(पारीत व्दारा श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक– 23 ऑगस्ट, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत दोन्ही तक्रारी या ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द ग्राहक मंचा समोर जरी वेगवेगळया दाखल केलेल्या असल्या तरी या दोन्ही प्रकरणातील तक्रारकर्ता हा एकच आहे आणि या दोन्ही तक्रारीं मधील वस्तुस्थिती सुध्दा सारखीच आहे आणि ज्या कायदे विषयक तरतुदींचे आधारावर या दोन्ही तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदे विषयक तरतुदी सुध्दा सारख्याच आहेत म्हणून आम्ही या दोन्ही तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकालपत्र पारीत करीत आहोत.
02. तक्रार क्रं-CC/14/60 मधील तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा उपरोक्त नमुद पत्त्यावर भंडारा येथे राहतो. यातील विरुध्दपक्ष ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि. हे मरुती सुझुकी इंडीया प्रा.लि. या वाहन निर्माता कंपनीचे अधिकृत डिलर असून त्यांचे भंडारा व नागपूर येथे अनुक्रमे विक्री व सेवा केंद्र आहे. (विरुध्दपक्ष ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर जे मरुती सुझूकी इंडीया प्रा.लि. या वाहन निर्माता कंपनीचे भंडारा व नागपूर येथील डिलर व विक्रेता आहेत, त्यांना या निकालपत्रात “विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता” असे संबोधण्यात येईल) तर विरुध्दपक्ष मरुती सुझूकी ऑफ इंडीया लिमिटेड, गुरगाव, हरीयाना ही एक चारचाकी वाहन निर्माता कंपनी आहे. (विरुध्दपक्ष मरुती सुझूकी ऑफ इंडीया लिमिटेड, गुरगाव, हरीयाना या वाहन निर्माता कंपनीस निकालपत्रात वाहन निर्माता कंपनी असे संबोधण्यात येईल) तर विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया ऐश्योरन्स कंपनी लि. दिल्ली ही एक विमा कंपनी आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने स्वतःचे व कुटूंबाचे उपयोगासाठी विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांचे भंडारा येथील शोरुम मधून दिनांक-31.08.2013 रोजी मरुती डिझायर (व्ही.एक्स.आय.) कार खरेदी केली होती, त्या कारचा Chasis No.-MA3EJKD1S00368703, Engine No.-1284592, Registration No.-MH-36-H-4069 असा आहे. सदर कार कोटेशन नुसार एकूण रुपये-6,33,853/- एवढया किमतीत खरेदी केली होती. सदर कार त्याने युनियन बँक ऑफ इंडीया कडून कर्ज घेऊन खरेदी केली होती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर कार त्याने दिनांक-08.11.2013 रोजी त्याचे घरा समोरील पोच मध्ये पार्कींग केली होती. परंतु असे असताना दिनांक-10.11.2013 रोजी रात्री 11.15 वाजताचे सुमारास कारला अचानक आग लागली व त्या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आणि ती दुरुस्त होण्या पलीकडील आहे. वस्तुतः सदर कार खरेदी केल्या नंतर ती फक्त दोन महिने आणि ती फक्त 670 किलोमीटर चालली होती. सदर कार दुरुस्त होण्यापलीकडील असल्याने त्याने भंडारा येथील स्थानिक विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांना दिनांक-11.11.2013 रोजी कळविले होते तसेच त्याच दिवशी तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे कार जळाल्या बाबत तक्रार नोंदविली होती व विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांना दुरध्वनी वरुन सुध्दा सुचना दिली होती. भंडारा येथील विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांनी सदरची कार त्यांचे कामठी रोड नागपूर येथील सर्व्हीस सेंटरमध्ये पाठवावी अशी सुचना दिली, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांचे नागपूर येथील सर्व्हीस सेंटरवर कार नेऊन दिली, सदर कार नेण्यासाठी त्याला रुपये-5500/- एवढा खर्च आला परंतु सदरचा खर्च वाहन डिलर/विक्रेता यांनी दिला नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने खरेदी केलेली कार घराचे पोर्च मध्ये बंद स्थितीत असताना अचानक कारचे इंजिनला आग लागल्याने त्याला विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांनी हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक उत्पादकीय दोष असलेल्या कारची विक्री करुन त्याची फसवणूक केली. विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांनी सदर कारचे निरिक्षण, संशोधन व तपासणी या करीता शुल्क रुपये-2500/- तक्रारकर्त्या कडून घेतले परंतु इंजिन मध्ये दोष असल्या बाबत सांगितले नाही वा तपासणी संबधात कोणतेही दस्तऐवज पुरविले नाहीत. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी त्यास दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. विरुध्दपक्ष मरुती सुझूकी इंडीया प्रायव्हेट लिमिटेड ही वाहन निर्माता कंपनी असून त्यांनी उत्पादकीय दोष असलेली कार बाजारात विक्रीस आणून तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली, त्यामुळे त्याला शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या कारचे इंजिनला आग लागल्याने घराचे पोर्च मध्ये त्याचे बाजूला उभी असलेली त्याची बजाज प्लेझर मोटरसायकल सुध्दा जळाली तसेच पोर्चला आग लागल्यामुळे पोर्चची सफेदी करण्यासाठी सुध्दा त्याला खर्च करावा लागला.
