertaken to do free service and rectify defects during warranty, cannot escape liability towards manufacturing defects found in vehicle.’ 2. II (2010) C.P.J. Page No.466 Kerala SCDRC Thiruvananthapuram PIONEAR MOTORS (KANNUR) PVT. LTD., V/S. WINSPOT TAILORS & ANR. ‘Manufacturer and dealer parties for selling products-dealer cannot evade from responsibility of defective products-dealer liable.’ अशाप्रकारे निष्कर्ष नोंदविले आहेत. वरील सर्व न्यायनिवाडे विचारात घेता व तक्रारीत दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली आहे अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. 11. मुद्दा क्र.2 - 1. तक्रारदार यांनी आपल्या मागणी क्र.1 मध्ये तक्रारदार यांना सोसाव्या लागलेल्या खर्चापोटी, आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.1,00,000/- ची नुकसानभरपाई सामनेवाला यांचेकडून मिळावी अशी मंचासमोर विनंती केली आहे व मागणी क्र.2 मध्ये रक्कम रु.50,000/- सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी मिळावे अशी विनंती केलेली आहे. तक्रारदार यांनी खर्चापोटी व आर्थिक नुकसानपोटी रक्कम रु.1,00,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- नुकसानी कशी झाली याबाबतचा पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी नि.5/1 वर टेंपोच्या दुरुस्तीबाबतच्या खर्चाच्या 6 पावत्या व नि.5/3 वर फोटोची पावती व फोटोग्राफस् हजर केलेले आहेत. परंतु त्यासंदर्भात पावत्या देणा-यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. तसेच तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात टेंपो धंद्याच्या कामासाठी बाहेर दुसरीकडे नेण्याचे ठरलेले असतानासुध्दा ते भाडे चुकवून टेंपोच्या दुरुस्तीसाठी सामनेवाला यांचे सर्व्हिस सेंटरला जावे लागले व ड्रायव्हरच्या जेवणखाण्याचा, डिझेलचा खर्च सोसावा लागला. या आपल्या खर्चाच्या तक्रारीच्या संदर्भात पुरावा हजर केलेला नाही तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी लेबर चार्जेस व मटेरियल चार्जेस आकारले त्यामुळे तक्रारदार यांना खर्च झाला या आपल्या खर्चाच्या तक्रारीच्या समर्थनार्थ सामनेवाला हे सदर खर्च देण्यास कसे जबाबदार आहेत, वॉरंटी कालावधीत सदर खर्च सामनेवाला यांनी आकारायचा होता की नव्हता याबाबतही सबळ पुरावा सदर तक्रारीत तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी सदर टेंपोमध्ये मूलभूत दोष होते याबाबतही तज्ञांचा अहवाल सादर केलेला नाही. तक्रारदार यांनी नि.5/2 वर दाखल केलेल्या टेंपोच्या खरेदीच्या पावतीवर Hypothecation : M/s.Dapoli Urban Co-Op.Bank Ltd., Br.Dapoli असे नमूद आहे यावरुन व तक्रारदार यांचे नि.2 वरील शपथपत्रावरुन तक्रारदार यांनी कर्ज घेवून टेंपो घेतला होता या तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील म्हणण्याबाबतची पृष्ठी मिळते. तसेच तक्रारदार यांनी नि.3 वर तक्रारदार यांच्या टेंपोवर नेमलेल्या ड्रायव्हर श्री.सुभाष सुकाळे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे त्यामुळे टेंपोवर ड्रायव्हर नेमला होता या तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील म्हणण्याला पृष्ठी मिळते असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी नि.10 वर तक्रारदार हे स्वतः टेंपो चालवित नाहीत त्यासाठी त्यांनी पगारी ड्रायव्हर ठेवला असे नमूद केले आहे यावरुन तक्रारदार यांनी ड्रायव्हर नेमला हे त्यांनी मान्य केले आहे असे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी खर्चापोटी व आर्थिक नुकसानीपोटी व मानसिक नुकसानीपोटी सदर तक्रार अर्जामध्ये सबळ पुरावा हजर केलेला नसला तरीपण तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांना सामनेवाला यांनी दोषयुक्त अशा प्रकारचे वाहन दिल्यामुळे तक्रारदार यांना निश्चितच वेळोवेळी टेंपोच्या दुरुस्तीसाठी सामनेवाला यांचे रत्नागिरी, चिपळूण व दापोली सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागले हे स्पष्ट होते. तक्रारदार यांच्या नि.2 वरील शपथपत्रावरुन तक्रारदार हे काळकाईकोंड ता.दापोली येथे रहातात असे दिसून येते. तक्रारदार हे वेळोवेळी सामनेवाला यांचे सर्व्हिस सेंटरमध्ये गेले परंतू सामनेवाला यांनी टेंपोच्या दोषांचे निराकरण पूर्णपणे केले नाही. तसेच तक्रारदार यांच्या नि.33 वरील प्रतिउत्तराप्रमाणे व सामनेवाला यांनी नि.68/1 वर दाखल केलेल्या सर्व्हिस हिस्टरीप्रमाणे तक्रारदार हे सदर टेंपोच्या दोषांबाबत तक्रार दाखल झाल्यानंतरही सामनेवाला यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये वॉरंटी कालावधीत टेंपोच्या दुरुस्तीबाबत जात होते परंतु त्यांच्या टेंपोमधील दोषांबाबतच्या तक्रारींचे निराकरण पूर्णपणे केले नाही हे स्पष्ट होते. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांना निश्चितच खर्चास व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागलेले आहे त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून खर्चापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.30,000/- (रु.तीस हजार मात्र) मिळण्यास पात्र ठरतात अशा मताशी आम्ही आलो आहोत. या संदर्भात आम्ही खालील न्यायनिवाडा विचारात घेत आहोत. 1 (2009) C.P.J. Page 270 NC MARUTI UDDYOG LTD., V/S. ATUL BHARADWAJ & ANR. “Vehicle taken many times to service center resulting inconvenience – compensation and cost awarded. ” असा निष्कर्ष नोंदविला आहे. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी व प्रकरण खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) तक्रारदार यांना देण्याचा आदेश सामनेवाला क्र.1 व 2 यांना करणे योग्य होईल अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. 2. तक्रारदार यांनी आपल्या मागणी क्र.3 मध्ये सामनेवाला यांना टेंपोमधील मुख्य दोष दूर करुन कायमचा बंदोबस्त करण्याचा आदेश करण्यात यावा अथवा सामनेवाला यांनी सदरचा टेंपो परत घेवून त्याठिकाणी नवीन टेंपो द्यावा अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. तक्रार अर्जामध्ये दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार हे अजूनही सदर टेंपोचा वापर करतात हे स्पष्ट होते. सदर टेंपोमध्ये मूलभूत दोष आहे हे दाखविण्याची जबाबदारी तक्रारदार यांची होती. परंतू त्याबाबत तक्रारदार यांनी तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही अथवा मूलभूत दोषांबाबत सदर टेंपो तज्ञांकडून तपासण्यात यावा अशा प्रकारचा अर्जही तक्रार अर्जात दाखल केलेला नाही. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी तक्रारदार यांची सदरची मागणी मान्य करणे योग्य व संयुक्तिक होणार नाही अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना झालेल्या खर्चापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.30,000/- (रु.तीस हजार मात्र) अदा करावेत. 3. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व प्रकरण खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) अदा करावेत. 4. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वर नमूद आदेशाची पूर्तता दि.01/12/2010 पर्यंत करण्याची आहे. 5. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 01/11/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |