द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष -
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांची जून,2007 चे दरम्यान भोपाळवरुन मुंबईला बदली झाली त्यामुळे तक्रारदारांचे घरसामान भोपाळवरुन मुंबईला आणणे आवश्यक होते. तक्रारदार ज्या टाटा टेली सर्व्हिसेस लि.कंपनीमध्ये काम करीत होते त्या कंपनीने तक्रारदारांचे घरसामान भोपाळवरुन मुंबईला आणण्यासाठी सामनेवाला वाहतूक कंपनीशी संपर्क साधून दि.05/06/2007 चे पत्राने तक्रारदारांचे घरसामान 15 दिवसांत सुरक्षितपणे मुंबईला पोहोच करावे असे सामनेवाला यांना सांगितले. तक्रारदारांच्या घरसामानाबरोबत त्यांची मारुती वर्सा कार सुध्दा भोपाळवरुन मुंबईला आणण्याचे होते. सामनेवाला यांनी तक्रारारांचे घरसामान व त्यांची कार मुंबईला आणली. तक्रारदारांना त्यांचे घरसामान दि.09/06/07 रोजी मिळाले. त्यांनी घरसामानाची पाहणी केली असता त्यांना काही घरसामानाची मोडतोड झाल्याचे दिसून आले. सामनेवाला यांचे प्रतिनिधी श्री.नरेंद्र कुमार यांनी घरसामानाच्या नुकसानीची भरपाई तक्रारदारांना ताबडतोब दिली.
2) त्यानंतर तक्रारदारांना त्यांच्या मारुती वर्सा कारचे नुकसान झाल्याचे दिसून आले. सदरची बाब तक्रारदारांनी सामनेवाला यांनी निदर्शनास आणली त्यावेळी सामनेवाला यांचे अधिका-यांनी तक्रारदारांना कारच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडे मागणी करावी असे सुचविले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी नॅशनल इंन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधला. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सर्व्हेअरने तक्रारदारांना गाडीचे नुकसान झाल्यासंबंधीचे प्रमाणपत्र सामनेवाला यांचेकडून आणावेत असे सुचविले. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडे गाडीच्या नुकसानीसंबंधी प्रमाणपत्र मागितले असता सदरचे प्रमाणपत्र देण्याचे सामनेवाला यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारांच्या मारुती वर्सा कारच्या नुकसानीबाबतचा क्लेम नाकारला व क्लेम नाकारताना तक्रारदारांच्या गाडीचे नुकसान अपघातामुळे झाले नसुन सामनेवाला यांनी सदर गाडी मुंबईला आणली त्यावेळी झाले असे कारण दिले.
3) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे घरसामान व मारुती वर्सा कार दि.08/06/07 रोजी मुंबईत आली असतानासुध्दा त्या दिवशी त्यांची कार त्यांना ताबडतोब न देता दुस-या दिवशी म्हणजेच दि.09/06/07 रोजी सकाळी 10.00 वा. त्यांच्या ताब्यात देण्यात आली. तक्रारदारांना त्यांच्या कारची पाहणी करता आली नाही. तक्रारदारांनी त्यांची कार मे.एस्.एस्.व्हील्स प्रा.लि. या मारुती सुझूकीच्या अधिकृत सेवा केंद्राकडे दुरुस्तीसाठी पाठविली. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या कारची वाहतूक करताना आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे तक्रारदारांच्या कारचे नुकसान झाले असे असतानाही तक्रारदारांना नुकसानीसंबंधीचा दाखल दिला नाही. तक्रारदारांनी सदर वाहन दुरुस्तीचे रक्कम रु.44,872/-चे बिल मे.एस्.एस्.व्हील्स प्रा.लि. ने तक्रारदारांना दिले त्यावेळी तक्रारदारांना रक्कम रु.13,700/- मे.एस्.एस्.व्हील्स प्रा.लि.यांना द्यावी लागली. उर्वरित रक्कमेसाठी सामनेवाला यांनी इन्शुरन्स कंपनीकडे विनंती केली व त्यावेळी इन्शुरन्स कंपनीने गाडीच्या दुरुस्तीची उर्वरित रक्कम मे.एस्.एस्.व्हील्स प्रा.लि.ला दिली.