तक्रारकर्त्याने कारचे इंजिन जळाल्यामुळे त्याला कार खरेदी पासून ती रोड पर्यंत चाले पर्यंत आलेल्या खर्चाचे विवरण तक्रारीत नमुद केले ते पुढील प्रमाणे-
अक्रं | विवरण | आलेला खर्च |
1) | कारची एकूण विक्री किम्मत (आरटीओ नोंदणी खर्च, विमा व वॉरन्टी इत्यादी) | 6,33,853/- |
2) | नादुरुस्त कार सेवाकेंद्रात पोहचविण्यासाठी क्रेनचा आलेला खर्च | 5,500/- |
3) | निरिक्षणासाठी घेतलेला कारचा खर्च व ईतर खर्च | 2,500/- |
4) | कारचे बाजूला उभ्या असलेल्या होंडा प्लेझर मोटर सायकल दुरुस्तीचा खर्च | 14,229/- |
5) | कारला आग लागल्यामुळे घराचे पोर्चचा सफेदी खर्च साहित्यासह | 10,300/- |
| एकूण खर्च | 6,66,382/- |
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने दिनांक-11.11.2012 पासून अनेकदा विरुध्दपक्ष स्थानिक डिलर/विक्रेता यांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती दिली. विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता आणि विरुध्दपक्ष वाहन निर्माता कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याने आयुष्यभर केलेलया कमाईचा दुरुपयोग झाला असून त्याला कारचे उपभोगापासून भौतीक सुखा पासून वंचित राहावे लागत आहे. तक्रारकर्त्याने दोन्ही विरुध्दपक्ष अनुक्रमे भंडारा व नागपूर येथील वाहनाचे डिलर/विक्रेता यांना दिनांक-20.02.2014 रोजी वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून नुकसानभरपाईच्या रकमेची व्याजासह मागणी केली व नादुरुस्त कारचे मोबदल्यात नविन कार देण्याची मागणी केली परंतु विरुध्दपक्ष वाहनाचे डिलर/विक्रेता यांनी सदर नोटीसचे उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याचे पुढे असे नमुद केले की, त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-1,15,000/- भौतीक सोयी पासून वंचित ठेवल्यामुळे रुपये-20,000/- तक्रारदाखल खर्च रुपये-10,000/- आणि नोटीस खर्च रुपये-5000/- असे मिळून तो एकूण रुपये-1,50,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. परंतु विरुध्दपक्ष हे त्याचे तक्रारीस कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करावी लागली.
तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारी मधून विरुध्दपक्षां विरुध्द पुढील प्रमाणे मागणी केली-
तक्रारकर्त्याला उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे खरेदी केलेल्या कारचे इंजिन जळाल्या पासून ती विरुध्दपक्ष डिलरचे नागपूर येथील सेवाकेंद्रात दुरुस्ती करता नेई पर्यंत लागलेला एकूण खर्च ज्यामध्ये कारचे मुल्य, कारचे नोंदणी शुल्क, कारचा विमा आणि नादुरुस्त कार घरा पासून ते सेवाकेंद्रात नेई पर्यंतचा खर्च असे मिळून एकूण आलेला खर्च रुपये-6,66,382/- आणि त्याला झालेल्या शारिरीक,मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,50,000/- आणि ईतर खर्च रुपये-2500/- असे मिळून एकूण नुकसान भरपाईची रक्कम रुपये-8,18,882/- विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता, विरुध्दपक्ष वाहन निर्माता आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी यांचे कडून मिळावी आणि सदर रक्कम रुपये-8,18,882/- वर तक्रार दाखल केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने वयाज मिळावे अशी मागणी केली.
03. तक्रार क्रं-CC/15/94 मधील तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
ग्राहक तक्रार क्रं- CC/15/94 मधील मजकूर हा जवळपास ग्राहक तक्रार क्रं-CC/14/60 मधील तक्रारीतीत मजकूराशी म्हणजे खरेदी केलेल्या कारचे वर्णन, रजिस्ट्रेशन क्रमांक, कारला आग लागलेल्या घटनेचे विस्तृत विवरण, कार खरेदी पासून ते रोड पर्यंत चाले पर्यंत आरटीओ नोंदणी, विमा इत्यादीसाठी आलेला खर्च, कारला आग लागल्या नंतर सेवाकेंद्रात नेण्यासाठी आलेला खर्च इत्यादी संबधीचा संपूर्ण मजकूर हा जवळपास सारखाच असल्याने येथे पुनरोक्ती टाळण्यात येते. फक्त ग्राहक तक्रार क्रं-CC/15/94 मध्ये तक्रारकर्त्याने थोडे वेगळे असे नमुद केले की, त्याने खरेदी केलेल्या कारचा विमा हा विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी दिल्ली यांचे कडून काढला होता आणि त्याचा पॉलिसी क्रमांक-31260031130300949654 असा होता आणि सदर विम्याचा कालावधी हा दिनांक-02.09.2013 ते दिनांक-01.09.2014 चे मध्यरात्री पर्यंत होता. विमाकृत कार जळाल्यामुळे विम्याचे रकमेचा धनादेश विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने नागपूर येथील विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता याचे मार्फतीने एकूण रुपये-4,77,899/- एवढया रकमेचा दिनांक-19.06.2014 रोजी तक्रारकर्त्याला दिला व तो त्याने त्याचे सर्व कायदेशीर हक्क अबाधीत ठेऊन स्विकारला परंतु तक्रारकर्त्याला या पेक्षा जास्त रक्कमेचा खर्च आलेला असून विरुध्दपक्ष विमा कंपनीने रक्कम कमी दिलेली आहे. सदर रकमेचा धनादेश देतेवेळी विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याच्या को-या कागदावर सहया सुध्दा घेतल्यात आणि सही न केल्यास रक्कम मिळणार नाही अशी धमकी दिल्याने त्याने सहया केल्या होत्या. म्हणून ग्राहक तक्रार क्रं सीसी/15/94 मध्ये तक्रारकतर्याने विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागणी केली-
विम्याची फरकाची रक्कम रुपये-1,55,954/- त्याला विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून देण्यात यावी तसेच विमा क्लेमची रक्कम उशिराने दिल्यामुळे त्याला बँकेत तीन हप्त्याची रक्कम रुपये-42,000/- भरावी लागली तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,35,000/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-3,32,954/- विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी कडून तक्रारकर्त्याला घटना घडल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-21 टक्के दराने व्याजासह मंजूर करावी.
