श्रीमती दिप्ती अ. बोबडे, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने वि.प.कडून भुखंड घेण्याचे ठरविले होते. त्याकरीता वि.प.ने तक्रारकर्त्याला त्याच्या Buy Back योजनेमध्ये भाग घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने वि.प.ने दि.05.03.2015 ला त्याच्या A-SKY group या लेआऊटमधील भुखंड क्र. पी-24, मौजा कांडली, ता.समूद्रपूर, जि. वर्धा, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु.करीता Buy Back करारनामा केला. तक्रारकर्त्याने भुखंडाची पूर्ण किंमत रु.2,50,000/- वि.प.ला दिली. वि.प.ने हेतूपुरस्सर Buy Back करारनामा व्यतिरिक्त वरील रकमेची पावती तक्रारकर्त्यास दिली नाही. भुखंडाची पूर्ण रक्कम अदा करुनही वि.प.ने तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच शासनाच्या कुठल्याच विभागाकडून परवानगीसुध्दा मिळविली नाही. विक्रीपत्र करुन देण्याकरीता तक्रारकर्त्याने वि.प.ला वेळोवेळी मागणी केली असता वि.प. नेहमी त्याला टाळत होता. त्यानंतर काही दिवसांनी वि.प.ने स्वतःहून तक्रारकर्त्यास सांगितले की तो तक्रारकर्त्याला विक्रीपत्र करुन देऊ शकत नाही. तेव्हा तक्रारकर्त्याने दिलेली रक्कम तो परत करण्यास तयार आहे. तेव्हा कराराप्रती जे दस्तऐवज होते ते तक्रारकर्त्याने त्याला परत करावे. तक्रारकर्त्याने त्याला धनादेश वटल्यानंतर दस्तऐवज परत करतो असे सांगितले. वि.प.ने तक्रारकर्त्याला दि.05.04.2016 चा धनादेश क्र. 680328 रु.2,50,000/- चा दिला. परंतू तो धनादेश “Funds insufficient” या कारणास्तव अनादरीत झाला. अशाप्रकारे वि.प.ने तक्रारकर्त्याकडून भुखंडाची संपूर्ण रक्कम घेऊनसुध्दा त्याला विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच पैसेही परत केले नाही. ही वि.प.ची कृती अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करणारी असून सेवेतील त्रुटी आहे. वि.प.ने तक्रारकर्त्यास फसविले म्हणून त्याला ही तक्रार मंचासमोर दाखल करावी लागली तक्रारीत त्याने उपरोक्त भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे, तसे शक्य नसल्यास भुखंडाची किंमत रु.2,50,000/-, शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/-, तक्रारीचा खर्च रु.10,000/- असे एकूण रु.3,10,000/- हे 18% व्याजासह परत करावे अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकूण 3 दस्तऐवज सादर केलेले आहे.
2. सदर प्रकरणाची नोटीस वि.प.ला प्राप्त झाल्यावरही ते मंचासमोर हजर न झाल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. तसेच तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्यांचे वकिलांमार्फत ऐकला व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष -
3. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल दस्तऐवज क्र. 2 जे उभय पक्षामध्ये Buy Back करारनामा आहे, त्याचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे लक्षात येते की, तक्रारकर्ता व वि.प.मध्ये A Sky Group या लेआऊटमधील भुखंड क्र. पी 24 मौजा कांडली, ता. समूद्रपूर, जि. वर्धा करीता व्यवहार झाल्याचे दिसते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की, भुखंडाची संपूर्ण रक्कम रु.2,50,000/- त्याने वि.प.ला दिले होते. ते परत करण्याकरीता वि.प.ने तक्रारकर्त्यास दिलेला धनादेश अभिलेखावरील दस्तऐवज क्र. 1 आहे. सदरच्या प्रकरणात वि.प. त्याला नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाला नाही व त्याने तक्रारीस उत्तरही दाखल केले नाही. तेव्हा तक्रारकर्त्याचे कथन की, त्याने वि.प.ला भुखंडाची संपूर्ण रक्कम रु.2,50,000/- दिली. हे मंचास मान्य करण्यात कुठलेही दुमत नाही. ज्याअर्थी, वि.प.ने रु.2,50,000/- चा धनादेश तक्रारकर्त्यास दिला. त्याअर्थी, ते त्यास देणे होते हे सिध्द होते. दस्तऐवज क्र. 1 वरुन हेही दिसून येते की, वि.प.ने तक्रारकर्त्यास दिलेला रु.2,50,000/- चा धनादेश “Funds insufficient” या कारणास्तव अनादरीत झाला. वि.प.ने तक्रारकर्त्याकडून उपरोक्त भुखंडाकरीता संपूर्ण रक्कम स्विकारुन त्याला विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच ते करुन देणे जमत नाही हे मान्य करुन त्याची स्विकारलेली रक्कम ही तक्रारकर्त्यास परत केली नाही. त्याकरीता वि.प.ने दिलेला धनादेशही अनादरीत झाला. वि.प.ची ही कृती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असून सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीत त्याने भुखंडाकरीता दिलेली रक्कम रु.2,50,000/- ही 18 टक्के व्याजासह वि.प.नी परत करावी अशी मागणी केली आहे. वरील कथनाच्या पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने त्याच्या लेखी युक्तीवादासोबत खालील न्याय निवाडे जोडले आहेत.
- III (2010) CPJ 428 (NC) Sushila Devi Agrawal vs. Jan Sankalp Sehkari Avas Samiti Ltd.
- (2014) 2 CPR 15 Carlos Felix Barretto and ors. Vs. Shetty Coastal Development Pvt. Ltd.
- (2014) 1 CPR 102 Surbhi Constructions vs. Sanjay Johnson Soanes
- Maya Lashkare vs. M/s. Jagdamba Promoters in CC/12/34 (decided in 02/09/2014)
परंतू वरील न्यायनिवाडयामधील व सदर प्रकरणातील वस्तूस्थिती (facts and circumstances) हे वेगळे आहेत. ते सदर प्रकरणात लागू होणार नाही. सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने उपरोक्त भुखंडाकरीता झालेल्या व्यवहाराकरीता Buy Back करारनामा व्यतिरिक्त कुठलेही दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले नाही. त्यामुळे भुखंड विक्रीकरीता झालेल्या कराराबाबत कुठल्याही अटी व शर्ती तसेच सत्य वस्तूस्थिती मंचासमोर आलेली नाही. दाखल दस्तऐवजावरुन भुखंडाकरीता वि.प.ने तक्रारकर्त्याकडून रु.2,50,000/- एवढी रक्कम घेतल्याचे स्पष्ट होते. करिता तक्रारकर्ता हा रु.2,50,000/- एवढी रक्कम व्याजाशिवाय वि.प.कडून परत मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदरच्या रकमेवरील व्याज तसेच तक्रारकर्त्याने केलेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्चाकरीता केलेल्या मागण्या मंच फेटाळत आहे. तसेच भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याचीही तक्रारकर्त्याची मागणी मंच फेटाळत आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- रु.2,50,000/- ही रक्कम आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत परत करावी अन्यथा त्यानंतर पुढील कालावधीकरीता वरील रकमेवर प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत 12 टक्के व्याज देय राहील.
2) शारिरीक, मानसिक त्रासाकरीता व तसेच तक्रारीच्या खर्चाकरीता कुठलाही आदेश नाही.
-