(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्षा (प्र.))
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे...
1. तक्रारकर्ता हा मौजा नवेगाव रै. तह. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याचे मालकीचे मौजा दर्शनी चक, तह. चामोर्शी जिल्हा- गडचिरोली येथे सर्व्हे नं.23, 27 व 28, आराजी 1.20 हे.आर. धानारी स्वरुपाची शेतजमीन आहे.
2. विरुध्द पक्ष क्र1 हे मौजा नवेगाव रै. येथील प्रतिष्ठीत व्यक्ति असुन त्यांचे मे. अर्चना कृषी केंद्र या नावाचे शेतीस लागणा-या औषधी व बिज विक्रीचे व्यावसायीक प्रतिष्ठान आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हे चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील प्रतिष्ठीत व्यक्ती असुन त्यांचे मे. छबीलदास धनजीभाई गांधी (स्टॉकीस्ट) या नावाने औषधी व बिज विक्रीचे व्यावसायीक प्रतिष्ठान आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 मे. यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि., यांचे हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे ठोक शेती उपयोगी औषधी व बिज विक्रीचे व्यावसायीक प्रतिष्ठान आहे.
3. तक्रारकर्त्याने माहे जून-2017 मध्ये धान या पिकाची पेरणी करण्याकरीता विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. कंपनीचे वान (बिजाई) पदमशाली बिल क्र.081/091 दि.17.06.2017 रोजी रु.3,660/- ला बियाणे खरेदी केले. बियाणे खरेदी करीत असतांना विरुध्द पक्ष क्र.1 यांनी बियाणे पेरल्यानंतर पिक 140 ते 145 दिवसात येईल असे सांगितले व तसे बिलात नमुद आहे. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने बियाणे खरेदी केल्यानंतर दि.18.06.2017 ला बियाणे शेतात नेऊन 30 किलो मिश्रखत व 60 किलो पदमशाली धानाची बिजाई पेरणी केली. त्यानंतर एक महिन्यानंतर दि.18.07.2017 रोजी रोपांची लागवड केली असता धानाचे पिक 140 ते 145 दिवसांचे आत धान निसवण्याचे चिन्ह आढळून आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.03.09.2017 रोजी मे. अर्चना कृषी केंद्र यांना माहिती दिली असता विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याचे शेतात दोनदा येऊन धान पिकाचे डिजिटल फोटो काढून पाहणी केली व कंपनीस नुकसान भरपाई देण्यास सांगतो असे सांगून निघून गेले. त्यानंतर तक्रारकर्त्याने 7-8 दिवसांनंतर विरुध्द पक्षांना फोन केला असता त्यांनी आम्ही नुकसान देणार नाही असे स्पष्ट सांगितले. म्हणून तक्रारकर्त्याने मा. उपविभागीय कृषी अधिकारी, गडचिरोली यांचेकडे अर्ज केला असता त्यांनी दि.03.11.2017 रोजी तक्रारकर्त्याचे शेतातील पिकांचा पंचनामा केला व योग्य कालावधीत पिक हाती आले नाही हे दिसुन आले व पुढेही नुकसान भरुन येण्याची शक्यता नाही असा अहवाल दिला. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी त्याला धानपिकाची बिजाई ही जड धानपिक म्हणून हलक्या जातीचे धान पिक दिले असल्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झालेले असुन विरुध्द पक्षांनी त्याची फसवणूक केलेली आहे. विरुध्द पक्षांची सदरची कृति ही सेवेतील कमतरता आहे. म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालिल प्रमाणे मागणी केली आहे.
4. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत त्याने विरुध्द पक्षांचे दुकानातून खरेदी केलेल्या धानपिकाचे बियाणामुळे झालेल्या नुकसाना दाखल रु.1,50,000/- देण्याचा विरुध्द पक्षांना आदेश करावा. तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची रक्कम रु.60,000/- व तक्रारीचा खर्च रु.7,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
5. तक्रारकर्त्याने निशाणी क्र.2 नुसार 10 झेरॉक्स दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्त्याची तक्रार नोंदणीकरुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात हजर होऊन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले.
6. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी निशाणी क्र.18 वर दाखल केलेल्या शपथपत्रात नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास जुन 2017 मध्ये तक्रारकर्त्यास यशोदा हायब्रीड सिड्स प्रा.लि. कंपनीचे पदमशाली बिल क्र.81 व 91 नुसार दि.17.06.2017 रोजी 6 बॅग एकूण रु.3,750/- ला विक्री केली होती, ही बाब मान्य केलेली आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास बियाणांची विक्री करते वेळी 140 दिवसांत पिक येईल असे सांगितले असुन पॉम्पलेटमध्ये सदर बाब नमुद आहे. तक्रारकर्त्याने धान पिक गर्भामध्ये असतांना विरुध्द पक्ष क्र.1 यांना माहीती दिली असता त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 ला स्वतः भेटून सांगितली व विरुध्द पक्ष क्र.3 यांना फोनव्दारे कळविली असता त्यांनी मौका चौकशीकरीता येतो असे सांगितल्याचे नमुद केले आहे. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 व कंपनीचे कर्मचारी यांनी तक्रारकर्त्याचे शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांना काही दिवसात पिक कापणीस येणार असल्याचे दिसुन आले. त्यानंतर दि.03.11.2017 रोजी मा. उपविभागीय कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी पंचनामा केला आहे. तसेच तक्रारकर्त्याला काही दिवस अगोदर पिक आल्यामुळे थोड्या प्रमाणात नुकसान झाले असुन कंपनी काही प्रमाणात भरपाई देण्यांस तयार असल्याचे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने संपूर्ण पिकाचे नुकसानीची भरपाई मागितली असल्यामुळे सदरची तक्रार व्यर्थ व वेळ घालविणारी असल्याचे नमुद केले आहे.
7. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी निशाणी क्र.12 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमुद केले आहे की, ते यशोदा हायब्रिड सिड्स प्रायव्हेट लिमीटेड चे स्टॉकीस्ट असुन त्यांचा कोणत्याही प्राप्त मालाच्या गुणवत्तेची हमी देण्याचा संबंध येत नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 कडून सिलबंद पॅकेटमध्ये आलेल्या बियाणांची त्यांने विरुध्द पक्ष क्र.1 ला विक्री केली असल्याने त्यांचा बियाणांचे गुणवत्तेबद्दल कोणताही संबंध येत नाही असे आपल्या लेखीउत्तरात नमुद केले आहे.
8. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी निशाणी क्र.7 वर दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमुद केला आहे की, त्यांचा तक्रारकर्त्यासोबत कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाही. तसेच तक्रारकर्त्यास विक्री केलेल्या बियाणांचा अवधी हा 125 ते 130 दिवसांचा आहे त्यामुळे बियाणांचा अवधी हा 140 ते 145 दिवसांचा आहे अश्या प्रकारचे निवेदन काढण्याचा विरुध्द पक्ष क्र.2 ला अधिकार दिलेला नाही. म्हणून विरुध्द पक्ष क्र.2 यांनी केलेल्या कृत्याबाबत त्यांना जबाबदार धरता येणार नाही. तसेच तक्रारकर्त्याने धान बिज ‘पदमशाली’ विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून खरेदी केले होते ही बाब मान्य केली असुन तक्रारकर्त्याला देण्यांत आलेल्या बियाणांचे बिलावर पिकाचा अवधी हा 140 ते 145 नमुद केल्याचे अमान्य केले आहे. तसेच तक्रारकर्त्याने महत्वाची माहिती, उत्पन्न व पिक किती झाले हे लपवून ठेवले असल्यामुळे तक्रारकर्त्याची सदरीची तक्रार खोटी असुन ती खर्चासह खारिज करण्यांत यावी अशी विरुध्द पक्ष क्र. 3 ने मंचास विनंती केलेली आहे.
9. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी दाखल केलेले बयान, तसेच दाखल दस्तावेज, शपथपत्र व तोंडी युक्तिवादावरून खालिल मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता ही विरुध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- // कारणमिमांसा// -
10. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्ता हा मौजा तांबोशी, पो.नवेगाव रै. तह. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन त्याने शेतीकरीता विरुध्द पक्ष क्र.1 मे. अर्चना कृषी केंद्र यांचेकडून यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. कंपनीचे वान (बिजाई) पदमशाली बिल क्र.81 व 91 नुसार दि.17.06.2017 रोजी बियाणे खरेदी केले होते ही बाब तक्रारीसोबत दाखल निशाणी क्र.2 वरील दस्त क्र.3 वरुन स्पष्ट होते. म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
11. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेजांची पडताळणी करतांना असे दिसते की, त्याने विरुध्द पक्ष क्र.1 मे. अर्चना कृषी केंद्र, नवेगाव रै, यांचेकडून यशोदा सिड्सचे पदमशाली वान (बिजाई) बिल क्र. 081/091 दि.17.06.2017 रोजी रु.3,660/- ला बियाणे खरेदी केले ही बाब निशाणी क्र.2 वर दाखल दस्त क्र.3 वरुन सिध्द होते. तसेच सदर बिलावर बियाणे पेरल्यानंतर पिक 140 ते 145 दिवसात येईल असे नमुद आहे. तक्रारकर्त्याने दि. 18.06.2017 ला पदमशाली धानाची बिजाई पेरणी केल्यानंतर एक महिन्यानंतर दि. 18.07.2017 रोजी रोपांची लागवड केली असता धानाचे पिक 140 ते 145 दिवसांचे आत धान निसवण्याचे चिन्ह आढळून आले. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 व कंपनीचे कर्मचारी यांनी तक्रारकर्त्याचे शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांना काही दिवसात पिक कापणीस येणार असल्याचे दिसुन आल्यानंतर दि.03.11.2017 रोजी मा. उपविभागीय कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी पंचनामा केला असुन सदर बाब दस्त क्र.8 वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने धान पिक गर्भामध्ये असतांना विरुध्द पक्ष क्र.1 यांना माहीती दिली असता विरुध्द पक्ष क्र.1 व कंपनीचे कर्मचारी यांनी तक्रारकर्त्याचे शेतात जाऊन पाहणी केली असता कंपनी काही प्रमाणात भरपाई देण्यांस तयार असल्याचे सांगितले. परंतु तक्रारकर्त्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 तर्फे खरेदी केलेली बियाणे तक्रारकर्त्याने 140-145 दिवसात पिक येईल या उद्देशाने पेरणी केली होती हे तक्रारीसोबत दाखल दस्तावेजावरुन स्पष्ट होते. ही बाब विरुध्द पक्ष क्र.2 चे बियाणे प्रसिध्दी पत्रकानुसार असल्यामुळे व सदर पत्रकाबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांना माहीत नाही, हे गृहीत धरण्यासारखे नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 ला असे पत्रक काढण्याचा अधिकार नाही, हे कंपनीच्या नियमाविरुध्द असल्याचे विरुध्द पक्ष क्र.3 ने दाखल शपथपत्र व कंपनीचे बियाणाचे प्रसिध्दी पत्रकावरुन सिध्द होते. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दिलेल्या पत्रकानुसार बियाणांचा वापर करण्याचा कालावधीनुसार तक्रारकर्त्याने वापर केल्यामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विरुध्द पक्षांनी अनुचित व्यवहार केलेला आहे असे सिध्द होते त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे. तसेच कंपनीव्दारे पुरवठा केलेले बिज कंपनी नियमानुसार व पत्रकानुसार 125-130 दिवस कालावधीनुसार योग्य असण्याचे सिध्द होत असल्यामुळे तसेच तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र.3 चा ग्राहक होत नसल्यामुळे त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश पारित करणे योग्य नाही, असे या मंचाचे मत असुन हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्षांविरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास शेतीत झालेल्या नुकसानीपोटी रु.20,000/- तक्रार दाखल दि.28.11.2017 रोजी पासुन ते प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- अदा करावा.
4. विरुध्द पक्ष क्र.3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
5. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तरित्या आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे करावी.
6. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
7. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.