4) तक्रारदारांनी त्यांच्या कारचे नुकसान सामनेवाला यांचेकडून वेळोवेळी मागितले असताना सुध्दा सामनेवाला यांनी नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली. सबब तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करावा लागला. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून त्यांच्या मारुती वर्सा कारचे दुरुस्तीसाठी त्यांनी मे.एस्.एस्. व्हील्स प्रा.लि. यांना दिलेली रक्कम र.13,700/- तक्रारदारांना द्यावी असा सामनेवाला यांना आदेश करावा व वरील रक्कमेवर सामनेवाला यांनी तक्रारदारांना द.सा.द.शे.18 टक्के दराने दि.16/07/07 पासून व्याज द्यावे असाही आदेश करावा अशी विनंती केली. तक्रारदारांची वरील वाहन दुरुस्त होईपर्यंत तक्रारदारांना त्यांच्या कार्यालयात जाण्यायेण्यासाठी झालेला खर्च रक्कम रु.16,800/- व त्यावर 18 टक्के दराने व्याज सामनेवाला यांनी द्यावे अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदारांना सामनेवाला कंपनीकडून कारच्या दुरुस्तीच्या खर्चापैकी काही रक्कम द्यावी लागल्यामुळे त्यांना रु.2,054/-नो क्लेम बोनस मिळाला नाही, म्हणून ती रक्कम 18 टक्के व्याजासहित सामनेवाला यांना द्यावी व तसेच मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रु.1 लाख व या अर्जाचा खर्चापोटी रक्कम रु.20,000/- सामेनवाला यांनी तक्रारदारांना द्यावेत असा आदेश करावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
5) तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
6) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारअर्ज गैरसमजूतीवर आधारलेला असून तक्रारअर्जातील आरोप खोटे व चुकीचे असल्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा. सामनेवाला यांच्या सेवेत कोणतीही कमतरता नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांचे वाहन सुरक्षितरित्या भोपाळवरुन मुंबईला आणले व ते तक्रारदारांच्या ताब्यात दि.09/06/07 रोजी दिले त्यावेळी तक्रारदारांनी सदरचे वाहन चालवून पाहिले होते. एक महिन्यानंतर तक्रारदारांनी सदरचे वाहन दुरुस्तीसाठी मे.एस्.एस्.व्हील्स प्रा.लि. यांचेकडे पाठविले. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या घरसामानाची मोडतोड झाल्याबद्दलची नुकसानभरपाई सामनेवाला यांच्या प्रतिनिधीने ताबडतोब तक्रारदारांना दिली होती. तक्रारदारांचे वाहन वाहतूक करताना पुरेशी काळजी घेतली नाही त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे याकामी त्यांची सेवा मे.टाटा टेली सर्व्हिसेस प्रा.लि., भोपाळ यांनी घेतली होती व ती व्यवसायिक स्वरुपाची होती. सबब तक्रारदार हे ग्राहक नसल्यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या ग्राहक मंचासमोर दाखल करता येणार नाही.
7) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारांच्या वाहनाचे किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेअरची नेमणूक केली होती किंवा नाही ? याबाबततक्रारदारांनी स्पष्टपणे काहीही म्हटलेले नाही. सर्व्हेअरचा रिपोर्ट असल्यास तो तक्रारदारांनी हजर करावा असा आदेश तक्रारदारांना करावा. तक्रारदारांना इन्शुरन्स कंपनीकडून रक्कम रु.31,172/- या पूर्वीच मिळाला आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले आरोप खोटे आहेत. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल करण्यापूर्वी कॅरिअर अक्ट, 1865 च्या कलम 10 प्रमाणे नोटीस देणे आवश्यक होते. अशी नोटीस सामनेवाला यांना दिलेली नसल्यामुळे सदरचा तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांनी केलेले आरोप नाकारले असून तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा असे म्हटले आहे.
8) तक्रारदारांनी प्रतिनिवेदन दाखल करुन कैफीयतीतील आरोप नाकारले आहेत. याकामी सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदारांचे वकील श्री.नवीन कुमार व सामनेवाला यांचे वकील शिव कुमार वत्स यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आला.
9) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना त्यांनी तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई व इतर रकमा व्याजासहित सामनेवाला यांचेकडून मागता येईल
काय ?
उत्तर - नाही.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - सामनेवाला हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत असून त्यांचे कार्यालय दानाबंदर, मुंबई येथे आहे. जून,2007 चे दरम्यान तक्रारदारांची भोपाळवरुन मुंबईला बदली झाली त्यावेळी त्यामुळे तक्रारदारांचे घरसामान भोपाळवरुन मुंबईला आणणे आवश्यक होते. तक्रारदार ज्या टाटा टेली सर्व्हिसेस लि.कंपनीमध्ये काम करीत होते त्या कंपनीने तक्रारदारांचे घरसामान भोपाळवरुन मुंबईला आणण्यासाठी सामनेवाला वाहतूक कंपनीशी संपर्क साधून दि.05/06/07 चे पत्राने तक्रारदारांचे घरसामान 15 दिवसांत सुरक्षितपणे मुंबईला पोहोच करावे असे सामनेवाला यांना सांगितले. तक्रारदारांच्या घरसामानाबरोबर त्यांची मारुती वर्सा कार सुध्दा भोपाळवरुन मुंबईला आणण्यात आली. या बाबी उभपक्षकारांना मान्य आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.06/09/07 रोजी मुंबई येथे त्यांचे घरसामान पोहोच झाल्यानंतर त्यांनी त्या घरसामानाची पाहणी केली असता त्यांना काही घरसामानाची मोडतोड झाल्याचे आढळून व त्याची नुकसानभरपाई सामनेवाला यांचे प्रतिनिधी श्री.नरेंद्र कुमार यांनी तक्रारदारांना ताबडतोब दिली ही बाब सुध्दा सामनेवाला यांना मान्य आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची मारुती वर्सा कार भोपाळवरुन आणताना सामनेवाला यांनी योग्य ती काळजी घेतली नाही व सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरतेमुळे त्यांच्या कारचे नुकसान - “to the extent of excel and differential of the rear tyres and RIM” झाले. सदरची बाब तक्रारदारांनी सामेनवाला यांच्या निदर्शनास आणल्यानंतर सामनेवाला यांनी सदर कारची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून वसुल करावी अस सुचविले. तक्रारदारांनी विमा कंपनी (नॅशनल इन्शुरन्स कंपनीशी) संपर्क साधला असता त्यांना सामनेवाला यांचेकडून संबंधीत कारचे डॅमेज सर्टिफीकेट आणावे असे सांगण्यात आले. तक्रारदारांनी डॅमेज सर्टिफीकेट सामनेवाला यांचकडून मागितले असता सामनेवाला यांनी डॅमेज सर्टिफीकेट देण्याची टाळाटाळ केली. नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सामनेवाला यांना कारची वाहतूक करताना योग्य ती काळजी घेतली नाही या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारला. तक्रारदारांनी सदरची कार दुरुस्तीसाठी मे.एस्.के.व्हील्स प्रा.लि.या मारुती सुझूकीच्या अधिकृत गॅरेज्मध्य दिली होती. कार दुरुस्तीचे एकूण बिल रु.44,872/- झाले. वरील बिलापैकी रक्कम रु.13,700/- तक्रारदारांनी स्वतः भरले व इन्शुरन्स कंपनीला वारंवार विनंती केल्यानंतर विमा कंपनीने उर्वरित कार दुरुस्तीची रक्कम गॅरेजला दिली नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी विनंती करुनही सामनेवाला यांनी कार दुरुस्तीचा खर्च न दिल्यामुळे दि.15/10/2007 रोजी सामनेवाला यांना नोटीस दिली व कार दुरुस्तीचा खर्च व नुकसानभरपाई मागितली.
सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारांच्या कारचे नुकसान झाले हा तक्रारदारांचा आरोप खोटा आहे. ज्या घरसामानाचे नुकसान झाले होते त्याची भरपाई सामनेवाला यांनी ताबडतोब दिली आहे हे तक्रारदारांनी तक्रारअर्जात मान्य केले आहे. दि.15/10/07 पूर्वी तक्रारदारांनी कारची नुकसानभरपाई सामनेवाला यांचेकडून मागितल्याबद्दल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांना कारची डिलिव्हरी दि.09/06/07 रोजी मिळाली हे तक्रारदारांना मान्य आहे. जर कारचे तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे नुकसान होवून ती चालू शकत नव्हती तर तक्रारदारांनी सामनेवाला यांना ताबडतोब लेखी कळविले असते. दिनांक 09/06/07 रोजी कार त्यांच्या ताब्यात मिळूनसुध्दा तक्रारदारांनी ती कार दुरुस्तीसाठी गॅरेजला जवळ जवळ महिन्याभरानंतर पाठविली. यावरुन तक्रारदारांच्या कारचे सामनेवाला यांच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले या आरोपात तथ्य वाटत नाही. तक्रारदारांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून त्यांच्या कारच्या नुकसानभरपाई बाबत रक्कम रु.31,171/- विमा कंपनीकडून वसुल केले असे तक्रारअर्जात म्हटले आहे. तथापि, विमा कंपनीच्या सर्व्हेअरने कारच्या नुकसानीसंबंधीचा दिलेला अहवाल तक्रारदारांनी या कामी हजर केलेला नाही. सामनेवाला वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी कारचे झालेले संपूर्ण नुकसान विमा कंपनीकडून वसुल केले असल्यामुळे पुन्हा तीच रक्कम सामनेवाला यांचेकडून वसुल करता येणार नाही.
तक्रारदारांची कार त्यांना दि.09/06/2007 रोजी प्रत्यक्ष ताब्यात मिळाली. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी त्यांच्या कारची वाहतूक करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे नुकसान झाले होते. असे कारचे नुकसान झाले असते तर तक्रारदारांनी सामनेवाला यांना ताबडतोब कळविले असते व नुकसानभरपाई मागितली असती. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांची कार मे.एस्.के.व्हील्स प्रा.लि. यांचेकडून दुरुस्त करुन घेतली. तक्रारदारांनी दाखल केलेला मे.एस्.के.व्हील्स प्रा.लि.चा जॉब कार्ड रिटेल इन्व्हॉईस दि.13/07/2007 रोजीचा आहे. दि.16/07/2007 रोजी तक्रारदारांनी रु.13,700/- मे.एस्.के.व्हील्स प्रा.लि. ला दिल्यासंबंधीची पावती आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीला पुन्हा पुन्हा विनंती केल्यानंतर विमा कपंनीने कारच्या दुरुस्तची उर्वरित रक्कम संबंधीत गॅरेजला दिली. उलटपक्षी सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे नॅशनल इन्शुरन्स कंपनीने कारचे तथाकथीत झालेल्या नुकसानीची संपूर्ण नुकसानभरपाई दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांना कार दुरुस्तीच्या खर्चासाठी कोणतीही रक्कम सामनेवाला यांचेकडून मागता येणार नाही. कोणतीही विमा कंपनी त्यांच्या सर्व्हेअरच्या मार्फत विमाधारकाच्या कारचे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्याशिवाय दुरुस्तीचा खर्च मंजूर करत नाही. या कामी इन्शुरन्स कंपनीच्या सर्व्हेअरचा रिपोर्ट दाखल केलेला नाही. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी त्यांना कारचे किती नुकसान झाले याबाबतचा दाखला दिला नव्हता. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्रे दाखल न केल्यामुळे तक्रारदारांचे म्हणणे ग्राह्य धरता येणार नाही. सबब तक्रारदारांना सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता सिध्द करता आली नाही असे म्हणावे लागते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता सिध्द न करता आल्यामुळे व कारच्या दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम त्यांनी यापूर्वीच विमा कंपनीकडून वसुल केलेली असल्यामुळे, तसेच संबंधीत विमा कंपनीस या कामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील न केल्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून कसलीही रक्कम अगर नुकसानभरपाई वसुल करता येणार नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब वर नमूद केलेल्या कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे.
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 325/2007 रद्द करणेत येत आहे.
2.खर्चाबद्दल आदेश नाही.
3.सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.