04. ग्राहक तक्रार क्रं-CC/14/60 मध्ये विरुध्दपक्षांनी दाखल केलेले लेखी उत्तर-
04-ए) विरुध्दपक्ष अनुक्रमे भंडारा व नागपूर येथील वाहन डिलर/विक्रेता यांनी असे नमुद केले की, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांना प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही. त्यांनी कार संबधात तक्रारकर्त्याला दिलेले कोटेशन त्यांना मान्य आहे. दिनांक-12.11.2013 रोजी क्षतीग्रस्त कार तक्रारकर्त्याने स्वतःहून विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांचे नागपूर येथील वर्कशॉप मध्ये आणून दिली होती आणि सदर कार घराचे पोर्च मध्ये पार्कींग केली असता तिला दिनांक-10.11.2012 रोजी रात्री 11.15 वाजता अचानक आग लागल्याचे सांगितले. कारला अचानक आग लागल्याने त्या संबधी काही उत्तर देण्याचा प्रश्न उभवत नाही. कार सोबत उभी बजाज प्लेझर ही गाडी जळाल्याने तिचे नुकसान झाल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष वाहन विक्रेता यांना 11.11.2013 रोजी घटनेची माहिती दिल्याची बाब नाकबुल केली, तक्रारकर्त्याने घटनेची सुचना दिली नव्हती. कार क्रेनने आणण्यासाठी लागलेला खर्च नाकबुल केला. नागपूर येथील विरुध्दपक्ष वाहन डिलर यांनी तक्रारकर्त्यास दिनांक-23.12.2013 रोजी कळविले होते की, कारला लागलेली आग ही उत्पादीकीय दोषामुळे लागलेली नाही. उत्पादकीय दोषामुळे कारचे इंजिनला आग लागल्याची बाब नामंजूर केली. क्षतीग्रस्त कारचे निरिक्षण करण्यासाठी विरुध्दपक्ष वाहन डिलर यांनी रुपये-2500/- घेतल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द केलेली अन्य विपरीत विधाने नाकबुल केलीत. त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही वा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. तक्रारकर्त्याने केलेल्या अन्य मागण्या नाकबुल केल्यात. आपल्या विशेष कथनात नमुद केले की, मेसर्स ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि. हे भंडारा येथील मरुती सुझुकी इंडीया लिमिटेड या कार निर्माता कंपनीचे अधिकृत डिलर असून त्यांनी तक्रारीत वर्णनातीत कार तक्रारकर्त्याला दिनांक-31.08.2013 रोजी विकली होती ही बाब कबुल केली. दिनांक-12.11.2013 रोजी नागपूर येथील वर्कशॉप मध्ये क्षतीग्रस्त कारची आणण्यात आली आणि त्या कारची पाहणी मरुती सुझुकी इंडीया लिमिटेड यांचे नागपूर कार्यालयातील कार्यरत अधिकारी जे.कन्नान आणि विरुध्दपक्ष कार डिलरचे चमूने दिनांक-14.11.2013 रोजी केली होती. निरिक्षणा अंती असे आढळून आले की, कारला लागलेली आग ही बाहय कारणामुळे लागलेली आहे, ती उत्पादकीय दोषामुळे लागलेली नाही. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणेच कार पार्कींग केल्या पासून 58 तासा नंतर तिला आग लागली, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याला नागपूर येथील वर्कशॉप मधून दिनांक-23.12.2013 आणि दिनांक-15.01.2014 रोजी कळविण्यात आले. क्षतीग्रस्त वाहन भंडारा येथून नागपूर येथे आणण्या करीता लागलेला खर्च रुपये-5500/- देण्याची जबाबदारी त्यांची नाही. विरुध्दपक्ष वाहन डिलर यांचे कडून मिळालेल्या माहिती नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष दि नयु इंडीया एश्योरन्स कंपनीकडे विमा दावा दाखल केला व सर्व्हेअरने तपासणी सुध्दा केली. त्यानुसार विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला विम्याचे दाव्यापोटी रुपये-4,77,899/- आणि वाहनाचे सॉल्व्हेजपोटी रुपये-45,000/- अशा रकमा दिनांक-08.07.2014 रोजी अदा केलेल्या आहेत. अशाप्रकारे तक्रारकर्त्याला एकूण रुपये-5,22,899/- अशी रक्कम क्षतीग्रस्त विमाकृत वाहनापोटी नुकसान भरपाई म्हणून मिळालेली आहे परंतु तक्रारकर्ता सदरची बाब लपवून ठेवीत आहे. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने ग्राहक मंचा समोर आलेला नसून तक्रार चुकीची असल्याने खारीज करण्याची विनंती अनुक्रमे भंडारा व नागपूर येथील विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता यांचे तर्फे करण्यात आली.
