तक्रार क्र. CC/ 12/ 111 दाखल दि. 31.12.2012
आदेश दि. 12.09.2014
तक्रारकर्ता :- श्रीमती सविता विष्णु गोमासे
वय – 28, धंदा - घरकाम
रा.माटोरा ता.जि.भंडारा
वारसदार श्री विष्णु दामोदर गोमासे
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- मेसर्स आहुजा इलेक्ट्रानिक्स
मेन रोड,बडा बाजार,भंडारा
ता.जि.भंडारा मार्फत प्रोप्रायटर
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्ती स्वतः हजर.
विरुध्द पक्ष एकतर्फी.
.
(आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा.बडवाईक)
-// आ दे श //-
(पारित दिनांक 12 सप्टेंबर 2014)
1. मुळ तक्रार ही विष्णु दामोदर गोमासे यांनी दाखल केली होती. त्यांच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी सविता विष्णु गोमासे हिचा वारस म्हणुन या तक्रारीमध्ये समावेश करण्यात आला. मुळ तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2 तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या दुकानातून दिनांक 29/1/2012 रोजी कोणीका कंपनीचा पोर्टेबल 14 इंची रंगीत दुरदर्शन संच (T.V.) 3,600/- रुपयाला खरेदी केला. सदर दुरदर्शन संच (T.V.) खरेदी करतेवेळी विरुध्द पक्षाने दुरदर्शन संचा (T.V.) मध्ये एक वर्षापर्यंत कोणताही बिघाड होणार नाही व झाल्यास दुरदर्शन संच (T.V.) बदलून देण्यात येईल अथवा रक्कम परत करण्यात येईल, असे सांगितले. विरुध्द पक्षाने खरेदीचे देयक दिले व त्यावर एक वर्षाच्या मुदतीच्या warranty बाबत नमुद केले आहे. टीव्ही संच खरेदीच्या दोन महिन्यानंतरच दुरदर्शन संचा मध्ये आग निर्माण होवून दुरदर्शन संच (T.V.) जळाला व त्यामुळे दुरदर्शन संच (T.V.) निकामी झाला. या बाबत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला सुचना देवून दुरदर्शन संच (T.V.) बदलून देण्याची विनंती केली तसेच बदलून न दिल्यास रक्कम परत करावी अशी तोंडी विनंती वारंवार केली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी मान्य केली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने जळालेला दुरदर्शन संच (T.V.) विरुध्द पक्षाकडे परत केला. वारंवार मागणी करुन देखील विरुध्द पक्षाने हेतुपरस्पर बंद दुरदर्शन संच (T.V.) बदलुन दिला नाही अथवा रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 1/10/2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्द पक्षाला प्राप्त होऊनही त्याने नोटीसचे पालन केले नाही अथवा उत्तर देखील दिले नाही. यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला विचारणा केली असता विरुध्द पक्षाने ‘‘आता मी तुला संच देणार नाही, त्याबरोबरच रक्कम देखील परत करणार नाही, तुला जे जमेल ते करुन घे.’’ असे उत्तर दिले. तसेच तक्रारकर्त्यास अपमानजनक शब्द बोलून त्यास मारण्याची धमकी दिली. विरुध्द पक्षाच्या या वागण्यामुळे तक्रारकर्त्यास त्रास सहन करावा लागला. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी बाबत तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे.
3. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये दुरदर्शन संचाची किंमत रुपये 3,600/-, शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च, नोटीसचा खर्च मिळण्याची मागणी केली आहे.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या समर्थनार्थ दस्तऐवज दाखल करण्याच्या यादी प्रमाणे एकुण 4 दस्त तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 12 ते 15 वर दाखल केले आहे.
5. मंचाने तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर विरुध्द पक्षाला नोटीस पाठविली. विरुध्द पक्षाची नोटीस ‘Intimation’ या शे-यासह परत आल्यामुळे मंचाने दिनांक 13/5/2013 रोजी विरुध्द पक्षाविरुध्द एकतर्फी आदेश पारित केला.
6. तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारीमध्ये दाखल दस्त यावरुन मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
7. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून रुपये 3,600/- ला कोणीका कंपनीचा रंगीत दुरदर्शन संच (T.V.) दिनांक 29/1/2012 ला एक वर्षाच्या Warranty सह खरेदी केला, याबाबत तक्रारकर्त्याने बील दाखल केले आहे. दुरदर्शन संच (T.V.) घेतल्यानंतर दोन महिन्यातच दुरदर्शन संच (T.V.) आगीमुळे जळाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला सुचना देवून दुरदर्शन संच (T.V.) बदलून देण्याची विनंती केली. अथवा दुरदर्शन संच (T.V.) बदलून देणे शक्य नसल्यास दुरदर्शन संचाच्या रक्कमेची मागणी केली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी मान्य न केल्यामुळे तक्रारकर्त्याने जळालेला दुरदर्शन संच (T.V.) विरुध्द पक्षाकडे नेवून जमा केला. तरी देखील विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दुरदर्शन संच (T.V.) बदलून दिली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने वकीलामार्फत नोटीस पाठविली व विरुध्द पक्षास नोटीस प्राप्त होवून देखील विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निराकरण केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने मंचामध्ये तक्रार दाखल केली. मंचाची नोटीस प्राप्त होवून देखील विरुध्द पक्ष गैरहजर राहिला व तक्रारीला उत्तर दाखल केले नाही त्यामुळे विरुध्द पक्षाला तक्रारकर्त्याची तक्रार मान्य आहे हे स्पष्ट होते. करीता तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
8. तक्रारकर्ता/तक्रारकर्ती ही माटोरा गावचा रहिवासी असून व्यवसायाने मजुर आहे. त्यामुळे त्यास माटो-यावरुन भंडारा येथे विरुध्द पक्षाच्या दुकानामध्ये वारंवार यावे लागले. त्यासाठी त्याला त्यादिवशी मजुरीवर जाता आले नाही. त्यामुळे त्यास आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. तसेच दुरदर्शन संच जळाल्यामुळे निकामी झाला. त्यामुळे तक्रारकर्ता व त्याच्या कुटुंबियांना मनोरंजना पासून मुकावे लागले. त्यामुळे तक्रारकर्ता निश्चितच शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची/तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस रुपये 3,600/- (तीन हजार सहाशे) हे 9 टक्के व्याजाने तक्रार दाखल झाल्यापासून म्हणजेच 31/12/2012 पासून ती संपुर्ण रक्कम मिळेपर्यंत दयावे.
3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस शारीरिक,मानसिक त्रासापोटी रु.5,000 (पाच हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(दोन हजार) दयावे.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.