(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोहिणी दि. कुंडले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 20 एप्रिल 2013)
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 स्थानिक डिलरकडून विकत घेतलेल्या मोटार सायकल मधील दोष दूर करता आला नाही म्हणून नविन वाहन अथवा किंमत परत मिळावी म्हणून तक्रार दाखल आहे.
तक्रार व युक्तीवाद थोडक्यात.
तक्रारकर्त्याने दि.28.4.2012 रोती हिरो होंड कंपनीची ग्लॅमर मोटरसायकल रुपये 51,725/- मध्ये खरेदी केली. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, दि.30.4.2012 रोजी (दोनच दिवसात) इंजिनमध्ये गाडी चालवितांना गडगड असा आवाज येऊ लागला. त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्र.1 च्या शोरुममध्ये गाडी नेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. तेथील मेकॅनिकने ग्लॅमर मोटर सायकलच्या इंजिनची बनावट वेगळी असल्याने गडगड असा आवाज येतो, पण तो दोष नाही म्हणून आवाजाकडे दुर्लक्ष करावे असे तक्रारकर्त्याला सांगितले.
दि.8.5.2012 रोजी पुन्हा उपरोक्त तक्रारीसाठी (इंजिनमधील गडगड आवाज) तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.1 कडे वाहन घेऊन गेला असता वरील प्रमाणेच आवाजाकडे दुर्लक्ष करण्यास त्याला सांगण्यात आले.
दि.13.5.2012 रोजी तक्रारकर्त्याने मोटर सायकल सर्व्हिसिंगसाठी विरुध्दपक्ष क्र.1 कडे दिली. त्यावेळी तक्रारकर्त्याची इंजिनमधील आवाजाची तक्रार व त्यावर विरुध्दपक्ष क्र.1 चे दुर्लक्ष करण्याचे उत्तर वरीलप्रमाणेच कायम होते. यावेळी तक्रारकर्त्याने इंजिनसोबत बॉडीमध्ये सुध्दा आवाज येतो, पेट्रोल नॉब बंद असतांनाही पेट्रोलचा इंजिनला पुरवठा होते व ती चालू रहाते आणि गिअर लवकर पडत नाहीत, अशा नविन तक्रारींची भर त्यात घातली.
दि.20.5.2012 रोजी पुन्हा तक्रारकर्त्याने मोटर सायकल दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे नेली. दुरस्तीसाठी तक्रारी कायम होत्या म्हणून वाहन बदलून देण्याबद्दल विरुध्दपक्षाल विनंती केली, असे तक्रारकर्ता म्हणतो.
इंजिन आणि बॉडीमधून येणारा गडगड आवाज हा दोष विरुध्दपक्ष क्र.1 दुरुस्त करण्यात अपयशी ठरले. याचाच अर्थ वाहनाच्या बनावटीतच (manufacturing defect) दोष आहे, असे तक्रारकर्ता म्हणतो.
दि.26.5.2012 रोजी दोषपूर्ण वाहन बदलून द्यावे अथवा त्याची किंमत नोंदणी खर्चासह मिळावी म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ला पञ पाठविले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दि.11.7.2012 रोजी नोटीस दिली. त्यालाही प्रतिसाद दिला नाही. दि.4.7.2012 पासून उपरोक्त दोषांमुळे तक्रारकर्त्याने मोटर सायकल वापरणे बंद केले आहे. वाहनाच्या वापरापासून वंचित रहावे लागल्याने तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरिक, मानसिक ञास होतो, असे तक्रारकर्ता म्हणतो.
तक्रारकर्ताची मागणी.
(1) मोटर सायकल बदलून मिळावी.
किंवा
मोटर सायकलची किंमत रुपये 57,521/- व्याजासह व नोंदणी खर्चासह परत मिळावे.
(2) नुकसान-भरपाई रुपये 20,000/- मिळावी आणि तक्रार खर्च व नोटीस खर्च मिळावा.
तक्रारीस कारण मंचाच्या अधिकारक्षेञात दि.28.4.2012 (खरेदीची तारीख) रोजी
घडल्यापासून दोन वर्षाच्या मुदतीत तक्रार दाखल केली आहे, असे तक्रारकर्ता म्हणतो.