04-बी) विरुध्दपक्ष मरुती सुझुकी इंडीया प्राय. लिमिटेड या वाहन निर्माता कंपनी तर्फे लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष वाहन निर्माता यांनी त्यांचे विरुध्द कोणतीही मागणी तक्रारीत करण्यात आली नसल्याचा आक्षेप नोंदविला ( येथे सपष्ट करण्यात येते की, वाहन निर्माता कंपनीने लेखी उत्तरात आक्षेप नोंदविलया नंतर तक्रारकर्त्याने मंचाचे परवानगीने तक्रारीत दुरुस्ती करुन सर्व विरुध्दपक्षां विरुध्द मागणी केली) तक्रारकर्त्याने फौजदारी प्रक्रिया संहितचे कलम 154 प्रमाणे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केल्यामुळे सदर तक्रार ग्राहक मंचा समोर चालविता येत नाही. तक्रारकर्त्याने कार मध्ये उत्पादकीय दोष असल्या बाबत जे आरोप तक्रारीतून केलेले आहेत त्या संबधात सखोल परिक्षण, तोंडी व लेखी पुरावा असणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे शासनाचे अधिकृत प्रयोगशाळे मधून वादातील वस्तुचे निरिक्षण होणे आवश्यक आहे आणि बहुतांश प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी सुध्दा तज्ञांचा पुरावा आवश्यक असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. परंतु असा तज्ञांचा पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याला दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी कडून क्षतीग्रस्त वाहनाचे विम्यापोटी दिनांक-19 जून, 2014 रोजी रुपये-4,77,899/- मिळालेले आहेत. मा.राष्ट्रीय आयोगाने सुध्दा ए.बी.मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुध्द अॅडमिरल इम्पेक्स प्रा.लि. या प्रकरणात विमा कंपनीने एकदा विम्याची रक्कम दिल्या नंतर पुढे कोणतीही रक्कम मंजूर केलेली नाही. तक्रारकर्त्याचे कारला लागलेली आग ही वाहनाचे उत्पादकीय दोषामुळे लागली ही बाब पुराव्यानिशी सिध्द झालेली नसल्याने तसेच तक्रारकर्त्याला वाहनाचे विम्या संबधीची रक्कम विमा कंपनी कडून मिळालेली असल्याने विरुध्दपक्ष वाहन निर्माता कंपनी विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
05. ग्राहक तक्रार क्रं-CC/15/94 मध्ये विरुध्दपक्षांनी दाखल केलेले लेखी उत्तर
05-ए) विरुध्दपक्ष मे. ऑटोमोटीव्ह मॅनयुफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड, भंडारा या वाहन विक्रेता/डिलरने एक लेखी निवेदन प्रकरणात दाखल केले. त्यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने ग्राहक तक्रार क्रं सीसी/15/94 मध्ये विरुध्दपक्ष वाहन विक्रेता/डिलर यांचे विरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही तर जी काही मागणी केलेली आहे ती विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी विरुध्द केलेली आहे त्यामुळे या प्रकरणात त्यांची कोणतीही जबाबदारी येत नाही.
