(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 23 डिसेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्ता हे नागपूर येथील कायमचे रहिवासी असून ते उपरोक्त पत्त्यावर राहतात. विरुध्दपक्ष ‘झाम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि.’ या नावाने कंपनी अॅक्ट अंतर्गत नोंदणी झालेली आहे. त्याचे रजिस्टर्ड ऑफीसर कन्हैय्या हाइट्स बेसा, घोगली स्वामीधाम मंदीर जवळ, बेसा, नागपूर येथे आहे. विरुध्दपक्ष यांचे व्यवसायाचे मुख्य स्वरुप हे जमीन विकत घेवून त्यामध्ये ले-आऊट पाडून अपार्टंमेंट बनविणे व अपार्टमेंट मधील फ्लॅट विकणे असे आहे.
3. तक्रारकर्त्याने फ्लॅट क्र. 60, 61 प्रोजेक्ट K.C.1 Phase-IV रुपये 2,50,000/- करीता रसिद नं.5585 दिनांक 2.8.2011 व रसिद नं.2414 दिनांक 1.12.2010 व्दारे विरुध्दपक्ष यांनी अर्जदार तर्फे आममुखत्यारधारक श्रीमती गौतमी अशोक डोंगरे यांनी अग्रीम रक्कम म्हणून दिली होती. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांचेकडून मौजा – वाघधरा, खसरा नंबर 94, प.ह.नं. 46, तहसिल – हिंगणा, Phase-IV फ्लॅट क्र.60, 61 कन्हैया सिटी-1 करीता अग्रीम रोख रक्कम रुपये 2,50,000/- दिनांक 2.8.2011 रोजी घेतली. तक्रारकर्ता यांनी वारंवार विरुध्दपक्ष यांना विनंती केली की, आम्हीं ज्या ले-आऊटची फ्लॅट बुकींग केले आहे त्याची आम्हांला विक्रीपञ करुन द्यावे, परंतु विरुध्दपक्ष यांनी जाणून-बुजून हेतुपुरस्परपणे खरी स्थिती स्पष्ट करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर, तक्रारकर्त्याने बरेचदा विरुध्दपक्षास प्रत्यक्ष भेट घूवन देखील तक्रारकर्ता यांनी वरील ले-आऊटमधील फ्लॅटचे विक्रीपञ करुन दिले नाही. आममुखत्यार श्रीमती गौतमी अशोक डोंगरे ह्या तक्रारकर्ता अनिरुध्द यांची आई आहे. श्री अनिरुध्द हे इग्लंड येथे शिकत आहे व त्यास U.S.A. मध्ये M.S. करण्याकरीता पैशाची आवश्यकता असल्यामुळे दिनांक 20.10.2015 रोजी रुपये 5,00,000/- परत मागितले. परंतु, विरुध्दपक्ष यांनी रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्ष यांनी कन्हैया सिटी-1 फेज- IV, फ्लॅट क्र.60, 61 च्या मोबदल्यात आजच्या बाजार भावाप्रमाणे रक्कम तक्रारकर्त्यास देण्यात यावी.
2) जर हे जर शक्य नसल्यास तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये 2,50,000/- यावर 24 टक्के व्याजासह मंजूर करण्यात यावे.
3) तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देण्यात यावे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्षाला नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्षास मंचाची नोटीस निशाणी क्र.6 प्रमाणे मिळूनही हजर झाले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी क्र.1 दिनांक 18.8.2016 पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले.
5. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवादाकरीता पुरसीस दाखल केली. तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. आममुखत्यार श्रीमती गौतमी अशोक डोंगरे यांनी आपला मुलगा श्री अनिरुध्द अशोक डोंगरे याचे नावाने विरुध्दपक्ष यांचे ले-आऊट मौजा – वाघधरा, खसरा नंबर 94, प.ह.नं. 46, तहसिल – हिंगणा, Phase-IV फ्लॅट क्र.60, 61 कन्हैया सिटी-1 मध्ये रोख रक्कम रुपये 2,50,000/- रसिद क्रमांक 5585 दिनांक 2.8.2011 ला विरुध्दपक्षाकडे जमा करुन आरक्षीत केले होते. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षास आरक्षीत फ्लॅट क्र.60, 61 चे विक्रीपञ करण्याकरीता वारंवार विनंती केली, परंतु, विरुध्दपक्ष यांनी टाळाटाळ केली.
7. तक्रारकर्ता यांनी निशाणी क्र.3 नुसार दस्ताऐवज दाखल केले असून त्यात दस्त क्र.1 वर कन्हैय्या सिटीची रसिद क्र.5585 जोडली आहे, दस्त क्र.5 वर नकाशाची छायाप्रत, दस्त क्र.7 वर आममुखत्यार पञ दाखल केले. नि.क्र.5 नुसार मंचातर्फे विरुध्दपक्ष यांना दिनांक 23.5.2016 रोजी मंचामध्ये उपस्थित राहण्याकरीता नोटीस पाठविली. मंचाची नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष मंचात हजर झाले नाही, करीता दिनांक 18.8.2016 रोजी मंचाने विरुध्दपक्षाचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत केला. वास्तविक, इतकी मोठी रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा असतांना तक्रारकर्ता तर्फे आरक्षीत फ्लॅट क्र.60, 61 ची उर्वरीत रक्कम घेवून विक्रीपञ करणे व त्याचा ताबा देणे आवश्यक होते. परंतु, विरुध्दपक्ष यांनी विक्रीपञ करुन न दिल्यामुळे आममुखत्यार श्रीमती गौतमी अशोक डोंगरे यांचा मुलगा तक्रारकर्ता अनिरुध्द यास शिक्षणाकरीता ञास सहन करावा लागला. विरुध्दपक्षाचे गैरवर्तणामुळे तक्रारकर्त्यास आर्थिक, शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे विद्यमान मंचातर्फे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, मौजा – वाघधरा, खसरा नंबर 94, प.ह.नं. 46, तहसिल – हिंगणा, Phase-IV, कन्हैया सिटी-1 येथील फ्लॅट क्र.60, 61 पोटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे जमा केलेली रक्कम रुपये 2,50,000/- दिनांक 2.8.2011 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह परत करावे.
(3) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, विरुध्दपक्ष यांच्या सेवेतील ञुटीमुळे तक्रारकर्त्यास नमूद परिस्थितीमध्ये झालेल्या आर्थिक, मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 10,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(4) तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(5) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिण्याचे आत करावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 23/12/2016