तक्रारीसोबत एकूण 11 दस्त तक्रारकर्त्याने दाखल केले.
विरुध्दपक्ष क्र.1 चे उत्तर व युक्तीवाद थोडक्यात.
विरुध्दपक्ष क्र.1 हे गडचिरोली येथील स्थानिक विक्रेते आहेत. त्यांनी तक्रारकर्त्याला दि.28.4.2012 रोजी उपरोक्त वर्णित मोटर सायकल रुपये 51,725/- मध्ये विकली.
विरुध्दपक्ष क्र.1 सुटे भाग विकणे, सर्व्हिसिंग करुन देणे, वाहनातील तक्रारींचे निराकरण करणे अशी कामे करतात. तक्रारकर्त्याच्या वाहनातील तक्रारींची प्रत्येकवेळी दखल घेऊन तपासून वाहनात काही दोष नसल्याबद्दल तक्रारकर्त्याला सांगितले. परंतु, तक्रारकर्त्याने ते मानयला तयार नाही.
तक्रारकर्त्याची मुख्य मागणी मोटर सायकल बदलून नविन मिळावी अथवा त्याची किंमत, व्याज व नोंदणी खर्च मिळावा, अशी आहे. वाहनाच्या अटी/शर्ती आणि वॉरन्टीमध्ये वाहन बदलून देण्याचा किंवा किंमत परत करण्याचा नियम नाही. तक्रारकर्ता सोबत तशा प्रकारचा कोणताही करार विरुध्दपक्ष क्र.1 किंवा 2 ने केला नाही.
वाहनाच्या इंजिनमध्ये गडगड आवाज येतो अशी तक्रार घेऊन तक्रारकर्ता दि.30.4.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 च्या वर्कशॉपमध्ये आला, तेंव्हा तेथील मेकॅनिकने स्वतः मोटर सायकल तपासून, चालवून त्यात आवाज येत नसल्याबद्दल खाञी करुन दिली.
परत दि.8.5.2012 रोजी तशीच तक्रार घेऊन आला, तेंव्हाही त्याच्या शंकेने निरसन करुन देण्यात आले.
दि.20.5.2012 रोजी तक्रारकर्ता मालकाकडे पुन्हा वरील तक्रारी घेऊन आला, तेंव्हा स्वतः मालकानी मोटर सायकल चालवून बघितली व आवाज येत नसल्याची खाञी तक्रारकर्त्याला करुन दिली. तक्रारकर्त्याला वाहन बदलून अथवा त्याची किंमत परत पाहिजे म्हणून.
विरुध्दपक्ष क्र.1 नुसार मोटर सायकलमध्ये कोणताही बिघाड नसतांना तक्रारकर्ता विनाकारण वारंवा मोटर सायकल दुरुस्तीसाठी आणतो. यावरुन, त्याला हे दाखवायचे आहे की, वारंवार वाहन दुरुस्तीसाठी न्यावे लागते म्हणजेच त्यात उत्पादन दोष आहे.
वाहनाच्या वॉरन्टीमध्ये कोठेही वाहन बदलून देण्याचा अथवा किंमत परत करण्याचा करार नाही. सुटे भाग दोषपूर्ण असल्यास ते वॉरन्टी काळात मोफत बदलून देता येतात.
विरुध्दपक्ष क्र.1 हे उत्पादक नाहीत ते केवळ विक्रेता आहेत व विक्रीपश्चात सेवा प्रदान करतात. त्यामुळेही बदल्यात नविन वाहन देण्याची अथवा किंमत परत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही.
वाहन बदलून मिळण्यासाठी किंवा किंमत परत मिळण्यासाठी उत्पादनातील दोष स्वतंञ पुरावा/तज्ञाचा अहवाल यान्वये सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे. त्याने तसे केले नाही.
तक्रारकर्त्याची तक्रार कपोलकल्पित व खोटी आहे. विरुध्दपक्षाच्या सेवेत ञृटी नाही म्हणून तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्र.1 करतात.
विरुध्दपक्ष क्र.2 एकतर्फा आहेत.
मंचाने तक्रारकर्त्याच्या व विरुध्दपक्ष क्र.1 च्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपञे तपासली.
// मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष //
तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र.1 हे दोघेही मान्य करतात की, तक्रारकर्त्याने दि.30.4.2012, दि.8.5.2012, दि.13.5.2012, दि.20.5.2012, दि.26.5.2012 या तारखांना वाहनातील गडगड आवाजाबद्दल विरुध्दपक्ष क्र.1 कडे शोरुम मध्ये वाहन दुरुस्तीसाठी आणले.
उपरोक्त तारखांबद्दलचे जॉबकार्डबद्दल विचारण केली असता, विरुध्दपक्षाने जॉबकार्ड ठेवले नसल्याचे सांगितले. तक्रारकर्त्यानेही जॉबकार्डची मागणी केली नसल्याचे सांगितले.
वाहनातील कथित दोषाची (गडगड आवाज) कोठेही कागदोपञी नोंद नाही. तसेच, त्याचे निराकरण केल्याबद्दलही कागदोपञी पुरावा दोन्हीही पक्षांजवळ उपलब्ध नाही. ही विरुध्दपक्ष क्र.1 च्या सेवेतील ञृटी तर ठरतेच पण तक्रारकर्ता स्वतः सुध्दा याबाबतीत दोषी आहे. त्याने लेखी तक्रारी केल्या नाहीत.
तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र.1 यांच्यातील तोंडी व्यवहाराची दखल घेऊन केवळ विशिष्ठ तारखांना वाहन वर्कशॉपमध्ये नेले ऐवढ्या बाबीवरुन वाहन बदलून देण्याची अथवा किंमत परत करण्याची मागणी मंच मान्य करु शकत नाही, शिवाय उत्पादनात दोष आहे असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. त्यासाठी त्याने स्वतंञपणे कोणत्याही तज्ञाचा अहवाल सादर केला नाही, किंवा तज्ञाचा अहवाल मागविण्यासाठी मंचाला विनंती केली नाही. केवळ तक्रारकर्ता म्हणतो म्हणून उत्पादनात दोष आहे, असे गृहीत धरता येत नाही, असा मंचाचा निष्कर्ष आहे.
तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार गडगड आवाजाबद्दल आहे हा आवाज येण्याचे सर्वसाधारण कारण म्हणजे योग्य वेगावर योग्य गिअरचा वापर न करणे हे सर्वच वाहन चालकांना ज्ञात आहे. वाहन नविन असतांना पार्टस् चलनात येऊन मोकळे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तक्रारकर्त्याने गडगड आवाजाचा केवळ बहाणा करुन वाहन बदलून घेण्याचा अथवा किंमत परत मागण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे मंचाचे मत आहे.
विरुध्दपक्षाने जॉबकार्ड ठेवले नसले तरी प्रत्येक तारखेला तक्रारकर्त्याला सेवा दिली आहे हे स्वतः तक्रारकर्ता सुध्दा मान्य करतो.
वरील सर्व विवेचनावरुन मंचाचा निष्कर्ष आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 च्या सेवेत ञृटी नाही.
सबब आदेश.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्ताची तक्रार अत्यंत मर्यादित अर्थाने मंजूर करण्यात येतो.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे वाहन संपूर्ण सर्व्हिसिंग करुन चालू स्थितीत आणून द्यावे. यासाठी, तक्रारकर्त्याने वाहन विरुध्दपक्ष क्र.1 च्या वर्कशॉपमध्ये न्यावे.
(3) विरुध्दपक्ष क्र.1 ने काही पार्टस् बदलण्याची आवश्यकता भासल्यास त्याची किंमत तक्रारकर्ताकडून घ्यावी. परंतु, सर्व्हिस चार्ज आकारु नये.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 ने केलेल्या कामाचे जॉबकार्ड तक्रारकर्त्याला द्यावे.
(5) दोन्ही पक्षांनी आपापला खर्च वहन करावा.
(6) विरुध्दपक्ष क्र.2 च्या सेवेतील ञृटी तक्रारकर्त्याने सिध्द न केल्याने त्यांना या तक्रारीतून वगळण्यात येते.
गडचिरोली.
दिनांक :- 20/04/2013.