05-बी) विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्त्याची कार जळाली परंतु आग कशामुळे लागली हे स्पष्टपणे तक्रारीत नमुद नाही तसेच कारचे बाजूला असलेली मोटरसायकल जळालयाची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने परस्पर विरुध्दपक्ष डिलर याचे नागपूर येथील सेवाकेंद्रात जळालेली कार दुरुस्ती करता नेली व विरुध्दपक्ष विमा कंपनीला आंधारात ठेवले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला विम्याची रक्कम कमी दिल्याची बाब नाकबुल केली. तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीने धमकी देऊन को-या दस्तऐवजावर त.क.च्या सहया घेतल्याची बाब नामंजूर केली. विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-19.06.2014 रोजी रुपये-4,77,899/- चा धनादेश विम्यापोटी तक्रारकर्त्याला दिलेला आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची व्याजासह केलेली मागणी अमान्य करण्यात येते. तक्रारकर्त्याने कार जळाल्याचे खोटे कारण नमुद केल्यामुळे त्याची कार संबधात नुकसानीची मागणी रुपये-3,32,965/- आणि शारिरीक मानसिक त्रासा बद्यल व तक्रारीचे खर्चा बद्यल रुपये-1,35,000/- ची व्याजासह केलेली मागणी अमान्य करण्यात येऊन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
06. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दोन्ही तक्रारी, तक्रारीं मधील विरुध्दपक्षांची उत्तरे, प्रकरणां मधील दाखल शपथपत्रे व लेखी युक्तीवाद तसेच दाखल दस्तऐवजांचे मंचाव्दारे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले, त्यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
01 | त.क.ने खरेदी केलेली कार त्यामध्ये उत्पादकीय दोष नसल्याचे कारणामुळे जळून खाक झाली नव्हती या विधाना संबधात विरुध्दपक्ष मरुती सुझूकी ऑफ इंडीया लिमिटेड या निर्माता कंपनीने ठोस असा पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला आहे काय? | नाही |
02 | विरुध्दपक्ष मरुती सुझूकी ऑफ इंडीया लिमिटेड या निर्माता कंपनी निर्मित कार मध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब तसेच उत्पादकीय दोष असूनही नादुरुसत कार दुरुस्त करण्यासाठी स्थानीय विरुध्दपक्ष डिलर/विक्रेता यांनी तक्रारकर्त्याला मदत न केल्यामुळे दोघांनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | होय |
03 | विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने आयडीव्ही नुसार संपूर्ण रक्कम त.क.ला दिलेली असल्याने आता काही जबाबदारी विमा कंपनीची येते काय | नाही |
04 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
कारण मिमांसा
07. तक्रारकर्त्याने वादातील कारचा विमा हा विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया अॅश्योरन्स कंपनी दिल्ली यांचे कडून काढला होता आणि त्याचा पॉलिसी क्रमांक-31260031130300949654 असा होता आणि सदर विम्याचा कालावधी हा दिनांक-02.09.2013 ते दिनांक-01.09.2014 चे मध्यरात्री पर्यंत होता. विम्याचे वैध कालावधीत विमाकृत कार जळाल्यामुळे विम्याचे रकमेचा धनादेश विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने नागपूर येथील विरुध्दपक्ष वाहन डिलर/विक्रेता याचे मार्फतीने एकूण रुपये-4,77,899/- एवढया रकमेचा दिनांक-19.06.2014 रोजी तक्रारकर्त्याला दिला व तो त्याने स्विकारला. या संबधात तक्रार क्रं-सीसी/15/94 मध्ये पान क्रं 18 वर धनादेशाची प्रत दाखल आहे, त्यावरुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे नावे युनियन बँक ऑफ इंडीयाचे तक्रारकर्त्याचे खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेचा धनादेश क्रं-130522, धनादेश दिनांक-19.06.2014 रोजीचा एकूण रक्कम रुपये-4,77,899/- एवढया रकमेचा दिल्याची बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, त्याने सदरचा विमा कंपनीचा धनादेश त्याचे सर्व कायदेशीर हक्क राखून स्विकारला. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, ग्राहक तक्रार क्रं-सीसी/14/60 मध्ये विरुध्दपक्ष कार डिलर/विक्रेता यांनी जे लेखी उत्तर दाखल केले, त्यामध्ये परिच्छेद क्रं 19 मध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून तक्रारकर्त्याला विमाकृत क्षतीग्रस्त कारचे सॉल्व्हेज पोटी दिनांक-08.07.2014 रोजी रुपये-45,000/- मिळालेले असल्याचे नमुद केले. अशाप्रकारे तक्रारकर्त्याला विमाकृत कारचे नुकसानभरपाई पोटी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून एकूण रुपये-5,22,899/- मिळालेले आहेत व ही बाब तक्रारकर्त्याला सुध्दा मान्य आहे. विमा पॉलिसी प्रमाणे सदर कारची घोषीत केलेली किम्मत (Insured Declared Value) रुपये-5,23,899/- एवढी असून जवळपास तेवढी संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्याला विमा कंपनी कडून मिळालेली आहे. आयडीव्ही रकमेपेक्षा जास्त रक्कम तक्रारकर्त्याला विमा कंपनी कडून मंजूर करता येत नाही. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स विमा कंपनी विरुध्दची अतिरिक्त विम्याची रक्कम मिळण्या बाबतची मागणी मंजूर करता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे खरेदी केलेली कार दिनांक-08.11.2013 रोजी त्याचे घरा समोरील पोच मध्ये पार्कींग केली होती. परंतु असे असताना दिनांक-10.11.2013 रोजी रात्री 11.15 वाजताचे सुमारास कारला अचानक आग लागली व त्या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आणि ती दुरुस्त होण्या पलीकडील आहे. वस्तुतः सदर कार खरेदी केल्या नंतर ती फक्त दोन महिने आणि फक्त 670 किलोमीटर चालली होती. एकाएकी कारने पेट घेतला असल्याने त्यामध्ये उत्पादकीय दोष (Manufacturing defect) आहे. तर विरुध्दपक्ष मरुती सुझूकी इंडीया प्रायव्हेट लिमिटेड यांनी दाखल केलेल्या लेखी उत्तरा मध्ये त्यांचेव्दारा निर्मित कार तक्रारकर्त्याचे घरातील पोर्च मध्ये असताना अचानक रात्रीचे वेळी पेट घेतल्याने कारमध्ये उत्पादकीय दोष होता असे म्हणता येणार नाही या विधानावर जास्त जोर दिला. परंतु विरुध्दपक्ष मरुती सुझूकी इंडीया प्रायव्हेट लिमिटेड या कार निर्माता कंपनीचे असे जर म्हणणे आहे की, त्यांनी निर्मिती केलेल्या वादातील कार मध्ये उत्पादकीय दोष नव्हता तर हे म्हणणे सिध्द करण्याची संपूर्ण जबाबदारी (Burden) विरुध्दपक्ष निर्माता कंपनीची आहे, या संबधात वेळोवेळी मा.वरिष्ठ न्यायालयांनी न्यायनिवाडे दिलेले आहेत. ग्राहक तक्रार क्रं-सीसी/14/60 मध्ये विरुध्दपक्ष कार डिलर/विक्रेता यांचे तर्फे जे लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष दाखल करण्यात आले त्यामध्ये विशेष कथनातील परिच्छेद क्रं 14 मध्ये असे नमुद आहे की, दिनांक-12.11.2013 रोजी नागपूर येथील वर्कशॉप मध्ये क्षतीग्रस्त कार आणण्यात आली आणि त्या कारची पाहणी मरुती सुझुकी इंडीया लिमिटेड यांचे नागपूर कार्यालयातील कार्यरत अधिकारी जे.कन्नान आणि विरुध्दपक्ष कार डिलरचे चमूने दिनांक-14.11.2013 रोजी केली होती आणि त्यानंतर सदर चमुने तक्रारकर्त्याचे घरी दिनांक-16.11.2013 रोजी भेट दिली होती. विरुध्दपक्ष वाहन निर्माता कंपनीचे अधिकारी यांनी जर क्षतीग्रस्त कारची पाहणी केली होती तर नेमकी आग कशामुळे लागली या बद्यल सखोल विवेचन त्यांनी केले असते तसेच विरुध्दपक्ष वाहन निर्माता कंपनीने तज्ञांचा पुरावा (Expert Opinion) या प्रकरणात दाखल केला असता परंतु तसे काहीही या प्रकरणात विरुध्दपक्ष मरुती सुझूकी इंडीया प्रा.लि. या कार निर्माता कंपनी तर्फे केलेले नाही. तक्रारकर्त्याने जास्तीची काळजी म्हणून कारला आग लागल्या बाबत पोलीस स्टेशनला सुध्दा एफ.आय.दाखल केलेला आहे व त्याची प्रत ग्राहक मंचा समोरील ग्राहक तक्रार क्रं-सीसी/14/60 मध्ये पान क्रं 18 व 19 वर दाखल केली. सदर एफआयआर मध्ये सुध्दा कारला आग लागण्याचे कारण हे बॅटरी मध्ये शॉर्ट सर्कीट झाल्याचे नमुद केलेले आहे. सदर एफआयआर मध्ये असे सुध्दा नमुद आहे की, कारचे बाजूला असलेल्या मोटरसायकलचे सुध्दा नुकसान आगीचे घटनेमुळे झालेले आहे. क्षणभरासाठी असेही गृहीत धरले की, जर कोणी अज्ञात ईसमाने कारला आग लावली असती तर पोलीसां मध्ये एफआयआर नोंदविल्या नंतर ती बाब नक्कीच पोलीस तपासामध्ये उघड झाली असती परंतु अशी कोणतीही बाब उघड झालेली नाही. तसेच कार विकत घेतल्या नंतर फक्त दोन महिने झाले असताना व ती केवळ आगीचे घटने पर्यंत केवळ 670 किलोमीटर चालली असताना आणि घराचे पोर्चमध्ये उभी असताना त्यामध्ये अचानक आग लागून ती जळून संपूर्ण खाक झाली, त्यामुळे सदरची कारमध्ये आग लागल्याची घटना ही कारमध्ये उत्पादकीय दोष असल्यामुळेच (Manufacturing Defects) झाली असा निष्कर्ष काढण्यास कोणतीही हरकत नाही.
09. आता या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की, तक्रारकर्त्याने खरेदी केलेली कार केवळ दोन महिन्यात ती 670 किलोमीटर चाललेली असताना कारमध्ये उत्पादकीय दोष असल्यामुळे अचानक आग लागून खाक झाली व त्यामुळे या घटनेस सर्वस्वी जबाबदार ही विरुध्दपक्ष मरुती सुझूकी इंडीया प्रायव्हेट लिमिटेड ही कार निर्माता कंपनी (Maruti Suzuki India Pvt. Ltd.-Car Manufacturing Company) जबाबदार आहे कारण सदर कार मध्ये उत्पादकीय दोष (Manufacturing Defect) होता ही बाब सिध्द झालेली आहे. सदर वस्तुस्थिती पाहता विरुध्दपक्ष कार निर्माता कंपनीने आणि विरुध्दपक्ष कार विक्रेता यांनी कार नादुरुस्त झाल्या नंतर योग्य ती सेवा तक्रारकर्त्याला दिली नसल्याची बाब सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्त्याला जरी विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स या विमा कंपनी कडून विम्याची रक्कम रुपये-4,77,899/- आणि सॉल्व्हेजपोटी रुपये-45,000/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-5,22,899/- जरी मिळालेली असली तरी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण कार मिळाल्यामुळे त्याला कारचे भौतीक सुखा पासून वंचित राहावे लागले त्याच बरोबर नविन घेतलेली कार केवळ दोन महिन्यात वॉरन्टी कालावधीत आपोआप जळाल्यामुळे कार दुरुस्तीसाठी त्याला कार टोचन करुन भंडारा येथून नागपूर येथे आणावी लागली, तिचे निरिक्षण वर्कशॉप मध्ये करावे लागले, विरुध्दपक्षांच्या भेटी घेऊन पत्रव्यवहार करुनही त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी ग्राहक मंचात तक्रार दाखल करावी लागली व आजही तक्रारकर्ता व त्याचे कुटूंब सदर कारचे उपभोगापासून वंचित आहेत. त्याच बरोबर पोर्च मध्ये कार सोबत उभी असलेली मोटरसायकल सुध्दा जळाली तिचे दुरुस्तीसाठी खर्च करावा लागला तसेच घराचे रंगरंगोटीसाठी सुध्दा खर्च करावा लागला आणि नमुद कालावधी मध्ये तक्रारकर्ता व त्याचे कुटूंब कारचे भौतीक सुखापासून वंचित राहिलेत. तक्रारकर्त्याने सदर कार विकत घेण्यासाठी कर्ज सुध्दा घेतले होते आणि कार जळाल्या पासून ते विमा कंपनीची रक्कम मिळे पर्यंत त्याला बँकेचे परतफेडीचे 03 हप्ते सुध्दा भरावे लागलेत हा सर्व घटनाक्रम पाहता तक्रारकर्ता आणि त्याचे कुटूंबाला उत्पादकीय दोष असलेल्या कार मुळे मोठया प्रमाणावर शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला, विरुध्दपक्षांना वकीलांचे मार्फतीने नोटीस द्यावी लागली आणि शेवटी या दोन तक्रारी ग्राहक मंचा समोर दाखल कराव्या लागल्यात, त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्याचे ग्राहक मंचाचे मत आहे.
10. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, तक्राकर्त्याने विरुध्दपक्ष ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चरस प्रायव्हेट लिमिटेड ऑथोराईज्ड डिलर, भंडारा यांचे कडून विरुध्दपक्ष मरुती सुझूकी इंडीया प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मरुती सुझूकी डिझायर कार खरेदी केली, त्याचे कोटेशन विरुध्दपक्ष डिलर/विक्रेता यांनी दिलेले आहे, त्याची प्रत तक्रार क्रं-सीसी/14/60 मध्ये पान क्रं 9 वर तक्रारकर्त्याने दाखल केली. सदर कोटेशन हे दिनांक-26/08/2013 रोजीचे असून त्यामध्ये कारची किम्मत खालील प्रमाणे दर्शविलेली आहे-
Maruti Suzuki | Dz |
Ex.Showroom Cost | 5,51,472/- |
Insurance | 18,868/- |
RTO (One Tax) | 50,533/- |
Extended Warranty | 7,680/- |
Service Charges | 5,200/- |
Total- | 6,33,853/- (Actual Sum Rs.6,33,753/-) |
सदरचे कोटेशन विरुध्दपक्ष भंडारा येथील ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि.डिलर/विक्रेता यांना मान्य आहे. याचाच अर्थ असा निघतो की, कार खरेदी केल्या पासून ते तिचा विमा, सेवाशुल्क, हमी इत्यादी मिळून ती रोड पर्यंत चालविण्यासाठी आणण्या करीता तक्रारकर्त्याला रुपये-6,33,753/- एवढा खर्च आलेला आहे.
11. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने ग्राहक तक्रार क्रं- सीसी/14/60 मध्ये खालील बिलांच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत- पान क्रं 20 वर अन्सारी क्रेन सर्व्हीस यांनी नादुरुस्त कार भंडारा येथून नागपूर येथे विरुध्दपक्ष डिलरचे सेवा केंद्रात पोहचविण्यासाठी एकूण रुपये-5500/- तसेच पान क्रं 22 वर बांधकाम करणा-या मिस्त्रीने दिनांक-04.12.2013 रोजी टाईल्स घसाईचे कामा करीता रुपये-6470/- घेतल्या बाबत पावती दाखल आहे. तसेच पान क्रं 22 वर दिनांक-14.12.2013 रोजी घराचे सफेदीचे कामा बाबत रुपये-3900/- ची पावती दाखल आहे. तसेच पान क्रं 23 वर रंगरंगोटीचे साहित्य खरेदी केल्या बाबत रुपये-6120/- ची पावती दाखल आहे. पान क्रं 24 व 25 वर मनोज ऑटो स्पेअर भंडारा यांनी दिनांक-12.01.2014 रोजीचे रुपये-14,221/- चे दिलेले बिल अशा दस्तऐवजाच्या प्रती तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या आहेत. पोलीस एफआयआर मध्ये सुध्दा कारचे बाजूला ठेवलेली मोटरसायकल जळाल्याची बाब नमुद आहे. उपरोक्त पुराव्यां वरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याची कार जळाल्यामुळे बाजूला ठेवलेली मोटरसायकल सुध्दा जळाली आणि पोर्चचे भागाचे नुकसान झाल्यामुळे त्याला टाईल्सची घसाई तसेच रंगरंगोटी करावी लागली व त्यासाठी खर्च करावा लागला या बाबी सिध्द होतात. तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल क्षतीग्रस्त विमाकृत कारचा फोटो सुध्दा दाखल केलेला आहे. कारचे बाजूला असलेली मोटरसायकल दुरुस्तीचा खर्च आणि पोर्च मधील टाईल्स घसाई व रंगरंगोटीचा खर्च असे मिळून रुपये-36,211/- एवढा खर्च केलेला असल्याचे दिसून येते. अशाप्रकारे कार खरेदी केल्या पासून ती रस्त्यावर चालण्या करीता आणे पर्यंत तक्रारकर्त्याला रुपये-6,33,753/- आणि आगीची घटना झाल्या नंतर बाजूला ठेवलेली मोटरसायकल नुकसान आणि पोर्चची दुरुस्ती इत्यादीसाठी आलेला खर्च रुपये-36,211/- असे मिळून एकूण रुपये-6,69,964/- एवढा खर्च तक्रारकर्त्याला आलेला आहे आणि यासाठी विरुध्दपक्ष कार निर्माता कंपनी मरुती सुझूकी इंडीया प्रा.लि. जबाबदार आहे कारण त्यांनी दोषपूर्ण कार विरुध्दपक्ष भंडारा येथील स्थानीय अधिकृत डिलर यांचे मार्फतीने तक्रारकर्त्याला विक्री केलेली आहे.
12. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी कडून विमा आणि सॉल्व्हेजपोटी एकूण रुपये-5,22,899/- मिळालेले आहेत परंतु त्याला वर नमुद केल्या प्रमाणे एकूण रुपये-6,69,964/- एवढा खर्च आलेला आहे त्यामुळे या दोन्ही रकमां मधील फरकाची येणारी रक्कम रुपये-1,47,065/- विरुध्दपक्ष कार निर्माता कंपनी मरुती सुझूकी इंडीया प्रायव्हेट लिमिटेड यांचे कडून तक्रारकर्त्याला मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष कार निर्माता कंपनी मरुती सुझूकी इंडीया प्रायव्हेट लिमिटेड यांची निर्मित कार नादुरुस्त झाल्या नंतर ती टोचन करुन तक्रारकर्त्याला भंडारा येथून नागपूर येथे न्यावी लागली व टोचनचे बिल अदा करावे लागले, या सर्व प्रकारात विरुध्दपक्ष स्थानीय डिलर व विक्रेता यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही मदत केल्याचे दिसून येत नाही व ही त्यांनी तक्रारकर्त्याला दिलेली दोषपूर्णसेवा आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-30,000/- आणि तक्रार व नोटीस खर्च असे मिळून रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्दपक्ष कार निर्माता कंपनी व विरुध्दपक्ष स्थानिक कार डिलर/विक्रेता यांचे कडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
13. या ठिकाणी आणखी एक बाब विशेषत्वाने नमुद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने ग्राहक मंचा समोर तक्रार क्रं-सीसी/14/60 दाखल केलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा नव्याने एक तक्रार क्रं-सीसी/15/94 दाखल केलेली आहे. ग्राहक तक्रार क्रं सीसी/15/94 मध्ये नव्याने विमा कंपनीला प्रतिपक्ष केले परंतु वर नमुद केल्या प्रमाणे विमा कंपनीने विमा पॉलिसी प्रमाणे सदर कारची घोषीत केलेली संपूर्ण किम्मत (Insured Declared Value) तक्रारकर्त्याला दिलेली असल्याने ग्राहक तक्रार क्रं सीसी/15/94 खारीज होण्यास पात्र आहे.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
- तक्रारकर्त्याची ग्राहक तक्रार क्रं-सीसी/14/60 खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेली दुसरी ग्राहक तक्रार क्रं-सीसी/15/94 खारीज करण्यात येते.
- ग्राहक तक्रार क्रं-सीसी/14/60 मध्ये विरुध्दपक्ष क्रं-3 कार निर्माता कंपनी मरुती सुझूकी ऑफ इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, गुरगाव, हरीयाना तर्फे चिफ जनरल मॅनेजर यांना असे आदेशित करण्यात येते की, त्यांचे निर्मित उत्पादकीय दोष असलेल्या कारमुळे तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई दाखल रक्कम रुपये-1,47,065/-(अक्षरी रुपये एक लक्ष सत्तेचाळीस हजार पासष्ठ फक्त) द्यावी आणि सदर रकमेवर प्रस्तुत ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्याचा दिनांक-04.09.2014 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 9 टक्के दराने व्याज द्यावे.
- विरुध्दपक्ष क्रं 1) मे.ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड, भंडारा स्थानिय अधिकृत डिलर व विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-3 मरुती सुझूकी इंडीया प्रा.लि. कार निर्माता कंपनी यांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) आणि तक्रार व नोटीस खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) द्यावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1) मे.ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि.भंडारा स्थानीय अधिकृत डिलर व विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-3 मरुती सुझूकी इंडीया लिमिटेड कार निर्माता कंपनी यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 2) मे.ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर (कार दुरुस्ती सेवा केंद्र) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रमाणित सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात. सदर निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-सीसी/14/60 मध्ये लावण्यात यावी आणि प्रमाणीत प्रत ग्राहक तक्रार क्रं-सीसी/15/94 मध्ये लावावी.
- तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.